शीतल मुळीक
साक्षीनं लग्नाचं मनावर घेतलं खरं पण एकाच वेळी तिच्या समोर अशा दोन व्यक्ती आल्या की कुणाला निवडावं याविषयी संभ्रम निर्माण झाला. अखेर तिने तो निर्णय फार विचारपूर्वक घेतला. कसा?
लग्नाचं वय! लग्नाचं वय! हे शब्द ऐकून ऐकून साक्षी वैतागली होती, पण वेळेत सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत हे तिला कळत होतं. करिअर तर पुढे पुढे आव्हान देत जाणारच आहे… अखेर साक्षीने स्थळं पाहायचं मान्य केलं.
आई : सातार्डेकर एकदम विश्वासू आहेत. त्यांनी पूर्ण विचार करूनच हे स्थळ आणलं असणार. पहिलंच स्थळ आहे हे. नाही आवडलं तर अजून पाहू असं म्हणून उगाच पुढे ढकलू नकोस.’’ साक्षी : ‘‘हो गं आई… तू तयारी कर आधी पटापट.. उशीर झाला तर इम्प्रेशन वाईट पडेल.’’
आई : ‘‘हा काय तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे इम्प्रेशन वाईट पडायला…’’
आई आणि साक्षी कारने निघाले आणि रेस्टॉरंटमध्ये वेळेत पोहोचले. सुमित आणि सुमितचे आईबाबा अगदी वेळे आधी येऊन रेस्टॉरंटमध्ये बसले होते. साक्षीला पाहून सुमितचा चेहरा खुलला, सुमितमध्ये पाहताक्षणी छाप पडावी असं काहीच नव्हतं अर्थात दिसणं हे काही साक्षीचं लग्नाचं प्रमाण नव्हतं त्यामुळे तिने लगेचच त्याला बाद केलं नाही. इकडची तिकडची बोलणी झाली. मुला-मुलीला वेगळं बोलू द्यावं असं सुमितच्या आईचं मत पडलं… मग त्या दोघांना बाहेर फिरून येऊ द्या असा विचार मांडण्यात आला. त्याला साक्षी तयार झाली.
सुमित : ‘‘माझी ऑफिसची मीटिंग आहे आठ वाजताची. तुमची हरकत नसेल तर आपण उद्या भेटूया.’’
साक्षी : ‘‘ शनिवारी सुट्टी असते ना.’’
सुमित : ‘‘सध्या एक महत्त्वाचा प्रोजेक्ट येतोय. थोडं जास्त काम आहे.’’ साक्षीच्या मनात पाल चुकचुकली. हा वर्कोहोलिक आहे की काय. आताच असं बोलतोय तर नंतर वेळ देईल का?
दुसर्या दिवशी सुमित आणि साक्षी बागेमध्ये भेटले तेव्हा तिने आधी हाच विषय त्याच्यासमोर ठेवला.
साक्षी : ‘‘तुम्हाला काम खूप आवडतं वाटतं.’’
सुमित : ‘‘तसं नाही, पण काम केलं की त्यातल्या सगळ्या आव्हानांची मजा घेता आली पाहिजे. नाहीतर आयुष्य नीरस होईल.’’ साक्षीला पटलं ते.
सुमित : ‘‘तुम्हाला छंद जोपासायला
वेळ मिळतो का?’’
साक्षी : ‘‘आमचा टेरेस फ्लॅट आहे त्यावर मी अनेक झाडं लावली आहे. त्यांच्याबरोबर मी खूप रमते.’’
सुमित : ‘‘ओह… काय योगायोग आहे. मलाही झाडांची काळजी घ्यायला खूप आवडतं. आमच्या रो-हाऊस भोवती मोठी झाडं पण लावलीत मी, चिकू, पेरू वगैरे…’’
साक्षी : ‘‘काय म्हणता मग तर खूप मजा येईल.’’ सुमितने चमकून तिच्याकडे बघितलं आणि मिश्कील चेहरा करून विचारलं, ‘‘हा तुमचा होकार समजू का मी?’’
साक्षी लाजली आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली, ‘‘अजून कोणकोणते छंद आहेत तुमचे?’’ सुमित : ‘‘वाचन! आता फार वेळ मिळत नाही, पण पूर्वी मी खूप वाचायचो.’’
