वैवाहिक नातं केवळ प्रेमावर टिकत नाही तर लैंगिक सहजीवनाने हे नातं अधिक विश्वासपूर्ण, गहिरं होत जातं. म्हणूनच वैवाहिक जीवनात शास्त्रीय माहितीच्या आधारे आणि समजून-उमजून, शरीर-मनाच्या सुंदर संगमातून उपभोग घेणं हे महत्त्वाचं. परंतु आताच्या नवरा-बायकोंमध्ये लैंगिक समाधानाच्या व्याख्या बदलेल्या दिसतात का? हे सांगणारा या लेखाचा पूर्वार्ध एकविसाव्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांत आपल्या विवाह आणि कुटुंब संस्थेमध्ये जे बदल होत गेले, त्यातील लैंगिक जीवन हा अत्यंत महत्त्वाचा भाग. कारण अनेक नाती या समाधानाभोवती रेंगाळत असतात. खरं तर भारतात प्राचीन काळापासून लैंगिक प्रेम आणि कामजीवन या विषयांवर अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले गेले आहेत.
यात वात्सायनाचे ‘कामसूत्र’ जगातील सर्वात प्रसिद्ध, प्राचीन ग्रंथ मानला जातो. यात शारीरिक संबंध, मानवी जीवन, प्रेम, नाती आणि कला, याचे विस्तृत मार्गदर्शन आहे. कोकपंडित यांनी रचलेला ‘रतिरहस्य’ हा ग्रंथ कामशास्त्रावर आधारित आहे तर कवी कल्याण मल्ल यांचा १५ व्या शतकातील ‘अनंत रंग’ हा ग्रंथ वैवाहिक जीवन सुखकर व्हावं आणि प्रेमात नवीनता राहावी या उद्देशाने लिहिला गेला. क्षेमराज या राजाने लिहिलेला ‘नागरसर्वस्व’ हा ग्रंथ कामशास्त्र आणि प्रेमिकांच्या आचारसंहितेवर प्रकाश टाकतो. आधुनिक काळात लैंगिक शिक्षण, मानसशास्त्र आणि कामजीवनावर मराठी भाषेतही अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. यामध्ये वैद्यकीय, वैज्ञानिक दृष्टिकोनातून शरीरसंबंध आणि आरोग्याची माहिती देणारे अनुवादित तसेच स्वतंत्र साहित्यही समाविष्ट आहे. वानगीदाखल डॉ. अनंत आणि डॉ. शांता साठे यांचे किशोरावस्था आणि लैंगिक शिक्षणाविषयी ‘हे सारं मला माहीत हवं’ आणि ‘काय सांगू? कसं सांगू?’ ही पुस्तके, तसंच डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या कामशास्त्र विषयक उत्तम मार्गदर्शन करणार्या ‘निरामय कामजीवन’ या पुस्तकांचा उल्लेख करता येईल.
आपल्या समाजातल्या लैंगिक वास्तवाचं एका शब्दात वर्णन करायचं तर ‘अज्ञान’ असंच करावं लागेल, अगदी आजही! लैंगिकता या शब्दाचा उच्चारही निषिद्ध इथपासून आताच्या पिढीतला संभोगदर्शन (पोर्नोग्राफी ), ‘वन नाईट स्टॅन्ड’, ‘डेटिंग ॲप्स’, आणि साठ टक्क्याहून अधिक तरुण-तरुणींनी घेतलेला विवाहपूर्व लैंगिक नात्याचा अनुभव. इतक्या विस्तृतपटावर लैंगिकताविषयक शास्त्रीय माहिती आणि परिपक्व समज फार कमी दिसते. समुपदेशकांकडे गेली तीस वर्षं जी वास्तव प्रकरणे येत आहेत त्यातून हेच चित्र पुढे येतं.
