सुप्रिया सावंत
घरातल्या आर्थिक परिस्थितीचे चटके बालपणातच अनुभवलेले अनेक जण आता सढळ खर्च करताना थोडेतरी कचरतातच…कारण आताच्या सुखवस्तू जगण्याला कधीकाळी केलेल्या काटकसरीची, आवडलेल्या अनेक गोष्टींकडे मन मारून केलेल्या दुर्लक्षाची दुखरी किनार असते. असे क्षण ठरवलं तरीही विसरता येत नाहीत आणि हे क्षण आपल्या अतिशय प्रिय व्यक्तीबरोबर जगलेले असू तर या क्षणांची आठवण आनंदाच्या क्षणीसुद्धा टोचत राहते… पण आयुष्यभराचा धडाही देते…
एकदा खरेदी करताना मनाचा हिय्या करून मी डेबिट कार्डचा पिन नंबर पहिल्यांदा अगदी न चुकता टाकला त्यावेळी माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता. नेहमी या विषयावर विनोदाचे बोचकारे मारून मला हैराण करणार्या नवरोबाला माझ्यापेक्षाही आनंदाने उड्या मारू की काय असं झालं होतं.
ऑनलाइन शॉपिंग/ओटीपी/ क्रेडिट शॉपिंग या माझ्यासाठी भीतीदायक असलेल्या गोष्टींपासून मी लांबच असायचे पण ‘काळाबरोबर चालायला शिक,’ असं सतत पालुपद लावणार्या माझ्या नवर्यासाठी मी एक डेबिट कार्ड घेतलं खरं, पण दोन-तीन महिने चक्क न वापरताच ते पर्समध्ये पडून होतं. खरेदीसाठी जेव्हा ते पहिल्यांदा बाहेर काढलं आणि मशीनमध्ये घातलं तेव्हा काउंटरवरची मुलगी म्हणाली, ‘‘ मॅडम पिन नंबर टाका.’’ तोंडात पिनचा पाढा सुरू… तरीही नेमका उलटा पडला, मग डायरीत नोंद करून ठेवल्याचा फायदा झाला. मागे वाढत जाणार्या रांगेमध्ये कुजबुज होत होती. त्याकडे दुर्लक्ष करीत कशीबशी निसटले तिथून, पण नंतर हळूहळू छान सवयीचं झालं. आताशा मी खरेदी झाली, की काउंटरवर येऊन दिमाखात कार्ड बाहेर काढते, न चुकता पिन टाकते. भारतीय स्त्रियांचं आर्थिक स्वातंत्र्य नक्की हेच याची खूणगाठ बांधत मी सामान भरते पण ‘ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल’ झाल्याचा मेसेज आणि त्या चपट्या मशीनमधून कागदी चिठ्ठी सरसरून बाहेर येत नाही तोपर्यंत जीवाची घालमेल सुरूच असते आणि खरोखर किती सोप्पं आहे ना! याची प्रत्येक वेळी निश्चिंती मिळते आणि मग चालता चालता मन चाळीस वर्षं मागे जातं. पैशांशी असलेलं नातं जाणवत राहातं.
जेमतेम दहा वर्षांची असेन मी, आईबरोबर काही कामानिमित्त मामाकडे चालतच निघालो. कदाचित आईकडे बससाठीचे पुरेसे पैसे नसावेत आणि मीही फिरायला मिळेल या बालसुलभ आनंदात तिच्याबरोबर निघाले खरी, पण येताना मात्र ‘फुल ग्लास मलईदार लस्सी’ द्यायची ही अट आईकडून मान्य करून घेतली. मामाकडून परत निघालो, पुन्हा चालतच. आईचं अपेक्षित काम बहुधा झालं नसावं. नाराजच होती थोडी. चालताना वाटेत बरीच उपाहारगृहं, दुग्धालयं मागे पडत होती. आईचा हात दाबून मी प्रत्येक ठिकाणी थांबवण्याचा असफल प्रयत्न करत होते त्यावर आई पुन्हा खेचत माझी गाडी पुढेपुढे नेत होती. आई दिलेला शब्द पाळत नाही याचा राग राग येत होता. सरते शेवटी लस्सी पिण्याची इच्छा अनावर झाल्याने आईच्या हाताला हिसडा देऊन तिथंच उभी राहून रडू लागले. नाईलाजानं पुढे दोन मिनिटांवर असलेल्या उपाहारगृहात आम्ही शिरलो. आत बर्यापैकी वर्दळ… मी आईचा हात सोडून धावत जाऊन कोपर्यातल्या एका टेबलावर जागा पकडून बसले. वेटरने पाण्याचा ग्लास पुढ्यात ठेवला तेवढ्यात, गटागट पाणी पिऊन पाय हलवत मी आजूबाजूचे निरीक्षण करू लागले.
