scorecardresearch

 दुरून डोंगर साजरे

मनातलं कागदावर

 दुरून डोंगर साजरे
(संग्रहित छायाचित्र)

उमा बापट

रक्त देऊन घरी परत येताना अण्णा वाट वाकडी करून वेगळ्याच रस्त्यानं जाऊ लागले. वाटेत इमारत लागली ‘सुखसदन’. ते तडक आत शिरले गेटमधून. समोर काऊंटरवर एक हसतमुख प्रौढ स्त्री बसली होती. ‘‘या, या.,’’ त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं. ‘‘एकटेच आलायत की बरोबर आहे कुणी?’’ बाईंनी विचारलं. ‘‘बरोबर कुणी कशाला हवंय? माझा निर्णय आहे, मी पैसे भरणार आहे. झालंच तर धडधाकट आहे मी. समजलं?’’ अण्णा तिरसटून उत्तरले..

अण्णा झोपेतून जागे झाले मात्र, त्यांची कपाळावरची नस संतापाने फुगली. त्यांना बेड-टी लागत असे. बायकोनं लगेच सुनेला वर्दी दिलीच, पण त्या वेंधळीनं पाच मिनिटांनी चहा आणून दिला. अण्णांनी दोन चुळा भरून टाकल्या. तोवर सुनेनं खोलीत चहा आणला होता. चहाचा कप पाहाताच ते फणकारून म्हणाले, ‘‘हुं! मला नकोय असला ‘लालबाग परळ’ चहा.’’ ते चवताळल्यासारखे होऊन, अजिजी करणाऱ्या बावळट बायकोवरही डाफरले. चहा लाथाडून चपला पायात सरकवत पाकीट घेऊन तरातरा सरळ बाहेर पडले. ते सगळ्यांवर कावले होते.

मुलगा, सून, बायकोही आपल्या पैशांवर टपले आहेत याची खात्रीच होती त्यांना. बायकोला ते माफ करायला तयार होते, कारण तिनं सेवेत कधीच कसूर केली नव्हती; पण ही नेभळट बाई हल्ली मुलासुनेला सामील होती. मुलं निघून जातील म्हणून धास्तावलेली होती.

‘‘व्हा चालते खुशाल. घर माझं आहे लेको समजलात? बाहेर काढीन एकेकाला. हुं!’’ ते स्वत:शीच फिस्कारले.

तरीही आपली आबाळ होतेय हे त्यांना सहन होत नव्हतं. ‘‘काय समजलात लेको. वीस वर्ष मॅनेजर होतो मी. पुढचं प्रमोशन शुअर होतं. डायरेक्टर खिशात होते माझ्या.’’ जाताना ते मिशीतच किंचित हसले. आज शुगर तपासायची होती. चहा प्यायचाच नव्हता; पण वेंधळ्या सुनेला झाडली ते बरंच झालं. अण्णा लॅबला गेले. रक्ताचा सँपल दिला. पैसे भरून बाहेर पडले तिथून.

वाटेत नेहमीच्या उडप्याकडे शिरले. सारं रिटायर्ड मित्रमंडळ आत बसलेलं होतं. ‘‘या या साखरसम्राट.’’ एकच पुकारा झाला. मधुमेहींमध्ये अण्णा सर्वात सीनिअर होते ना! मग सर्वानी पथ्य विसरून यथेच्छ चापलं. अण्णांनी तक्रारींचा पाढा घडाघडा वाचला. वेगवेगळी मतं व्यक्त झाली. विषय रंगला. अगदी चहाही झाला. सरवटय़ांनी बिल दिलं.

‘‘अण्णा, ऐका माझं. ‘सुखसदन’मध्ये एकदा चलून तरी पाहा. मीच जाणार होतो तिथे, पण होम मिनिस्टर तयार नाहीत.’’ सरवटे अण्णांना म्हणाले. मग सगळे बाहेर पडून घरोघरी पांगले. अण्णा घरी गेले तरी त्यांचा मूड बिघडलेलाच होता. दुपारी जेवणही त्यांनी नुसतंच चिवडलं. जेवून ते जरा आडवे झाले तोच दोघं नातू शाळेतून आले. येताच बॅगा भिरकावून त्यांनी घरभर दंगा सुरू केला. अण्णा कर्कश ओरडले त्यांच्यावर. दोघांना दणके घालावे असं त्यांना वाटलं, पण बायको मधे आलीच. अण्णा चिडीला आले.

