डॉ. सई लळीत

सासूच्या चपळाईने आणि कामाच्या उरकाने गावी आलेल्या दोघी सुना दोन दिवसांपासून पासून हैराण झाल्या होत्या. आपण हिच्या मदतीला आलोय की खजील व्हायला आलोय हेच त्यांना कळत नव्हतं. हे असं दरवेळीच व्हायचं म्हणा, पण प्रत्येक वेळी येताना वाटायचं, या वेळी म्हातारी थकली असेल जास्त. पण कसलं काय! म्हातारी ताजीतवानी दिसायची.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
Mahavikas Aghadi candidate of Chandrapur Vani Arni Lok Sabha Constituency MLA Pratibha Dhanorkar has filed his second nomination form Chandrapur
“मी रडणार नाही, तर लढणार,” प्रतिभा धानोरकर यांचे शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

नातवाने घराला लागून असलेल्या बाहेरच्या खोलीतून ‘‘आईऽऽऽ’’ अशी हाक मारली. आजी बाहेरच होती. पटकन पायऱ्या वगरे न ओलांडता आजीने व्हरांडय़ातून खाली उडी मारली.

‘‘काय रे..’’

‘‘काही नाही. कोकम सरबत हवं होतं.. डोकं खूप दुखतंय!’’ अध्रे केस पिकलेला तिचा तिशीचा तरुण नातू म्हणाला.

‘‘आता आणते.’’ म्हणत परत आजी पायऱ्या न चढता व्हरांडय़ात उडी मारून पसार झाली. मागाहून हळूहळू पायऱ्या उतरून येणारी तिची साठीची सून थक्कच झाली. दुखणारे गुडघे तिला जास्तच जाणवले. दहा-पंधरा मिनिटं होताहेत तोपर्यंत आजी एका हातात सरबताचा ग्लास आणि एका हातात वाटी घेऊन आली.

‘‘वाटी कसली?’’

‘‘हे घे सरबत. जिऱ्याची पूड टाकलीय त्यात आणि हे वेखंड आणलंय उगाळून. कपाळाला ओढा दे जरा. वासानेच बरं वाटेल तुला.’’ आजी हसत म्हणाली.

सुनेला, सुचेताला हसू आलं नाही. तिने कोपराने दुसऱ्या जावेला ढोमसलं. तिने तोंड वाकडं करून नाक उडवल्यावर दोघींनाही हसू आलं.

सासूच्या चपळाईने आणि कामाच्या उरकाने दोघी दोन दिवसांपासून हैराण झाल्या होत्या. आपण हिच्या मदतीला आलोय की खजील व्हायला आलोय हेच त्यांना कळत नव्हतं. काल तर गंमतच झाली. सकाळी नळाचं पाणी आलं. आयसीयूत इमर्जन्सी आल्यासारखी म्हातारीची धांदल उडाली. अध्र्या भरलेल्या कळशा घेऊन धावतेय नुसती!

‘‘ओ थांबा मी देते आणून.’’ (झेपत नसताना सुचेता म्हणाली) ‘‘जरा घासायला पण हव्यात कळशा. आम्ही दोघी भरतो पाणी. तुम्ही बसा बाहेर!’’ (कसं पाणी भरतोय ते बघत बसू नका. थोडक्यात..) मग दोघींनी हंडा कळशी घासून पाणी भरलं. िपप, बादल्या, मोठी पातेली, तपेली सगळं शिगोशिग भरून ठेवलं. सुचेता सहज बाहेर गेली. परडय़ाच्या कोपऱ्यात काहीतरी हालल्यासारखं वाटलं. बघते तर काय तिथल्या डोणीजवळच्या नळाजवळ म्हातारी बादली भरत उभी.

‘‘कशाला गेलात दगडा-धोंडय़ातून?’’ सुचेता आवाजात शक्य तितका कमी वैताग आणत म्हणाली.

‘‘बाहेरच्या बाहेर पाय धुऊन घरात यायला गावतं. काल पाच वेडे राघू पाणी पीत होते. बुलबुल पण येतात. कवडे तर काय विचारायलाच नको. गरुड पण आला होता एकदा..’’ म्हातारी डोळे चमकवत म्हणाली. (हुं.. विष्णूकडे जाताना मध्येच तहान लागली असेल.) ‘‘राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करायला हवंय आपलं परडं!’’ सुचेता हसत म्हणाली, ‘‘आणि तुमचा पाय मुरगळला (मोडला) असता तर? केवढय़ाला पडलं असतं?’’

