लोकगीतांमध्ये पुरुषांची गीतं, स्त्रियांची गीतं बहुधा स्वतंत्र आहेत. ती विविध हेतूंनी निर्माण होत असतात. मराठीत स्त्रीनिर्मित गीतं विशेषत: ओवीगीतं बहुपरिचित आहेत. इतकी की लोकगीतं म्हटलं की, स्त्रियांची ओवीगीतं असं एक समीकरण रूढ झालं आहे.
मानवी जीवनाचा समग्र वेध घेताना भूतकाळातील मृत अवशेषांचे पुरावे एका मर्यादेपर्यंत उपयोगी पडतात. ऐतिहासिक कागदपत्रं, शिलालेख, नाणी यातून फार तर तत्कालीन राज्यकर्त्या वर्गाची माहिती मिळू शकते. पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेल्या साधनांचाही एका मर्यादेपर्यंतच उपयोग होऊ शकतो; पण लोककथा, लोकगीतं, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे (आणि शिव्यासुद्धा) हे शाब्द साहित्य सामान्यातील सामान्य माणसाच्या मनातील भावनांची, विचारांची, धारणांची सूक्ष्मातिसूक्ष्म आंदोलनं जतन करीत असते. बदलत्या भौतिक जीवनातील पडसादही या शब्द लोकसाहित्यात अगदी सहजपणे उमटलेले दिसतात. त्यामुळे लोकसाहित्य लोकजीवनाचा, लोकमानसाचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याचं एक महत्त्वाचं साधन ठरतं.
स्वातंत्र्योत्तर काळात आणि विशेषत: आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जगभर साजरं झाल्यानंतरच्या काळात विविध दृष्टिकोनातून स्त्रीविषयक अभ्यास होऊ लागला आहे. राष्ट्रीय विकासात स्त्रीजीवन विकासाला अग्रक्रम द्यायला हवा, ही बाब तर आता आता राज्यकर्त्यांच्या ध्यानी येऊ लागली आहे. स्त्रीजीवनाच्या सर्वांगीण अभ्यासाचं साधन म्हणून स्त्रीनिर्मित लोकसाहित्य हे अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. स्त्रीगीतांची संकलने मराठीत खूप झाली आहेत.
मात्र स्त्रीजीवनाचा वेध घेण्याच्या दृष्टीने त्यांचा चिकित्सक अभ्यास झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकभाषेचा अभ्यास हा लोकसांस्कृतिक अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे. भाषावैज्ञानिकदृष्ट्या भाषेचा अभ्यास होत असतोच; पण त्यात भाषेतून व्यक्त होणार्या मानवी मनाचं विश्लेषण नसतं. ते लोकतत्त्वीय दृष्टीतून केलेल्या भाषिक अभ्यासातून मिळतं. प्रचलित शब्दकोशातूनही ज्या शब्दांच्या नेमक्या अर्थच्छटा मिळत नाहीत, त्यांचा शोध लोकभाषेत लागतो. स्त्रीजीवनाचा शोध घेता येईल अशा काही ओव्या मात्र निश्चितच पाहता येतील.
बाईची जात्यावरची ओवी प्रामुख्याने शेती संस्कृतीचं वर्णन करणारी असली तरी बदलत्या काळाबरोबर ती बदलत गेलेली दिसते. नुकतंच इंग्रजीचं शिक्षण सुरू झालं होतं. त्या काळात आपला मुलगा इंग्रजी अक्षरं लिहिताना पाहून तिला धन्य धन्य वाटतं, तेही तिच्या गाण्यातून येतं.
‘शाळेतल्या पंतोजीला
देऊ केली मी खारीक,
राजस बाळाचं अक्षर
इंग्रजी बारीक.’
अभ्यासाचा कंटाळा करणार्या मुलाला ती समजावते की,
‘हट्ट नको घेऊ, अक्षरे शीक चार,
विद्येला मान फार, जगामध्ये…’ शिकून-सवरून मुलगा मिळवता होणं ही तिच्या सुखाची परमावधी असते. ‘साहेब साहेब हाका मारीती झोकात, राजस बाळाची खुर्ची साहेब लोकात.’ बदलत्या काळाचं भान, शिक्षणाचं महत्त्व तिला आल्याच्या (मात्र मुलासाठी मुलीसाठी नव्हे) खुणाही यात दिसतात. इतकंच नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या चळवळींचे पडसादही बायकांच्या ओव्यांतून उमटलेले दिसतात. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरू यांचं कर्तृत्व तिच्या कानी आलेलं दिसतं. त्या महापुरुषांविषयीचा अभिमान आणि आदर तिने परोपरीनं व्यक्त केलेला दिसतो.
