आपल्या देशात करोना साथीच्या दरम्यान पहिली टाळेबंदी सुरू झाली आणि आमच्या योग शिक्षिका अंजूताई यांच्या आईला रुग्णालयात दाखल करावं लागलं. करोनामुळे सगळे भयभीत झालेले असल्यानं इच्छा असूनही आम्ही कुणीच मदत करण्याचं धाडस दाखवू शकलो नाही, तरी दोन शिलेदार जीवावर उदार होऊन तयार झाले. त्यांना हाताशी घेऊन अंजूताईंनी दहा-बारा दिवस किल्ला लढवला; तोही स्वत:ची तब्येत ठीक नसताना. मात्र एक दिवस त्यांचा फोन आला, ‘‘वंदना, आई गेली गं!’’ त्यांच्या आवाजातला कंप, वेदना, रितेपणा मला त्या एका वाक्यातही स्पष्ट जाणवला. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे वडील गेले होते आणि दोन महिन्यांपूर्वी त्यांचे योगगुरूही! अतिशय संवेदनशील, हळव्या, ऋजू स्वभावाच्या अंजूताई आतून अगदी तुटल्या होत्या.
त्यांच्याशी काय आणि कसं बोलावं मला सुचेना. अशा वेळी मला स्पर्शाची भाषा खूप जवळची वाटते. वाटलं, त्यांना भेटावं, त्यांचा हात हातात घ्यावा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांचं सांत्वन करावं; पण करोनाचे नियम आडवे आले. दूरध्वनीवरून बोलणं, समजावणं खूप उपरं, दूरस्थ वाटलं. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यातल्या मर्यादा जाणवत राहिल्या. त्या बोलत होत्या, तरी खर्या अर्थानं त्यांचं मन मोकळं होतंय असं वाटेना… मनात आलं स्पर्शाचं महत्त्व उमगायला करोनासारखा विषाणू अवतरावा लागावा?
आपल्या भारतीय समाजात स्पर्श या गोष्टीकडे कायमच दूरस्थ भावनेनं पाहिल्याचं दिसतं. बाहेरच्या अनेक देशांत हस्तांदोलन, आलिंगन, कपाळावरती, हाताचे चुंबन अशा अभिवादनाच्या, परस्परभेटीचा आनंद व्यक्त करण्याच्या, वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यामध्ये कमालीची सहजता आहे. अनेक ठिकाणी तर समोरची व्यक्ती पुरुष आहे की स्त्री, हा विचारही मनात नसतो. एका माणसाने दुसर्या माणसाजवळ केलेली आपल्या भावनेची अभिव्यक्ती एवढंच अभिप्रेत असतं. तिकडची मुलं हे बघतच मोठी होत असल्याने, त्यात त्यांनाही काही वावगं वाटत नाही. खरं तर भारतातही मूल जन्माला आलं की स्पर्शाने किती श्रीमंत होत वाढतं! तान्ह्या बाळाची साधी आंघोळच बघा ना. इतका कोवळा जीव, पण तेलाचा मसाज किती छान करून घेतो. बाळगुटी, हळद-वेखंड, अंघोळ घालणार्या हातांच्या स्पर्शाला अगदी सुगंधी करून टाकतात. आंघोळीनंतर बाळाची मुलायम कांती किती तुकतुकीत दिसते आणि त्याच्या जावळाचा प्राजक्ताच्या