‘‘किती जपायचं जिवाला? मोडला तर मोडला पाय! काय व्हायचं ते होईल.’’ ती निर्विकार आध्यात्मिक चेहरा करत म्हणाली. समोरच्याला निरुत्तर करण्याचं ट्रेिनग ती जन्मजात घेऊन आली होती.

(‘‘तुमचं काय? तीन पायांची शर्यत आमची होणारंय,’’ दोघी मनातल्या मनात म्हणाल्या.)

सकाळी न्हाणीतला विस्तव पेटत नव्हता. कुठेतरी जरासं धुमसत होतं (घरात पण). आजी आली आणि फुंकणीने फुंक मारून गाल फुगवून असा वारा दिला की विस्तव धडाधडा पेटायला लागला. लाल लाल अग्नी फुलं हंडय़ा खाली रसरसायला लागली. आपल्याला साधा फुगा फुगवता येत नाही.

सुचेता वैनीला अचानक नवऱ्याविषयी नुस्ता संताप दाटून आला. ‘आईच्या मदतीला जा. म्हातारी एकटी पडलीय. या वयात तिला एकटं ठेवणं बरोबर नाही.’ म्हणून महिनाभर त्याने नुसता धोशा लावला होता. म्हणून मुंबईहून मुलाला रजा घ्यायला लावून ती इथे लगबगीने म्हातारीच्या सेवेसाठी आली होती. तर इथे आजी तिच्यापेक्षा चपळाईने घरभर वावरत होती. हे असं दरवेळीच व्हायचं म्हणा, पण प्रत्येक वेळी येताना वाटायचं, या वेळी म्हातारी थकली असेल जास्त. पण कसलं काय! म्हातारी ताजीतवानी दिसायची.

‘‘आज भाजी कसली करू या गो? फणसाची करू या?’’

‘‘नको, अकरा वाजले आता. याच्या पुढे फणस फोडणार कधी आणि गरे सोलणार कधी? बटाटय़ाची करू या.’’

‘‘बटाटय़ाची काय, तुम्ही रोजच खाता. नंतर म्हणाल गावी काय मजाच नाही आली. ए नातवा.. जरा फणसाचे दोन तुकडे करून दे. मी बसल्या बसल्या विळीवर चिरून देते.’’ नातवाने एक घाव दोन तुकडे केले. म्हातारीने फटाफट फणसाचे छोटे छोटे तुकडे करून भाजीचा ढीग लावला. दोन्ही सुनांना गरे सोलायला लावून आतून वरवंटा घेऊन आली. आठिळ्या फोडल्या. ‘‘या आता सोला तुम्ही. मला नखं नाहीत ना?’’ असं म्हणून प्रसन्न हसली. (हुं. हसायचं काय त्यात. अरे देवा मोठय़ाने हसता नये. हाच वरवंटा घालायची डोक्यात- सुचेता)

‘‘अरे बापरे काय ही म्हातारीची ताकद. फणसच काय, फणसाचं झाड पण तोडू शकते ही.’’ शैलाच्या मनात आलं, ‘‘खरं म्हणजे म्हाताऱ्या आम्ही होतोय आता! ही ती स्टेज ओलांडून केव्हाच पुढे गेलीय.’’

‘‘चुलीवर करू या ना भाजी?’’

‘‘कशाला? गॅसवरच करू या.’’

‘‘गॅसवर काय तुम्ही रोजच खाता. चुलीवरची भाजी टेस्टला बरी लागते!’’ म्हातारी पानाचा रस गिळत म्हणाली (अजून एक दोन वर्षांनी मस्तानीसारखा पानाचा रस उतरताना दिसेल गळ्यातून. दिवसेंदिवस तरुण होत चाललीय ना ती..).

सुचेता वैनी नेहमीप्रमाणे तिच्या उत्साहाने थक्क-बिक्क झाली. ‘‘बरं करा चुलीवर.’’ ती मोठय़ा उदारपणे संधी देत म्हणाली.