दुपारी जेवल्यावर दोन तासांनी परत शुगर तपासायची होती. बायको जेवून पेंगुळली होती. अण्णांच्या डोक्यात काय आलं एकदम, त्यांनी चार कपडे, टूथब्रश, टॉवेल, चेकबुक अन् पैशाचं पाकीट एका पिशवीत भरलं अन् ते चपला अडकवून बाहेर पडले. बायकोचा डोळा लागला होता. रक्त देऊन परत येताना अण्णा वाट वाकडी करून वेगळ्याच रस्त्यानं जाऊ लागले. वाटेत ते थांबले एका सुबक इमारतीसमोर. सुंदर अक्षरांत नाव लिहिलं होतं- ‘सुखसदन’. क्षणभरच त्यांनी विचार केला असेल नसेल, ते तडक आत शिरले गेटमधून. समोर काऊंटरवर एक हसतमुख प्रौढ स्त्री बसली होती. ‘‘या, या.’’ त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं. ‘‘एकटेच आलायत की बरोबर आहे कुणी?’’ बाईंनी विचारलं. ‘‘बरोबर कुणी कशाला हवंय? माझा निर्णय आहे, मी पैसे भरणार आहे. झालंच तर धडधाकट आहे मी. समजलं?’’ अण्णा तिरसटून उत्तरले. अधीक्षिका बाई सगळं समजल्यासारख्या हसल्या. हा काही पहिलाच नमुना नव्हता.

‘‘पैसे ना? हो, हो, चेक चालेल की. फक्त हा फॉर्म आधी भरून द्या. हे घ्या पेन.’’ सगळे सोपस्कार झाले तशी बाईंनी गडय़ाला हाक मारली. ‘‘रघू ऽऽ जरा काकांचं सामान घे आणि त्यांना खोली दाखव. शेंडय़ांचीच खोली दे. अगदी सुखसोयीवार आहे आमचा वृद्धाश्रम. आवडेल इथे तुम्हाला.’’ बाई म्हणाल्या.

रघूबरोबर अण्णा खोलीत आले. पहिल्या मजल्यावरची टोकाची खोली होती. छान उजेड, वारा होता. अण्णा जरा सुखावले. रूममेट शेंडे मोठे गोष्टीवेल्हाळ गृहस्थ वाटले. त्यांनी हसतमुखानं स्वागत करून ओळख करून घेतली. मग अशाच गप्पा झाल्या. शेंडय़ांची पत्नी वारली होती. तिन्ही मुलं परदेशी होती. ते इथे दोन वर्षांपासून होते. ‘‘मी, मी..’’ अण्णा कसेबसे स्वर ताब्यात ठेवून बोलू लागले. ‘‘पै पै जोडून भला थोरला फ्लॅट घेतला, म्हातारपणी निवांत राहावं म्हणून, पण सांगतो तुम्हाला शेंडेसाहेब, एक क्षणाची शांतता नाही घरात. मुलगा लाख रुपये पगार मिळवतो. मग जा ना तुझी दंगेखोर पोरं घेऊन, चालता हो. घे वेगळी जागा. आमच्या डोक्याला का ताप?’’ अण्णांचा आवाज चढू लागताच शेंडे पटकन् म्हणाले, ‘‘अं हं अण्णासाहेब, अहो आपलं बी.पी. नाही चढू द्यायचं. शांत व्हा पाहू तुम्ही बरं. आजचा पेपर पाहिलात का? पंतप्रधान काय म्हणाले ते वाचा. व्हेरी इंटरेस्टिंग!’’ शेंडे चतुर होते. पटकन विषय बदलून अण्णांना थाऱ्यावर आणलं. मग राजकारणावर गप्पा अगदी तावातावानं झाल्या. अण्णा हळूहळू मोकळे होऊ लागले. दोघं दुपारच्या चहाला खाली गेले.

एका लांब मोठय़ा हॉलसारख्या जागेत लांबच लांब टेबलं मांडली होती. दोन चटपटीत मुली चटचट चहाचे ग्लास मांडत होत्या. ‘‘आजोबा, साखर की बिनसाखर?’’ एकीनं विचारलं. ‘‘बिनासाखर.’’ अण्णा उत्तरले. चहा बरा होता. मग शेंडय़ांबरोबर ते बाहेरच्या लाऊंजसारख्या जागेत गेले. तिथे मोठा टीव्ही होता. बसायला सोफे, खुच्र्या होत्या. बरेच जण टीव्हीवर बातम्या पहात होते. अण्णांना बरं वाटलं. घरी सदान्कदा मालिकांचं दळण चालू असायचं. स्वत:च्याच घरात मनासारखं काही करता येत नव्हतं.

