प्राचीन काळापासून प्रामुख्यानेस्त्रियांमुळेच संस्कृती निर्माण झालेली आहे. याचे अवशेष आपल्याला स्त्रीनिर्मित साहित्यामध्ये दिसतात. त्यापैकी जात्यावरच्या ओवीची खूप उदाहरणं आपण पाहत आलो आहोत. कारण ‘ओवी’ हा अतिशय सुगम छंद आहे. स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्यांचं संकलनही बरंच आहे. याखेरीज इतर छंद, गाणी आहेत. स्त्रियांनी जशी ओव्यांची रचना केली आहे, तशी निरनिराळी गाणी किंवा ‘पद’ ज्याला म्हणतो, ती स्त्रीरचित पदं, कवितांचा पसाराही मोठा आहे.

गायल्या जाणार्‍या गाण्याची रचना खूप विविध प्रकारची आहे. त्यात देवाधर्माची गाणी, सणवाराची गाणी, जीवनातले महत्त्वाचे प्रसंग ्स्त्रियांनी गाण्यातून सांगितले आहेत. उदाहरणार्थ, बाळ जन्माला येण्याआधीपासून डोहाळेगीते, बाळ जन्माला आल्यानंतर पाळणागीते, लग्नामधली निरनिराळी गीते, हळदीची गीते,स्वतंत्र विषयांवरची गाणी, म्हणजे लग्नाआधी मुलगा-मुलीला किंवा मुलगी-मुलाला पाहायला गेल्यानंतर जी गाणी असतात, ती गाणीसुद्धा आहेत, म्हणजे हल्ली ज्याला आपण ‘कांदा पोहे’ कार्यक्रम म्हणतो. त्या कांदा पोहे कार्यक्रमाचीसुद्धा गाणी आहेत. त्यात नवरीच्या आईचं मन व्यक्त झालेलं आहे.

त्या वेळी स्त्री-पुरुष नातेसंबंध नेमके कसे होते, आपल्याला फारसं माहीत नाही. हल्ली आपण प्रेमाबद्दल वगैरे बरंच बोलतो. पूर्वी स्त्री-पुरुषांचं प्रेम गाण्यातून व्यक्त झालेलं आहे. त्या गाण्यांचीही पुष्कळ रंगरूपं आहेत. त्याची आविष्काराची पद्धत वेगळी होती, जास्त संयमित होती. प्रत्यक्ष ओव्यांऐवजी लग्नविधीची गाणी निरनिराळी आहेत. महाराष्ट्रातल्या लग्नविधीत ‘मुहूर्तमेढ रोवणं, ‘घाणा’ भरणं हा महत्त्वाचा लोकविधी आहे, याचीही गाणी आहेत.

घाणा भरणं म्हणजे लग्नाच्या तयारीच्या आधी दळण-कांडण सुरू करण्यापूर्वी सगळ्या देवांना निमंत्रित करायचं. या देवता लोकदेवता असतात, म्हणजे, जशी कोल्हापूरची अंबाबाई असेल, गणपती असेल, तर त्यांना घाणा भरण्यासाठी, लग्नाची तयारी करण्यासाठी निमंत्रण द्यायचं. उदा. ‘आधी मूळ धाडा, घुंगराची गाडी, शाल जोडीचा वर्‍हाडी गणराज, ‘घाणा भरिते, घाणा भरिते, सव्वा खंडी गहू, नवर्‍या मुलाला गोत बहू…’ अशाप्रकारे त्या सगळ्या देव-देवतांची गाणी आहेत.

रुखवताची गाणी, उखाणे खूप आहेत. ‘रुखवत’ म्हणजे काय? तर नवरी मुलगी सासरी जात असताना, तिच्याबरोबर जे निरनिराळे खाद्यपदार्थ दिले जातात- लाडू, चिवडा, करंज्या- त्याला रुखवत म्हणतात. विहीणबाईंची गाणी प्रसिद्ध आहेत. ‘विहीण’ म्हणजे नवर्‍या मुलाची आई, विहीणबाई जेवायला बसली की विहीणबाईचा मान, नवरी मुलीची आई असेल, तर तिला फार मान नाही. पण नवर्‍या मुलाची आई जेवायला बसली की तिच्या गुणवर्णनाची गाणी म्हटली जायची. कधी कधी नवरीकडच्या बायका जरा जास्त खोडकर असल्या, तर त्यात नवर्‍या मुलाच्या आईचा दोष काढणारी गाणीसुद्धा असायची आणि स्त्रिया त्या स्वतंत्रपणे गायच्या.