म्हातारीने भराभर चूल पेटवली. (म्हातारी म्हणायचं सुख घ्यायचं एवढंच. ती बापडी काय म्हातारी व्हायस कबूल नाय.) मोठय़ा टोपाला खालून राखेचं थामण लावून चुलीवर टोप चढवला. भाजीला फोडणी दिल्यावर भाजी रटमटायला लागली तेव्हा कुठे ती दोन मिनिटं टेकली.

‘‘नारळ फोडून खोबरं कातून ठेवायला हवं,’’ ती पुटपुटली. शैलाने लगेच नारळ फोडायला घेतला.

‘‘मी देवू कातून?’’

‘‘नको खोवीन मी,’’ शैला जमेल तेवढय़ा नम्रपणे म्हणाली.

‘‘तुम्हाला उभ्याने कामं करायची सवय ना? म्हणून म्हणते गो. नाहीतर म्हणशील सासूने काम लावलं,’’ असं म्हणून तोंड उघडं टाकून ती खदाखदा हसली.

तिच्या प्रसन्न रूपापुढे हात टेकत शैलाने पण लाजत हसल्यासारखं करत थोडं तोंड उघडलं. दोन मिनिटं गेली असतील नसतील, ‘‘भाजी चाळवून बघायला हवी, नायतर लागेल खालून.’’ ती बसल्या जागेवरून ताडकन् उठत म्हणाली. ‘मी बघते’ असं म्हणायला एक क्षण शैलाला मिळाला नाही. म्हातारीने विस्तव कमी केला. वर झाकणावर थोडंसं पाणी ओतून ठेवलं. कोठी घरातल्या कुठल्याशा बरणीतलं शोधून जाडं मीठ घातलं. पांढऱ्या साडीतली पांढरेशुभ्र केस असलेली एखाद्या यज्ञीय देवतेसारखी पाकसिद्धी करायला धडपडत होती.

आता हिच्या वरताण कामं करायचं म्हणजेही प्रॉब्लेम आणि कमी काम करायचं म्हणजे लाज! म्हातारीने म्हणतात तशी पंचाईत करून ठेवलेली होती.

मुलांनी जेवताना आईचं भरपूर कौतुक केलं, त्यामुळे जेवणं लडिवाळ झाली. ‘‘एकच चपाती पुरे मला,’’ म्हातारी एक चपाती डब्यात टाकत म्हणाली. केली होती फक्त एक चपाती परत, पण चेहरा असा केला होता, जणू काय नवलाखांचा हार परत करतेय. (आठवणीने चपातीची जाड कडा बाजूला काढून ठेवणं आणि ते जाणवून देणं हे ओघाने आलंच) सुचेता हसलेली बघून नातू म्हणाला, ‘‘आजये डाएटिंग काय गे?’’

‘‘छे रे बाबा! सुनांचं डाएटिंग! माझं म्हातारीचं कसलं डाएटिंग?’’ एका वाक्यात धा बारा पक्षी मारत म्हातारी म्हणाली. या वाक्यानंतर गरम गरम भात ताटात वाढून घेताना सुनांना जरा कसंसंच वाटलं.

‘‘आमटी ढमक ढवळ झालीय. तिखट मीठाचा पत्ता नाही. भाताचा रंग पण बदलला नाहीय,’’ थोरला म्हणाला.

एकदम पिन ड्रॉप सायलेन्स.

म्हातारी हसू दाबत शैलाकडे एकटक बघत राहिली.

‘‘कालची मस्त झाली होती आमटी..’’ जेवणाचं पोस्टमार्टेम सुरू झालं

‘‘ती मी केली होती,’’ म्हातारी म्हणाली. ‘‘आजची भाजी बरी झालेय ना?’’

‘‘ए वन!’’

‘‘या भाजीसाठी तुझ्या पोटी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा.’’ दोघेही मनापासून (जरा अतीच) म्हणाले.

भाजीचं बेसुमार कौतुक झाल्यामुळे म्हातारीचा चेहरा नुसता फुलला होता. (आमचं नाही कधी कौतुक करत असं. दोघींच्याही मनात आलंच आणि नवऱ्याच्या आईवर पण जळतो आपण याची थोडी लाजही वाटली.)