फुलांसारखा मऊ मुलायम स्पर्श! कितीतरी वर्षं एकत्र कुटुंबात वाढणारी मुलं घरातील किती जणांचा स्पर्श अनुभवत मोठी होत असत. अगदी मोठ्या भावंडांच्या उत्सुक, प्रेमळ तर कधीकधी बालसुलभ हेव्याच्या स्पर्शापासून, पणजी, आजीच्या मऊ हातांच्या अनुभवी स्पर्शापर्यंत! आईचा मायेनं ओथंबलेला प्रेमभरला स्पर्श, तर बाबांचा पितृछाया धरणारा आश्वासक स्पर्श. अगदी घरातल्या गडीमाणसांच्या हक्काच्या स्पर्शापासून इतर अनेक नातेवाईकांच्या भावपूर्ण स्पर्शाची केवढी विविधता…
बाळ मोठं होत जातं, कारभार-हट्ट करायला लागतं, ऐकेनासं होतं, नि मग हेच मृदू स्पर्श ‘वळण लावण्याच्या’ नावाखाली कधीकधी कठोरही होतात. मुलांचं घराबाहेरचं जग विस्तारत जातं, तसं स्पर्शातील वैविध्य समजायला लागतं. तरुण वयात चोरट्या, पण हव्याहव्याशा वाटणार्या स्पर्शाची ओळख होते. त्यातून अगणित नात्यांची गुंफण होते. कुणी मित्र-मैत्रीण, तर कुणी सखा-सखी बनतात. प्रेमात पडल्यावर प्रियकर-प्रेयसीचं नातं सफल झालं तर ते पती-पत्नीच्या नात्याचा अनुभव देतं! या सर्व काळात हवेसे स्पर्श, नकोसे स्पर्श…या सगळ्या स्पर्शांची ओळख होते; त्यातून माणूस ‘समजण्याची जाण निर्माण होते. परंतु या समजून घेण्याच्या प्रक्रियेला पूर्वी समाजातून मनमोकळी संमती क्वचितच मिळायची. सतत पहारा आणि सतत नकार. जणू सर्व स्पर्श वाईटच असतात. स्पर्शातून सुरू होणारी प्रेमाची भाषा पुढे जाऊन कोणालातरी फसवण्यासाठीच असते. पती-पत्नीच्या कायदेशीर, हक्काच्या नात्यातही, बाहेर फिरताना सहज धरावासा वाटणारा हात म्हणजे केवळ प्रेमाचं प्रदर्शन! ‘आपापल्या घरात बसून करा तुमच्या प्रेमाचे ‘चाळे’.
चारचौघात वावरताना, वागताना काही लाज-शरम आहे की नाही?’ अशी वाक्यं पूर्वी सर्रास कानावर पडायची. अर्थात समाजाची मानसिकता हळूहळू बदलत गेली. निसर्गनियमांचा विचार केला तर स्पर्शाचा संबंध आपल्या त्वचेशी असतो. त्वचा आपल्या पंचेंद्रियांपैकी एक आणि सर्वात जास्त संवेदनशील. ही पंचेंद्रियच बाहेरच्या जगाला आपल्या आत आणतात आणि सकारात्मक-नकारात्मक अशा अनेकविध भावना आपल्यामध्ये निर्माण करतात. नीट विचार केला तर लक्षात येईल की गंधांची जाणीव करून देणारं एक नाक, बाह्य जगाचं दर्शन घडवणारे दोन डोळे, ध्वनी आणि शब्द आपल्यापर्यंत पोचवणारे दोन कान आणि रुचीवैविध्याचा अनुभव देणारी एक जीभ हे सर्व अवयव आपल्या एकाच चेहर्यात सामावलेले आहेत. त्वचा मात्र अंगभर पसरलेली आहे! का बरं असेल असं?