भारतासारख्या देशात आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती यामुळे लोकांवर घरातल्या मोठ्यांचा आणि समाजाचा सतत खूप दबाव राहिला. घरात खूप माणसं, जागा मर्यादित, भोवतालच्या करड्या नजरा यामधून खासगीपणा, मोकळेपणा बहुसंख्यांना अभावाने मिळाला. सामायिक जगण्यापासून (वाडे, चाळी) स्वतंत्र जगण्यापर्यंतच्या (बंगले, फ्लॅट्स) प्रवासात सुखसोयींबरोबर स्वातंत्र्य, खासगीपणा सहज मिळू लागला. मात्र विवाहसंस्थेतील लैंगिक सहजीवनाच्या बहुस्पर्शी जाणिवेपासून आजही माणसं दूरच आहेत. या बहुस्पर्शी जाणिवेत नैसर्गिक लैंगिक गरजा, स्त्री आणि पुरुषांच्या लैंगिकतेतील फरक, त्याविषयीच्या समाजाच्या आणि व्यक्तींच्या धारणा, दृष्टिकोन, मानसिकता, स्त्री- पुरुष लैंगिक अवयवांचे शरीरशास्त्र, संप्रेरकांची भूमिका, स्पर्श तसंच भावनांचं स्थान, पूर्वायुष्यातील लैंगिक अत्याचाराच्या शरीर, मनावरील जखमा, व्यक्तिमत्त्वातील फरक यामुळे लैंगिक नात्यात निर्माण होणार्या फटी अशा अनेकानेक गोष्टी आहेत. वर उल्लेख केलेल्या ग्रंथांचे तर सोडाच, पण साध्या पुस्तकांचे वाचन करूनही कामशास्त्रीय माहिती ना आधीच्या पिढ्यांनी घेतली ना माहितीसागरात आकंठ बुडालेल्या आजच्या पिढ्या घेत आहेत. आधीच्या पिढ्यांचे उपर्या माहितीचे स्रोत कथा- कादंबर्या, चित्रपट असे होते, ज्यांचा उद्देश रंजन हा होता, शास्त्रीय माहिती देणं नव्हे. आत्ताच्या पिढ्या माहितीजालावर (इंटरनेटवर) सहजी उपलब्ध असलेल्या, लैंगिक भावना उद्दीपित करणार्या आणि कामुकतेकडे घेऊन जाणार्या पर्यायांचा अनुभव घेत आहेत. म्हणजे काळ बदलला तरी वैवाहिक जीवनातील लैंगिक सौंदर्य आणि समाधानाचा शास्त्रीय माहितीच्या आधारे, समजून-उमजून, शरीरमनाच्या सुंदर संगमातून उपभोग घेणारी काही विवाहित जोडपी आहेत, नाही असं नाही; पण अजूनही त्यांचं प्रमाण कमी आहे. याचे वैवाहिक नात्यावर तात्कालिक आणि दूरगामी परिणाम होतात. या नात्याचा गाभा असलेल्या पती-पत्नीमधील निरोगी, भावनिक आणि लैंगिक सहजीवनाचा अभाव हे विवाह आणि कुटुंब व्यवस्था सुदृढ नसण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.
प्राणिमात्रांसाठी विणीचा निर्धारित हंगाम असतो (मेटिंग पिरियड). तसंच, त्यांचा समागम हा शारीर पातळीवरचा असतो. त्याचा हेतू केवळ प्रजोत्पादन हाच असतो. त्यांच्यात कोणतीही वचनबद्धता नसते. काही अपवाद वगळता, नर- मादीची ही जोडी पिल्लं स्वतंत्रपणे जगण्यासाठी सक्षम होईपर्यंतच एकत्र राहते. संसार वगैरे थाटत नाही. याउलट माणसं सर्व वेळ समागमक्षम असतात. भावनिक ओढ आणि शारीरिक आकर्षण यामुळे स्त्री-पुरुष एकत्र येणं अत्यंत स्वाभाविक आहे. समूहात राहणार्या माणूस या सामाजिक प्राण्याच्या या निसर्गउपजत आकर्षण आणि इच्छांना पुढे विवाह व्यवस्थेतील बंधनांच्या, नैतिक मूल्यांच्या, नियमांच्या आणि कायद्याच्या चौकटीत, पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यात बद्ध केलं गेलं. परस्पर साहचर्यातील आनंद मागे पडून संसार नामक कर्तव्य आणि जबाबदार्यांच्या व्यावहारिक नात्यातच माणसं अधिक जखडली. परंतु उत्क्रांत झालेला मानवी मेंदू हा विचारक्षम आणि भावनाक्षम असल्याने, विवाहातील लैंगिक नात्यात वैचारिक प्रगल्भता आणि परस्परातील भावनिक सामंजस्य अपेक्षित आहे, ज्यामुळे पतीपत्नीमध्ये विचार आणि भावनांची देवाण-घेवाण होत राहून, एक छान मैत्री, प्रेमभाव निर्माण होईल. या मैत्रीला संवेदनशील, भावपूर्ण स्पर्शाचे सुंदर कोंदण लाभल्यास पती-पत्नीमधील मानसिक बंध दृढ होऊन, त्यांच्यामध्ये सहज, सुंदर, तरल शरीरसंबंध घडेल. भावनिक जवळीकीची मन:पूत शरीर संबंधात झालेली परिपूर्णता म्हणजेच आनंद आणि समाधान देणार्या भावनोत्कटतेचा अत्युच्च पातळीवरचा अनुभव (ऑरगॅझम)! अशा अनुभवाच्या वारंवारितेतून परस्परांवरील प्रीती, विश्वास वाढत जातो आणि त्यातून जाणवणार्या भावनिक सुरक्षितता आणि स्थैर्यामुळे वैवाहिक नातं दृढ होत जातं. दीर्घकालीन वैवाहिक नात्यात परस्परांशी वचनबद्ध राहता येण्याचा हा भक्कम पाया आहे.
