पुण्याच्या ‘साथ-साथ’ या विवाह अभ्यास मंडळात आमचा एक उपक्रम असे. स्वत:चे गुणदोष सांगत आपली ओळख करून द्यायची. आत्मविश्वासाने सुयोग्य स्वओळख सांगणारे फार कमी. एकदा तर एक मुलगी म्हणाली, ‘‘आई म्हणते, तू कायम गोंधळलेली असतेस, बाबांना मात्र मी हुशार वाटायचे. माझ्या मोठ्या भावाने मला बावळट ठरवून टाकलं होतं, तर आजी म्हणायची, माझी नात फार प्रेमळ आहे. शिक्षक, शेजारीपाजारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक प्रत्येकाचं माझ्याबद्दल वेगळं मत होतं. यामध्ये मी नेमकी आहे तरी कशी? हे मला कळायचंच नाही. तुमच्या या उपक्रमात स्वत:विषयी सविस्तर माहिती भरताना जाणवलं की, स्वत:त डोकावल्याशिवाय मला माझं अंतरंग समजणारच नाही. स्वत:ला ओळखण्याची माझी सुरुवात इथून झाली.’’

भारतीय समाज कौटुंबिक आणि सामाजिक धाग्यांनी इतका घट्ट विणला गेलेला आहे की, आपल्याभोवतीची सर्व माणसं सतत आपल्याबद्दल काही तरी मत बनवत असतात. आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे पूर्ण हत्ती कुणालाच दिसत, समजत नसतो. शिवाय प्रत्येक व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनानुसार मत बनवत असते. नात्यांमध्ये भूमिकांनुसार हा दृष्टिकोनही बदलतो. त्यात पूर्वग्रहही प्रभाव टाकतात. माहेरच्यांना दिसणारी ‘मुलगी’ आणि सासरच्यांना दिसणारी ‘सून’ वेगळी असते. सर्वसाधारण मुलगा जावई म्हणून मात्र कौतुकाचा असतो. अनेकांना त्यांच्या-त्यांच्या नजरेतून आणि अनुभवांमधून माझ्याबद्दल असं काय-काय वाटत असलं, तरी मी नेमकी कशी/ कसा आहे, असं जाणीवपूर्वक स्वत:कडे बघण्याचे कष्ट फारसे कुणी घेताना दिसत नाहीत. अनेक माणसं, परिस्थिती आणि कालप्रवाह जसा, जिथे घेऊन जाईल तसे जाताना दिसतात. त्यांच्या-त्यांच्या जुळवून घेण्याच्या क्षमतांनुसार आणि मर्यादांनुसार तिथे-तिथे पोहोचतात.

एकत्र कुटुंबाचा प्रभाव, हुकमत गाजवणारे पालकत्व आणि आजच्या तुलनेने सरधोपट जीवन यामध्ये ‘स्वओळख’ हा मुद्दा कधी केंद्रस्थानी नव्हताही. सगळ्यांनाच भूमिकांच्या साच्यांमध्ये असं ठाकून-ठोकून बसवलं जायचं की माणसं दाखवून दिलेल्या, मळलेल्या वाटांनी, तडजोडी करत, परिस्थितीशी जुळवून घेत चालत राहायची आणि ‘संसार’ नामे निजकार्य इमाने-इतबारे करत जबाबदार्‍या आणि कर्तव्यपूर्तीचं समाधान मिळवायची. जी यात कमी पडायची त्यांना इतर सांभाळून घ्यायचे. आजचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे झाले आहेत. ते कुणाच्या मताने चालत नाहीत. त्यांच्या तळव्यावर अख्खं जग विराजमान झालं आहे. त्याचा विलक्षण प्रभाव त्यांच्या आयुष्याची भावी दिशा ठरण्यावर पडतो.

