|| वंदना धर्माधिकारी

एखादं झाड तयार करावं निसटलेल्या क्षणांचं, असं मनात आलं. त्याच रात्री घराच्या गच्चीवर भला मोठा चौकोनी वाफा करून झाड करायला लागले.आठवून आठवून अशा निसटलेल्या क्षणांना लटकवलं  मी तिथे, गच्चीवरील झाडावर. मोठमोठय़ा झुंबरांना कसे रंगीबेरंगी लोलक लटकवतात ना तसेच लोंबणारे हलणारे, डोलणारे ते क्षण चकाकतात मस्तपकी..

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

एखादी वस्तू हरवली तर ती शोधून काढता येते. कारण ती असते अशीच कुठेतरी पडलेली, अडकून बसलेली. सापडल्यावर खूप आनंद होतो, कारण त्यात आपला जीव अडकला असतो.. ज्याला आपण निर्जीव म्हणतो त्यातही आपला जीवात्मा असा घट्ट अडकतो, तर मग, ना ज्याला आकार, उकार, रूप, गंध अशा क्षणांचे काय? कसे जातात कुठे तरी न सांगता सावरता, हळूच चोरपावलांनी आलो, असं दाखवतात आणि लुप्त होतात. पटापट एकेक करीत कितीतरी क्षण घरंगळत जातात, निसटतात एकामागून एकेक.. त्यांची लागलेली चुटपुट जीवघेणी असते. पुन्हा नाही भेटत, हळवं मन कासावीस होतं. क्षणिक त्याच्या अनुभूतीसाठी. पुसटशी जरी चाहूल लागली तरी जीव मोहरून उठतो हे मात्र अगदी खरं!

छोटय़ा छोटय़ा गोष्टी सरकन गळून जाव्यात, तसेच क्षण कधी निसटतात समजत नाही. ते परत नाही येणार याची जाणीव अस्वस्थ करून सोडते. घडय़ाळाचे काटे उलटे फिरवता येत असते तर कित्ती छान झालं असतं? नको तसेही. त्यानं तर काळ पुढे गेलाच नसता. जे जे हवे जे मागे गेलं त्याच्याच पाठी धावलो असतो आपण सगळे जण. म्हणूनच निसटलेले क्षण फक्त स्मरायचे असतात कारण आत खोलवर पडलेले असतात ते कायमचे विसाव्याला आल्यासारखे.. तरीपण काळाची पुटं चढतात त्यावर आणि त्यांची बोचणी हलकी होत जाते..

नंतर गंमत होते. हेच कधीचे, कुठले तरी जुने पुराणे सांडलेले, ओढून घेतलेले, निसटलेले क्षण एकेक करीत स्वप्नात येतात माझ्या. अगदी खरं.. त्यात आईनं, ‘असं नाही करायचं, तसं नसतं वागायचं, हेच असच बरोबर, ते चूक चूक चूकच..’ अगदी बजावून सांगितलेलं देखील आहे. चिडलेली असते मी, तरी आई ऐकत नाही माझं, तिचं आपलं तेच असतं, नाही म्हणजे नाही.. कधीतरी मी आणि आई दोघीच घरात असताना आई खूप काय काय सांगते, त्यानं काय झालं, काय होईल.. काहीबाही असतं सारं काही. त्या वयात फारसं समजायचं नाही. आईला आपली खूप खूप काळजी आहे, याची जाणीव व्हायची आणि मी आईला बिलगायची. मला पटायचं आईनं सांगितलेलं आणि माझ्या नाकावरचा राग पुसला जायचा. हरवले माझे काही क्षण आईमुळे, पण आईचं ऐकायचच, हेच बरोबर होतं. नंतर मोठी झाले, शाळा अकरावीपर्यंत, नंतर कॉलेजची चार वष्रे. अगणित निसटलेले एकेक क्षण येतात सामोरे. आता हसू येतं त्यांचं, पण त्या वेळी हवेसे वाटायचे. मी ते सगळे क्षण सुरुवातीला एका कंपासपेटीत ठेवायची. पण ती लगेच भरली, मग घेतलं जुनं दप्तर. लवकरच तेही लहान झालं. आमच्याकडे शेतावरचा आंबेमोहोर असायचा. त्याचं पोतं घेतलं आणि कोंबलं त्या क्षणांना आत. पोत्याला भोक होतं हे मी बघितलंच नाही. गेले बाई माझे क्षण हरवून.. कुठे आठवत बसू. दिलं त्यांना कायमचं सोडून. मारला दाभणाने टाका पोत्याला आणि एकेक करीत पोती टाकली माळ्यावर. माळाही भरला, आता काय करायचं या निसटलेल्यांचं? शिवाय मांडलेला संसार म्हटलं की माळ्यावर काय काय ठेवावं लागतं ते आधी नव्हतं ना माहीत. तरीपण, त्यापेक्षा माझे सांडलेले क्षण मोलाचेच होते, तेव्हाही आणि त्यातले काही आत्ताही. फरक इतकाच वाटतो, आता त्यांच्याकडे मी तिऱ्हाईताच्या नजरेतून बघू शकते. आतलं आंदोलन नाही उमटत.