‘गांधी माझा सखा गं,
ओवी त्याला गाईन
ओव्या गाऊ कौतुके,
तू ये रे बा विठ्ठला…’
जवाहर माझा धीराचा
वीर तो छातीचा…
काटा काढी सोजीराचा,
येरे बा विठ्ठला…’ अशा ओव्यांच्या लडीच्या लडी उलगडत जातात.
‘स्वदेशीचा मंत्र लोकमान्य देती,
मिळेल त्याने मुक्ती हिंदुस्थाना,
बायांनो नटू नका,
परदेशी गं चिटाने बुडतील कारखाने,
साळियांचे…’’ (चिटाचे – नक्षीचे छापील कापड)
अशा ओवी मालिकांतून विदेशी बांगड्या, चहा, साखर, कपबशा अशा वस्तूंचा निषेध करीत बायकांना त्यांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याही उपर
‘पैसेवाला मोठा मुंबईचा टाटा,
तेणे मुळशी पेटा बुडविला…’
धरणाखाली बुडणारी भूमी आणि धरणीची विस्थापित लेकरं यांनी मांडलेल्या सत्याग्रहाचं वर्णन करणार्या या लोककवयित्री म्हणजे मेधा पाटकरांच्या प्रेरक पूर्वसुरी आहेत.
महात्मा गांधींची मोहिनी तर फार मोठी होती. या बायांना तर ते जादूगार वाटत. त्यांनी प्रथम नव्या जाणिवांनी स्त्रीला उंबर्याबाहेर पडण्याची प्रेरणा दिली. त्यांचाही प्रभाव ओव्यांतून दिसतो.
‘जिकडे तिकडे, झाले गांधी गांधी अंगावर साधी, खादी बाळगीती…’
‘गांधी हा गारुडी, वागवितो पुंगी इंग्रजाला गुंगी, तेणे येई…’
‘गांधी जादूगर, भ्याडा करी धीट, दास्याचा आणि वीट, जनलोकां…’’
असं गांधींचं मर्मही ती नेमकेपणाने सांगते. मिठाच्या सत्याग्रहाच्या प्रेरक प्रसंगाचं वर्णनही परोपरीने केलं आहे.
‘बाया झाल्या धीट,
त्यांची गेली भीती
हाती झेंडा घेती,
स्वराज्याचा…’
‘उठली मुलेबाळे,
त्यांना भीती कशी नाही
‘वंदेमातरम’ दिशा दाही,
दणाणती…’
महात्मा गांधींच्या सत्याग्रहाने दिलेली असीम निर्भयता बायका-मुलांपर्यंत प्रवाहित झाली. स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला अभिप्रेत असं हे मूल्य महात्मा गांधींनी किती सहजपणे रुजवलं याचा साक्षात्कार तत्कालीन सामान्य गृहिणींच्या या ओव्यांतून होतो. समकालीन स्त्रियांचे हे प्रतिसाद सामान्य स्त्रीच्या स्थितिगतीचा वेध घेण्याच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आणि खात्रीचे आहेत यात शंका नाही.
इतकंच कशाला, अगदी त्याही आधीचं वर्णन त्यांच्या साहित्यात दिसतं. निजामी राज्यातील अत्याचार, कोंडी आणि त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणार्या समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब त्या सीमाप्रदेशातल्या स्त्रियांच्या ओव्यात उमटलेलं दिसतं.
‘‘निजामाचे रझाकार, करीताती हल्ला, लेकी-सुना नेल्या, गर्जतअल्लाअल्ला’ तर ‘‘मातले रझाकार, करिती लूटमार गोरगरीब बिचारी, हिंडती रानोमाळ…’’ हे त्याचे काही नमुने…
ज्या बायांना घरातल्या मोकळ्या वातावरणामुळे किंवा थोडंफार औपचारिक शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यामुळे म्हणा इतिहासाची तोंडओळख झाली आहे, त्यांनी महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी राजांवरही ओव्या रचल्या आहेत.