जसजसा काळ बदलतो, तसतसं त्या बदलत्या काळाचं प्रतिबिंब ्त्रिरयांच्या या निरनिराळ्या गाण्यांवर दिसतं. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत निरनिराळ्या गोष्टींची प्रतिबिंबं आपल्याला, ज्या जात्यावरच्या ओवीत दिसतात, तशी इतर गाण्यातही दिसतात. तेव्हा स्त्रिया ओव्यांच्या शिवाय निरनिराळी प्रकारची गाणी रचायच्या. त्या देवाधर्माच्या गाण्यातली एक, दोन गाणी सांगते. आमची आजी म्हणायची, संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीची येण्याची वेळ. ती वेळ झाली की आमच्या आजीचं गाणं सुरू व्हायचं.

‘लक्षुंबाई हो सारजा,
लक्षुंबाई हो गिरजा,
लक्षुंबाई हो तुळजा…’आणि शेवटी
‘लक्ष्मी हसत झाली जागी,
भक्तांना बोलावी ती वेगी…’

असं पुष्कळ लांबलचक गाणं लक्ष्मीचं ! तसंच, संत सखूचं एक गाणं असायचं, की ती संत सखू कराडला राहणारी आणि कराडमध्ये कृष्णा नदी वाहते, याचं वर्णन केलेलं होतं.

‘कृष्णातिरी कराड नगरी
क्षेत्र वसवले ब्रह्मपुरी,
दुराचारी ब्राह्मण नांदे
सून सखू भाग्याची खरी’

त्या सुनेला म्हणजे सखूला, माहेरी विठ्ठलाच्या भक्तीचे संस्कार झालेले होते, तर ते सासरी काही चालायचे नाही. म्हणून मग, सासरचे लोक रागवायचे. पण विठ्ठलाची ओढ सखूच्या मनातून काही जाईना. मग पुढे गाणं असायचं.

‘आषाढ मासी एकादशी,
यात्रा चालली पंढरीसी,
ब्राह्मणांची सून सखूबाई,
गेली होती ती पाण्यासी
तिच्या मनामध्ये देव संचरले,
जाईन म्हणते पंढरीसी
गंगेवरती घागर ठेवून,
सखू चालली पंढरीसी…’

मग ती सखू पंढरीला जाते. या वेळी तिच्या मैत्रिणी, तिच्या सासूजवळ कागाळ्या करतात, की तुझी सून अशी गंगेवर घागर ठेवून त्या विठ्ठलाच्या दिंडीत त्यांच्याबरोबर गेली. मग ती सासू आपल्या मुलाला म्हणजे सखूच्या नवर्‍याला सांगते आणि तो सखूचा नवरा काठी घेऊन तिला मारतो आणि रस्त्यातनं परत आणतो. याप्रमाणे या प्रसंगाचं वर्णन करणारं संत सखूचं लांबलचक गाणं असायचं.

‘तिच्या मैत्रिणी सांगत गेल्या,
सखूूबाईच्या सासूला
त्या सासूला राग आला,
तिने सांगितले पुत्राला
त्या पुत्राने घेऊन काठी,
सखू अडविली रस्त्याला
हाणीत मारीत, सखू आणिली
कोंडिली पहा खोलीत
कुलप लाविली महामूर…’’

अशीच किती तरी डोहाळ्याची गाणी असायची. पहिल्या महिन्यामध्ये तिला काय खावंसं वाटलं, दुसर्‍या- तिसर्‍या महिन्यात कुठले डोहाळे लागले, असं नऊ महिने तिच्या ज्या इच्छा-आकांक्षा असतील, त्या डोहाळ्याच्या गाण्यातून व्यक्त केलेल्या होत्या. अशी निरनिराळ्या प्रकारची गाणी अस्तित्वात होती. तसंच बायका नवर्‍याचं नाव घेतात ते उखाणे वेगळे आहेत.

