टबुली

पाच वर्षांची टबुली, माझ्या मुलाची मुलगी

Preparing Your Child for a New Sibling, children, sibling rivalry, Chaturang, Chaturang news, Loksatta, Loksatta news

टबुलीच्या जीवनात आता भागीदार येणार. तिच्या मम्मी-डॅडीच्या विश्वात तिच्याशी स्पर्धा करणारा तुल्यबळ भागीदार येणार होता. ती तर पूर्ण अनभिज्ञ होती. मला एकदम तिची कणव आली. तिचा निष्पाप, निरागस, चेहरा मी वाचू लागले. उरात ममत्व उचंबळून येऊन मी तिची पप्पी घेत राहिले..

पाच वर्षांची टबुली, माझ्या मुलाची मुलगी! तिची आई माझी सून! टबुलीचं व माझं नातं तसं तिखट! टबुली माझ्याजवळ फारशी फिरकायची नाही. सुनेची अकरा ते चार पार्ट टाइम नोकरी! तेवढय़ा वेळात मी तिची देखभाल करायची. जेवण देणं व झोपवणं! ती उठे तोपर्यंत तिची मम्मा हजर असायची. संध्याकाळी पाच ते आठ माझं सोशल वर्क! टबुलीशी थोडं खेळणं, गप्पा, गोष्टी असं चालू असायचं!
‘‘सारखं काय मी, माझी मम्मा, माझा डॅडी.. आजी नव्हे का कोणी तुझी?’’ मी.
‘‘तू तर सगळ्यांची आजी आहेस, पिंकी, चिंक्या दादाची.. मम्मा डॅडींची फक्त मी.,’’ टबुलीचं उलट उत्तर तयार असे. मी पण हसून तिचं कौतुक करत असे. कारण आम्हा उभयतांचा वानप्रस्थाश्रम चालू होता. ‘त्यांना त्यांचं जीवन जगू द्यावं.’ या विचारसरणीत सात र्वष गेली होती.. एकत्र राहत होतो, सुरळीत चालू होतं गाडं!
पण लवकरच मी, माझी मम्मा, माझा डॅडी हे टबुलीचं गणित चुकलं! नवी चाहूल लागली. सुनेचं फोनवरचं बोलणं कानावर पडलं, ‘कसं काय प्लॅनिंग चुकलं कुणास ठाऊक!’ तिला उलटय़ा सुरू झाल्या आणि माझं मन हरखलं! ‘हे सगळं फोनवर मैत्रिणीला सांगतीय..मला मात्र नाही..’ चला वानप्रस्थाश्रमाची एक पायरी चढा.. ‘या गोष्टी लपून राहणार आहेत थोडय़ा..!’ मी नाक वर करत गप्प बसले.
‘‘काय गं, दोन- तीन दिवस सलग उलटय़ा होत आहेत.’’ मी विचारलं. ‘‘हो आई, मी तुम्हाला सांगणारच होते.. बहुतेक काही गडबड..’’ ती ओशाळली.
‘‘अगं, तेच आहे.. वा, छान, अभिनंदन, काही काळजी करू नकोस, मी आहे, घाबरू नकोस’’ मी वानप्रस्थाश्रमाची एक पायरी खाली उतरले. तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले, तिनं स्पर्शानंच नाकारलं, ‘‘आई, पुष्करला बोलवा ना जरा.’’ तिनं मला कटवलं! पुष्कर पण धावत आला. दोघंही मला ढकलून निघून गेले..
झाला प्रकार टबुली कावरीबावरी होऊन पाहत होती. टबुल्याला त्या दोघांनी आपल्याबरोबर नेलं नव्हतं. ‘‘टबुल्या, टबुल्या, अगं तुझ्या मम्माला काही झालं नाहीये. तुला नाही का कधी कधी उलटी होत.’’ मी तिची समजूत घालत तिला कुरवाळत राहिले. एकदम जाणीव झाली. टबुलीच्या जीवनात आता भागीदार येणार. तिच्या मम्मी-डॅडीच्या विश्वात तिच्याशी स्पर्धा करणारा तुल्यबळ भागीदार येणार होता. ती तर पूर्ण अनभिज्ञ होती. आता स्वाभाविकपणे थोडी मागे पडणार होती. मला एकदम तिची कणव आली. तिचा निष्पाप, निरागस, चेहरा मी वाचू लागले. उरात ममत्व उचंबळून येऊन मी तिची पप्पी घेत राहिले.