निसर्गनियमाने, जीवसृष्टीतील प्रत्येक सजीवाच्या जगण्याच्या प्रेरणा तीनच आहेत. स्वत:चे अस्तित्व टिकून राहणे, प्रजात टिकून राहणे आणि बदलांमध्येही तगून राहण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवत राहणे. यासाठी प्रत्येकाला निसर्गाने विशिष्ट गुणधर्म आणि कौशल्यांचा संच दिलेला आहे. विचार आणि भावनांचा उत्क्रांत मेंदू लाभलेला माणूस हा सामाजिक प्राणी असल्याने, त्याला नातीही टिकवून ठेवायची असतात. या सगळ्यासाठी प्रत्येक माणसाला त्याच्या मेंदूने गुणदोषांचा समुच्चय किंवा गुणवैशिष्ट्य असलेलं व्यक्तिमत्त्व दिलेलं असतं. हीच त्या-त्या माणसाची शास्त्रीय स्वओळख. वयाच्या विशीपर्यंत प्रत्येकाची ही संरचना/ आकृतिबंध तयार होतो. त्याआधी, विशेषत: तारुण्यात, बरेच जण या ‘स्व’ओळखीच्या संभ्रमातून (selfidentity crisis) जातात. व्यक्तिमत्त्वाची रचना पूर्ण होऊन हळूहळू स्थिरावत गेली तरी अनेकांना आपल्या या स्वभाव-संचाची ओळख झालेली असते असं नाही. परदेशातील अनेक मुलं अठराव्या वर्षीच घराबाहेर पडत असल्यामुळे त्यांचा हा स्वशोध लवकर सुरू होतो आणि स्वओळखीचा संभ्रम, गोंधळ लवकर संपतो.

‘परिपक्वता’ हा स्वओळखीचा पुढचा टप्पा आहे, जो नित्य नव्या अनुभवांमधून मेंदूत ज्या नवनव्या न्यूरॉन्सच्या जोडण्या होत राहतात त्यातून सिद्ध होतो. स्वत:ला अधिकाधिक संधी देत आपण जितकं स्वतंत्र, स्वावलंबी होत जाऊ तितकी ही परिपक्वता उन्नत होत राहते. आयुष्यभर चालणार्‍या स्वउन्नतीच्या प्रवासाचा पाया ‘स्वओळख’ हा असल्याने त्याचं गांभीर्य लक्षात यावं. नुकताच The Pursuit of happyness हा नितांत सुंदर इंग्रजी चित्रपट बघितला. त्यात आपल्या पाच वर्षांच्या मुलाला वडील सांगतात, ‘‘तुला कुणी म्हणालं की, तुला हे जमणार नाही; पण तुला जर खात्री असेल की तुला ते जमेल, तर गो अहेड. तुझे स्वप्न तुझे असेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्दही तुझीच असेल.’’

स्वओळख अचूक असेल तर माणूस स्वविकासाच्या पायर्‍या योग्य दिशेने आणि भराभर चढतो. आत्मबोध (self- actualization) आणि आत्मदर्शन हा माणसाच्या आध्यात्मिक प्रवासाचा अंतिम बिंदू. सारं संत वाङ्मय, या अंतिम बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी चित्तशुद्धीचे प्रयत्न आणि त्यासाठीची प्रक्रिया याबद्दल बोलतं. स्वओळखीचं म्हणूनच इतकं महत्त्व.

आपल्या कुटुंबात लहानाचं मोठं होताना परिवारातील प्रत्येकाच्या स्वतंत्र स्वभावधर्माशी जुळवून घेण्याच्या क्षमता आपल्यामध्ये सहजच विकसित होत जातात. त्या वाढीच्या काळात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची प्रक्रियाही चालू असते. आयुष्यात ‘लग्न’ या टप्प्याचा प्रवेश होतो, तेव्हा आपलं शिक्षण जसं एका टप्प्यावर आलेलं असतं तशी ही जडणघडणही! अनेकदा एकमेकांना संपूर्ण अनोळखी आणि म्हणून अनभिज्ञही असलेली दोन माणसं, फक्त वरवरच्या ढोबळ विचारांनी लग्न करतात आणि चोवीस तास एकमेकांच्या सोबत राहायला लागतात. अशा वेळी स्वओळखीचाच अभाव असेल तर दुसर्‍याला कसं समजून घेणार? त्यामुळे लग्नाने माणसं एकत्र येतात ती आधी स्वत:ला ओळखून, मग त्या ओळखीनुसार दुसर्‍याला पारखून, त्यातील मिळतेजुळतेपण तपासून नव्हे, तर फक्त परस्परांकडून असलेल्या अपेक्षा घेऊन! प्रत्यक्षात कुणाच्या अपेक्षा पूर्ण करायला आपण तरी सक्षम आहोत का, हे कुणीच तपासलेलं नसतं.

