उल्का कडले ulkakadlay@gmail.com

चहाचा कप घेऊन स्वाती नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन बसली. ही तिची आवडती जागा होती. खिडकीतून खाली गेटजवळ नवीनच आलेला वॉचमन रामपाल तिला दिसला आणि तिच्या कपाळावरील एक आठी गडद झाली. रामपाल आणि तिच्या कथेतील अशोक यांच्यामध्ये काहीही फरक नव्हता. सतत तो स्वरालीशी बोलत असे. स्वराच्या बोलण्यात सतत ‘रामपाल चाचा’ असे आणि स्वातीला ते  खटकत होतं, तिच्या कथेतील कुसुमसारखं..

त्या अतिशय अरुंद पायवाटेवरून एखाद्या नागिणीसारखी सळसळत कुसुम वाट काढत होती. दोन्ही बाजूला वाढलेलं गवत, झुडपं.. सहसा एकटं कोणी त्या वाटेवरून जायला धजावत नसे. बाई तर नाहीच नाही. कोण जाणे एखादं जनावर, खरंखुरं आणि माणसातलं, दबा धरून बसलं असेल तर? पण आज आता उपाय नव्हता. साडीचा पदर घट्ट कमरेकडे खोचून एका हातात साडी वर धरून ती तिच्या परीने जिवाच्या आकांताने भरभर चालत होती आणि दुसऱ्या हातात शेतावर काम करताना हातात असलेला कोयता तिने तसाच धरला होता; गरज पडलीच तर असावा म्हणून. चालताना त्या निर्जीव लोखंडी वस्तूचीच काय ती सोबत आणि आधार होता तिला. आज सकाळी नवरा तालुक्याच्या गावी गेल्यामुळे कावेरीला शाळेच्या फाटकापर्यंत सोडून कुसुम शेतावर कामाला गेली होती. शेतावर पोचून ती काम सुरू करणार इतक्यात कावेरीच्या शाळेतला प्रशांत तिला घराच्या दिशेने जाताना दिसला.

‘‘काय रे? परत का चाललास घरी?’’

‘‘आज शाळेला सुट्टी दिली. आताच जाहीर झालं.’’

‘‘अरे देवा! कावेरीला पाहिलंस का?’’ चिंता, भीती कुसुमच्या स्वरातून सहज जाणवत होती.

‘‘हो, ती गेली अमिताबरोबर; अमिताची आई पण सोबत होती.’’

कुसुमच्या जिवाचा भीतीने, कुशंकेने अगदी थरकाप झाला. त्यांच्या आळीत चार घरं सोडून नव्याने राहायला आलेल्या ‘त्या’ माणसाचा, अशोकचा, तिला फार संशय होता. काही न काही कारणाने तो कावेरीला जवळ घेत असे. खाऊ आणत असे. एकदा तर तिला सायकलवर बसवून फिरायला घेऊन जाणार होता म्हणे. नाही जाऊ दिलं तर कावेरी कित्ती रडली होती तेही आठवलं. पण हल्ली काहीबाही ऐकू येत असतं. कसा ठेवायचा विश्वास कोणावर? मग कुसुम तिच्या पाच वर्षांच्या कावेरीला डोळ्यात तेल घालून जपू लागली होती.

चालताना कुसुम स्वत:लाच दोष देत होती की कावेरीला फाटकातून आत नेऊन सोडलं असतं तर तेव्हाच कळलं असतं की आज शाळा नाहीये ते; आपण थोडं थांबायला तरी हवं होतं. पण आता वेळेत घरी पोचण्याशिवाय तिच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणूनच कधी नव्हे ती ही पायवाट आज तिने निवडली होती..

इतकं सगळं लिहून झाल्यावर स्वाती लिहायची थांबली. कथा पुढे कशी रंगवावी हे नीटसं तिचं ठरत नव्हतं. वरचेवर तिच्या वाचनात येणाऱ्या स्त्रियांवर व छोटय़ा मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांना, फसवणुकीला कथेच्या स्वरूपात मांडणं हे काही वाटलं तेवढं सोपं काम नव्हतं हे तिला लिहिताना जाणवू लागलं. कथा लिहिताना एका मुलीची आई म्हणून कुसुमची सहवेदना अनुभवणं जेव्हा तिला फार जड जाऊ लागलं तेव्हा तिने सध्यातरी लिहायचं थांबवावं असं ठरवलं. तसंही आता अर्ध्या तासात स्वराली शाळेतून यायची वेळ झाली होती. तेव्हा लॅपटॉप तसाच ठेवून ती उठली आणि तिने स्वत:साठी चहाचं आधण चढवलं. एकीकडे डोक्यात कथेचे विचार चालूच होते.

