नवर्याचं ‘नाव घेणं’ म्हणजेच ‘उखाणा घेणं’ हे फक्त मराठी संस्कृतीचंच वैशिष्ट्य नाही तर मराठी संस्कृती ज्या भाषिक, धार्मिक प्रदेशाला चिकटलेली आहे तिथला भाषिक परिणाम या उखाणे संस्कृतीवर होत असतो. स्त्रियांची भाषा वापरण्याची, ताल, लय जपण्याची प्रवृत्ती या उखाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. काळाप्रमाणे या उखाण्यांमध्ये बदलही होत गेले, अगदी इंग्रजी शब्दही त्यात आले. मात्र नवर्याच्या नावाचा थेट उल्लेख न करण्याचा, उखाण्यांचा मूळ उद्देश वेगळाच असतो.
लोकसंस्कृतीतल्या अनेक घटकांमध्ये उखाणे हा अतिशय मनोरंजक असा भाग आहे. उखाणे म्हटलं की, आपल्याला आठवतं ते म्हणजे पत्नीनं पतीचं नाव घेण्याचे उखाणे. नव्या नवरीनं नवर्याचं नाव थेट न घेता विशिष्ट शब्दरचना करून त्यात ते गुंफायचं असतं. आजकाल नवरेसुद्धा आपल्या बायकोचं नाव असं गमतीदार उखाण्यातून मधून मधून घेत असतातच. स्त्रिया अजूनही, विशेषत: त्यांच्या लग्नात उखाणे घेत असतात. त्याला ‘नवरीनं नवर्याचं नाव घेणं’ असं म्हटलं जातं. मात्र आता ते कालबाह्य होत चालले असले तरी प्रसंगविशेषी ते शिल्लक राहिले आहेत.
अलीकडे नवर्याला त्याच्या नावानेच बहुदा हाक मारली जाते, परंतु आपल्या परंपरेमध्ये नवर्याला थेट त्याच्या नावाने हाक मारू नये किंवा त्याचं नाव उच्चारू नये असा संकेत आहे. उच्चारलं तरी ते थोडंसं अलंकारिक पद्धतीने उच्चारावं अशी ती पद्धत आहे. म्हणून नवरीला लग्न होऊन घरात प्रथम प्रवेश करताना किंवा कुठल्याही विशेष प्रसंगी ‘‘नाव घे…’’ म्हणून आग्रहानं सांगितलं जातं. अशा वेळी ती स्त्री उभी राहते. कारण बसून नवर्याचं नाव घ्यायचं नाही, त्याचा मान राखायची ही भूमिका असायची. उभी राहिल्यावर लाजत मुरडत ती नवर्याचं नाव घेण्याचा प्रयत्न करते. उखाण्यामध्ये नाव कसं घ्यायचं, तर ‘‘महादेवाला बेल वाहते वाकून, अमुकरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून.’’ हा अगदी साधा उखाणा. आता यात ‘महादेवाला बेल वाहते वाकून.’ हा फक्त शब्दांचा पसारा आणि अमुकरावांचं तिथं नवर्याचं नाव घ्यायचं आणि ‘सगळ्यांचा मान राखून…’ म्हणजे इतरांचा मान राखण्यासाठी हे करायचं अशा प्रकारची धारणा असते. कालांतराने स्त्रिया शिकायला लागल्या आणि इंग्रजी शब्द वापरण्याची खुमखुमी आली तेव्हा ‘‘मराठीतील भाकरी-इंग्रजीत झाला ब्रेड, अमुकरावांच्या नावाचं मला लागलं वेड,’’ असाही उखाणा घेतला गेला. पुढच्या काळात सासर आणि पती दोघांचंही नाव घ्यायचे उखाणे आले तेव्हा काहीशा सुधारणावादी ्त्रिरयांनी त्यांच्या उखाण्यात राजकीय संदर्भही द्यायला सुरुवात केली. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आली तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांना संयुक्त प्रांताच्या मंत्री केलं होतं. तेव्हा एका बाईने घेतलेला उखाणा मला अजून आठवतो. ‘‘विजयालक्ष्मी पंडित संयुक्त प्रांताच्या माजी मंत्री, अमुकराव गेले गावाला वेध लागला अंतरी…’’ हे थोडे सुधारणावादी ्त्रिरयांचे उखाणे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये खूप लांबलचक उखाणे घेण्याची पद्धत होती,
‘‘झुणझुण झुण्यात, बसले मेण्यात
खण चोळी अंगात, शेंदूर भांगात
सोन्याची किल्ली, उघडली खोली
खोलीत चूल, चुलीवर परात
परातीत भात, भातावर तूप
तुपासारखं रूप, रूपासारखा वाडा
अन् रखुमाई म्हणती – पतिदेव
अमुक रावा विठ्ठल देवा,
काम हातचं सोडा
अन् आधी मला माहेरी धाडा…’’
असा लांबलचक उखाणा घेतला जातो किंवा त्याही पूर्वी फार प्रसिद्ध उखाणा होता. हा उखाणा फक्त स्त्रिया घ्यायच्या आणि त्याला थोडा वेगळ्या प्रकारचा स्पर्श द्यायच्या.
