मनामध्ये जे असेल ते शब्दामध्ये व्यक्त करणं ही माणसाची गरज असते. लोकपरंपरेतील शाब्द आणि शाब्देतर साहित्यातून निर्माण झालेल्या कलांमध्ये अनेक स्त्रीरचित गाणी, कथा, मंत्र, म्हणी, उखाणे, ओव्या होत्या ज्या गरजेतून आल्या. बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गीत, पाळणा गीत आले, पुढे जेवणासाठी कांडण गीत, जात्यावरच्या ओव्या आल्या. या सगळ्यांमध्ये त्या कामाची लयही दडून आहे आणि दु:खही. म्हणूनच सुरुवातीची गाणी कारुण्यपूर्ण आणि शोक व्यक्त करणारीही होती, त्या शोकाची गाणी झाली… जसं वाल्मीकींच्या शोकातून श्लोक.
‘मौखिक परंपरेतून लोकसाहित्य’ या ३१ जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण पाहिले की, मौखिक परंपरेमध्ये दैनंदिन जीवनाशी निगडित सर्व प्रकारच्या कलांमध्ये स्त्रीनिर्मित कलांचे अनेकविध आविष्कार दिसतात म्हणून शाब्द आणि शाब्देतर साहित्य हे कृतीमधून घडत आलेले आहे. या कलांच्या आविष्कारात स्त्रियांचा नकळत मोठा सहभाग आहे हे आपण पुन:पुन्हा पाहतो आहोत. या कलांमध्ये प्रामुख्याने हस्तकला आहेत आणि त्याच्याआधी शाब्दकला आहेत.
लोकसांस्कृतिक शाब्दकलांमध्ये आपण गाणी, कथा, म्हणी, उखाणे पाहणार आहोत. त्यापैकी ‘जात्यावरची ओवी’ मराठीमध्ये प्रसिद्ध आहे. कारण बायकांच्या गाण्यामध्ये जात्यावरची ओवी ही सगळयात आधी आली, पण त्याच्याही आधी कांडण्याच्या ओव्या आल्या याचे पुरावे आपणाला प्राचीन साहित्यामध्ये दिसतात. ‘जैन बृहद् कल्पसूत्र भाष्या’मध्ये कुटण्याच्या (कांडपाच्या) ओवीचा प्रथम उल्लेख येतो कारण जोपर्यंत जातं सापडलेलं नव्हतं आणि जास्त धान्य निर्माण होत नव्हतं त्यावेळेला बायका अन्न दगडावर कुटून ते शिजवून आपल्या बाळांना खाऊ घालत होत्या आणि आपणही खात होत्या. ‘कल्पसूत्र भाष्य’ या ग्रंथामध्ये इसवी सनाच्या ६ व्या शतकामध्ये म्हटलेले आहे की, पीडित होऊन कुट्टीणी म्हणजे कांडण करणार्या ्त्रिरया, मुसळ घेऊन कारुण्यपूर्ण गीते आळवून विस्वर म्हणत असतात. त्या म्हणतात, ‘हे माझ्या ह्रदया तू का बरं व्याकूळ होतोस?’ म्हणजे बायका व्याकूळ होऊन गाणी म्हणत होत्या, दु:खाची गाणी म्हणत होत्या असे दिसते. पुढे ज्यावेळेला जास्त धान्य उत्पादन व्हायला लागले त्यावेळेस ‘जातं’ आलं मग जात्यावरची ओवी आली, ‘ओवी’ या शब्दाच्या ज्या निरनिराळ्या उत्पत्ती दिल्या जातात त्याच्यामध्ये ‘ओघाओघात येते ती ओवी’ असे म्हटले जाते. त्याच्याहीपेक्षा जुन्या काळामध्ये बायकांच्या जर ओव्या ऐकल्या तर त्या प्रत्येक चरणाच्या शेवटी ज्याला आर्त उद्गार म्हणता येईल असा ‘उई गं’ असा उद्गार यायचा त्यामुळे त्या ‘ऊ ई’ उद्गारातून ओवी हा शब्द आला वा असावा, असे संशोधक मानतात. बायकांची प्रथम जी ओवी आली ती साडेतीन चरणी, यमक जुळवणारी अशी होती, म्हणजे कसं तर ‘गाण्याच्या नादात तुला ओढिते दगडा.’ तेव्हा ती दगडाला ओढते आहे आणि ती गाण्याच्या नादामध्ये ओढते आहे, म्हणजे एकीकडे तिला कष्ट आहेत त्या कष्टाचे कारण आहे ते ‘जातं’ आणि तिला दररोज ते दळण दळल्याशिवाय गत्यंतर नाहीये आणि म्हणून प्रामुख्याने ‘जात्यावरच्या ओव्या’ या बाळगीतानंतरच्या ओव्या आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