शेंडय़ांनी बाकीच्यांशी ओळख करून दिली. सर्वाच्याच कहाण्या हळूहळू गप्पांतून उलगडल्या. थोडय़ाफार फरकानं सगळ्यांच्या व्यथा साधारण सारख्याच होत्या. शेजारच्या लहान खोलीत काही जण योगासनं करत होते, पण ऐच्छिक होतं ते. अण्णांना व्यायामाचा कंटाळा होता. काही वेळ ते बोलत बसले. मग मात्र ‘एक्सक्युझ मी’ म्हणत उठले अन् एकटेच बाहेरच्या आवारात चक्कर मारायला गेले. हिरवीगार झाडं, बसायची सिमेंटची बाकं, अण्णा उमललेच. ते परत आले तेव्हा अंधारलं होतं. ते आत आले. कुणी जप करत होते. कुणी नुसतेच डोळे मिटून बसले होते. बाकीचे अजून टीव्ही मालिका पाहात होते.

अण्णा परत खोलीत आले. काही वेळानं शेंडेपण आलेच. त्यांच्याशी बोलताना शेंडय़ांची हकिकत कळली. ‘‘अहो, बायको वारली तेव्हा तिघा मुलांपैकी कुणीही आलं नाही. मी एकटय़ानं सगळं केलं. फार भकास वाटायचं त्यानंतर. पुढे लगेचच मला अ‍ॅटॅक आला. मीच अ‍ॅब्युलन्स बोलावून स्वत:च अ‍ॅडमिट झालो. घरी कसाबसा आलो. कानाला खडा लावला. एकटं म्हणून राहायचं नाही. अहो, उद्या मेलो तर कुणाला पत्ताही नाही लागायचा.’’ बोलताना शेंडय़ांचे डोळे वारंवार भरून येत होते. अण्णांनी कसंबसं त्यांचं सांत्वन केलं. आपल्याला निदान बायको तरी आहे काळजी घ्यायला. अण्णांना वाटून गेलं.

सायंकाळचे आठ वाजले तशी जेवणाची बेल वाजली. शेंडय़ांबरोबर अण्णाही जेवायला डायनिंग हॉलमध्ये गेले. दोन गडी पानं मांडत/वाढत होते. हे दोघं जागा पकडून बसले. मस्त पालेभाजी अन् गरमगरम भाकरीचा बेत होता. अण्णांची कळी खुलली. घरी बटाटे, कोबी, फ्लॉवर खाऊन ते कंटाळून गेले होते. ते चवीनं जेवू लागले; पण त्यांच्या शेजारी बसलेले एक म्हातारे गृहस्थ इतके किळसवाणे जेवत होते की अण्णांना घास जाई ना. कसंबसं त्यांनी जेवण आटपलं.

खोलीत येऊन ते मासिक चाळत पडून राहिले. जरा थकवा वाटत होता. पावणेदहाला शेंडे बातम्या बघून परत खोलीत आले. परत माफक गप्पा झाल्या. दहाच्या ठोक्याला सगळ्या खोलीतले दिवे एकसाथ बंद झाले. नाइटलॅम्प तेवढे चालू होते. अपुऱ्या उजेडात अण्णांनी औषधाच्या गोळ्या कशाबशा शोधून घेतल्या. दहाच मिनिटांत शेंडे गाढ झोपले. अण्णांचाही बऱ्याच वेळानं डोळा लागला; पण शेंडे भयंकर मोठय़ानं घोरत होते. त्यामुळे झोपमोड झाली. मग अण्णा मेंढय़ा मोजत राहिले. पहाटे जरा डोळा लागतो न लागतो तोच कर्कश बेल सर्वत्र वाजली. रघूची आरडाओरड चालू झाली. ‘‘चला दादानू, बिगी बिगी त्वांड ध्वा. चा ठंड होती बघा.’’

आधी प्रार्थना, मगच चहा ही माहितीही मिळाली. अण्णाचा बेड-टी घरीच राहिला.

अण्णांनी एकटय़ानंच जागा पकडली. ‘शेंडय़ांना घोरण्याबाबत झाडावं का? राहू दे. सध्याच नको.’ त्यांनी ठरवलं.

कालच्याच दोघी मुली चहा, नाश्ता देत होत्या. एकीनं चहाचा ग्लास पुढे ठेवला. दुसरीनं विचारलं, ‘‘पोहे की उप्पीट?’’

‘‘पोहेच दे.’’