‘‘आमचं घर माणसांच्या गोतावळ्यात रमणारं आणि ही इतकी घुमी कशी काय? हिला माणसं आवडतच नाहीत की काय? आधी कळलं असतं तर… आमचा मुलगा हिच्या रूपाच्याच प्रेमात पडला,’’ हे नेमकं कुणी आणि केव्हा कळून घ्यायचं? तुमच्या लेकानं तरी ही कल्पना दिली होती का तिला? मुळात तो तरी बोलका आहे का? अंतर्मुख माणसं चांगली वा वाईट नसतात. ती कमी बोलतात. त्यांची अभिव्यक्ती सौम्य असते. लग्न ठरताना आपल्या या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्व-वैशिष्ट्याबद्दल बोललं, सांगितलं जाणं अपेक्षित नाही का? ‘‘मला माणसं आवडत नाहीत असं नाही, पण मुळात माझा स्वभाव बोलका नाही. मला पटकन कुणाशी मैत्री करता येत नाही.

ओळख ते परिचय असा प्रवास व्हावा लागतो. ज्या व्यक्तीबरोबर माझी नाळ जुळते त्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकते. त्याला वेळ लागतो.’’ स्वत:विषयी इतकं सविस्तर आपण सांगतो का? दुसर्‍याला तरी विचारतो का? हा उलगडा केला वा करून घेतला नसेल तर ‘कुणात मिसळायचं नसतं’, ‘मित्र-मैत्रिणी जवळजवळ नाहीतच’, ‘पाट्र्या आवडत नाहीत’, ‘स्वत:तच रमलेले’ अशी अपेक्षाभंगाची अभिव्यक्ती होत राहते. मग ती व्यक्ती अधिकच आपल्या कोशात जाते. लग्न ठरण्याला लग्न ‘गाठ’ जुळणं असं का बरं म्हटलं असेल? दोन माणसांच्या अपुर्‍या स्वओळखीमुळे आणि त्यामुळे अपुर्‍या परस्पर ओळखीमुळे नात्यांमध्ये विसंवादाच्या, अपेक्षाभंगातून होणार्‍या कटुतेच्या, नाराजीच्या, निराशेच्या गाठी तयार होत जातात म्हणून?

हेही वाचा

खरं तर माणसाचा स्वभाव हा अतिशय गुंतागुंतीचाच आहे. त्यामुळे स्वओळख सोपी नाहीच. विकसित मानसशास्त्र सांगतं की, प्रत्येक माणसाचा स्वभाव म्हणजे अनेक वैशिष्ट्यं असलेल्या गुणावगुणांचा संच असतो. प्रत्येकात ही सर्व वैशिष्ट्यं निसर्गत:च असतात. मात्र त्यांची अभिव्यक्त होणारी, वर्तनात येणारी तीव्रता, वारंवारता, कालावधी हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्या वर्तनातून त्या-त्या माणसांची ठळक वैशिष्ट्यं (Dominating traits) जाणवतात. असं वर्तन आपल्या नजरेत भरतं. आपण ते वारंवार अनुभवतो. म्हणून आपल्या दृष्टीने तो त्याचा स्वभाव असतो. मग आपण त्याला ते ‘लेबल’ लावतो. जसं रागीट, प्रेमळ, संयमी, शांत, आक्रमक, आनंदी, मवाळ आदी. पण माणूस या सहजी समोर येणार्‍या रूपाइतकाच मर्यादित नसतो. कारण खूप मोठं आयुष्य जगताना, अनेक नाती निभावताना, अनेक घटनांना सामोरं जाताना, तर्‍हतर्‍हेचे प्रसंग अंगावर घेताना त्याच्या टिकून राहण्यासाठी आणि स्वविकासासाठी त्याला वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांचा संच लागत राहतो. जीवनाच्या कक्षा विस्तारत जातात तेव्हा त्याची स्वओळखही विस्तारत जाते.