‘‘सोन्या, मी आहे ना..’’ खूप गलबललं, किती तुटक वागत होते मी तिच्याशी! माझ्या स्पर्शातली ‘तिची आजी’, तिला जाणवली. ती पण निर्धास्त होऊन मला बिलगली. आश्वासक बनली.
‘‘ममाला काय झालंय आजी?’’
‘‘काही नाही, उलटी होतीय म्हटलं ना! चल आपण मम्माला बघून येऊ,’’
का कोणास ठाऊक, पण मन एकदम उल्हसित झालं! जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. मी पेलवीन सर्व, मदत करीन! मन वाऱ्यागत वाहवत राहिलं. विसावत राहिलं वाऱ्यावर..वय विसरून!
‘‘काही लागलं तर सांग, बरं वाटलं नाही तर, खावंसं वाटलं तर! आता मी सर्व करीन, टबुलीचं सारं बघेन, काळजी करू नकोस’’ मी उत्साहानं तिच्याजवळ आले बोलायला!
‘‘आई, सुरवातीला हे होणारच! आणि माझी ही दुसरी वेळ आहे. पहिली नव्हे.. आणि हे सगळं जितकं सहज घेता येईल तेवढं चांगलं!’’ तिनं मान फिरवत उत्तर दिले. मी हिरमुसले, मागे सरले. मागे टबुली उभी, माझा आधार घेत!
आता मी टबुली आणि तिची मम्मा यांचा लपंडाव सुरू झाला व टबुली आमच्यातला दुवा बनली. तिची तहान-भूक, खाणं पिणं, शाळेत जाणं-येणं झोपवणं, खेळवणं.. हळूहळू मी सारं बघू लागले. शाळेतून आल्यावर ‘आजी’ हाक येऊ लागली कानावर!
‘‘टबुली आधी युनिफॉर्म काढ, हातपाय धू, सगळं खायचं, पानात टाकायचं नाही..मग होमवर्क करायला माझ्याजवळ ये..’’ मम्मा म्हणाली.
‘‘मम्मा, तू झोप, आजी आहे ना!’’ टबुली सहज म्हणाली.
‘‘तर तर, आजी आहे ना. एरवी कोण करतं सगळं? आजी करते वाटतं हे सगळं?’’ सून तिरीमिरीत बाहेर आली. टबुलीला रट्टा मिळाला.
‘‘अगं मारू नको तिला, तू झोपून होतीस म्हणून करते मी सारं, तात्पुरतं!’’
‘‘काही नको, काही लाड करू नका तिचे! पाच वर्षांची घोडी झालीय ती!’’ आणखी एक रट्टा..टबुलीचं रडणं.!
काही दिवसांतच टबुली मोठी झाली वाटतं, हिला वाटतं म्हणून ही मोठी झाली, तिला आता सर्व समजलं पाहिजे अशी हिची धारणा बनत चाललीय? ‘‘अगं, तूच करतेस हे सर्व, तू जे सांगतेस, तेच मी करायला सांगतीय ना? का मारतेस तिला शाळेतून आल्यावर?’’ मी कळवळले.
‘‘आई, तुम्ही मधे पडू नका, फार शेफारलीय ती हल्ली..’’
हा नवीनच गुंता निर्माण होत होता. टबुलीचं मी सगळं करणं हे सुनेतल्या आईला दुखावत होतं. म्हणून वडय़ाचं तेल वांग्यावर निघत होतं! हा गुंता सोडवला पाहिजे. दुपारी सहज तिच्याजवळ गेले.
‘‘सुमी, हा थोडय़ा दिवसांचा प्रश्न आहे आणि मुलं कधी आईची माया विसरतात का? सध्या तुझी स्थिती नाजूक आहे. थोडा समजूतदारपणा दाखव.’’
‘‘हो, मीच नेहमी समजूतदारपणा दाखवायचा ना?’’ सून रागावली.
