डॉ. गीताली वि.मं.
‘‘पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीच्या स्त्रीपणाची किंमत नाही म्हणून स्त्रियांनी ते स्त्रीपणच सोडून देणे फार हानीकारक आहे. स्त्रियांना समता, संधी, न्याय मिळण्यासाठी ‘पुरुष बनावे’ लागण्याची सक्ती होणे ही चांगली गोष्ट नाही. स्त्री राहूनच तिला ते मिळाले पाहिजेत.’’ असे मत ठामपणे मांडणार्या अभ्यासू लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सामंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वैचारिक लेखनाचा हा आढावा.
आज माणसाच्या जगण्यासाठी चालू असणार्या संघर्षात जीवघेणी स्पर्धा, हिंसा, क्रौर्य उफाळून आलेलं दिसत आहे. सत्तांध राजकीय नेत्यांच्या जग जिंकण्याच्या लालसेतून होणारी युद्धे विध्वंसक आहेत. यामुळे मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा या जीवघेण्या काळात माणसाला स्त्रीमूल्येच वाचवू शकतील, असा प्रगाढ विश्वास असणारी विचारवंत लेखिका मंगला सामंत नुकत्याच हे जग सोडून गेल्या. मानवाच्या कल्याणासाठी शांती आणि समता प्रस्थापित करण्यासाठी बालकप्रधान व्यवस्था हवी आणि त्यासाठी स्त्री मूल्यं, स्त्री गुण पुनर्प्रस्थापित होण्याची गरज त्या आपल्या लेखनातून, भाषणातून सतत कळकळीनं मांडत होत्या. ते नेमकं काय होतं हे समजावून घ्यायला हवं.
‘‘स्त्रीला दूर लोटून काही हजार वर्षांत पुरुषांच्या पुढारीपणातून जी नैतिक, भौतिक समाजव्यवस्था उभारली गेली ती काही शांती समतेची नाही तर ती हिंसाचार आणि दारिद्र्याने भरलेली आहे. सहकार्य, संयम, सामंजस्य, ममता, समता या स्त्रीगुणांचा अभाव असल्याचे हे चिन्ह नव्हे का? त्याशिवाय निसर्गातील स्पर्धात्मक, सूडात्मक, आक्रमक अशा सस्तन नरामधून पुरुष उत्क्रांत झालेला आहे हे सत्यही नाकारता येत नाही. मग तरीही अट्टहासाने ममत्व, समत्व, दयाळूपणा हे विशेषत्वाने स्त्रियांचे गुण आहेत हे नाकारायचे आणि ते पुरुषांमध्येही (स्त्री इतकेच)आहेत अशी विधाने करीत स्त्रियांनी स्वत:लाच का फसवावे? हाही एक प्रश्नच आहे. स्त्रियांच्या अनेक शतकांच्या पीछेहाटीमुळे मागे पडलेले हे स्त्रीगुण स्त्रियांनी अभिमानाने ‘ते आमचे आहेत’ असं म्हणून आपली समाजातली महत्त्वाची जागा ताब्यात घेणे हीच भूमिका स्त्रीला सन्मान देऊ शकेल आणि जगाला वाचवू शकेल.’’ या त्यांच्या ‘स्त्री-पर्व’ या महत्त्वाच्या ग्रंथात केलेल्या मांडणीमागे त्यांचा सखोल अभ्यास त्यांनी दिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या यादीतून प्रतित होतो.
स्त्री-पुरुषांमधील वर्तन मूल्यांचे वेगळेपण हे त्यांच्या अपत्य जन्माबाबतच्या भिन्न असणार्या योगदानाशी संबंधित असते, असं सांगत मंगला सांगतात की, स्त्री व पुरुषांमधील अशा मूलभूत वेगळ्या जडणघडणीमुळे आणि मूल्य फरकांमुळे स्त्री-पुरुषांची मानसिकता, भावनिकता, विचार पद्धती यामध्ये फरक असतो. दोघांची मते, निर्णय, कृती, क्रिया-प्रतिक्रिया, भूमिका, पवित्रे अनेकदा भिन्न आढळतात असे काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. विवाहानंतर स्त्री आपली मातृत्वक्षमता पुरुषाकडे गहाण टाकते त्यातून तिचा छळ सुरू होतो तेव्हा सोशिकपणा, संयम, क्षमा हे गुणांपेक्षा तिची बचावाची आयुधे झाली. त्याचा फायदा मात्र पुरुषांना मिळाला.