‘‘आजघरात माजघर
माजघरात स्वयंपाकघर
स्वयंपाकघरात चूल
चुलीवर तवा, तव्यात ओवा’’
असे आणखी काही उखाणे असायचे. वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीचे उखाणे घेतले जातात. पुणे, मराठवाड्यामध्ये गेलं तर वेगळ्या प्रकारचे उखाणे असत. कारण तो भाषिक संस्कार उखाण्यावर होत असतो. मराठवाड्यातली मराठी भाषा थोडी वेगळ्या उच्चारातली असते किंवा वेगळ्या धाटणीची असते. लातूर भागातल्या संध्या रंगारी या स्त्रीने मला काही उखाणे पाठवले होते, त्यातला एक नमुना म्हणून उखाणा सांगते.
‘‘वारंगा माझं सासर,
आमनी माझं माहेर
गावात घर, घरापुढे अंगण
अंगणात प्रांगण,
प्रांगणात तुळशीचे वृंदावन
वृंदावनासमोर रांगोळी,
नाव घेते हळदीच्या वेळी
नाव घ्या, नाव घ्या,
नावात काय असतं,
नावात असतो लहानांचा मोठेपणा
मोठ्यांचं थोरपण, थोरांचा मान,
तोच आमचा स्वाभिमान
अमुकरावांचं नाव घेऊन,
ठेवते सर्वांचा मान…’’
उखाण्यातून भावना व्यक्त करताना स्त्रिया शब्दांशी खेळ खेळतात. ताल-लय यात त्या शब्दांना गुंफतात. यात खटके असतात, यमक, अनुप्रास असे अलंकार वापरलेले असतात. त्यामुळे शब्दांशी खेळ खेळत, शब्दांचा, अर्थाचा आकृतिबंध निर्माण करत त्या नवर्याचं नाव घेतात तेव्हा त्या उखाण्यात भोवतालचा तपशील मांडलेला असतो. तेव्हा स्त्रियांची शब्दांशी खेळ खेळण्याची ताकद, या निरनिराळ्या प्रकारच्या उखाण्यांमधून दिसते असं मला वाटतं. आणखी एक उखाण्याचा प्रकार असतो, तो म्हणजे खेळ खेळताना विशेषत: फुगड्या, झिम्मा खेळताना ्त्रिरया उखाणे घेतात. दोन मुली फुगडी खेळता-खेळता एकीकडे त्या फुगडीचा ताल असतो ‘‘दण दण दण दण…’’ असा आणि त्या तालामध्ये ते फुगडीचे शब्द बसतात. ‘‘फुगडी खेळू दणा दणा, रुपये मोजू खणा खणा, बाभळीचं झाड माझं, कंबरपट्टा लाल, मेहंदीचं झाड माझी पाचही बोटं लाल’’ असा हा फुगडी खेळण्याचा उखाणा. दुसरा उखाणा फुगडीच्याच वेळचा. ‘‘आम्ही दोघी मैत्रिणी एकमत करू. हातात बांगड्या हातभर भरू…’’ हा सारा शब्दांचा खेळ आहे. करू करू… हे इथे यमक जुळलेलं आहे. त्याला एक ताल आहे, लय आहे. स्त्रिया अशा प्रकारे शब्दांशी खेळ खेळत त्यात गंमतही करतात, म्हणजे कधी हे उखाणे गंभीरपणाने घेतले जातात, कधी थोडा दिलगिरीचा स्पर्शही त्याला दिला जातो.