‘शिव छत्रपती,
धन्य गं धन्य राजा,
पोटच्या पुत्रापरी,
पाळिली त्याने प्रजा’,
‘दळीता कांडिता,
तान्हे बाळा आंदुळता,
शिवाजी मराठा आठवावा…’,
‘‘रायगडच्या किल्ल्यावरी,
सोन्याचा पाळणा,
शिवाजीचा बाळ तान्हा,
राजाराम…’’
शिवाजीच्या कौतुकाच्या ओव्यांप्रमाणेच पेशवाईतल्याही अनेक घटनांवर बायकांनी ओव्या रचल्या आहेत. विशेषत: पुण्याचं वर्णन, नारायणरावांचा खून, आनंदीबाईचा कावेबाज स्वार्थीपणा हे बायांच्या ओव्यांचे खास विषय आहेत.
‘पुणे शहरात मोठेमोठे वाडे,
लोक परी वेडे कारभारी…’’
या कौतुकाबरोबरच
‘पुणे शहरात पाण्याचा सुकाळ,
परी पुण्याचा दुष्काळ चोहीकडे…’’ असा टोमणाही मारला आहे.
‘नारायणरावाला मारीले
आनंदीबाईला आनंद,
तिने तबकी गुलकंद वाटियेला…’
पुढे पुणे शहराची जी दुर्दशा झाली त्याचंही मोठं मार्मिक वर्णन बायकांच्या ओव्यांतून दिसतं.
‘जळला बुधवारवाडा,
उडाले कऊल,
नेला पुण्याचा डऊल इंग्रजांनी,
पुणे झाले सुने, गुणे झाले उणे
देवे नारायणे, न्याय दिला
पुणे झाले सुने, वाडे ओस झाले
वैभव सारे गेले, मराठ्यांचे…’’
अशी पेशवाई अखेर झालेली पुण्याची अवदशा अनेक परींनी या बायांनी वर्णन केली आहे. पुढच्या काळात पुन्हा लोकमान्य टिळकांमुळे पुण्याची मान उंचावली. तेव्हाही बायांनी ओव्यांतून दखल घेतली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू हे स्वातंत्र्यपूर्व राष्ट्रनायक स्त्रियांच्या कौतुकाचे विषय ठरलेच; पण त्या त्या शहरात, प्रदेशात नावारूपाला आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींसाठीही बायकांची वाणी गात राहिली.
अधिक बारकाईने मागोवा घेत गेलं तर महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भूप्रदेशांत स्थितीगतीचं, समकालीन क्रांतिकारी व्यक्तींच्या कर्तृत्वाचं प्रतिबिंब त्या त्या काळातील प्रादेशिक ओव्यांतून उमटलेलं दिसेल. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरही या बायांनी ओव्या रचल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील एका आडगावातल्या बाईने अशा किती तरी ओव्या ऐकवल्या होत्या. त्यातला हा एक नमुना,
‘‘बाबा, नि म्हणू बाबा,
बाबा आम्रिताचा पेला,
बाबाचं नाव घेता,
जीव आनंदानं न्हाला…’’
परंपराशील चाकोरीत जगत असताना, पारंपरिक मूल्यं जगत असतानाही ्त्रिरयांच्या ओव्या बदलत्या सामाजिक पर्यावरणाशीही संवाद साधताना दिसतात. आपली चाकोरी भेदण्याचा प्रयत्न करणं, ही समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. तरीही जीवनाचं गंभीर तथ्यही ती विसरत नाही.
जीवनात अनेक चढउतार असले तरी त्याला कुठं तरी अंतही आहे, याचं भान असणं ही विशाल अर्थाने आध्यात्मिक जाणीव आहे. प्रपंचाचा स्वार्थ साधीत असतानाही उच्चतम पारमार्थिक तथ्य ती कधी विसरत नाही. ‘शेजराणीबाई नको म्हणूस
माझं माझं,
नदीच्या गं पलीकडे जागा
साडेतीन गज…’
याचं व्यक्तीने सतत भान ठेवलं तर जीवन सुंदर करता येणंही माणसाच्या हाती आहे. हे पारंपरिक शहाणपण खूप मोठं आहे. अनुभवातून परिपक्व झालं आहे. या अशा त्या काळातल्या बायांच्या ओव्या वाचल्या की एकूणच औपचारिक शिक्षण आणि अनुभवातून आलेलं शहाणपण यातील श्रेष्ठ-कनिष्ठत्व ठरवणं कठीण जातं.