चहाचा कप घेऊन स्वाती नेहमीप्रमाणे खिडकीत येऊन बसली. ही तिची आवडती जागा होती. खिडकीतून खाली गेटजवळ नवीनच आलेला वॉचमन रामपाल तिला दिसला आणि तिच्या कपाळावर एक आठी गडद झाली. रामपाल आणि तिच्या कथेतील तो अशोक यांच्यामध्ये काहीही फरक नव्हता. सतत तो स्वरालीशी बोलत असे. स्वराच्या बोलण्यात सतत ‘रामपाल चाचा’ असे. आणि स्वातीला ते खटकत होतं. संजय पण सध्या बदली होऊन इंदोरला स्थायिक झाल्यामुळे स्वाती आणि सात वर्षांची स्वराली दोघीच मुंबईत होत्या. हे शालेय वर्ष संपलं की त्या दोघीही इंदोरला जाणार होत्या. पण तोपर्यंत तरी स्वातीवर हा मानसिक ताण खूप वाढला होता हे नक्की. या ताणातूनच तिच्या मनातील काल्पनिक भीतीनं डोकं वर काढलं होतं आणि तिनं ही कथा लिहायला घेतली होती. तर.. त्या रामपालला समज द्यायलाच हवी असं तिनं मनाशी ठरवलं.

चहा पिऊन झाल्यावर तिनं घडय़ाळात पाहिलं तर बस यायची वेळ झाली होती. विचारांच्या नादात तिचं वेळेकडे काहीसं दुर्लक्ष झालं होतं म्हणून ती स्वत:वरच वैतागली. तिने कप घाईघाईत ओटय़ावर ठेवला. नेहमीप्रमाणे त्यात पाणी घालायचंही भान आज तिला राहिलं नाही. लिहिलेली कथा तिने पटकन लॅपटॉपवर सेव केली. आरशात बघून स्वत:चा अवतार वरवर ठीक केला आणि घराची किल्ली घेऊन ती बाहेर पडली.

ती लॉक लावेपर्यंत नेमकी लिफ्ट वर आली. बघते तर त्यातून स्वराली आणि रामपाल बाहेर आले. स्वातीचा राग अनावर झाला आणि तो तिच्या चढलेल्या आवाजातून व प्रतिक्षिप्त क्रियेतून व्यक्त झालाच.

‘‘मै आ रही थी ना नीचे।’’ असं म्हणत स्वराला खेचून घेत तिने कोणाचा कसलाही विचार न करता जोरात दरवाजा बंद केला आणि स्वराला जवळ घेत तिने घाबरून विचारलं, ‘‘काय गं? तुला काही केलं नाही ना चाचांनी?’’

‘‘नाही. काय करणार?’’ स्वराचा निरागस प्रश्न.

स्वातीला तिला याहून स्पष्टपणे कसं विचारावं ते कळेना. तरीसुद्धा न राहवून तिने विचारलंच, ‘‘अगं, तुला त्यांनी कुठे हात वगैरे लावला होता का? जवळ घेतलं होतं का?’’

‘‘नाही गं आई. फक्त रस्ता क्रॉस करून दिला आणि माझी बॅग पण घेतली. आई, चाचा किनई खूप छान आहेत. ते ना मला..’’

‘‘स्वरा, आता पुरे हं! आवर तुझं.’’ स्वातीने रागाने टोकलंच.

स्वरा हिरमुसली; तरीही तिला आईला काहीतरी सांगायचं होतं. पण इतक्यात बेल वाजली म्हणून स्वातीने दरवाजा उघडला; तर दारात रामपाल उभा. स्वाती मगाशी गडबडीत सेफ्टी दरवाजा लावायला विसरली होती. तिने आधी तो त्याच्या तोंडावरच लावून घेतला आणि मग तिला बोलायला थोडा धीर आला. रामपालशी सारं संभाषण हिंदीतूनच होत असे.

