‘‘अनू, तूच हे करून दाखव…’’ या उत्साहवर्धक वाक्याने माझ्या खेळाडू मित्रांबरोबर चाललेल्या चर्चेचा शेवट झाला. बुद्धिबळात स्त्री खेळाडूंची कामगिरी पुरुषांच्या तुलनेत निम्न स्तरावरची का असते यावर आमचा ऊहापोह चालू होता. मुंबईहून नागपूर येथील ‘महाराष्ट्र राज्य खुल्या अजिंक्यपद’ स्पर्धेसाठी आम्ही सर्वजण आगगाडीने प्रवास करत होतो. प्रवासात असा विषय चर्चेसाठी मिळाला की वेळ कसा जातो ते समजत नाही. गंमत म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच गाठ पडली आणि मी चक्क या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

खुल्या स्पर्धांमध्ये नंतरही अनेक बक्षिसे मिळवून तसेच ‘राष्ट्रीय खुल्या ज्युनिअर’ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून माझ्या परीने मी, एका स्त्री खेळाडूने खुल्या गटात चांगली कामगिरी करून दाखविण्याचा खारीचा वाटा उचलला. यानंतर अनेक वर्षं लोटली. आणि आता जरी स्त्री खेळाडूंनी आपल्या खेळाचा दर्जा वर्षागणिक उंचावला असला, तरी अगदी आजच्या घटकेलासुद्धा स्त्री आणि पुरुष बुद्धिबळ खेळाडूंच्या दर्जात लक्षणीय तफावत आढळून येते. अनेक वेळा बातचीत करताना ‘बुद्धिबळा- सारख्या बैठ्या खेळात ही तफावत का?’ हा प्रश्न मला विचारला जातो. खरेतर अजूनही बुद्धिबळात सरासरी स्त्री खेळाडूंची कामगिरी पुरुषांच्या तुलनेत कमी का पडते या प्रश्नाला समाधानकारक वैज्ञानिक उत्तर नाही.

या विषयाला अनेक पैलू आहेत. एक समज असा आहे, की नकाशा वाचन, गणित आणि अभियांत्रिकी यांसारखी क्षेत्रं जी बुद्धिबळाच्या कौशल्याच्या जवळ जातात, त्याकडे ्त्रिरयांचा जास्त कल दिसून येत नाही. स्त्रिया पारंपरिकरित्या ज्या क्षेत्रात जास्त प्रवीण मानल्या जातात त्या परस्पर संबंध, भाषा इत्यादी कौशल्यांचा बुद्धिबळात जास्त वापर होत नाही. धोका पत्करण्याची मानसिक तयारी आणि स्पर्धात्मकता या गोष्टी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये कमी दिसून येतात. काही जणांनी याचे खापर संप्रेरकांवर (हॉर्मोन्स) फोडले आहे. त्यात परिवार सांभाळून प्रवास करणं, गर्भवती असताना खेळणं, मूल झाल्यावर सरावासाठी वेळ काढणं इत्यादी कठीण गोष्टी एक स्त्री खेळाडू म्हणून पेलणं खूप अवघड जातं. इराणी स्त्री बुद्धिबळपटूंना तर इतक्या अडचणींना तोंड द्यावे लागले, की त्यातल्या बहुतेकींनी दुसर्‍या देशात जाणं पसंत केलं. सामाजिक दबावामुळे, वर्षानुवर्षे बुद्धिबळ हे पुरुषांचे क्षेत्र मानले गेल्यामुळे खूप थोड्या स्त्रिया मुळात या क्षेत्राकडे वळतात, खूप वर्षं टिकून राहण्याची गोष्ट तर दुर्मीळच! ज्या क्षेत्रात मुळातच ज्येष्ठ, अनुभवी स्त्रिया कमी प्रमाणात दिसतात, अशा क्षेत्रात प्रवेश करायला देखील लहान मुली कचरतात हा सामाजिक सिद्धांत एका वैज्ञानिक पाहणीत पडताळून पाहण्यात आला आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंमध्ये स्त्रियांची संख्या केवळ १० ते १२ टक्के आहे. ‘ग्रँडमास्टर’ हा बुद्धिबळातील सर्वोच्च किताब मिळविणारे पुरुष खेळाडू आहेत सुमारे २१००, तर स्त्री खेळाडू केवळ ४४ च्या आसपास. विविध कारणांमुळे पुरुषांविरुद्ध खेळताना वाटणारा आत्मविश्वासाचा अभाव हेही एक कारण स्त्री खेळाडूंच्या कामगिरीला खीळ घालते. एका अभ्यासात स्त्रियांना त्यांचे प्रतिस्पर्धी न दाखविता इंटरनेटवर पुरुष खेळाडूंशी खेळविण्यात आले तेव्हा त्यांची कामगिरी समाधानकारक झाली. परंतु जेव्हा प्रत्यक्ष पुरुष खेळाडूंसमोर बसून खेळायची वेळ आली तेव्हा त्यांचा खेळ तुलनेत कमी दर्जाचा झाला. बरेच वेळा असे लक्षात आले आहे, की स्त्रियांची स्त्री खेळाडूंविरुद्धची कामगिरी ही त्याच दर्जाच्या पुरुष खेळाडूविरुद्धच्या कामगिरीपेक्षा सरस असते.