गाण्यातून काही वेगळे-वेगळे उखाणे असायचे. मंगळागौरी, नागपंचमीचं गाणं असायचं. या सगळ्या गाण्यांचं वैशिष्ट्य असं, की त्या गाण्यातून एखादी गोष्ट सांगितलेली असायची. म्हणजे, ज्याला आपण ‘कथा-गीत’ म्हणतो ते. नागपंचमीच्या गाण्यात नागाच्या आणि त्यांच्या भक्तांच्या अनेक कथा सांगितलेल्या असायच्या. नागपंचमी येते आणि मुलीला आपल्या माहेरी जायची ओढ लागते आणि म्हणून नागपंचमी आणि माहेर यांचं नातं अभिन्न होतं. म्हणूनच

‘पाच फण्याचा नागोबा,
पडला गं माझ्या पायावरी…’
‘‘दीर म्हनीतो वयनी,
साखळ्या कशानं मोडिल्या,
तुमचं काय गेलं,
आमच्या बापानं घडईल्या…’

असे खटकेबाज संवादही गाण्यातून येतात.

नागपंचमीच्या अनेक लोकप्रचलित कथा आहेत. नाग (साप) आणि स्त्री ही एकपरीने सनातन स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व म्हणून विविध नात्यांनी येतात. नाग, सर्प कथेतील स्त्रीचा बाप, भाऊ, प्रियकर, पती अशा विविध नात्यांनी येतो. सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड यांच्या संशोधनाने त्याला पुष्टी मिळते. लोकपरंपरेतले विश्वास व कथा यांच्या आधारे काही आधुनिक साहित्यही निर्माण झाले आहे. उदा. ‘नागमंडल’ हे डॉ. गिरीश कर्नाड यांचे नाटक (मराठी भाषांतर) व अन्य उदाहरणेही आहेत. मराठी लोकपरंपरेतील एक स्त्री गीत खूप मोठे आहे. त्याची थोडक्यात ओळख…

पंचमीचा आला सण
आला पंचमीचा सण
लोकांच्या लेकी बा माह्येरी
माझी बाळाई सासरी
अरं तू सोपाना बाळा,
जारं बाळी आणायला
घोड्यावर बाळ स्वार झाला
लागला वनाच्या वाटंला
पाची वन वलांडली,
आला बाळीच्या सासरी…

मग बाळीच्या सासूच्या परवानगीने घोड्यावर आपल्यापुढे बसवून पाची ‘वने वलांडून’ माहेरी आला. आई लेकीस आनंद झाला. झिम्मा फुगडीच्या खेळानं जागरण रंगलं, ‘‘द्या गं बोटु कुंकवाचं, द्या गं बोटु हळदीचं.

वैनीच्या कासाई (एक भारी साडी) लागलं वैनीची कासाई नासली आणि वैनी रागावली. तिने आकांडतांडव केलं. नणंद-भावजयीच्या पारंपरिक शत्रुत्वाचं रूप पुढच्या कथेत. तिनं नवर्‍याला सांगितलं. बहिणीला परत सासरी पोचवायला जाल तेव्हा वाटेत ‘‘दुरुन रगत धरावं, त्यात कासाई भिजवावी, मला आणून दावावी…’’ मग बायकोच्या धाकानं वाटेत पाणी प्यायला थांबायचे निमित्त करून ‘काढली कंबरेची सुरी, ठेवली बाळीच्या शिरी…’

बाळा घरी परत गेला, इकडे त्या विहिरीच्या काठावर मृत बाळीचं काय झालं?

‘बाळी झाली जाई वेल
आली सासूच्या सपनी
सासू पती मिळईनी
गेली बाळीच्या जवळी
पतीनं अमृत शिपलं
बाळी उठून बसली
गेली अपुल्या सासरी…’’
असा ‘पंचमीचा आला सण…’

बायकांच्या कथागीताचा हा एक नमुना. त्यात चमत्कृती आहेच. स्त्रीरचित भाषिक विलासामध्ये साहित्याचे विविध प्रकार, गीते, उखाणे आदींसह अनेक कथाही आहेत. गद्य कथा तर खूप आहेत. पण विदुषी दुर्गाबाई भागवतांनी एक रास्त तक्रार केली आहे, तेवढ्याची नोंद – प्राचीन काळापासून पुरुषांच्या लोककथांची अनेक संकलने प्राकृत, संस्कृतात झाली आहेत. तसा स्त्रीरचित कथांचा संग्रह नाही. माझ्या पिढीच्या स्मृतिकोशातल्या स्त्री रचनांचे हे फक्त नमुने नोंदविले आहेत.