साक्षी : ‘‘ कशा प्रकारचं वाचन करता तुम्ही?’’
सुमित : ‘‘ मला काल्पनिक आणि माहितीपूर्ण असं दोन्ही वाचायला आवडतं.’’
साक्षी : ‘‘ मग सध्या काय वाचताय?’’ सुमित : ‘‘सृष्टीची रचना देवाने केली की उत्क्रांतीतून झाली याचा ऊहापोह करणारं एक पुस्तक आहे.’’
साक्षी : ‘‘अरे वा! काय म्हटलंय मग त्यात?’’ सुमित बोलत राहिला आणि साक्षी ऐकत राहिली. मनाचे धागे एकमेकांत गुंफून एक सुंदर नक्षी बनू लागली.
दुसर्या दिवशी साक्षी प्रसन्न मन:स्थितीत उठली आणि तिला असं वाटू लागलं की, ही प्रेमाची जादू आहे का? त्याच मन:स्थितीत ती ऑफिसला पोचली.
आज ऑफिसमध्ये तिचा नवीन मदतनीस येणार होता. तिला तिच्या सगळ्या कामाची रूपरेषा त्याला द्यायची होती. साक्षी ऑफिसमध्ये वेळेत पोहोचली. रिसेप्शन रूममध्ये एक स्मार्ट, देखणा मुलगा बसलेला तिनं पाहिला. साक्षीला पाहताच तो उठून उभा राहिला नि म्हणाला, ‘‘हॅलो साक्षी मॅडम!’’
साक्षी : ‘‘ओह,अद्वैत सावंत का?’’ अद्वैत : ‘‘हो. गुलाम आपकी सेवा मे हाजिर है!’’ साक्षीला हसू आलं…
साक्षी : ‘‘ओळखी करण्यात पटाईत दिसता तुम्ही…’’
अद्वैत : ‘‘अजून खूप गोष्टीत पटाईत आहे.. आप आजमाके तो देखिये..’’
साक्षी पुन्हा हसली म्हणाली, ‘‘तुम्ही मला ओळखलं कसं?’’
अद्वैत : ‘‘साक्षी मॅडम सुंदर आहेत असं म्हटलं होतं मला कुणीतरी..’’
साक्षी परत हसली. म्हणाली,
‘‘आशा करते तुम्ही बोलण्यात आहात तसेच कामातही हुशार असाल.’’ अद्वैत : ‘‘आशा नाही ऑर्डर. तुम्ही ऑर्डर करायची आणि आम्ही ती चांगल्या प्रकारे पूर्ण करणार. बघालच तुम्ही.’’ साक्षीने दिवसभर अद्वैतला प्रशिक्षण दिलं, खूप कामात गेला दिवस, पण दिवसाच्या शेवटीही ती टवटवीत फुलासारखी खुललेली होती. आज ती जितकी हसली तेवढी ती कधीच हसली नव्हती…
काही दिवस भरकन गेले. कसलंसं स्वप्न बघत ऐके दिवशी साक्षी उठली. तिच्या अस्पष्ट जागृतीवर कुठलासा अस्पष्ट चेहरा येत होता आणि थोड्याच वेळात तो चेहरा स्पष्ट झाला. अद्वैत हात पसरून तिला मिठीत बोलावत होता. साक्षी ताडकन उठली. तिला आठवलं, तिने सुमितकडे आणखी वेळ मागितला होता. सांगितलं होतं की, आपण एकमेकांना आणखी काही काळ जाणून घेऊन या. लग्नाची घाई करून नंतर त्याचं ओझं वाटायला नको. ती संध्याकाळी सुमितला भेटणार होती. तिला मेल्याहून मेल्यासारख झालं. अद्वैतचा चेहरा असा का शिरू पाहतोय माझ्या मनात? तिला वाटून गेलं.
ती ऑफिसला पोहोचली तेव्हा अद्वैतकडे बघायची तिची हिम्मत होईना… ती त्याच्याकडे बघायचं टाळून त्याला काम समजावत राहिली. अद्वैत तिच्याकडे रोखून एकटक बघतोय असं जाणवलं तेव्हा तिनं स्पष्ट शब्दात विचारलं. ‘‘असं काय बघतो आहेस?’’
अद्वैत : ‘‘ मी? मी बघतोय? तुम्ही फारच गंभीर दिसताय. एनी प्रॉब्लेम?’’