अगदी वाढत्या वयाच्या टप्प्यावरही ‘‘अरे, मी काल असा कसा वागलो?’’ असा प्रश्न त्याला पडतोच. म्हणून तर स्वओळख ही नित्य चालू राहणारी प्रक्रिया आहे. आता स्वत:लाच असा प्रश्न पडत असेल तर इतरांना तर आपल्याविषयी किती प्रश्न पडत असतील! म्हणून तर नातेसंबंधांची जपणूक आणि त्यांचे वर्धन हा काट्याकुट्यांचा मार्ग आहे असं म्हटलं जातं. आपल्या कुटुंबव्यवस्थेने या काट्याकुट्यांच्या मार्गावर म्हणून तर सण, समारंभ, उत्सव, माहेरपण अशा अनेकानेक योजनांमधून सुमनांचे ताटवे फुलवण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने अनेकांना एकत्र आणून आनंद देता-घेताना परस्परांशी जुळवून घेण्याच्या क्षमता वाढवत नेल्या.

एकविसाव्या शतकातल्या गेल्या पंचवीस वर्षांत हे सगळं कसं बदलत गेलं हे आपण अनुभवतोच आहोत. आजच्या करिअर-अर्थकेंद्री समाजाच्या, जगण्याच्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या क्षमता वाढत असल्या तरी नातेसंबंधांमध्ये जुळवून घेण्याच्या, तिथे तडजोडी करण्याच्या नवीन पिढ्यांच्या क्षमता आता कमी-कमी होताना दिसत आहेत. यातून विवाहसंस्थेला बेबनाव, विवाहबाह्य संबंध, नाइलाजाने एका छताखाली राहणं, अविवाहित राहणं, घटस्फोट यांचे हादरे बसत आहेत. त्यामुळे स्वओळखीचं महत्त्व कधी नव्हे इतकं वाढलं आहे. आपण नेमके कसे आहोत? त्यानुसार आपल्याला नेमकं काय हवं, नको आहे आणि का? काय नक्की मानवणार नाही आपल्याला? कशाशी जुळवून घेता येईल, कशाशी नाही? (उदा. आजच्या काळात लोकांनी ‘आऊटडेटेड’ असं लेबल लावलं तरी जोडीदार निर्व्यसनी हवा ही विवेकी अपेक्षा आहे). याची स्पष्टता तेव्हाच येईल जेव्हा गुणदोषांसहित आपला स्वभाव, आवडीनिवडी, राहणीमानाच्या संकल्पना, सवयी, आर्थिक व्यक्तिमत्त्व, कुटुंबविषयक विचार, मूल्य, भविष्याच्या योजना, सामाजिक जाणिवा आदी.

अनेकानेक गोष्टींची स्पष्टता आपल्याला असेल तेव्हा. नाही तर दुसर्‍याला कुठल्या मुद्दयांवर पारखायचं हे कसं कळणार? म्हणून मनासारख्या वैवाहिक नात्यासाठी, आपल्या आवडीच्या जोडीदाराचा शोध, ‘स्व’च्या शोधातून सुरू होतो आणि तसा जोडीदार मिळवण्यासाठी विचार करण्याचे, अभ्यास करण्याचे कष्टच घ्यावे लागतात. स्वत:च्या जमिनीची नांगरणी विचारांनी, विवेकाने केली तर समाधानी सहजीवनाची आणि निकोप विवाहसंस्थेची बीजं इथंच पेरली जातात.

गेल्या २५ वर्षांत मानसशास्त्रात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपला ‘स्वभाव’ अचूक सांगून आपल्या स्वओळखीला शास्त्रीय मदत करणार्‍या मानसशास्त्रीय चाचण्या आता सहजी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची मदत नवीन पिढ्यांनी घ्यायला हवी, नाही का? त्याबद्दल सविस्तर नंतर बोलूच.

टीप : ३० मेच्या लेखाच्या शेवटी उद्धृत केलेल्या कवितेच्या ओळी डॉ. मृदुला दाढे यांच्या आहेत.

(संदर्भ : अफसाना लिख रही)

vankulk57@yahoo.co.in