स्त्री प्रतिभेचे ठसे अनेक प्रकारे शाब्द (मौखिक) रचनेत उमटलेले दिसतात. जसं आपण ओव्यांच्या बाबतीत पाहिलं. स्वातंत्र्य आलं, तर त्या स्वातंत्र्याच्या काळात जे वातावरण निर्माण झालं, ते महात्मा गांधी, पंडित नेहरू हे पुढारी आले. त्यांचं कौतुक करणार्‍या ओव्या बायकांनी गायल्या, हे आपण मागच्या भागात पाहिलं. त्याचप्रमाणे इंग्रज आल्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे आधुनिक शिक्षण हळूहळू सुरू झालं, म्हणजे स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, आज आपण ज्याला शाळा, महाविद्यालय म्हणतो, ते हळूहळू सुरू झालं. त्या पूर्वीच्या काळात सर्व स्त्री-पुरुषांना शिक्षणाची सोय नव्हती. म्हणजे लिहिण्या-वाचण्याच्या शिक्षणाची सोय नव्हती. ज्यांना होती, त्या ठरावीक समाजातील पुरुषांना फक्त लिहिण्या-वाचण्याची व्यवस्था होती. निरनिराळ्या प्रकारे काळ बदलतो तसं त्याचं प्रतिबिंब गाण्यामध्ये पडलं आणि ही गाणी स्त्रियांनी रचलेली आहेत.

शिक्षण सुरू झाल्यानंतर मुलींच्या राहणीमानामध्ये सुधारणा होत गेली. म्हणजे त्या काळात ज्याला आज आपण ‘फॅशन’ म्हणतो, ती सुरू झाली. त्यामुळे त्यावरसुद्धा बायकांची गाणी आहेत. म्हणजे त्यांचं राहणीमान कसं बदललं? त्यावर थोडीशी टीका आहे. थोडं विडंबन आहे. म्हणजे स्त्रिया पूर्वी ज्या पद्धतीने केस विंचरायच्या, वेणी घालायच्या. त्या पद्धती बदलायला लागल्या हळूहळू, त्याचं एक गाणं फार प्रसिद्ध आहे. स्त्री मुक्तीचे जे सगळे इतिहास आहेत, त्याच्यामध्ये माझ्या मते हे गाणं मैलाचा दगड ठरावा, की स्त्रिया सुधारल्या आणि त्यांचं राहणीमान बदललं.

सुधारणा पहा कशी जाहली
वरिष्ठ स्त्रियांची,
केस डोईचे उलटे फिरवी,
करणी रेषांची…
भांग वाकडा गोल बुचडा
वर गजर्‍याचा थाट,
चाळे यांचे भारीच
यांची बारीक टिकली लाल,
महेश्वरीचे लुगडे भारी,
शुभक पोलका छान…
‘पायी चप्पल हातात छत्री
जाते शाळेला…

स्त्रियांनी पायात चप्पल घालणं, हातात छत्री घेणं, त्या वेळी फॅशन वाटायला लागली. इतकंच नव्हे, तर ती शाळेत जायला लागली आणि शाळेत जाताना काय म्हणाली नवर्‍याला?

तुम्ही लागा स्वैंपाकाला
सांगे नवर्‍याला,
चहा घेऊनी या तुम्ही मजला
मधल्या सुट्टीला,
घरी येण्याचा हिसका
तुम्ही देऊ नका मजला…

अशा प्रकारे स्त्रियांच्या बदललेल्या रहाणीमानाची थोडीशी चेष्टा आणि थोडंसं वर्णन हे बदलत्या काळामध्ये बायकांच्या गाण्यामध्ये झालेलं दिसतं.