लोकपरंपरेतील गाणी किंवा कोणतीही कृती ही कामाच्या लयीशी बांधलेली असते. म्हणजे बाळाला झोपवण्याची ओवी असली, मांडीवर थापटून झोपवायचं असलं तरी ती चार तालामध्ये येते ‘ये गं, ये गं गाई’ याप्रमाणे, परंतु पाळण्यामध्ये बाळाला घालून त्याला झोका द्यायचा असला तर पाळण्याची दोरी लांब जाते आणि नंतर ती जवळ ओढली जाते त्यामुळे गाण्याची लयसुद्धा लांबवत येते. या पाळण्यातल्या गाण्याला आपण झोपाळ्याची गाणी असे म्हणतो म्हणजे ‘जो जो जो जो रे’ तो ‘जो’लांबवला जातो कारण दोरी लांबवली जाते, दंड लांबवला जातो म्हणून ‘जो…’ असा लांब उद्गार निघतो म्हणून कामाच्या लयीशी गाण्याचा आविष्कार बांधलेला असतो. तसेच दळणाचे असते आणि म्हणून दळण दळतानासुद्धा जात्याची पाळी लहान असेल, दळणाला कष्ट जास्त लागणार नसतील, तर जातं भरभर भरभर ओढलं जातं ज्याला लोकपरंपरेत ‘भरडा दळण’ म्हणतात, म्हणजे जाड दळायचे असले की लवकर लवकर जातं ओढले जाते, तिथे बायकांची गाण्याची उंच पट्टी लागते आणि ज्यावेळेला बारीक पीठ दळायचे असेल त्यावेळी जाते जरासे जड जाते. त्याच्याहीपेक्षा अवघड म्हणजे हळदी- सारखे दळण दळायचे असले तर ते आणखीनच जड जाते. गाताना उंच पट्टी लागते त्यावेळेस ते ‘भरडा दळण’ असते आणि बारीक पीठ दळायचे असले तर गाण्याची चाल संथ असते.
(‘‘आपला उगीचच असा गैरसमज असतो की, लिहिता-वाचता आल्यानंतर माणसं शहाणी झाली, त्याच्याआधी सगळ्या बायका ‘अडाणी’ होत्या. कारण लिहिता-वाचता येत नव्हते तरी माणूस विचार करत होता, त्याला भावना होत्या, त्याला आपल्या घटनांचे अर्थ लावता येत होते, त्याला संवेदना होत्या आणि त्या सगळ्या स्त्रिया आणि पुरुष दोघांंकडून व्यक्त होत होत्या. म्हणूनच आधुनिक मंडळींनी आमच्या प्राचीन बायकांच्या पारंपरिक साहित्याकडे नीटसे लक्ष दिलेले नाहीये, असे माझे साधार म्हणणे आहे. कारण बाईच्या वेदना सिमोन-द-बोव्हारने १९७५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्षा’त सांगण्यापूर्वी माझी जात्यावर दळण दळणारी बाई म्हणत होती, ‘‘कडु विंद्रावन डोंगरी त्याचा रहावा। पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा।। ’’ आता हे तिचे येड पांघरून पेडगावला जाणे आहे की नाही? की पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा? ‘कावळ्यानं कोट केलं बाभूळ पानामंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामंदी’ असं सांगणार्या किती तरी ओव्या आमच्या या प्राचीन बाईच्या शहाणपणाच्याच आहेत.’’ )
हे रोज रोज दळण दळायचे, तर या जात्याने मला जड जाऊ नये म्हणून ती त्या जात्याला ईश्वर म्हणते. कारण शेवटी बाईचे दु:ख दूर करणारा दुसरा कोण असणार, तर ईश्वरच. म्हणून ती म्हणते ‘जात्या तू ईश्वरा! नको मला जड जाऊ, बयाच्या दुधाचा सया पाहतात अनुभवू, माय माऊलीचं दूध माझ्या मनगटी खेळतं’ बया म्हणजे आई, आईने मला कसे दूध पाजलेले आहे, त्याचे बळ माझ्या मनगटात आहे. तर बाईचे जे दुखणे आहे ती ते जातं ओढत असताना गाण्यातून सांगते. तिचे ते कष्ट हलके व्हावेत म्हणून गाण्याची साथ तिचे कष्ट सुसह्य करतात. कोणतेही कष्टाचे काम करताना, पुरुषही एकीकडे गाणी म्हणतात, म्हणजे नांगरणे असो किंवा मोटेचं गाणे असो. ज्यावेळेस शारीरिक कष्ट जास्त लागतात त्यावेळेस गाणे हे कष्ट हलके करायला साथ देत असते. म्हणून पुढे केशवसुतांनीही म्हटलेले आहे ‘गाण्याने श्रम वाटतात हलके, हेही नसे थोडके.’ जात्यावरच्या ओव्यामध्ये आपल्याला या सगळ्यांचे निरनिराळे आविष्कार दिसतात.