मैत्रिणींचे खेळीमेळीचे संबंध असतील तर त्या मुली एकमेकींना चिडवायच्या, तेही उखाण्यातूनच. जसं, ‘‘चुलीवर ठेवला पापड, सोनीचा नवरा माकड…’’ फुगडी खेळताना असे अनेक प्रकारचे उखाणे या स्त्रिया घेत असत. फुगडी खेळताना किंवा निरनिराळे खेळ खेळताना ते वर्णन येतं. ‘दंडफुगडी’ वेगळी असते. दंडफुगडी दंडाची असते, बसफुगडी असते. यात ‘‘किस बाई किस, दोडका किस…’’ म्हणत पाय घासत घासत खेळ खेळायचा असतो फुगडीसारखा. किंवा दोन्ही हात धरून फुगडी खेळायची हे सगळ्यांना माहीत आहे.
नवर्याचं नाव घेण्याचे उखाणे हे फक्त मराठी भाषेपुरतेच मर्यादित राहत नाहीत. शेजारचा भाषिक प्रदेश असेल, त्या भाषिक प्रदेशाचा परिणाम त्या सीमा प्रदेशातल्या भाषेवर होत असतो. म्हणजे नागपूर, विदर्भाच्या आतल्या भागामध्ये गेलं किंवा हैदराबादजवळ गेलं, तर तिथं इस्लाम राजवट दीर्घकाळ होती. त्यामुळे उर्दू आणि हिंदी भाषेचा परिणाम त्या सीमा प्रदेशात असतो. तो भाषिक परिणाम म्हणून त्या भाषेतले उखाणे त्या धर्माच्या स्त्रिया घेतात. म्हणजे धर्म बदलला तरी संस्कृतीचा हा धागा कायम राहतो. म्हणजे एखादी मुस्लीम मुलगी जर नवर्याचं नाव घेण्यासाठी उखाणे घेत असेल तर ती म्हणते ‘‘तश्तरी में तश्तरी तश्तरीने खव्वा, मेरे पती के नाम की येलकी गावमें हव्वा…’’ तेव्हा मराठी व हिंदी असं मिश्रण करून त्या भाषेत स्त्रिया उखाणे घेतात. किंवा ‘‘मक्के की रोटी, सरसो का साग, आमकेराव मुझे मिले, खुश है मेरे भाग’’ यात हिंदी किंवा उर्दू भाषेचा प्रभाव दिसतो. आदिवासी प्रदेशामध्ये गेलं तर आदिवासी स्त्रिया त्यांच्या भाषेत नवर्याचंच नाव घेतात.
‘‘लाडी गोडी मा रमतू
आपलो यो परिवार
अमुक सायेब रो नाव
लेवा आज छ रविवार’’
निरनिराळ्या भाषिक प्रदेशाच्या सीमारेषेवर भाषिक मिश्रणं होतात आणि मुख्य म्हणजे सांस्कृतिक मिश्रणं होतात. नाव घेणं हे फक्त मराठी संस्कृतीचंच वैशिष्ट्य राहत नाही तर मराठी संस्कृती ज्या ज्या भाषिक, धार्मिक प्रदेशाला चिकटलेली आहे तिथला भाषिक परिणाम या उखाणे संस्कृतीवर होत असतो. म्हणून मी वारंवार सांगितलेलं आहे की, धर्मांतर झालं तरी संस्कृत्यंतर होत नाही. धर्म बदलतो परंतु लोकपरंपरेतल्या संस्कृतीचे धागे कायम राहिलेले असतात. नवर्याचं नाव घ्यायचा उखाणा असो, लग्नातली गाणी असो. लग्नातल्या गाण्यामध्ये धर्म बदलल्याचे खूप जाणवते. भाषा थोडीशी बदलली तरी लग्नात नाव घेण्याच्या चालीरीती, रूढी किंवा लग्नातल्या रूढी, परंपरा या त्या गाणी, उखाण्यांमधून दुसर्या भाषेमध्ये सहज प्रवाहित होताना दिसतात. कधी ते गुजराती, मराठी मिश्रण होतं. कधी हिंदी, मराठी होतं, कधी आदिवासी भाषांचं होतं, कधी कन्नड-मराठी भाषेचं होतं. ज्या सीमा प्रदेशामध्ये ही घटना घडत असेल त्याचे परिणाम त्या संस्कृतीवर होत असतात आणि त्या संस्कृतीमधली चाल, रीत, रूढी मात्र कायम असते. त्यामुळे नवर्याचं नाव घेणं ही पद्धत कायम असते.
