दवांत भिजुनी पानं फुलं बहरली

गंध तयांचा सभोवार उधळू लागली

हासू लागली, डोलू लागली

उषेचे गीत नवे झंकारू लागली

वा! पांघरुणात शिरून जोजविणारी अश्विनाची पहाट. घरासमोरच्या वाटांनी धुक्याची शाल पांघरलीय असंच वाटतंय. अंगणातली शेवंती, जास्वंदीनं झुकलेल्या फांद्या आणि तो कोपऱ्यातला सोनचाफा तोही पहाटेच्या थंडीनं गारठून गेलाय. फांद्यांच्या कुशीतल्या कळ्या हळूहळू डोळे टक्क उघडून पाहू लागल्यात. हातातलं पेन वहीच्या कागदावर टेकवत मी तोंडासमोर हात धरला आणि वाफांचा एक ढग तोंडातून बाहेर पडला. इतक्यात दरवाजा उघडून आई बाहेर आली.

‘‘अगं तनू आत ये. बाहेर गारवा किती आहे!’’

‘‘हो गं आई’’, मी बसलेल्या खुर्चीतून मागे वळून न पाहता म्हटलं.

‘‘आधी आत ये तू. थंडीनं सर्दी खोकला व्हायचा.’’ आईच्या सूचनेवरून अखेर अंगणातून वही, पेनच्या लवाजम्यासहित मी घरात आले.

‘‘मस्त वाटतंय बाहेर. अंगणात बसल्या बसल्या कविता पण सुचली.’’

‘‘बरं बाई’’, हसून आई म्हणाली.

‘‘यंदा दहावी आहे. सर्दी-तापानं आजारी पडलीस तर शाळेला रजा होईल.’’ स्वंयपाकघरातून आईचं पालुपद सुरूच होतं. तिच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता मी कवितेचा कागद दप्तरात भरला आकाशला दाखविण्यासाठी. आकाशचं घर आमच्या घरापासून दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही पहिलीपासून एकाच वर्गात शिकत होतो. शाळेला एकमेकांच्या खोडय़ा काढत जायचो. मराठी माझा आवडता विषय, त्यात कविता तर खूपच आवडायच्या. आमच्या बालभारतीच्या कविता वाचून एकदा अति उत्साहानं मी ही कविता करायला घेतली. सहावीला वगैरे असेन. शर्यतीत हरलेल्या सशावरची कविता सर्वाना खूप आवडली होती. तेव्हापासून गट्टीच जमली कवितेशी. आकाश आणि माझी लहान बहीण रश्मी माझ्या कवितेचे पहिले वाचक असायचे. तू काय बुवा मोठी कवयित्री होशील अशी त्यांची मस्करी चालायची. त्यांच्या बोलण्याने हुरळून जायचे मी. नेहमीप्रमाणे आजची कविता वाचून आकाशने मनमुराद दाद दिली. ‘‘कवितेखाली सही कर की तन्वी सबनीस’’, कागद माझ्या हातात देत तो म्हणाला. ‘‘आठ दहा वर्षांनी तुझ्या कविता आम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील’’, त्याची थट्टा सुरू झाली..

‘‘आई गं सांग ना गवतफूल कसं असतं?’’ माझ्या हाताला धरून माझी छोटीशी लेक विनू विचारत होती.. मघापासून ती काहीतरी बोलत होती कवितेविषयी आणि कविता हा शब्द ऐकून मी बारा ते पंधरा वर्ष मागे भूतकाळात फेरफटका मारून आले होते. मांडीवरचा लॅपटॉप बाजूला केला. विनूच्या पुस्तकात इंदिरा संतांची ‘गवतफुला’ची कविता होती. विनूची छोटी बोटं कवितेच्या शब्दांवर नाचत होती. विनू माझी मुलगी दुसरीत आहे. इतर लहान मुलांसारख्या तिलाही नव्या शब्दांविषयी, वस्तूंविषयी शंका असतात.

‘‘तुझी मम्मी गणितं शिकवते मोठी मोठी, कविता नव्हे विनू.’’ उगीच मला छेडायचं म्हणून सलील म्हणाला. का कुणास ठाऊक त्याचा इतका राग आला, पण मी काही म्हणण्याआधीच त्याला हॉस्पिटलमधून फोन आला होता. नाश्ता संपवून बाय म्हणत तो घराबाहेर पडलाही. ‘‘नंतर सांग हा मम्मी,’’ असं सांगून विनी खेळायला गेली. मन काही शांत बसेना. पुन्हा पुन्हा भूतकाळाच्या बंद खिडकीपाशी घुटमळू लागलं आणि आठवला तो शेवटचा दिवस. दहावीचा मे महिना. परीक्षेचा ताण हलका झाला होता. त्यातच घरी बाबांनी बातमी आणली. त्यांची पुण्याला बदली झाली होती. आम्हाला सिंधुदुर्ग सोडावं लागणार या कल्पनेनंच मन निराश झालं. जाताना आकाशने निरोपाची भेट म्हणून कुसुमाग्रजांचं ‘प्रवासी पक्षी’ दिलं. खूप कविता कर तनू, कवितेला विसरू नकोस, तो म्हणाला. माझ्या डोळ्यांतले थेंब हातातल्या पुस्तकावर पडले. मागे वळून न पाहता मी परतले.

पुण्यात आल्यावर बाबांच्या इच्छेप्रमाणे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावी, बी.एस्सी. वर्षे भराभरा जात होती. रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुण्यातल्या महाविद्यालयात नोकरी मिळाली. चेस्ट स्पेशालिस्ट सलिलशी लग्नही झालं. नव्या शहरात नवी दुनिया वसवताना कविता कधी दूर गेली समजलंच नाही. हल्ली संदीप खरेंचे कवितेचे कार्यक्रम पाहून आई हळहळते. ‘माझी तनूही मोठी कवयित्री झाली असती,’ म्हणते. ‘तनूचं सगळं चांगलं चाललंय की, नवराही चांगला मिळाला,’ अशा शब्दांत बाबा तिची समजूत घालतात. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं चांगलं चाललंय. मात्र कविता.. तिची नाळ गावाच्या मातीशी घट्ट जोडली होती. आयुष्यात स्थीर होण्यासाठी धावत मी खूप पुढे निघून आले. पण ती मात्र एकाकी उरली. मंद पावलांनी माझ्या आयुष्यात आली. आनंदाचं झाड लावलं अन् निघूनही गेली. त्या आनंदाच्या झाडाकडे लक्ष द्यायला मला वेळ होता कुठे. तनूचं निरागस मन मी केव्हाच कुलूपबंद केलं होतं. त्याच वेळी कविता वजा झाली आयुष्यातून. कपाटातून आकाशनं दिलेलं ‘प्रवासी पक्षी’ बाहेर काढलं. गेली पंधरा वर्ष दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. पेन हातात घेतलं आणि कागदावर शब्द उमटले ..

‘दौडत जाई काळ ठेऊनी मागे

असे क्षणांचे ठसे

वालुकापात्र कण् कण् जसे

रिते रिते भासे’

एवढय़ात विनूने हाक मारली, ‘‘आई..’’ बापरे! तिची शाळेची तयारी, डबा सगळंच बाकी होतं. हातातला कागद टेबलवर टाकून मी किचनकडे धावले.

कविता.. ती अधुरीच राहिली,   आजतागायत अधुरीच आहे!

स्नेहा डोंगरे

sneha.dongare78@gmail.com