मी पडले की हो संसारात. काय काय सोडलं देवालाच ठाऊक. मिळवलं देखील भरपूर काही, तरीही निसटणारे क्षण होतेच तिथे. काही हळवे, काही रडके, काही यांचे, काही इतरांचे. घरचे, दारचे, पाळणाघरातले देखील, काय सांगू कित्येक क्षण बसमधले देखील आहेत. बस नाही मिळाली तर काय व्हायचं, लेटमार्क! त्याचे नकोत का टिपलेले क्षण. गाडी घेऊन किक मारल्यावर भरधाव पळतानाचे सिग्नलवर दिसलेले, कोणीतरी मागून पुढे गेलेले, जाताना कानाजवळ जोरात शिट्टी मारलेले. खूप खूप आहेत ठेवलेले. आई झाल्यावर खुलली कळी आणि सारं काही छान छान वाटू लागलं. गणपती बाप्पाचे विसर्जन करता करता गेलेले क्षणही दिले मुळामुठा अर्पण. आता तर नातवंडं खेळतात मांडीवर तेव्हा कशाच्च काहीच वाटत नाही. यालाच वय वाढलं म्हणावं का? मोठ्ठं घर घेतलं तरी पोत्यांनी माळे भरले गेलेच. तरी बरं प्रत्येक खोलीत माळे आहेत माझ्या घरात. हल्ली माळे नसलेली घरेच वाढत चालली, म्हणूनही असेल की लोक तुटक वागायला लागलीत.

धो धो कोसळतात हेच निसटलेले क्षण निसरडय़ा मनातून खाली. मी एकटी असते, मस्त मूड असतो तेव्हाही येतात आणि मी नाराज असते त्या वेळेला देखील डोकावतात हळूच. एखादं झाड तयार करावं याच निसटलेल्या क्षणांचं असं मनात आलं. त्याच रात्री घराच्या गच्चीवर भला मोठा चौकोनी वाफा करून झाड करायला लागले. मी एकटीच हं, नको मला कोणाची लुडबुड. फक्त माझे हरवलेले क्षण तिथे लावणार, इतरांना काय त्याचे? कितीही वाढू देत त्यांची उंची, कोणी काही म्हणणार नाही की जागा मोकळी करून दे असा दट्टय़ा लावणार नाही. आठवून आठवून अशा निसटलेल्यांना लटकवलं की मी तिथे, गच्चीवरील झाडावर. मोठमोठय़ा झुंबरांना कसे रंगीबेरंगी लोलक लटकवतात ना तसेच लोंबणारे, हलणारे, डोलणारे ते क्षण चकाकतात मस्तपकी. माझं झाड तसं सरळसोट नाही त्या उभ्या ख्रिसमस ट्रीसारखं. तर वेगळं मस्त डौलदार, गोलाकार, सावली देणारं आहे. खोडाला टेकून उभं राहायचं आणि वर बघायचं तर फटीतून आकाश दिसतं,  गच्चगुच्च भरून गेलं लगेच. त्यांना झाड आवडलं, असंच मला वाटतं. नाहीतर बसले असते का ते निसटलेले क्षण गपगुमान झाडावर. पुन्हा खाली घे आणि होतं तिथेच ठेव असा हट्ट केला असता.. मस्त नाचले मी एकटीच माझ्या झाडाभोवती.

तुम्हाला दाखवीन कधीतरी. आता हेच बघा ना, मला लिहावं लागलं हे सगळं. गेला की नाही निसटून मनातला क्षण. जवळ असतात तर बडबड नसती का केली मी. खूप हसलो असतो आपण सगळे जण. त्यासाठी तरी यायलाच पाहिजे एकत्र. बसले टपटप टाईप करीत लॅपटॉपवर. नेहमी नाही असं बडवत बसणार. मग, माझे क्षण कमी कमी होतील की. आधीचे सगळे गेलेत झाडावर. नवीन हवेत मला. आत्ता मात्र जाऊ दे म्हणून देते सोडून. असं असलं तरी तुम्ही येणार नक्की माझं झाड बघायला. आणि नाही आलात तर मी काय करीन सांगू. याच निसटलेल्या क्षणांना मी झाडाला टांगणार आणि त्याभोवती परत गिरकी घेणार.

Vandana10d@yahoo.co.in

chaturang@expressindia.com