काही वर्षांपूर्वी एका शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले होते. प्रेक्षागारात काही मुलं आपापसात बोलत होती. त्यावेळी ‘‘ए, आपण सगळ्यांनी गाणं एकत्र बोलू या हा.’’ असं त्यांच्या संभाषणातलं एक वाक्य माझ्या कानावर पडलं. मला गाणं गातात हे माहीत होतं, पण गाणं ‘बोलणं’ हे नवीनच होतं. आणि थोडं धक्कादायकही. पण कालांतराने हा धक्का अधिकाधिक तीव्र होत गेला. आता सर्रास कविता, गाणं ‘बोलतात.’, ‘मी तुझी कोणती मदत करू?’ सारखं चुकीचं वाक्य बोलतात. काही वेळा तर हिंदी, इंग्रजीची सरमिसळ होते. मी घाबरलो ऐवजी, मी ‘डरलो’, किंवा मी पाणी ‘ड्रिंकलं’ हे त्यातूनच आलेलं.
असं बिघडत गेलेलं मराठी ऐकत असतानाच मराठी मन धास्तावून जावं, अशी बातमी म्हणजे, दहावी परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात राज्यातील सुमारे ९४ हजार ५४४ विद्यार्थी मराठी भाषा विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यात फक्त मराठी माध्यमातील म्हणजे ज्यांची प्रथम भाषा मराठी आहे असे ८०,८०३ विद्यार्थी आहेत. म्हणजे एकूण जवळपास १ लाखाच्या घरात हा आकडा पोहचलेला आहे. एक माजी मुख्याध्यापिका, शिक्षिका म्हणून आस्थेपोटी मराठी भाषा विषयातील या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांबाबत काही भाषा तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, आणि पालक यांच्याशी बोलले असता काही मते समोर आली.
मराठीत भाषा विषयात मोठ्या संख्येने जर मुले नापास होत असतील तर त्यामागची कारणे शोधायलाच हवीत. जी मुलं इंग्रजीसारखी परकीय भाषा शिकू शकत असतील तर मातृभाषा असलेली मराठी शिकण्यात ती मागे का राहतात, याचं उत्तर पालक, शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था याचं मराठीबाबत असणारं उदासीन धोरण हेच असावं. एका सजग पालकाने या अनुषंगाने विचारलेला प्रश्न चिंतेत पाडणारा आहे. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना जर मराठीच येत नसेल तर मराठी भाषेत शिकवल्या जाणार्या इतर विषयांचे आकलन त्यांना कसं होत असेल?’’ यासंदर्भात अनेक पालकांनी पूर्वी केलेली तक्रार आठवली. त्यांचं म्हणणं होतं, ‘‘आमच्या पाल्यांना मराठी भाषेचा अभ्यास करणं कठीण जातं. मराठीमध्ये लेखनाच्या चुका होतात, ती लिहिणं कठीण जातं.’’ खरं तर जी भाषा जशी बोलली जाते तशीच लिहिली जाते, असं असताना आपली मातृभाषा सलग नऊ वर्षं शिकल्यावरही दहाव्या वर्षी ती लिहिताना अक्षरजुळणी करता येत नसेल आणि विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याएवढी बिकट अवस्था येत असेल तर याबाबत चिंता नाही तर खेद जास्त वाटला पाहिजे. परकीय भाषांमधील उच्चारापेक्षा वेगळी असणारी अक्षरजुळणी, वाक्य रचना लक्षात ठेवण्याएवढी आपली पाल्यं सक्षम असतील तर मग आपल्या मातृभाषेबाबत इतकी उदासीनता का? यावर जास्त चिंतन झालं पाहिजे.