भिंतीच्या पलीकडे एक वेगळंच जग दिसत होतं. आचार्यांची गडबड, पेटलेल्या चुली, भांड्यांचे आवाज, कानावर पेन अडकवलेले टोपीवाले वेटर तयार झालेले पदार्थ अदबीने टेबलांवर ठेवत होते, काही निर्विकार चेहर्याने टेबल पुसत होते. नवीन ग्लासं पुन्हा भरून येत होती. बडीशेपच्या वाट्या, डोसे, इडली, वडे-सांबर विविध पदार्थ इथून तिथे फिरत होते. त्यांचा संमिश्र सुवास जीभ चाळवत होता. बाजूच्याच फ्रिजच्या उघडझापीमुळे थंड हवेच्या झुळुकी मानेला गुदगुल्या करीत होत्या.
बराच वेळ झाला होता, आई काउंटरवरच्या व्यवस्थापकाबरोबर काहीतरी बोलत हातातली पाच रुपयाची हिरवी नोट त्याला दाखवीत होती. त्याने हातात घेऊन काहीतरी म्हणत परत तिला दिली तेव्हा मात्र आईची नजर मला शोधू लागली. आमची नजरानजर एक होताच तिने उठून येण्याची खूण केली, पण मी त्याकडे दुर्लक्ष करून तिलाच आत बोलवत बाजूला बसण्याची जागा दाखवू लागले. मी जागची हलत नाही हे पाहून तीच वेगाने आत आली आणि माझ्या बखोटीला धरून बाहेर नेऊ लागली. मी अक्षरश: रडू लागले पुन्हा बाकावर बसण्याचा हट्ट करू लागले. काउंटरवरचा तो व्यवस्थापक आणि आजूबाजूची माणसं आम्हा दोघींकडे चमत्कारिक नजरेनं पाहत होती. मग फरफटतच आईने उपाहारगृहाच्या पायरीवरून मला बाहेर खेचले. दोघीही चालू लागलो होतो मनात एक वादळ घेऊन… कसलं बरं वादळ?… अपमानाचं, अवहेलनेचं, निराशेचं की आपल्या क्षुल्लक असण्याचं?… चालता चालताच आई बोलू लागली, ‘‘अगं नोट अगदी जीर्ण होती ना, म्हणून त्याला आधीच विचारलं चालेल का? तो नाही म्हणाला, बरं झालं आधीच शहानिशा केली. नाहीतर नंतर तमाशा झाला असता. तुला पुढच्या वेळी लस्सी नक्की देईन हो! आता आधी लवकर घरी जाऊ.’’ आईच्या चालण्याचा वेग आता वाढला होता. कदाचित परिस्थितीवरचा राग ती चालण्यातून व्यक्त करत होती. मीही तिचा हात घट्ट पकडून धावतच तिचा वेग साधण्याचा प्रयत्न करत होते. दोघीही गप्प, शांत. आजूबाजूची गर्दी मागे पडत होती. कशाचंच भान नव्हतं दोघींना, कधी एकदा आपलं घर गाठतो असं झालं होतं. पण तरीही माझ्या डोळ्यापुढून फ्रिजमधून बाहेर येणारा, थंडगार लस्सीवर तरंगणारा मलईचा तुकडा, लांब मधोमध दिमाखदार स्ट्रॉची नळी उभा केलेला ग्लास काही जाता जात नव्हता. त्यावेळी आईच्या मनात काय चाललं असेल…? कदाचित इतकी क्षुल्लक गोष्ट आपण लेकीला देऊ शकत नाही याचं शल्य?… पण मीही त्यानंतर ठरवलं आयुष्यात कधीच कुणाकडे हट्ट करायचा नाही आणि हा निर्धार मी अजूनही मोडलेला नाही.
इतक्या वर्षांनीसुद्धा हा प्रसंग पुन:पुन्हा डोळ्यासमोर येतो. लेकीला घेऊन मॉलमध्ये आत्मविश्वासाने फिरताना, काउंटरवर पिन नंबर टाकताना आणि चुटकीसरशी सगळी ‘पेमेंट डन’ करताना मला नेहमी आईची आठवण येते. आणि मग पाच रुपयांची हिरवी नोट, लस्सीचा थंडगार ग्लास आणि तिचा अगतिक चेहरा नजरेसमोर येतो.
त्यावेळी आईला सांगावंसं वाटतं, आई, आज त्या पाच रुपयांच्या नोटांची छोटी छोटी नाणी झालीयत, कदाचित भविष्यात आधुनिकतेच्या डिजिटल रेट्यात तीसुद्धा चलनातून बाद होतील, पण माझ्या मनात मात्र सदैव टोचत राहतील.
prabhusupriya0@gmail.com