ज्या गुणांना प्रचंड मानसिक ताकद लागते ते हे स्त्रीगुण अशा रीतीने शतकानुशतके स्त्रीच्या दुर्बलतेचे रूप धारण करून राहिले हा सर्व इतिहास सत्य आहे. याचा अर्थ पितृसत्ताक परिस्थिती बदलायला हवी, गुण नाही हे लक्षात घ्यायला हवं. ही परिस्थिती बदलण्यासाठी बालक प्रधान व्यवस्थेचा विचार मंगला यांनी केला आहे. माणूस बनणे म्हणजे काय हे स्त्रीलाच खुद्द समजत नाही कारण पितृसंस्कृतीला जन्म देणार्या विवाहसंस्थेमधूनच तर स्त्रीला पुरुषांच्या सेवेसाठी घरात आणली जाते आणि त्याच्या पितृत्वासाठी तिच्या मातृत्वाला अर्थ दिला जातो. बालपणापासून तिच्यावर संस्कार केले जातात तेच पुरुषाचे साधन बनण्याचे! बालकप्रधान व्यवस्थेत बालकांपासूनच माणूसपणाचा विचार करायला लावणारी आणि स्त्री पुरुष बालकांमध्ये माणूसपणाची मूल्य रुजवणारी अशी आखणी करून व्यवस्था अंमलात आणली तर ही पितृसत्ताक व्यवस्था मुळापासून बदलण्यास सुरुवात होईल. कारण लहानपणापासून मुलांप्रमाणे मुलींच्या स्वतंत्र जगण्याचा आणि तिच्या विकासाचा आदर करणार्या बालक प्रधान व्यवस्थेत जन्मलेली, वाढलेली स्त्री आजच्या व्यवस्थेतील स्त्रीपेक्षा माणूस म्हणून अधिक प्रगल्भ असेल तसेच पुरुषही.’ ही त्यांची विधाने नक्कीच विचार करायला लावणारी आहेत.
‘‘पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीच्या स्त्रीपणाची किंमत नाही म्हणून स्त्रियांनी ते स्त्रीपणच सोडून देणे फार हानिकारक आहे. स्त्रियांना समता, संधी, न्याय मिळण्यासाठी ‘पुरुष बनावे’ लागण्याची सक्ती होणे ही चांगली गोष्ट नाही. स्त्री राहूनच तिला ते मिळाले पाहिजेत. स्त्री-पुरुषांमध्ये उपजत, जैविक, नैसर्गिक काय आणि किती तसंच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीमुळे किती हा वाद सनातन आहे. माणूस हा निसर्गाचा अभिन्न भाग असल्यामुळे खरं तर या वादाचं स्वरूप हे की ते असं न ठेवता समग्र विचार करून सम्यक पद्धतीनं समाजहितासाठी विचार आणि कृती करणं ही काळाची गरज आहे. पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेत विषमतेवर आधारित बाईपण, पुरुषपण आणि इतरपण यांना विरोध करत माणूसपणाकडे वाटचाल करणार्या स्त्री चळवळीकडून मंगला सामंत हिच्या माणूसपणाची मूल्य सांगणार्या लेखन, चिंतनाची काहीशी उपेक्षा झाली आहे.’’
कोणत्याही नव्या व्यवस्थेचं मूल्यमापन हे बौद्धिक, वैचारिक पातळीवर, पण वास्तव व्यवस्थेच्या बाहेर पडून करता आलं पाहिजे. हे बाहेर पडता येणे हीच मुळात अवघड गोष्ट आहे, असं मंगला सांगतात तेव्हा हेही प्रश्न उपस्थित करतात की, मातृसंस्कृतीत ्त्रिरयांचे पटत असेल का? बालकप्रधान व्यवस्था स्त्रीला फक्त साधन बनवेल का? बालक प्रधान व्यवस्थेत स्त्रीचाच बळी जाईल का? वगैरे प्रश्न बर्याच वेळा आजच्या व्यवस्थेतील स्त्रियांकडे पाहून मनात येत असतात म्हणजे आजच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाता येणं आपल्याला जमलेलं नाही त्याचं ते लक्षण असू शकतं का? या प्रश्नांचाही विचार व्हायला हवा. व्यक्ती म्हणून स्त्रीचा विचार करताना स्त्री ही माणूस तर आहेच पण ती पुरुषासारखीच कशाला हवी? माणूसपणाच्या आपल्या व्याख्या पितृसत्ताक पुरुषप्रधानतेच्या प्रभावाखाली आहेत का? हे मंगला यांचं म्हणणं बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये तपासायला हवं.
समाजातील लैंगिक गुन्हे कमी होण्यासाठी समाजाला लैंगिक साक्षर करण्याची गरज आहे, हे मंगला यांचं एक ठाम विधान, त्याचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे की, एकमेकांच्या शरीराचा आणि शारीरिक गरजेचा आदर हा या साक्षरतेचा गाभा आहे. मानसिक लैंगिक धर्म आणि जैविक लैंगिक धर्म यांच्यामध्ये विसंगती का आली आणि त्याचे घातक परिणाम समाजावर कसे होतात याचे सखोल विश्लेषण त्यांनी ‘लैंगिक धर्म’ या पुस्तकात केलं आहे.