दोघे उठून गेले. या दोघी गप्पा मारत थोडय़ा रेंगाळल्या. तोपर्यंत मागच्या बाजूला थोडी खुडबुड ऐकू आली. म्हातारीने झालेली भांडी घासायला सुरुवात केली होती. दोघीही मागे धावल्या तर म्हातारी भला मोठा भाजीचा टोप घासत होती.

‘‘टोप कशाला घासताय? ती घासेल उद्या सकाळी.’’

‘‘तिला उद्या खूप भांडी पडतील ना, म्हणून घासत होते. तिचा नाहीतरी जीवच ना?’’ म्हातारी कनवाळूपणे म्हणाली. (हे उगीचच.. एरवी चहाचा कप आणि तिच्यासाठी कोणीतरी ठेवलेली साडी द्यायला जिवावर येतं म्हातारीच्या.)

‘‘सगळी कामाची हौस तुम्हीच करा. तिला फक्त  चार ताटं ठेवायची आणि दर महिना पाचशे रुपये पगार द्यायचा.’’ सुचेता मनात पुटपुटली.

‘‘उठा आम्ही दोघी घासतो भांडी.’’

‘‘कशाला? चारच आहेत भांडी आत्ता होतील घासून.’’

‘‘नको उठा तुम्ही..’’

‘‘बघ हां नंतर म्हणशील सासवेने भांडी घासायला लावली!’’ (आणि वर परत ते हसू आहेच.. जगप्रसिद्ध)

नाइलाजाने ती उठली. यांची भांडी घासून होईपर्यंत काहीतरी झाकपाक करत किचनमध्येच घुटमळत राहिली. (त्यामुळे या दोघींना भांडी घासताना मजेत थट्टामस्करी करत बोलताही येईना.)

‘‘आपलं बॅडलक म्हणजे तिला अजून चांगलं ऐकायलं येतं,’’ शैला हळूच म्हणाली.

‘‘कायऽऽ ऐकू नाही आलं,’’ सुचेता म्हणाली.

दोघीही जीव जाईपर्यंत हसल्या.

‘‘काय झालं गो? हसताय कशाला?’’

‘‘काय नाय. असंच आपलं. मुंबयच्या गोष्टी.’’

‘‘चल पडू या जरा.’’ दोघींनी माजघरात चटई टाकली. उशा घेऊन फॅन लावून पाठ सरळ करतायत तोपर्यंत म्हातारी आलीच.

‘‘इथे वारा छान येतो न? खोलीत खूपच उकडतंय.’’ म्हातारी बाजूलाच लवंडत म्हणाली. (जरा म्हणून गॉसिपिंग करता येत नाही.. नुस्ती नजरकैद.)

एवढीशी तिची ती कुडी बघून सुचेताचं मन भरून आलं. त्यातल्या त्यात आनंद मिळवण्यासाठी धडपडते बापडी! छळ म्हणावा तर काही नसतो तिचा. का आपण रोखत असतो तिला? सुखाच्या आड येऊन तडमडत असतो. पाच मिन्टं एक्या जाग्यावर बसत नाही. आपल्या महिला मंडळात खरं तर इंटरव्ह्य़ू घ्यायला हवा तिचा. डाएट, योगा, पॉझिटिव्ह थिंकिंग सगळं काखोटीला मारून फिरत असते दिवसभर.

‘‘पायांची फुटाफुट होतेय नुस्ती. नाचानाच खूपच होते माझी.. सगळं नीट अकरेखून ठेवावं लागतं ना? सगळ्यांना नुस्ती आई हवी. आई हे कुठे आणि आई ते कुठे? मी म्हटलं आता आपापल्या बायकांना सांगा काय ते. आई कितीशी पुरणारेय?’’ बोलताना दूध मासे खाऊन सुखावून मिश्या चाटणाऱ्या मांजरीसारखा तिचा चेहरा दिसत होता.

मग काय तान्ह्य़ा मुलांच्या तान्ह्य़ा बायकांना पहिल्यांदाच जाम हसू आलं आणि मग झोपेचं नाटक करता करता खरंच झोप लागली.

saeelalit@gmail.com

chaturang@expressindia.com