सेकंड ओपिनियन

आता मला खरंच काळजी वाटायला लागलीय.

प्रभाकर बोकील

‘‘बाबांना बघितल्याशिवाय किंवा निदान केस-फाईल स्टडी केल्याशिवाय दुसरे डॉक्टर तरी काय सांगणार? अन् डिस्चार्ज मिळाल्याशिवाय अशी हॉस्पिटलबाहेर फाईल बाहेर नेता कशी येईल तुला? त्याहीपेक्षा सेकंड ओपिनियन वेगळं असेल तरी निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.’’ मी सागरला सल्ला दिला.

‘‘हॅलो.. काका’’

‘‘हां, बोल सागर. बाबा कसे आहेत आता? आयसीयूमधनं आले बाहेर?’’

‘‘अजून नाही, काका. चोवीस तास मॉनिटिरगची गरज आहे, म्हणतायत. बीपी कंट्रोल करावं लागतंय, धाप लागतेय. ऑक्सिजन अधनंमधनं द्यावा लागतोय, पण आता किडनी काम करत नाहीयेत. डायलिसिस सुरू झालंय आठवडय़ातून तीनदा.’’

‘‘ओह.. माय गॉड! डायलिसिस.. मग डॉक्टर काय म्हणतायत?’’

‘‘इकडचे नेफ्रोलॉजिस्ट आहेत ते म्हणतायत, किडनीज नीट काम करत नाहीयेत, युरीन आउटपुट खूप कमी आहे. डायलिसिसला आता पर्याय नाही. कदाचित लाइफटाईम डायलिसिस लागेल.. आम्ही मनापासून प्रयत्न करतो आहोत, म्हणाले! काका, कशासाठी अ‍ॅडमिट केलं अन् चाललंय काय.. भलतीच गुंतागुंत सुरू झालीयत. डोकंच चालत नाहीये.’’

‘‘सेकंड ओपिनियन घ्यावंसं वाटतंय?’’

‘‘त्यासाठीच तुम्हाला फोन केला. सेकंड ओपिनियन घेऊन आपण आपला गोंधळ आणखीन तर वाढवणार नाही ना? अंधेरीला एक सीनियर कन्सल्टिंग नेफ्रोलॉजिस्ट आहेत. बाबांच्याच शाळेतल्या मित्राचे भाऊ,त्यांना जाऊन भेटावं, असं बाबादेखील म्हणतायत.’’

‘‘पण बाबांना बघितल्याशिवाय किंवा निदान केस-फाईल स्टडी केल्याशिवाय ते तरी काय सांगणार? अन् डिस्चार्ज मिळाल्याशिवाय अशी हॉस्पिटलबाहेर फाईल बाहेर नेता कशी येईल तुला? त्याहीपेक्षा सेकंड ओपिनियन वेगळं असेल तरी निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.’’

‘‘खरं आहे, पण आपण नक्की कुठे आहोत ते तरी कळेल. आज तरी मी दिशाहीन झालोय. अन् सध्या गेले दोन आठवडे जे चाललंय ते अगदी ऑब्झर्वेशन्स, रिपोर्ट्स, औषधं त्या डॉक्टरांना मी विस्तृतपणे सांगू शकतो. इकडचे इतर डॉक्टर्स, त्यांचे सहायक सगळ्यांशी मी चर्चा करत असतो सकाळ-संध्याकाळ. अन जे चाललंय त्याबद्दल, आता मला खरंच काळजी वाटायला लागलीय. एकीकडे युरीन आउटपुट कमी झालाय म्हणतायत, पण तो रेकॉर्डच केला जात नाहीय.. नर्सला विचारलं तर म्हणते, आम्हाला तशा सूचना नाहीत. सरप्राईझिंग!’’

‘‘ओके.. देन गो अहेड. सेकंड ओपिनियन घे मग. काय होतंय बघू मग.’’

* * * * *

‘‘हॅलो.. काका, बाबा आयसीयूमधून बाहेर आलेत. डिस्चार्जदेखील लवकर मिळेल, असं म्हणतायत.’’ सागर उत्साहात म्हणाला.