त्यावर एका पालकाने थेट सांगितलं की, ‘‘याचं कारण मराठी ही ‘चलनी’ भाषा नाही.’’ चलनी नाही म्हणजे त्यात रोजगाराच्या संधी कमी आहेत. पण हे वरवरचं विधान झालं. मराठी भाषेमध्ये आज अनेक संधी उपलब्ध आहेत. मराठी पत्रकारिता, मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचे लेखन, निवेदन लेखन इतर भाषांमधून किंवा मोडीसारख्या इतर लिपींमधून भाषांतर करणारा भाषांतरकार इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. कृत्रिम प्रज्ञेच्या (एआय)च्या युगात अचूक ‘प्रॉम्प्ट’ तयार करणं हासुद्धा एक व्यवसाय आहे. जर तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व असेल तर उत्कृष्ट मराठी ‘प्रॉम्प्ट’ तयार करून तुम्ही कृत्रिम प्रज्ञेच्या जगात चांगली मिळकत मिळवू शकता, पण विद्यार्थ्यांपर्यंत करिअरचे हे पर्याय पोहोचत नसल्याने आपोआपच भाषेबद्दलचं प्रेम आटत जातं हे नक्की. मी महाविद्यालयात शिकत असताना आम्हाला वारंवार सांगितलेलं निवृत्त प्रशासकीय अधिकारी भूषण गगराणी यांचं उदाहरण कायम आठवतं. त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा मराठीतून दिली आणि देशात तिसरा क्रमांक पटकावला. म्हणजेच मराठीला ‘व्यावहारिक’ महत्त्व नाही असं नाहीये. अशा यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणं पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यात आपण सारेच पालक, शिक्षक आणि समाज म्हणून कमी पडतोय, हाच त्याचा अर्थ असू शकतो.
‘‘मातृभाषा मराठी असणारा माणूस आपल्या मनाशी मराठीतूनच संवाद साधत असतो, विचार करत असतो. त्यातूनच काही निर्णयाप्रत पोहोचत असतो. म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी आपलं मातृभाषेवर प्रभुत्व असणं अत्यंत गरजेचंच आहे. त्याचबरोबर संभाषणकौशल्य आणि नातेसंबंध वाढवणं, त्यांची जोपासना करणं यासाठी मराठीचीच गरज आहे,’’ असं मराठी विषयाच्या तज्ज्ञ संपदा जोशी सांगतात. यालाच जोड देताना माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापकपद सांभाळणारे प्रवीण घाडीगांवकर सांगतात, ‘‘मराठी भाषा व्यवहारात आणणं किंवा तिचं उपयोजन करणं होत नाही त्यामुळे अनुत्तीर्णांची संख्या वाढत आहे.’’ मात्र त्यासाठी काठिण्यपातळी कमी करणं हा उपाय नाही. याविषयी मी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याशी बोलले असता त्या प्रत्येकाचा, दहावीच्या मराठी माध्यमाच्या कृतिपत्रिकेची काठिण्यपातळी ही त्या वर्गासाठी अपेक्षित असणार्या काठिण्यपातळीपेक्षा थोडी कमीच होती, असाच एकंदर सूर होता.
‘‘असं असतानाही जे विद्यार्थी मराठीत कच्चे आहेत तेही कमी पडतात आणि हुशार विद्यार्थीही मराठीत मागे राहातात,’’ असं मराठी विषयाच्या शिक्षिका असणार्या शीतल सामंत अत्यंत उद्वेगाने सांगतात. त्यांच्या मते, ‘‘काठिण्यपातळी खूप सोपी करून काय साध्य होतं? कागदावर गुणांचा आकडा फुगत असेल, पण विद्यार्थ्यांच्या मनात मराठी हा सोप्पा विषय आहे असा विचार रुजून त्या विषयाच्या अभ्यासाबाबत अनास्था निर्माण होते.’’ एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान मिळत नसेल तर त्याचा अभ्यास करण्यातही किती आनंद मिळेल? कुमारवयीन मुलांना आव्हाने स्वीकारायला आवडतात, असं मानसशास्त्र सांगतं. सगळंच सोप्पं असेल तर आव्हान उरणार नाही आणि विषयातला रसही कमी होत जाईल.