साक्षी : ‘‘असं काही नाहीये..’’
अद्वैत : ‘‘मला वाटलं तुम्ही माझ्या प्रेमात पडलात…’’ साक्षीने ताडकन अद्वैतकडे पाहिलं…
अद्वैत : ‘‘तुम्हाला हसवायला बोललो मी, तुम्ही आणखीनच गंभीर झालात..’’ साक्षी संभ्रम लपवायला खोटं खोटं हसली. पण अद्वैत हुशार होता. तिच्या नजरेची भाषा त्याला कळली. त्याला अंदाज आला की,साक्षीच्या मनात काहीतरी चालू आहे. दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि नजरानजर झाली. पटकन साक्षी म्हणाली, ‘‘मी… एका स्थळाला भेटते आहे सध्या… ’’ अद्वैतचा चेहरा एकदम पालटला. अतिशय चिडून हातातले पेपर्स टेबलवर जोरात आपटून तो तिथून निघून गेला. पण थोड्या वेळाने तो स्वत:च परत आला. आणि काही झालंच नाही अशारीतीने बोलू लागला.
दुसर्या दिवशी रविवार होता. साक्षीला सात वाजता जाग आली. आज जरा मलूल वाटत होतं तिला. तिच्यासोबत जे होतंय ते बरोबर आहे की चूक या संभ्रमात होती ती. तिने फोन हातात घेतला. आणि मेधाचा नंबर लावला. रिंग वाजताच साक्षीने प्रसन्न होऊन एक समाधानाचा श्वास घेतला. मेधा एक अतिशय हुशार, स्मार्ट विवाह समुपदेशक होती. या परिस्थितीत मेधाच आपल्याला मदत करू शकते याची तिला खात्री पटली आणि ती उत्साहाने बिछान्यातून बाहेर पडली.
कॉफीशॉपमध्ये मेधा आणि साक्षी भेटल्या. थोडा वेळ गेल्यावर साक्षीनं सगळी परिस्थिती मेधाला सांगितली.
मेधा : ‘‘तुला सुमितबद्दल काही फिलिंग्ज आहेत तरी का? कारण आफ्टर ऑल इट्स अरेंज थिंग…’’ साक्षी : ‘‘सुमितकडे स्थिर आयुष्य आहे, पैसा आहे. तर अद्वैतकडे बहारदार व्यक्तिमत्त्व.’’
मेधा : ‘‘हे बघ पैसा आणि वरवरच व्यक्तिमत्त्व या सुरुवातीला दिसणार्या आणि आकर्षित करणार्या गोष्टी असल्या तरी सहजीवनात त्यांचं महत्त्व दुय्यम असू शकतं. खास करून तुझ्यासारख्या प्रगल्भ मुलीसाठी. सहजीवनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एकमेकांशी जुळणं. तुला कोणत्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या तू तडजोड करू शकतेस हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.’’
साक्षी : ‘‘एव्हढं कसं ठरवणार ज्याच्याबद्दल फारसं माहीत नाही.’’
मेधा: ‘‘त्यासाठी तुला दोघांनाही भेटावं लागेल आणि तेही बर्याचदा.’’ साक्षी: ‘‘ अगं तू काय मला डबल टायमिंग करायला सांगते आहेस.’’ मेधा :‘‘ मैत्री म्हणून भेट…’’
साक्षी : ‘‘ बरं…’’
काही दिवसांनी सहज म्हणून अद्वैतनं विचारलं, ‘‘ ठरलं का मग लग्न?’’
साक्षी : ‘‘ नाही अजून काही ठरवलं नाहीये मी.’’
अद्वैत : ‘‘ ज्याच्या नशिबात असणार त्यालाच मिळणार राणी सरकार. आपण लग्नाची शक्यता पडताळली तर?’’ साक्षीला हे एकदमच अनपेक्षित होतं. पण हे तिला खूप छान वाटलं. एकदम छान. ती हसायला लागली. त्या संध्याकाळी दोघे समुद्र किनारी गेले. अद्वैतनं स्वत:बद्दल सगळं साक्षीला सांगितलं. साक्षी आधीचे काही दिवस सुमितलाही भेटत होती. त्यामुळे सुमितही साक्षीला चांगला कळला होता. साक्षीनं मेधाला भेटायचं ठरवलं. बाहेर जेवायलाच भेटल्या.