या संदर्भात बोलताना ‘पुरुषांच्या मेंदूची रचनाच बुद्धिबळासाठी बनविली आहे.’ या ब्रिटनच्या ग्रँडमास्टर नायजेल शॉर्टच्या वक्तव्याने ब्रिटनभर नाराजीचा सूर उमटला. ‘स्त्रिया या खूपच कमी पातळीवरच्या बुद्धिबळ खेळाडू असतात. त्यांनी बुद्धीच्या गोष्टीत पडू नये. घर पहावे.’ ही मुक्ताफळे आहेत बॉबी फिशर या अमेरिकेच्या महान बुद्धिबळ जगज्जेत्याची! रशियाचा जगज्जेता गॅरी कॅस्पारॉव्ह १९८९ च्या ‘प्लेबॉय’ मासिकात म्हणतो, ‘एक खरे बुद्धिबळ असते आणि एक स्त्रियांचे बुद्धिबळ’. यावर २००२ मध्ये हंगेरीच्या ज्युडीथ पोल्गारने कॅस्पारॉव्हला हरवून त्याचेच दात त्याच्या घशात घातले. यानंतर त्याची प्रतिक्रिया विचारली असता ‘आता मी तसे मानीत नाही’ अशी जाहीर कबुली मात्र कॅस्पारॉव्हने दिली.

स्त्रियांमधील पहिल्या जगज्जेत्या वेरा मेंचीकपासून सर्व आघाडीच्या स्त्री बुद्धिबळ खेळाडूंनी स्वत:ला खुल्या स्पर्धांमध्ये अजमावले आहे. खुल्या स्पर्धेतील वेरा मेंचीकच्याही आधी स्त्रियांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी म्हणजे १९२२ मध्ये मारिया तेरेसा मोरा या स्त्री खेळाडूने क्यूबाची ‘राष्ट्रीय खुली बुद्धिबळ अजिंक्यपद’ स्पर्धा जिंकली होती. पाठोपाठ १९२६ मध्ये वेरा मेंचीकने हेस्टग्सिं मेजर रिझर्व्ह ही खूप वरच्या दर्जाची खुली स्पर्धा जिंकली; पण हे काही तुरळक यश सोडले तर स्त्री खेळाडूंच्या हाती विशेष काही लागत नव्हते. १९७७ मध्ये नोना गॅप्रदिंषविली या जॉर्जियाच्या असामान्य स्त्री खेळाडूने लोन पाइन या शहरात घेतली जाणारी मानाची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. स्त्रिया पुरुषांबरोबरीने स्पर्धात्मक खेळू शकतात, नव्हे, त्यांना हरवून स्पर्धा जिंकू शकतात, असे तिने पहिल्यांदा जगाला दाखवून दिले. पुढच्याच वर्षी ग्रँडमास्टर हा सर्वोच्च किताब मिळविणारी ती पहिली स्त्री ठरली.