‘‘काय पाहिजे?’’

‘‘मॅडम, तुम्ही स्वरा बेबीवर रागावू नका. आज बहुधा तिची बस नेहमीपेक्षा थोडी लवकर आली. बेबी रस्त्याच्या पलीकडे एकटीच उभी होती, ट्रॅफिकमध्ये. म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. गावी माझी पण पाच वर्षांची छोटुली लेक आहे, सलोनी. स्वरा बेबीला बघून तिची खूप आठवण येते आणि स्वरा बेबीशी बोलून, खेळून खूप आनंद मिळतो. पण यापुढे मी लक्षात ठेवेन. मला माहितीये की तुम्हाला आवडत नाही माझं स्वरा बेबीशी बोलणं, खेळणं. आजपासून तुमच्या परवानगीशिवाय मी कधीच तिच्याशी नाही बोलणार, खेळणार. तुम्ही निश्चिंत राहा. पण विनंती करतो की बेबीवर मात्र बिलकुल रागावू नका.’’ रामपाल अगदी कळकळीने बोलला आणि स्वातीच्या प्रतिक्रियेची वाट देखील न बघता खाली निघून गेला. स्वाती दरवाजा बंद करून तशीच दरवाजात उभी होती. सुन्न!

संजयने चार दिवसांपूर्वी फोनवर सांगितलेलं स्वातीला आता अगदी लख्ख आठवलं. तेव्हा तिला त्याचं कौतुक वाटलं होतं. किती उत्साहाने सांगत होता तो.. ‘‘शेजारच्या घरात राहणारी छोटी नेहा म्हणजे आपली स्वराच गं! आज मी स्वराला आणतो ना तशाच तिच्यासाठी पण कुकीज आणल्या. इकडच्या बेकरीत खूपच छान मिळतात. तुला आणि स्वराला नक्की आवडतील बघ. तुम्हाला कधी एकदा भेटतोय असं झालंय. तोपर्यंत नेहाबरोबर खेळून तिच्या रूपात आपल्या स्वराला भेटत असतो झालं.’’ हे ऐकून तेव्हा तिला त्यात काहीऽऽऽही वावगं वाटलं नव्हतं. पण त्याच प्रकारचं रामपालचं वागणं मात्र तिला खूपच खटकत होतं. अजबच न्याय होता हा स्वातीचा!

तरी तिची आई तिला कायम सांगत असते की, ‘थोडा विश्वास ठेवावा गं समोरच्यावर; सदा न् कदा संशय भरलेल्या सैरभैर मनाला स्वास्थ्य कसं लाभेल?’ आज स्वातीला तिच्या आईच्या बोलण्याचा प्रत्यय आला होता. एका परपुरुषात दडलेला ‘बाबा’ तिला आज रामपालमुळे नीट कळला होता. पूर्णत: निष्काळजी राहू नये हे जितकं खरं तितकंच अगदीच अविश्वास दाखवू नये, सतत संशयित नजरेने बघू नये हेही तिला पटलं होतं. स्वातीला तिच्या कथेचा शेवट सापडला होता. तिने आता ठरवलं होतं की तिच्या कथेतून ती कोणताही नकारात्मक संदेश देणार नव्हती; तर तिला मिळालेली विचारांची नवी दिशा ती इतरांना देणार होती.

‘मनातलं कागदा’वर साठी मजकूर पाठवताना

या सदरासाठी आपण कोणत्याही विषयावर लेख, कथा आदी ललित साहित्य पाठवू शकता. शब्दमर्यादा ५०० ते १००० इतकी आहे. लेखासोबत आपला दूरध्वनी क्रमांक तसेच घरचा पत्ता अवश्य पाठवावा. लेख संगणकावर ऑपरेट करून पाठवणार असल्यास तो daocx  आणि PDF या दोन्ही फाइलमध्ये पाठवावा. chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com यावर लेख पाठवावेत. हस्तलिखित पाठवण्यासाठी आमचा पत्ता : ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१०

chaturang@expressindia.com