वास तर खमंग येत होता. पिवळे पोहे, वर हिरवी कोथिंबीर, पांढरंशुभ्र खोबरं, वर परत शेव पेरलेली. अण्णा कौतुकानं खाऊ लागले; पण चारच घासांनंतर एक लांब गुंतवळ डिशच्या बाजूने लोंबताना दिसली. अण्णांनी स्वत:च्याही नकळत डिश आदळली. ते चिडून ओरडू लागले. पोहे बाजूला विखुरले. गोंगाट ऐकून कालच्या अधीक्षिका लगेच आल्या. ‘‘आजोबा, चुकून झालं. रागावू नका. अशी सांडलवंड करू नये.’’ त्या समजुतीच्या स्वरात बोलू लागल्या. ‘‘मंदा, आजोबांना उप्पीट आणून दे बरं पटदिशी.’’ बाईंनी परिस्थिती नीट हाताळली.

पण अण्णांचा राग काही कमी होत नव्हता. उप्पीट थोडं खाऊन ते उठलेच. लगोलग आंघोळीला रांग लावायची होती. बऱ्याचशा स्वच्छ बाथरूम्स होत्या. अण्णांनीही नंबर लावून घेतला. आंघोळ उरकली. मग अशाच गोष्टी घडत राहिल्या आणि मुख्य म्हणजे अण्णांचं मन बऱ्यापैकी थाऱ्यावर येऊ लागलं होतं. बोलताना शेंडे सहज बोलले जे अण्णांना भावलं, ‘‘तर काय सांगत होतो अण्णासाहेब, ‘तडजोड’ हा एकच शब्द सारं सोपं करून सोडतो बघा.’’

दोन-तीन दिवसांनंतर एक दिवस त्यांनी परत पिशवी उचलली. सामान भरून ते खाली ऑफिस काऊंटरजवळ आले. आधी निरोप घेऊ सगळ्यांचा, त्यांनी ठरवलं. ते लाऊंजमध्ये गेले. आपला निर्णय सांगितला सगळ्यांना. ओळख ठेवण्याचं आश्वासन देऊन ते निघालेच. ‘‘पैसे नकोत मला परत, तुम्हाला देणगी समजा.’’ ते बाईंना म्हणाले. बाई सगळं समजल्यासारख्या हसल्या. ‘‘पैशांची काळजी करू नका आजोबा. चेकनं पैसे घरपोच येतील.’’

अण्णा हुरहुरत्या मनानं घराकडे निघाले. ‘त्याला काय होतंय? आपलंच तर घर आहे. होईल थोडा अपमान तर सहन करायचा.’ शेंडय़ांचं बोलणं त्यांना आठवू लागलं.

ते घरी पोचले तर तिथे बायको देव पाण्यात घालून बसली होती. नातू ओरडत सुटले, ‘‘आजी, आई, आजोबा आऽऽऽऽले.’’ दोघं पिशवीला झटू लागले. खाऊ शोधू लागले. सून धावतच आली, ‘‘या, या ना, चहा करते भरपूर दुधाचा.’’ ती मऊ आवाजात म्हणाली.

‘‘दूर व्हारे शहाण्यांनो. आजोबांना आत तरी येऊ द्या.’’ ती नातवांवर कातावली.

अण्णांनी सोफ्यावर बसकण मारली. बायको पाणी घेऊन आली. तिचा चेहरा पडलेला होता. ती पुटपुटत बोलत होती, ‘‘अभी म्हणाला होता, की सरवटे बोललेत काहीसं, म्हणून मग पोलिसात नाही गेला तो. उगीच बोभाटा झाला असता. चला पण, आलात सुखरूप; पण असे कसे गेलात न सांगता?’’

अभी ऑफिसमधून हाफ डे टाकून आला. येताच नमस्काराला जवळ वाकला. ‘‘अण्णा, प्रमोशन मिळालं एकदाचं,’’ तो आनंदानं म्हणाला.

अण्णा आशीर्वाद पुटपुटले.

नातू दोन्ही बाजूंनी बिलगले. मिशा ओडू लागले. त्यांचे मऊ गाल आजोबांच्या खरबरीत गालावर घासू लागले. अण्णांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर वाहू लागले. चष्मा धुरकट झाला. नातवंडांना कुरवाळत ते स्वत:शीच म्हणाले, ‘‘हे खरं ‘माझं’.. नाही नाही ‘आपलं घर’.’’ एका शब्दानं किती परक पडला अण्णांना वाटून गेलं.

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या