मात्र प्रत्यक्षात काय दिसतं? ‘लैंगिक नात्याची ऐशीतैशी’ असलेली असंख्य उदाहरणं. लोक समुपदेशनासाठी येत असतात. याचे किती प्रकार सांगावेत? नवपरिणीतांच्या बाबतीतही विविध प्रकार दिसतात. विवाहातील लैंगिक नातं म्हणजे नेमकं काय, स्त्री आणि पुरुषांचं शरीर, मन या क्रियेला कसा वेगवेगळा प्रतिसाद देतं आणि का? इतकी मूलभूत माहितीही आजच्या माहितीच्या विस्फोटाच्या काळातही अनेकांना नसते. त्यात चुकीच्या, अपुर्या, अशास्त्रीय माहितीवर आपल्या असंवेदनशील, अविवेकी विचारांचं रोपण केल्यामुळे वेगळेच गोंधळ! पूर्वीची जोडपी जे करण्याचं धाडस सहसा करत नव्हती त्याविषयी हल्लीच्या पिढीला काही वाटेनासं झालं आहे. प्रत्यक्षात वा दूरस्थ पद्धतीनं पोर्नोफिल्म्स/रील्स बघत, जोडीदाराला त्यातील अनैसर्गिक गोष्टी करायला भाग पाडणं, आधीच्या अनुभवांची तुलना करून जोडीदारास कमी लेखणं, हिणवणं, मानापमान मनात ठेवून लैंगिक नातं रोखून धरणं, जोडीदाराला स्पर्शापासूनही वंचित ठेवणं, जोडीदार लैंगिक नात्याबद्दल अननुभवी असेल तर तो/ ती आपला जोडीदार व्हायला लायक नाही असं मानून आत्मसन्मानाचा उपमर्द करणं असे अनेक प्रकार. तर दुसरीकडे ‘करून- करून भागले, देवपूजेला लागले’ या चालीवर लग्नाआधीची लैंगिक संबंध आलेली अनेक प्रेमप्रकरणं लपवून, ठरवून केलेल्या लग्नात, आपण ज्यात आनंद उपभोगला त्या लैंगिक क्रिया जोडीदारावर लादल्या जातात. त्या अवाजवी अपेक्षा पूर्ण न झाल्यास, जोडीदाराच्या मनाला लागेल असं बोलणं, संशय घेणं, आरोप करणं, अनुल्लेखानं मारणं, हे प्रकार सर्रास चालतात. यातून निर्माण होणार्या ताणांमुळे आपल्याकडून लैंगिक कामगिरी नीट होईल ना, ही चिंता भेडसावते (परफॉर्मन्स अँक्झायटी). त्यामुळे जमत असलेलंही जमेनासं होतं आणि मग त्या चक्रातच सापडायला होतं. अप्रामाणिकपणा, असंवेदनशीलता, दडपण, नाकारलेपण, अनादर अशा वातावरणात हे नातं उभं राहणार कसं?
अनेकांना यातील शरीरशास्त्र आजही माहीत नसतं किंवा अगदी जुजबी माहीत असतं. त्यात भरीला चुकीच्या, अविवेकी धारणा असतात. भीती, काळजी, घृणा, किळस, तिरस्कार अशा नकारात्मक भावनांचा कल्लोळ असतो. त्यात शुचितेच्या अवास्तववादी, अन्यायी, एकतर्फी पुरुषप्रधान संकल्पना आणि त्याची खातरजमा करून घेण्याचे अघोरी प्रकार…त्यामुळे उभय पक्षी आनंददायी लैंगिक नातं ही आपल्या समाजात एक दंतकथाच ठरतं.