‘जागतिक बुद्धिबळ संघटने’तर्फे खुल्या वर्गात ‘ग्रँडमास्टर’, ‘आंतरराष्ट्रीय मास्टर’ असे दोन मुख्य किताब देण्यात येतात. स्त्रियांना बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून ‘महिला ग्रँडमास्टर’, ‘महिला आंतरराष्ट्रीय मास्टर’ असे दोन मुख्य किताब देण्यात येतात. परंतु स्त्रियांसाठी असलेले किताब कमी गुणांकनात मिळतात आणि त्यामुळे खुल्या किताबांपेक्षा ते कमी दर्जाचे मानले जातात. नोनाने सुरू केलेली खुल्या स्पर्धांमधील यशाची परंपरा तिच्यानंतर ्त्रिरयांमधील विश्वविजेती बनलेल्या तिच्याच देशाच्या माया चिबुर्दानीडझेने चालू ठेवली. तिनेही ग्रँडमास्टर हा किताब मिळविला आणि दोन अव्वल दर्जाच्या ‘खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ही जिंकल्या.

परंतु स्त्रियांमधील बुद्धिबळाचा दर्जा उंचावण्यात सिंहिणींचा वाटा उचलला तो हंगेरीच्या तिघी पोल्गार भगिनींनी! सुझान, सोफिया आणि ज्युडीथ या तिघी भगिनी लहानपणापासून खुल्या स्पर्धांमध्येच खेळत असत. खुल्या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणारी मोठी बहीण सुझान ही सोफिया आणि ज्युडीथचीच नाही तर जगभरातील सर्व स्त्री बुद्धिबळपटूंची आदर्श ठरली. सोफियाने वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रोममध्ये झालेली आंतरराष्ट्रीय स्पर्धा मोठमोठ्या ग्रॅण्डमास्टर्सना धूळ चारत जिंकली. ज्युडीथने १९८८ मध्ये बारा वर्षांखालील आणि १९९० मध्ये चौदा वर्षांखालील ‘जागतिक खुले अजिंक्यपद’ जिंकून आपले पाय पाळण्यातच दाखवले. असंख्य खुल्या स्पर्धांमध्ये देदीप्यमान कामगिरी करीत ज्युडीथने आपले गुणांकन जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या दहा क्रमांकात नेऊन ठेवले तिथपर्यंत पोचणे कोणत्याही अन्य स्त्रीला शक्य झालेले नाही. पोल्गार भगिनींच्या आणि खास करून ज्युडीथच्या या यशामुळे जगभरातील असंख्य स्त्री खेळाडू पुरुषांच्याबरोबरीने खुल्या स्पर्धांमध्ये आत्मविश्वासपूर्वक खेळू लागल्या आहेत. १९९१ मध्ये ज्युडीथने हंगेरीची ‘खुली राष्ट्रीय अजिंक्यपद’ स्पर्धा जिंकली. यामुळे प्रेरित होऊन २०००ची लिथुएनियाची खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा व्हिक्टोरिया स्मिलिटने तर २००६ मध्ये ऑ्ट्रिरयाची खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा इव्हा मोसेरने जिंकली. थोडक्यात, पोल्गार भगिनींनी जगभरातील ्त्रिरयांमध्ये आपणही हे करू शकतो हा आत्मविश्वास जागृत केला.