मराठी ही मातृभाषा आहे, परंतु ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ या उक्तीप्रमाणे मराठी विषयाच्या अध्ययनाला दुय्यम लेखलं जातं. अभ्यासाची मराठी आणि व्यवहारातली मराठी यात बराच फरक आहे, असं सांगत मराठी विषयाचे शिक्षक महेश धामापूरकर म्हणाले, ‘‘भाषा म्हणून मराठी शिकताना तिचा पायाभूत आणि शास्त्रशुद्ध अभ्यास झालाच पाहिजे, या विचारापासून सारेच थोडे लांब जात आहेत. मराठी सोपा विषय असं मानलं जातं आणि गणित, इंग्रजी, विज्ञान यांची अवघड विषयांमध्ये गणना होते. त्यामुळे अभ्यासासाठीचा कालावधीही मराठीसाठी कमी दिला जातो. ‘कोडिंग’, ‘डिकोडिंग’, ‘इंग्रजी कम्युनिकेशन’ हे सगळं अभ्यासण्याच्या गडबडीत मराठीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं.’’
मराठी भाषेकडे पाहाण्याची दृष्टी ‘दैनंदिन जीवनात भाषेचं एवढं विशेष महत्त्व काय? भावना पोहोचल्या की झालं…’ अशी असल्यानं त्याचं महत्त्व कमी झाल्याचं अनेकांचं मत पडलं. मात्र त्याचाही सखोल विचार करणं गरजेचं आहे. पौगंडावस्थेत असणार्या अनेक मुलांच्या पालकांची आजकाल तक्रार असते मुलं चिडचिड करतात, रागराग करतात, उलट उत्तरे देतात, ऐकत नाहीत वगैरे. मुलं नैराश्याची, चिंतेच्या आजाराची शिकार बनत चाललेली दिसतात. शिक्षक आणि समुपदेशकही हे मान्य करतात. आपली मातृभाषा हे भावना व्यक्त करायचं साधन आहे. ते साधनच जर सशक्त नसेल तर भावना कशा व्यक्त करणार? त्यामुळे अनेकदा भावना दाबल्या जातात आणि त्यातून अनेक वर्तणुकीच्या आणि मानसिक समस्या जन्म घेतात. म्हणूनच पालकांनी मातृभाषेला महत्त्व देणं, मुलांशी त्याच भाषेत संवाद साधणं गरजेचं आहे. मराठीचं स्थान घरात बळकट झालं तर पालक आणि पाल्य यांच्या संवादामध्ये आणखी मोकळेपणा येईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम पाल्याच्या मानसिक आरोग्यावर होईल हे नक्की.
विद्यार्थ्यांमध्ये शाळा स्तरावर मराठी भाषा रुजवण्याचं काम अर्थातच शिक्षकांचं. तज्ज्ञ संपदा जोशी म्हणाल्या, ‘‘जाहिराती लिहिणं, ब्लॉग लिहिणं, विनंतीपत्र, बातमीपत्र तयार करणं या सगळया गोष्टी जगण्यासाठी उपयोगी पडणार्या आहेत. म्हणजेच त्यांना व्यावहारिक महत्त्व आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यासाठी वेगवेगळया पद्धतीने प्रोत्साहित केलं जावं. यामध्ये विद्यार्थ्यांना छोटे ब्लॉग लिहिणं, वर्गातल्या घटनेचं बातमीपत्र लिहिणं, अशी वेगवेगळी वर्गकार्ये देऊन त्यात सातत्यानं उत्कृष्ट काम करणार्या विद्यार्थ्यांचं आठवड्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या शेवटी कौतुक करण्यासारखे उपाय योजता येतील.’’ अध्यापनातला एकसुरीपणा टाळला गेला तर मराठी विषयाच्या सौंदर्याची विद्यार्थ्यांना जाणीव होईल, असंही सर्वांचं मत पडलं. यासाठी कवितावाचनाच्या वेगवेगळ्या पद्धती, प्रगटवाचनात मुलांचा सहभाग वगैरेसारखे अनेक उपक्रम सातत्याने राबवता येतील. या विषयावर बोलताना एका शिक्षकाने मात्र सांगितलं की, काही शिक्षकांना हे सगळं करण्याची इच्छा असूनही इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या रेट्यामुळे त्यांना ते काम करता येत नाही. मराठीवर कशाला एवढे कष्ट घ्यायचे, या विचाराच्या प्रबलतेमुळे त्यांची इच्छा मागे पडते. मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनीही वेळोवेळी अशा मनापासून धडपडणार्या मराठी शिक्षकांना प्रोत्साहित केलं पाहिजे. तसेच शासनानेही अभिजात मराठी भाषा पुढे नेऊ पाहणार्या अशा शिक्षकांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करायला हव्यात.