दुर्दैवानं, अनेकांना शरीरसंबंधांचं काही सोयरसुतकही नसतं. बर्याच जणांना वाटतं ते असतं केवळ मूल होण्यापुरतं! अनेकदा थेट शरीरसंबंध न घडता केवळ लैंगिक अवयवांच्या केवळ घर्षणातून अपघाताने दिवस जातात आणि लैंगिक नात्याची सुयोग्य पूर्तता (कॉन्झ्यूमेशन) होतच नाही. जोडपी भावनोत्कटतेच्या जादूई अनुभवांपासून वंचितच राहतात.
कुटुंब नियोजनाबद्दलही अनेकांनी काही विचार केलेला नसतो. ती साधनं वापरण्याबद्दल उदासीनता, भीती, अज्ञान अहंगंड, असतो. यातून लग्नानंतर लगेचच राहणारं गर्भारपण, आईकडच्या दीर्घ मुक्कामात होणारं बाळंतपण, मग बाल संगोपन, दखल न दिलेलं प्रसूतीनंतरचं औदास्य, त्यानंतर नोकरी सुरू झाली की होणारी ओढाताण, दमणूक, ऊर्जा आणि वेळेच्या अभावी कमी कमी होत जाणारी शारीरिक, मानसिक जवळीक… या सगळ्यांमध्ये अनेकदा लैंगिक नात्याची वासलातच लागत जाते. जुन्या पिढ्यांना निदान स्वस्थता तरी होती, आता तीही नाही. भरीला गैरसमज, वादविवाद, भांडणं, कौटुंबिक कलह, नोकरीतील अनिश्चितता/अस्थैर्य, आर्थिक समस्या, चिंताग्रस्तता, मुलांचे प्रश्न, व्यसनं, स्वैराचार/व्यभिचार आदींची भर पडली की पती-पत्नी मधील दुरावा इतका वाढतो की उरतं ते केवळ समाजाला दाखवण्यासाठी ठेवलेलं उपरं, औपचारिक, व्यवहारिक असं संसारी नातं! तन, मन आणि वाणी यांचा संवाद एखाद्या वाद्याच्या योग्य तारा छेडल्या गेल्यावर जसा सुरेल सुरांचा माहोल उभा राहतो तसा असतो. यातील एक जरी तार बेसुरी लागली तरी सगळा बेरंग होऊन जातो. जोडप्यामधील सुसंवादी, वैचारिक, भावनिक, लैंगिक साहचर्या अभावी, त्यांचं वैवाहिक नातं बेसुरी, उपरं निरस होऊन जातं.
अनेक विवाहबाह्य नाती ही अशा विफल विवाहांमुळे होणार्या घुसमटीची, विवाह सुखाच्या वंचिततेची, झालेल्या अन्यायाची परिणती असते; तर अशा वाटांना न जाणारे काहीजण मनोकायिक आजारांचे, वर्तनदोषांचे शिकार होताना दिसतात. केवळ लग्न, संसार टिकवून ठेवण्यासाठी जे लग्न निभावत असतात ते ‘हे असंच असतं’, अशी स्वत:ची समजूत करून घेतात. वर्षानुवर्षं शारीरिक, मानसिक दुरावा आणि लैंगिक नात्याचा अभाव अनुभवणार्या जोडप्यांचं प्रमाण चाळिशीपासूनच दिसतं, पण पन्नास ते सत्तर या वयोगटात ते सर्वात जास्त आहे. अगदी वीस-वीस वर्षंही शरीर-मनाने घटस्फोटित जोडपी, पति-पत्नी म्हणून वावरत असतात. त्यांच्या मुलांनाही याची जाणीव असते. विवाहबाह्य संबंधांचं प्रमाणही याच वयोगटात सर्वात जास्त आहे. विभक्त होण्यापेक्षा ते हा धोका पत्करताना दिसतात. लैंगिक अनारोग्याचे हे दुष्परिणाम आपल्या विवाह आणि कुटुंब व्यवस्थेनं लपवून ठेवलेल्या अप्रामाणिकपणाचं गेल्या पंचवीसच नाही तर अनेक वर्षांचं फलित आहे. मोबाइल फोनमुळे ते आता उघडं पडलं आहे एवढंच.
vankulk57@yahoo.co.in