जात्याच्या ओवीमधून बाईच्या सर्व भावना व्यक्त होतात. वेदना तर होतातच, परंतु केवळ वेदना घेऊन माणूस जगत नाही तर त्या वेदनांचा वेद करण्याचं काम, त्या सुंदर करण्याचे कामही माणूसच करत असतो, म्हणजे कसं तर, कधी दु:ख असते, कधी सुख असते, कधी आनंद असतो, उत्साह असतो, कधी मन निराश असते, कारुण्यपूर्ण गाणी असतात ती जास्त सुंदर असतात, असे अगदी संस्कृत काव्यापासून म्हटलेले आहे. रामायणाची ज्यावेळेला निर्मिती झाली, त्यावेळेस असे म्हटले जाते की, त्या क्रौंच पक्ष्याला मारण्यासाठी एक निषाद म्हणजे पारधी बाण मारत होता आणि ते वाल्मीकी ऋषींनी पाहिल्यानंतर त्यांचे मन कळवळले आणि त्यांनी पहिला श्लोक म्हटला आणि मग मंडळी वर्णन करतात, त्या ‘शोकाचा श्लोक झाला’. म्हणूनच पुढे वेदनेमधून सुंदर कविता निर्माण करण्याचे कार्य बाई करत आलेली आहे. जात्यावरच्या ओव्यातून तिच्या सर्व प्रकारच्या भावना व्यक्त होताना आपल्याला दिसतात, सामान्यपणाने लोकांना माहिती असते की, जात्यावरची ओवी म्हणजे पुरुषप्रधान व्यवस्थेचं कौतुक! ते आहेच म्हणजे बापाचे कौतुक, भावाचे कौतुक, नवर्याचे कौतुक, मुलाचे कौतुक, पण पुष्कळदा बाईने आपल्या अंतर्मनातील सलही व्यक्त केलेला आहे आणि जी नाती त्रासदायक होतात, त्या नात्यांचा निषेधही केलेला आहे परंतु त्याचा उद्गार फारसा कोणी सांगितलेला नाहीये, तो सांगण्याचा प्रयत्नही ते करणार नाहीत.
पुरुषप्रधान व्यवस्था ही त्रासदायक आहे हे बायका शिकायला लागल्यावरच कळले, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते हे पूर्णपणे सत्य नाही. आधुनिक मंडळींनी आमच्या बायकांच्या या पारंपरिक साहित्याकडे नीटसे लक्ष दिलेले नाहीये, असे माझे साधार म्हणणे आहे. कारण बाईला वेदना होत होत्या हे सिमोन-द-बोव्हारने १९७५ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला मुक्ती वर्षा’त सांगण्यापूर्वी माझी जात्यावर दळण दळणारी बाई म्हणत होती, ‘‘कडु विंद्रावन डोंगरी त्याचा रहावा। पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा।।’’ आता हे तिचे येड पांघरून पेडगावला जाणे आहे की नाही? की पुरुषाचा कावा मला येडीला काय ठावा, असं म्हणणारी जी बाई आहे तिला तथाकथित शुद्ध बोलता येत नसेल पण तिला शुद्ध भान आहे, काय चालले आहे त्याचे. ‘कावळ्यानं कोट केलं बाभूळ पानामंदी, पुरुषाला माया थोडी नारी उमज मनामंदी’ तर अशा कितीतरी ओव्या आहेत. आपला उगीचच असा गैरसमज असतो की, लिहिता-वाचता आल्यानंतर माणसं शहाणी झाली, त्याच्याआधी सगळ्या बायका ‘अडाणी’ होत्या. त्यांना ‘अडाणी’ म्हणणारे आम्ही सगळे ‘अडाणी’ आहोत, असे माझे म्हणणे आहे. कारण लिहिता-वाचता येत नव्हते तरी माणूस विचार करत होता, त्याला भावना होत्या, त्याला आपल्या घटनांचे अर्थ लावता येत होते, त्याला संवेदना होत्या आणि त्या सगळ्या स्त्रिया आणि पुरुष दोघांंकडून व्यक्त होत होत्या. त्या गाण्यातून व्यक्त होत होत्या, कथेतून व्यक्त होत होत्या, म्हणीतून, उखाण्यातून व्यक्त होत होत्या असे आपल्याला अनेक अंगांनी दिसते आणि त्याची उदाहरणे आपण पुढील भागामध्ये (२८ फेब्रुवारी) पाहणार आहोत.
chaturang@expressindia.com