खुल्या स्पर्धांमधील स्त्रियांचा सहभाग पूर्वीपेक्षा खूपच वाढला आहे ही नक्कीच उत्साहवर्धक गोष्ट आहे. भारतातील स्त्रियांच्या बुद्धिबळाचा पाया खाडिलकर भगिनींनी घातला ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. १९७८ मध्ये जेव्हा सर्वात धाकटी रोहिणी खाडिलकर ‘राष्ट्रीय खुल्या अजिंक्यपद’ स्पर्धेसाठी तयारीत होती, तेव्हा काही पुरुष खेळाडूंनी आणि ‘भारतीय बुद्धिबळ संघटने’ने ‘ही पुरुषांची अजिंक्यपद स्पर्धा असल्यामुळे एक स्त्री यात खेळू शकत नाही,’ असा पवित्रा घेतला. रोहिणीचे वडील आणि ‘नवाकाळ’ चे तत्कालीन संपादक नीळकंठ खाडिलकर यांनी हा अन्याय टाळण्यासाठी त्यावेळी जागतिक बुद्धिबळ संघटनेचे सचिव मॅक्स युवे यांच्याकडे धाव घेतली. स्वत: माजी विश्वविजेते असणारे युवे यांनी यात ताबडतोब लक्ष घालून भारतीय बुद्धिबळ संघटनेला रोहिणीला राष्ट्रीय खुल्या अजिंक्यपद स्पर्धेत
खेळू देण्यासाठी भाग पाडलं. भारताच्या कोनेरू हंपीने १९९९ मध्ये १२ वर्षांखालील ‘आशियाई खुले अजिंक्यपद’ पटकाविले. एवढेच नव्हे, तर ‘महिला ग्रँडमास्टर’ किताबावर न थांबता हंपीने ‘खुला ग्रँडमास्टर’ किताबही मिळविला. ही अद्वितीय कामगिरी करणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. तिच्या पाठोपाठ हरिका द्रौणावल्ली, आर.वैशाली आणि दिव्या देशमुखनेही हा किताब पटकाविला आहे.

स्त्रियांच्या या चमकदार कर्तृत्वामुळे हळूहळू पुरुष खेळाडूंची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टीही जास्त सकारात्मक होऊ लागली आहे. पूर्वी कोणी पुरुष खेळाडू स्त्री खेळाडूशी खेळताना हरला की त्याला भयंकर अपमानित झाल्यासारखे वाटत असे व सहखेळाडूंकडूनही एका स्त्रीबरोबरच्या स्पर्धेत हरल्याबद्दल त्याची टिंगलटवाळी होत असे. हळूहळू यात बदल होऊन स्त्रीकडून झालेल्या पराभवाकडे निव्वळ एक पराभव म्हणून बघण्याची दृष्टी निश्चितपणे तयार होत आहे, असे माझ्या लक्षात आले. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅग्नस कार्लसन म्हणतो, ‘‘बुद्धिबळाचं क्षेत्र बरीच वर्षं स्त्रियांकडे सहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून पाहात आलेलं नाही. या संस्कृतीत नक्कीच कुठेतरी बदल झाला पाहिजे…’’ असे प्रयत्न जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात सुरू आहेत यात वादच नाही. ज्युडीथ पोल्गार, वैशाली यांसारख्या काही आघाडीच्या स्त्री खेळाडू तर म्हणतात, की स्त्रियांसाठी ठेवलेले वेगळे ‘महिला ग्रँडमास्टर’ व ‘महिला आंतरराष्ट्रीय मास्टर’ किताब आता काढून टाकले पाहिजेत. लहानपणापासून मुलींसमोर खुल्या स्पर्धेतील यशाचे उच्च ध्येय ठेवलं तर नुसत्या स्त्रियांच्या स्पर्धांमधील यशावर तृप्त न होता त्या आणखी प्रगती करतील, असे त्यांचे मत आहे. परंतु भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी आणि आघाडीची बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे यांचा याला विरोध आहे. त्यांच्या मते, अजूनही स्त्रियांना विशेष उत्तेजनाची गरज आहे. त्यासाठी हे वेगळे किताब नजीकच्या भविष्यात तरी गरजेचे आहेत.

मला वाटते, की अजून ‘‘दिल्ली थोडीही दूर है…!’’ सध्याची स्त्री खेळाडूंची घोडदौड बघता ही वेळ लवकरच येईल अशी आपण आशा नक्कीच करू शकतो.

gokhale.anupama@gmail.com