सांस्कृतिक प्रसरण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला दिसतं. सांस्कृतिक आदान-प्रदान झालेलं दिसतं आणि स्त्रिया आपल्या बोलीभाषेमधून त्यात साध्य प्रवाहित करत असतात. त्यामुळे स्त्रियांची भाषा वापरण्याची, ताल, लय जपण्याची प्रवृत्ती हे आपल्याला उखाण्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं. निरनिराळ्या प्रकारच्या उखाण्यांबद्दल पुष्कळ बोलता येईल. या लेखात नवर्याचं नाव घेण्याचे उखाणे आणि खेळाचे उखाणे याबद्दल लिहिलं.
शेवटचा मुद्दा असा की, नवर्याचं नाव शब्दांच्या एवढ्या अनेक गोतावळ्यातून का घ्यायचं? त्याचं कारण काय? तर जुन्या काळापासून आपल्याकडे एक धारणा आहे. अथर्ववेदामध्ये त्याचे नमुने सापडतात. अथर्ववेदामध्ये काय आहे? लोकपरंपरेमध्ये ज्याला आपण जादूटोणा, मंत्र, तंत्र एकमेकांवर चांगली जादू किंवा वाईट जादू करायची. ‘कृष्ण यातू’ आणि ‘शुक्ल यातू’ म्हणतात, त्याचे मंत्र त्यात आहेत.
नवर्याचं नाव थेट घ्यायचं नाही. याचं कारण असं की, आपल्याकडे असा समज आहे की, एखाद्याच्या नावाने जादूटोणा केला, त्याचं वाईट होण्याचा मंत्र नावावर जरी घातला तर त्या व्यक्तीला तो बाधित होतो. आपला नवरा सुरक्षित राहावा, त्याचं खरं नाव चटकन लोकांना कळू नये हा त्यामागचा हेतू. म्हणून जुन्या काळी काही नवसाची मुलं असायची. त्या मुलांची नावंसुद्धा दोन ठेवली जायची. पाळण्यातलं नाव वेगळं आणि हाक मारायचं नाव वेगळं. पाळण्यातलं नाव शक्यतो कोणाला कळू देत नसत. तसं नवर्याचं खरं नाव कळू नये आणि नाव सुरक्षित राहिलं की व्यक्ती सुरक्षित राहते, अशी त्यामागची धारणा असल्यामुळे नवर्याच्या सुरक्षिततेसाठी अशा शब्दांच्या गोतावळ्यातून ते नाव व्यक्त करण्याची पद्धत होती, असं एक मत आहे.
नवर्याचं नाव घेण्याचे उखाणे हे फक्त मराठी भाषेपुरतेच मर्यादित राहत नाहीत. शेजारचा भाषिक प्रदेश असेल, त्याचा परिणाम सीमा प्रदेशातल्या भाषेवर होत असतो. भाषा बदलली तरी लग्नात नाव घेण्याच्या चालीरीती, रूढी किंवा लग्नातल्या रूढी, परंपरा या त्या गाणी, उखाण्यांमधून दुसर्या भाषेमध्ये सहज प्रवाहित होताना दिसतात. कधी ते गुजराती- मराठी मिश्रण होतं. कधी हिंदी- मराठी होतं, कधी आदिवासी भाषांचं होतं, कधी कन्नड-मराठी भाषेचं होतं. ज्या सीमा प्रदेशामध्ये ही घटना घडत असेल त्याचे परिणाम त्या संस्कृतीवर होत असतात आणि त्या संस्कृतीमधली चाली, रीती, रूढी मात्र कायम असतात. त्यामुळे नवर्याचं नाव घेणं ही पद्धतही कायम असते.
chaturang@expressindia.com