‘‘व्हेरी गुड. तुझ्या बाबालाच लवकर बरं वाटेल आता घरी गेलं की! फक्त डायलिसिससाठी आठवडय़ातून तीनदा जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. तिथे त्यावेळी चारपाच तास जातील. तेवढं तुम्हाला जमलं की झालं.’’

‘‘आठवडय़ातून दोनवर आलंय डायलिसिस. काका, सेकंड ओपिनियनचा उपयोग झाला.’’

‘‘अरे व्वा! काय म्हणाले ते डॉक्टर?’’

‘‘काही नाही.. या हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट त्यांचे स्टुडंटच निघाले. त्यांना सगळी केस समजून सांगितली. म्हणाले, हॉस्पिटल बदलू नकोस. चांगल्या सुविधा आहेत. सिटी स्कॅन – एमआरआयची प्रगत मशीन्स, २५-३० डायलिसिस मशीन्स आहेत. चांगले नामांकित डॉक्टर्स आहेत. काही डॉक्टर्स अग्रेसिव्ह असतात, त्याला इलाज नसतो. त्यातून अशा हॉस्पिटल्सना संलग्न असणं डॉक्टरांसाठी प्रेस्टीज असतं. त्यामुळे डॉक्टरांचे हातदेखील कधीकधी बांधलेले असतात. तुमच्या लक्षात येतंय ना मी काय म्हणतोय. पण काळजी नका करू. मी बोलतो तिकडच्या डॉक्टरांशी, असं म्हणाले!’’

‘‘मग?’’ ‘‘मग काय.. ते नक्की बोलले असणार इकडच्या डॉक्टरांशी. दुसऱ्याच दिवशी पुन्हा हॉस्पिटलच्या तिन्ही डॉक्टरांशी चर्चा केली. मी जरा जास्तच खोलात शिरतोय असं त्यांना वाटलं असेल म्हणूनदेखील असेल कदाचित, पण आता त्यांचा सूर बदललाय. आता डाएटीशियन पण येतात. बाबांचा युरीन आउटपुट सुधारलाय, तो व्यवस्थित पाहिला जातोय.  सुधारणा आहे असं डॉक्टरच म्हणतायत. असाच डाएट अन मेडिकेशन नियमित ठेवलं तर डायलिसीस कमी वेळा करावं लागेल, असंदेखील म्हणाले डॉक्टर!’’

‘‘अरे व्वा! एकदम चक्र कशी फिरली?’’

‘‘तीच तर गंमत आहे.. म्हणाले, आम्हाला सगळी काळजी घ्यावीच लागते, आम्ही कुठलाही चान्स घेत नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना काळजी म्हणून आधी कल्पना द्यावी लागते.. प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. रुग्ण आता चांगलं प्रतिसाद देतोय उपचारांना. काका, खरं सांगायचं तर आपल्यासाठी रुग्णाचा जीव सर्वात महत्त्वाचा असतो. पैशांचा प्रश्न नसतोच. इथंच सगळी गडबड आहे.. आता सगळा अंदाज येतोय, काका.’’ असं म्हणत सागर स्वत:शीच हसला.

‘‘बरं, त्या दिवशी विचारायचं राहून गेलं. विद्या काय म्हणतेय? कितवा, सातवा महिना लागला असेल ना? माहेरी जाणार असेल आता.. इथं तुझी ही धावपळ. हॉस्पिटलच्या चकरा. जबाबदारी अन् टेन्शनसुद्धा.’’

‘‘तिची वेगळीच कहाणी आहे. काका. बाबांना अ‍ॅडमिट केलं अन् माझी धावपळ सुरू झाली. आई रात्री इथं हॉस्पिटलमध्ये रहाते अन् दिवसभर मी असतो. बाबा अ‍ॅडमिट झाल्याचं कळल्यावर तिचे आईबाबा तातडीने आले होते. ते तिला तेव्हाच तिकडे घेऊन गेले. त्यात विद्याच्या पोटात भयंकर दुखायला लागल्यामुळे तिची अवस्था पाहून अ‍ॅम्ब्युलन्स करून ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, अन् तिला अ‍ॅडमिटच करावं लागलं. बाळ इतक्यातच खाली सरकल्यामुळे इमर्जन्सी निर्माण झाली होती. त्यात तिची शुगर वाढली. आता घरीच आहे विद्या. मात्र पूर्ण डाएट कंट्रोल, मेडिकेशन करून डॉक्टरांनी डिलिव्हरीपर्यंत बेडरेस्ट सांगितली आहे. वेगळं टेन्शन सुरूच आहे,’’

‘‘पण आता बरी आहे ना विद्या?’’