‘‘अगं, असं बोलू नकोस, देवाच्या दयेनं सगळं छान आहे. थोडी शांत हो! प्रसन्न राहा. हल्ली वाचतेस आणि ऐकतेस ना काही काही..या स्थितीत कसं राहावं ते..’’ तिच्या प्रतिसादाकडे लक्ष न देता मी बोलत राहिले. माझं समाधान होईपर्यंत! टबुली खूश होऊन ऐकत होती. अर्थ नाही, पण माझी तळमळ तिच्यापर्यंत पोचली होती. माझ्या मांडीवर पडून घुसळून घेत राहिली टबुली स्वत:ला!
आता टबुली शाळेतून आली, की मी तिला सांगायला लागले की आधी मम्माकडे जा! शाळेत काय झालं, काय खाऊ, काय नको सगळं मम्माला विचार. त्याप्रमाणे मी करायला लागले. टबुलीला पण हा सारा अर्थ कळला. ती गोड हसू लागली. गुंता कमी झाला. रोज असं घडू लागलं! प्रौढ वय, दगदग व ताणतणावांमुळे सुनेला बेड रेस्ट सांगितली.
‘‘आईला बोलावून घेते.’’ सून.
‘‘नको गं, आईला कशाला त्रास? मी आहे ना..’’ मी.
‘‘आईला कधी त्रास होतो का आपल्या मुलीचा?’’ सून.
‘‘मीपण आईच आहे ना? म्हणजे तू बोलाव आईला, पण त्यांना जमणार नसेल तर मी आहे. करू आपण सगळं नीट..’’ मी स्वत:ला सावरत म्हटलं!
‘‘पण आई ती आईच..’’ ती ठाम होती.
‘‘अगं, मान्य आहे मला, पण मी आईसारखी तर बनण्याचा प्रयत्न करतीय ना!’’
माझ्या डोळ्यांत पाणी तरळलं. दिवस-रात्र हिचा व टबुलीचा विचार चालू आहे.
‘‘आईसारख्या, पण आई नव्हे.’’
‘‘ठीक आहे, येऊ दे तुझ्या आईला..’’
‘‘परवानगी नकोय कुणाची मला.’’
‘‘नाही गं, तसं नाही, उलट मला त्यांची मदत होईल, आम्ही दोघी मिळून करू सारं. परवा मी डिस्कव्हरी चॅनलवर पाहत होते, इतर प्राण्यांमध्येसुद्धा माद्या लेकुरवाळ्या माद्यांना मदत करतात ते! अगदी वाघ-सिंह हिंस्र श्वापदांत असंच आढळतं.’’ मी हसत खेळत सांगत राहिले. ताण कमी करण्यासाठी ..खिलाडूपणे !
‘‘हो इतर माद्या मदत करत असतील, पण सासू नसते त्यात..’’
मी गप्प झाले—पिंजऱ्यातली वाघीण बनून!
टबुलीला आम्ही फिरायला घेऊन जात असू. सून पण हळूहळू रमायला लागली होती, आम्ही करतोय ते बघून! सतत फिरतीवर असणारा मुलगा पण जास्त काळ घरात राहू लागला. स्वयंपाकघरात लुडबुड करायचा. ‘‘आई, तुला खूप काम पडतं ना गं, मला सांग, मी मदत करीन!’’
मी त्या प्रौढ मुलाकडे अप्रूपतेने बघत राहायची. नातेसंबंध किती बदलतात ना?
‘‘सुमी, आई दादांना चार दिवस बाहेर जाऊन येऊ दे! नंतर जमणार नाही त्यांना. आपण करू सगळं, मी रजा घेतो.’’ मुलगा म्हणाला.
‘‘हो रे पुष्कर, मला पण तेच वाटतंय, आईंना जरा चेंज होईल. तेवढे दिवस माझी आई येईल. ‘‘मी हत्तीच्या सुपाएवढय़ा मोठय़ा कानानं ते ऐकत, डुलत डुलत राहिले. त्याच हिंदोळ्यावर चार दिवस लेकीकडे जाऊन आले. पण सगळा वेळ मनात अन् डोक्यात टबुलीच!
‘‘आई, मी तुझी मुलगी की टबुली.. सारखी तीच तुझ्या डोक्यात, जा बाई तू!’’ लेकीनं सांगितलं. आम्ही घरी परतलो. सुनेचा रोष, राग, कौतुक स्वागताला हजर! ‘‘घर डोक्यावर घेतलं टबुलीनं आजी-आजोबा कुठं आहेत, कधी येणार? माझी आई म्हणाली, ‘आजीनं फार लाडावून ठेवलंय.’’