त्यांची अनेक पुस्तके मुळातूनच वाचायला हवीत. ‘लग्नाविना’ या कादंबरीवर तर त्यांना चित्रपट करायचा होता. ‘तंतोतंत जुळवून घेताना’ हे पुरस्कारप्राप्त पुस्तक, याशिवाय ‘स्वातंत्र्य पूर्वसंध्या’ यामध्ये सर्वसामान्य स्त्री पुरुष यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान अधोरेखित करणारी अनुभव कथने आहेत, ‘स्त्रीमुक्तीच्या खापरपणज्या’ या पुस्तकामध्ये पाश्चिमात्य स्त्रियांचा संघर्ष रोचक पद्धतीनं मांडला आहे. याशिवाय ‘विवाहभ्रमातून भानावर’, ‘विवाहाच्या उत्क्रांतीतून वास्तवाकडे’ अशासारखी त्यांची अनेक पुस्तके आहेत. ‘विवाहभ्रमातून भानावर’ या पुस्तकात विवाहसंस्थेचा इतिहास, वास्तव आणि भवितव्य विलक्षण पद्धतीनं उलगडून दाखवला आहे. विधुरांच्या विवाह न होण्याच्या समस्या, स्त्री प्रश्न सोडवण्यासाठी पुरुष सुधारगृहाची गरज, तसंच गृहिणींसाठी गृहकाम भत्ता योजना, कौटुंबिक सत्ता आणि राजकीय सत्ता परस्परावलंबी आहेत म्हणून स्त्री प्रश्न सोडवण्यासाठी स्त्रियांनी राजकारणात सक्रिय व्हायला हवं आणि त्यासाठी स्त्रीवादी स्त्रियांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना करून त्यात स्त्रीवादी पुरुषांनाही सामील करून घ्यायला हवं. अशा अभिनव कल्पना, तर्कशुद्ध विचार, स्पष्ट आणि लेखणी धारदार, त्याला उपहासगर्भ विनोदाची जोड यामुळे चळवळीबाहेरच्या काठावरच्या लोकांना त्यांचं लेखन भावत असे. त्यातून चळवळ विस्तारली जात असे. त्यांना सतत नवनवीन कल्पनांचे, उपक्रमांचे धुमारे फुटत असतं. अशा या मंगला अतिशय रसिक, मिस्कील आणि सौंदर्याची उपासक होत्या.
परंपरा आणि नवता यांचा मेळ घालत प्रबोधनपर नावीन्यपूर्ण उपक्रम ही मंगला यांची खासियत होती. नव्या काळाशी सुसंगत भोंडल्याची गाणी, नागपंचमी, गणेशोत्सव, ऋषी पंचमी इतकंच नव्हे तर कृषी पंचमी, दुर्गोत्सव आदी भारतीय सणांच्या मनोवेधक कहाण्याचे त्यांचे व्हिडीओ ‘मिळून सार्याजणी’ मासिकाच्या ‘यू ट्यूब’ चॅनलवर उपलब्ध आहेत.
कृतिशीलपणे ‘निगराणी महिला बालक विकास संस्थे’च्या माध्यमातून गोसावी वस्तीच्या ‘नवराग्रस्त’ मातांच्या अनेक छळांची प्रकरणे पोलीस ठाण्यात नेऊन त्यांनी सोडवली. दरवर्षी आनंदाचे क्षण न मिळालेल्या या स्त्रियांच्या सहली नेल्या. वार्षिक स्नेहसंमेलनात स्त्रिया व मुली यांच्या नृत्य गाण्याच्या संस्कृतीला वाव दिला. तसेच ‘वुमेन्स नेटवर्क’ आणि ‘नेटवर्क प्रकाशन’ यामधूनही त्या सक्रिय राहिल्या. त्यांनी अतिशय हटके विषय असणारी ‘सहजीवन मंच आणि स्त्रीवृत्त’ ही अनियतकालिके एकखांबी पद्धतीनं काही काळ चालवली. त्यांच्या पुढाकारानं अनेक संस्था संघटना यांना बरोबर घेऊन ‘विवाह परिषद’ १ आणि २ या वैशिष्ट्यपूर्ण परिषदा पुण्यात झाल्या.
स्त्री पुरुष समता हवी असेल तर स्त्रियांनी पुरुषाप्रमाणे बदलावे मात्र पुरुष स्त्रीप्रमाणे बदलणार नाहीत हे आजचं दु:खद वास्तव आहे, ते बदलण्यासाठी स्त्रियांनी स्त्रीमूल्यांचा स्वत: आदर करावा आणि स्त्री पुरुष मिळून स्त्रीमूल्यांचा आदर करणारी चळवळ उभी करावी, अशी मंगला सामंत यांची कळकळीची इच्छा होती.
क्रांतिकारी, धाडसी विचार असणारा समृद्ध ऐवज त्या आपल्यासाठी ठेवून गेल्या आहेत. त्याच्यावर सशक्त वैचारिक मंथन करून स्त्री चळवळ अधिक बळकट करणं हेच त्यांच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वाला अभिवादन असेल.
saryajani@gmail.com