मेधा : ‘‘ हा घे कागद. दोन कॉलम कर. एका बाजूला लिही सुमित. एका बाजूला लिही अद्वैत. आणि दोन्ही कॉलमचे आणखी दोन कॉलम कर. एका बाजूला लिही सकारात्मक गुण आणि दुसर्या बाजूला लिही नकारात्मक गुण. आतापर्यंत त्या दोघांविषयी जे काही कळलंय त्याची यात मांडणी कर. साक्षीने सांगितल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. सुमितचे सकारात्मक गुण – समजूतदारपणा, जसं आपण आता राहतो तसं राहणीमान ठेवू शकतो, स्वत:ची स्पेस देतो, कुठलीही गोष्ट शांतपणे हाताळू शकतो, हवं ते करायचं स्वातंत्र्य देतो, तडजोड करायला तयार असतो. अद्वैतचे सकारात्मक गुण – तल्लख विनोदबुद्धी, दिसायला साजेसा, राग मनात ठेवून राहत नाही, कामात हुशार असल्याने आर्थिक दृष्टीने स्थिर होऊ शकतो, मला आलेल्या रागाला पटकन घालवू शकतो मस्करी करून, सतत प्रेम व्यक्त करत राहतो.
सुमितचे नकारात्मक गुण – कमी बोलतो, विनोदबुद्धी फार नाही, कामात गुंतणारा स्वभाव त्यामुळे वेळ कमी देऊ शकतो. अद्वैतचे नकारात्मक गुण – पटकन खूप रागावतो, आर्थिकरीत्या तडजोड करावी लागेल, मुडी स्वभाव.- सविस्तर लिहून साक्षीने तो कागद मेधाला दिला. मेधाने तो वाचला.
मेधा : ‘‘ तू स्वत:ला ओळखतेस त्यावरून यातले कोणते गुण तुला खूपच आवडतात आणि खूप आवश्यक आहेत असं तुला वाटतं? आणि कोणते तू अजिबात सहन करू शकत नाहीस याची यादी कर. तू स्वत:ला लहानपणापासून ओळखतेस तर उगाच तू आतापर्यंत न केलेल्या गोष्टी गृहीत धरू नकोस. स्वत:चा स्वभाव ओळखून लिही.’’
साक्षीने सगळ्या कागदावर नजर फिरवली आणि लहानपणापासून स्वत:चा स्वभाव, घटना आठवल्या. आपण कधी, कसे वागतो आणि आपल्याला काय हवंय याचा ऊहापोह केला. आणि लिहायला सुरुवात केली. ‘ खूप आवश्यक आहे समजूतदारपणा कारण आपण थोडे रागिष्ट आहोत. आपण स्वतंत्र वृत्तीचे आहोत म्हणून तडजोड करणारा साथीदार हवा. राग येणारा नवरा केला तर सतत भांडण होत राहतील आणि आपल्याला शांतता आवडते. विनोदबुद्धी असणं आणि राग पटकन निघून जाणं जरी खूप छान असलं तरी त्याचं महत्त्व माझ्यासाठी समजूतदारपणा असण्यापेक्षा महत्त्वाचं नाहीये. कुणीतरी आपलं शांतपणे ऐकून घेणं आणि समजावून अडचणीत मदत करणं हे आपली सतत तारीफ करण्यापेक्षा माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. दिसणं कितीही आकर्षक असलं तरी आपला मेंदू सांगतोय दिसणं दुय्यम आहे.’ तिने पुन्हा एकदा कागदाकडे नीट बघितलं. विचार केला आणि उत्तर लिहिलं, सुमित. आणि तो कागद खूश होत मेधाकडे सरकवला. ‘‘अभिनंदन! तुझी निवड करून झालीय.’’ असं म्हणून मेधानं साक्षीशी हात मिळवला.
साक्षी लग्नात खूश होती. अद्वैत तिच्या लग्नाला आला नाही. त्याने साक्षीने दिलेली पत्रिका टेबलावर भिरकावून दिली होती आणि समोरून निघून गेला होता. साक्षीला खूप राग आला होता या वागण्याचा. पण माणसानं जुनं सारं सोडून द्यावं आणि स्वत: केलेल्या निवडीत सुखाने राहावं, असं म्हणत समाधानानं हसली.
sheetalmulik@gmail.com