‘‘नवीन बाळ आलं की मोठं थोडं बिथरतं, आधार घेतं! नाही म्हटलं तरी नवीनात लक्ष केंद्रित होतं..’’ मी बडबडले.
‘‘माझं होणार नाही तसं, दोन्ही लेकरं सारखीच प्रिय, दोघांवर सारखंच प्रेम करू आम्ही!’’
‘‘हो असं असतं ना आईचं हृदय? मग मी तुझ्या नवऱ्यावर, मुलीपेक्षा कमी प्रेम करते, असं म्हणत असतेसच ना?’’ मीपण टोमणा मारला. अगदी सा..सू..गि..री करत!
अशा तू तू मै मैं ला हृदयात नाही ठेवायचं हे मी शिकले होते. इतक्या दिवसांत सून वयानं लहान आहे. स्वत:च्या संसाराची, अस्तित्वाची स्वातंत्र्याची ओढ आहे तिला. हे सगळं तिचं आहे. देऊन टाकावं ओंजळ भरभरून तिचं तिला. वानप्रस्थाश्रमाच्या तीन-चार पायऱ्या चढल्या गेल्या!..
बाळाचा जन्म झाला, शस्त्रक्रिया करावी लागली. पण सर्व काही व्यवस्थित झालं! सुनेच्या आईनं तिचा ताबा घेतला व मी टबुलीचा! हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर टबुलीला (पर्यायाने पुष्करला, खरं तर मला) खूप ‘सूचना’ देऊन झाल्या, ‘‘टबुली डॅडीजवळ झोपायचं, त्याच्याकडून सगळं करून घ्यायचं, शाळेत जायचं, हट्ट करायचा नाही, डॅडीचं ऐकायचं..’’ आजी-आजोबांच्या नावाचा फळा पुसत, ‘डॅडी’ अक्षर कोरण्याचा प्रयत्न करत ती निघाली. ती खडूची धूळ डोळ्यांत पुसत राहिले मी! मनाच्या फळ्यावर ‘वानप्रस्थाश्रम’ अक्षर कोरत राहिले.
रात्र झाली. ‘‘मी आजीजवळ झोपणार. ‘‘टबुलीनं हट्ट केला. ‘‘टबुली मम्मानं काय सांगितलं आहे विसरलीस वाटतं? ती ओरडेल तुला नि मला.. चल, तुला गोष्ट सांगतो..’’ टबुलीच्या डॅडीचं एकही लालूच टबुलीला भावलं नाही, मम्मा नसल्याचं भांडवल केलं लबाड मुलीनं!
‘‘ओ. के. आपण असं करू, आजी तू, मी आणि आजोबा सगळे एकत्र झोपू. इथं हॉलमध्ये, चालेल..’’ माझा मुलगा एकदम लहान झाला.
‘‘आजी आपल्यासाठी गाणं म्हणेल..’’
‘‘गाणं नाही गोष्ट!’’
मी खुदुखुदु हसले, ‘‘काय पण घाबरून राहतोय एक माणूस आपल्या बायकोला. दडपणाखाली वावरतोय’’ मी त्याची चेष्टा केली. अगदी त्याची आई बनून!
‘‘आई तुला माहितीय, मला आज एकदम फ्री.. मोकळं मोकळं वाटतंय..’’ तो चक्क उडय़ा मारू लागला, ‘‘आग्य््रााहून सुटका. आता सुमी हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत मी रिलॅक्स होणार आहे. मग आहेच..’’ घोडय़ांच्या टापांचा आवाज काढत तो म्हणाला!
टबुली पण नाचू लागली, अर्थ न कळता! मी, पस्तिशीचा माझा मुलगा, पाच वर्षांची नात, साठीपुढचे आजोबा. आम्ही सर्व हसत राहिलो. बत्तिशीची माझी सून हॉस्पिटलमध्ये होती, तिचं दोन दिवसांचं बाळ तिच्यासोबत होतं..
..मी मात्र माझं वय मुळीच सांगणार नाही..! सगळे घरी आल्यावर काय राजनीती वापरून पुन्हा असाच आनंद कसा आणायचा याचा विचार करण्यात मी मग्न झाले होते ना, म्हणून..!
aneelagadre@yahoo.co.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनातलं कागदावर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Children feeling at the time of their sibling birth