‘‘बरी आहे, काका. पण तिच्या पहिल्या डॉक्टरनं सुरवातीलाच, विद्याची तब्येत पाहून, पुढे त्रास होईल आईला अन् बाळाला म्हणून, पुढे जाऊ नका असा सल्ला आम्हाला दिला होता. तेव्हा आम्ही या आत्ताच्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेतलं. त्यांनी सगळं चेक करून, सोनोग्राफी वगैरे सगळ्या टेस्ट करून, सगळी परिस्थिती आम्हाला समजावून सांगितली. म्हणाले, असं आहे, एव्हरी चाईल्ड इज प्रेशियस. तुमचं पहिलंच बाळ आहे. आपण सगळी काळजी घेऊ. कुठल्याही इमर्जन्सीत अगदी मध्यरात्रीदेखील मला फोन केला तरी चालेल. डोंट वरी! म्हणून आम्ही पुढं गेलो. आमचा निर्णय चुकला तर नाही? पण त्यांना खात्री आहे.. म्हणतायत सगळं नीट पाळलं पाहिजे. बेड रेस्ट म्हणजे कंप्लीट बेड रेस्ट. अगदी अंघोळीलासुद्धा उठायचं नाही. आणि काका, हे मॅटर्निटी हॉस्पिटल अन् डॉक्टर ‘सिझेरियन’साठी प्रसिद्ध आहेत म्हणे!’’

‘‘सागर, त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस.. आणि ‘डोंट वरी. एव्हरी चाईल्ड इज प्रेशिअस’, हे डॉक्टरांचे शब्द विसरू नकोस.’’

* * * * *

‘‘हॅलो.. काका, आनंदाची बातमी! आम्हाला.. म्हणजे विद्याला.. मुलगी झाली!’’

‘‘ग्रेट! अभिनंदन तुम्हा सर्वाचं! विशेषत: विद्याचं. तिनं खूप सहन केलं.. कशी आहे ती? आणि हो, तुझे बाबा आता कसे आहेत?’’

‘‘विद्या आणि बाळ दोघंही छान आहेत. बाबादेखील आत्ता इथेच हॉस्पिटलात आले आहेत. नर्सने बाळाला गुंडाळून बाहेर आणल्यावर बाळाला प्रथम त्यांनीच घेतलं. त्यांचं प्रमोशन झालं ना! त्यामुळे आजी-आजोबा दोघेही खूश आहेत. आणि हो. त्यात आता त्यांना आठवडय़ातून एकच डायलिसिस. त्यामुळे एरवी नातीला खेळवायला मोकळे, म्हणून जास्त खूश आहेत.’’

‘‘चला, छान झालं सगळं. तुम्हा सर्वाचे तीन महिने तणावात गेले. या काळात बरंच काही शिकलास अनुभवाने, खरं ना?’’

‘‘खरं आहे काका.. तीन महिन्यांत तीन गोष्टी शिकलो. प्रत्येक रुग्ण वेगळा असतो, तसा प्रत्येक डॉक्टरही वेगळा असतो आणि प्रत्येक बाळ हे मौल्यवान असतं.. आणि हो, एक सांगायचं राहिलंच. डॉक्टरांनी सिझेरियनचीसुद्धा तयारी ठेवली होती.. आणि डिलिव्हरी नॉर्मल झाली!’’

‘‘पाहिलंस.. लोकांचं कुठवर ऐकणार? आपला अनुभव आपला गुरू..’’

‘‘मी त्यांना दोन्ही हात जोडून थँक्स म्हटल्यावर माझे हात पकडून म्हणाले, आभार देवाचे माना! त्या क्षणी मी चौथी महत्त्वाची गोष्ट शिकलो.. गॉड इज ग्रेट!’’

‘‘हे तू म्हणतोयस? तू नास्तिक आहेस ना?’

‘‘धिस इज माय सेकंड ओपिनियन!’’

pbbokil@rediffmail.com  

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनातलं कागदावर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prabhakar bokil article on second opinion

ताज्या बातम्या