भाषा विषयाची तळमळ असणार्या शिक्षिका नूरजहाँ नाईक यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. त्या म्हणाल्या, अलीकडे शाळेमध्ये दहावीचा निकाल आल्यावर त्याचं विश्लेषण करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे हे विद्यार्थी एक तर उच्च गुण मिळवणारे असतात किंवा थेट निम्न गुण प्राप्त करणारे असतात. मध्यम गुण मिळवणारे विद्यार्थी जवळजवळ नाहीसे होऊ लागले आहेत. कारण जे उत्तरपत्रिकेत उतरवलं जातं ते बहुतांशी तयार हातात मिळालेलं असतं.’’ यालाच पुष्टी देत मराठी शिकवणार्या शीतल सामंत म्हणतात,‘‘ मुलांचे अनुभव आणि भावविश्व खूप कमी पडतंय, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. एखादा प्रश्न जरा फिरवून विचारला की ते गडबडतात. स्वत:हून उत्तर देण्याची क्षमता कमी झालीय. मेंदूचा विचारांचा कप्पाच वापरला जात नाही का?, असं वाटून काळजी वाटते.’’
आज सारेच पालक आपल्या पाल्यांकडून उच्च स्तरावरील कामाची अपेक्षा करतात. अशा वेळी त्यांच्यातील उच्चभाषिक क्षमता विकसित होणं गरजेचं आहे. ही क्षमता विकसित करण्याचे काही मार्ग या क्षेत्रातील तज्ज्ञांशी बोलताना समजले. त्यातील अनेक गोष्टी शिक्षक त्यांच्या त्यांच्या वर्गात करत असतीलच. पण काही गोष्टी जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे. प्राथमिक शाळेपासूनच शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये असणारी वैशिष्ट्यं जाणवत असतात. भाषेसंदर्भात ही त्यांची किल्ली त्यांच्याच हातात देत त्यांना विकासाला मदत करणं, स्वमत तयार करण्यासाठी मुलांना त्यांचे विचार त्यांच्या शब्दांत वर्गात मांडण्यासाठी प्रोत्साहन देणं, कठीण वाटलेले शब्द विचारायला सांगणं, पुस्तक वाचून त्याचं परीक्षण करण्यास वर्गात प्रोत्साहन देणं, तासिकांचं योग्य नियोजन करून वर्गात अनेक विषयांवर विचारमंथन करणं असे अनेक उपक्रम शिक्षक राबवू शकतात.
खरं तर भाषा म्हणजे वाचन, लेखन, आकलन, अभिव्यक्ती, कौशल्य याचा संगम आहे. आपल्या मातृभाषेतून त्याचे संस्कार मुलांमध्ये रुजवायला हवेत, त्याची आवड निर्माण करायला हवी म्हणजे मग मुलं आपल्याच भाषेत नापास व्हायची भीतीच राहणार नाही.
joshimeghana.23 @gmail.com