माणसाचा मेंदू उत्क्रांतीमध्ये उन्नत होत गेला आणि भावनांसोबत विचारांच्या मेंदूची (प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स) मानवाला मोठीच देणगी मिळाली. मानव ‘सामाजिक प्राणी’ बनला. विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीतून वैचारिक-भावनिक बंध निर्माण होऊन त्याची साहचर्याची आणि सोबतीची गरज पूर्ण झाली. टोळ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास कुटुंबव्यवस्थेपर्यंत चालू राहिला आणि सुरक्षितता व स्थैर्याच्या त्याच्या भावनिक गरजा पूर्ण झाल्या. शब्द निर्माण झाले नव्हते तेव्हा स्पर्शच भावनिक नात्याचा गाभा होता.आपल्या त्वचेखाली अनेक संवेदी चेतातंतूंची टोकं (रिसेप्टर्स) असतात. त्यांच्यामार्फत स्पर्शातून निर्माण होणार्या संवेदना मेंदूपर्यंत पोहचतात. त्यातून परस्परांमध्ये भावबंध निर्माण होऊन, सोबतीमधून मिळणारी भावनिक सुरक्षितता माणसाच्या निवांत, आश्वासक जगण्यासाठी फार महत्त्वाची ठरते. तसंच, विविध स्पर्शांच्या आकलनातून माणूस स्वत:ला जगण्यातील सर्व पातळ्यांवरच्या स्वसुरक्षेची हमी देऊ शकतो. म्हणूनच निसर्गाने मानवाला अंगभर त्वचेचं सुरक्षाकवच दिलं. स्पर्शाचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे.
स्पर्शाचे विविध प्रकार अनुभवावे तितके कमीच आहेत. स्पर्शानुरूप माणसामाणसांमध्ये अनेक प्रकारची नाती निर्माण होताना दिसतात. निर्हेतुक, निकोप, तरल स्पर्श आणि कामुक स्पर्श यात असलेला भेद आपल्याला ओळखायला शिकवला जातो किंवा आपल्या विशेष अंतर्गत क्षमतेमुळे अथवा अनुभवांतून शिकत गेल्यामुळे आपल्या लक्षात यायला लागतो. मनाविरुद्ध, गैरफायदा घेऊन केलेला वेदनादायी कामुक स्पर्श हा मानसिक धक्का (ट्रॉमा) असतो आणि त्यामुळे त्याची पाळंमुळं खूप खोलवर गेलेली असतात. त्या भीतीचे, अविश्वासाचे योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निवारण झालं नाही तर दुर्दैवाने, पुढे निर्माण होणार्या सशक्त, वचनबद्ध नात्यांमध्येही भावनिक उणेपण, रितेपण जाणवत राहतं. त्या नात्यांचा मन:पूत आनंद घेता येत नाही. सहवेदनेचा स्पर्श आधाराला मिळाला तर काय बहार येईल!
अनेकदा स्पर्श हा एक चिरंतन अनुभव देतो. एकदा आमच्या संस्थेचं पथनाट्य होतं. आमच्या संघातील एकाचा अभिनय बघून रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका जख्ख वृद्ध आजीने त्याला जवळ बोलावलं आणि आपला हात त्याच्या गालावरून फिरवत ती प्रेमाने म्हणाली, ‘‘किती छान काम केलं रे तू पोरा… खूप मोठा होशील!’’ नंतर एकदा तो म्हणाला, ‘‘त्या आजीच्या खरखरीत हाताचा कौतुकभरला तो प्रेमस्पर्श मी आजही विसरू शकत नाही. नंतर मिळालेल्या कुठल्याच पारितोषिकाने तो आनंद, ते समाधान मला दिलं नाही.’’
आमचा एक मित्र त्याच्या मुलाला आंघोळ घालण्याचं काम मन लावून करायचा. बाबा आपल्याला आंघोळ घालण्याचं काम उरकत नाही, हे त्या छोट्या मुलालाही कळायचं. पुढे बाबा त्याच्या कामात व्यग्र झाला, त्याचा प्रवास वाढला. त्याला विमान पकडायला बरेचदा पहाटेच घर सोडायला लागायचं. आज आपल्याला अंघोळ न घालता बाबा गेला हे कळलं की मुलगा खट्टू व्हायचा. त्याने शेवटी बाबाला सांगितलं, ‘‘तू आंघोळ करतोसच ना? मग तेव्हा मलाही उठवून आंघोळ घालत जा. मी आंघोळ करून, शाळेत जाण्यासाठी आई उठवेपर्यंत, परत झोपी जाईन.’’ आंघोळ घालतानाचा बाबाचा स्पर्श त्या मुलाची दिवसभर सोबत करायचा. आपण लहान बाळाचे गालगुच्चे का घेतो? कारण त्या मऊमऊ, गुबगुबीत गालांचा निरागस, निव्र्याज स्पर्श आपल्याला अगदी हवासा वाटतो. माणसं पाळीव प्राणी तरी का पाळतात? ते उभयता एकमेकांच्या स्पर्शासाठी आसुसलेले असतात, म्हणूनच ना?
कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता कोण विसरेल? पुरामध्ये सर्व काही वाहून गेल्यावरही, न खचता, पुन:श्च उभं राहण्याची ताकद, ऊर्जा मिळवण्यासाठी एक जण कुसुमाग्रजांना भेटायला आला. त्याची कहाणी ऐकून मदतीसाठी कुसुमाग्रजांचा हात खिशाशी जाताच तो म्हणाला, ‘‘काही नको सर, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा.’’ त्याने केलेली ही विनंती आश्वासक, बळ देणार्या स्पर्शाचं महत्त्व किती सहज अधोरेखित करते!
गुरूंचा अस्पर्शित स्पर्शही अनेकांना असाच आश्वासक, निर्भय, नि:शंक बनवणारा वाटतो; तर परमेश्वराच्या चरण स्पर्शात शरणभाव अनुस्यूत आहे. खूप भयभीत झालेली व्यक्ती आधारासाठी आपला हात धरते तेव्हा त्या व्यक्तीचा भयकंप आपल्याही अणुरेणूपर्यंत झिरपत जातो आणि आपल्यालाही त्या थरकापाची अनुभूती देतो. तनमनाची ही अनुभूती निसर्गही देत असतो. निळ्याशार आकाशाला, पौर्णिमेच्या चंद्राला, लुकलुकणार्या चांदण्यांना आपण स्पर्श करू शकत नाही, तरी आपल्या भावना ते उत्तेजित करतात. आपल्या अंगावर त्याचे सुखद शहारे जाणवतात. वारा-पाणी मात्र पुढे वाहात जातात ते त्यांचा स्पर्श आपल्या अंगांगावर मागे ठेवूनच! निसर्गाच्या कुशीत स्पर्शाची ऊब न मिळती तर आपण परत परत त्याच्या- कडे कसं बरं ओढले गेलो असतो? सुवासिक, रंगीबेरंगी फुलं-पानं बघून नाक, डोळे तृप्त होत असले तरी त्या आनंदाची पूर्तता स्पर्शानं तर होते!
आपलेपणाच्या, आस्थेच्या एका स्पर्शात हजार शब्दांचा ऐवज असतो असं म्हणतात, ते खोटं नाहीये. वयोपरत्वे फारसं घराबाहेर पडू न शकणार्या किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये एकाकी किंवा वृद्धाश्रमात राहायला लागणार्या वृद्ध जिवांना तरी आपल्या माणसांच्या भेटीशिवाय दुसरी कसली ओढ असते? आपल्या मायेच्या एका स्पर्शाने त्यांचे थकलेले डोळे पाणावतात, हात थरथरतात. माझी एक मैत्रीण, अंथरुणाची कायमस्वरूपी सोबत झालेल्या आपल्या आईला भेटायला जायची, तेव्हा ती तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवायची. बोलायची काहीच नाही. निरोपाच्या वेळी तिच्या हातातून आपले हात सोडवताना मैत्रिणीचं मन विद्ध व्हायचं.
आपले वैवाहिक, कौटुंबिक जीवन अशा सुंदर, आस्थेच्या , मायेच्या, करुणेच्या स्पर्शांनी समृद्ध असेल तर ती या कुटुंब संस्थांची पण समृद्धीच नव्हे का? आणि जे समृद्ध असतं ते का अस्तंगत व्हावं? पण आपण आपल्या नात्यांमध्ये स्पर्शांची ही समृद्धी जाणीवपूर्वक निर्माण केली आणि प्रेमाने जोपासली तरच ना?
(लेखाचा उत्तरार्ध ३० मेच्या अंकात)
vankulk57@yahoo.co.in
