उज्ज्वला राहणे
सुधीरराव-अनुराधाबाई आणि अविनाशराव-सुमित्राबाईं नोकरीतून निवृत्त झाले आणि एक नवं आयुष्य त्यांच्या समोर उभं राहिलं. त्या दोन्ही जोडप्यांना एकेकच मूल. त्यांच्यावर आपलं म्हातारपण लादणं त्यांना योग्य वाटेना. शेवटी दोन्ही जोडप्यांनी एकत्र बसून आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला…

‘‘अविनाशराव, जरा नीट उभे राहा की हो! बघा, सुधीररावांचा फेटा किती रुबाबदार दिसतोय आणि तुमचा मात्र सैल होतोय सारखा.’’ ७८ वर्षांच्या सुमित्राबाईंनी हातात रेशमी फेटा धरून आपल्या पतीला हसतच दटावलं.

‘‘अहो सुमित्राबाई, बँकेत व्यवस्थापक असलेल्या सुधीररावांना शिस्तीची सवय आहे. आम्ही सरकारी कार्यालयात कागद सांभाळण्यात आयुष्य घालवलं, आम्हाला कुठं जमणार हा फेटा नीट बांधायला?’’ ७९ वर्षांच्या अविनाशरावांनी समोरच्या आरशात सुधीररावांकडे पाहत डोळा मिचकावला.

बाजूला उभ्या असलेल्या अनुराधाबाईंनी सुधीररावांच्या कोटावर गुलाबाचं फूल लावलं आणि म्हणाल्या, ‘‘आजचा दिवस या असल्या नोकर्‍यांच्या गप्पा मारण्याचा नाहीए. आज तुम्हा दोघांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ आहे. आपल्या दोन्ही कुटुंबांतला आनंदाचा सोहळा.’’

होय, आज आपल्या प्रशस्त घरात सुधीरराव आणि अविनाशराव या दोन्ही व्याह्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ एकत्र साजरा होत होता. वयाची ८१ वर्षं पूर्ण करून ८२ व्या वर्षात पदार्पण करताना, आयुष्यात १००० पूर्ण चंद्र पाहिल्याची कृतज्ञता त्या दोघांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होती.

दिवाणखाना फुलांनी, रुचकर पदार्थांनी आणि पाहुणे मंडळींच्या हास्यविनोदाने सजला होता. त्यांची नातवंडं, १० वर्षांचा अर्णव आणि ५ वर्षांची अनन्या पारंपरिक कपडे घालून उत्साहाने इकडेतिकडे धावत होते. अर्णव कधी सुधीरदादांचा चष्मा नीट करत होता, तर अनन्या अविनाशनानांच्या गळ्यात हात टाकून हुंदडत होती. एका बाजूला त्यांचे दादा-दादी (वडिलांचे आई-वडील) होते, तर दुसर्‍या बाजूला त्यांचे नाना-नानी (आईचे आई-वडील). सोहळा दोन्हीकडील नातेवाईक आणि मित्रमंडळींमुळे अतिशय आनंदात संपन्न झाला. सर्व जण या एकमेवाद्वितीय कुटुंबाचे खूप कौतुक करत होते. कारण हे कुटुंब होतंच आगळंवेगळं.

सुधीरराव आणि अनुराधाबाईंचा एकुलता एक मुलगा अमित आणि अविनाशराव व सुमित्राबाईंची एकुलती एक मुलगी नेहा. या दोघांनी लग्न केलं आणि दोन दोन आई-बाबा मिळवले. आजच्या या मंगलप्रसंगी आपल्या दोन्हीही आई-वडिलांचं त्यांनी औक्षण केलं. औक्षण करताना लेक आणि सुनेची भूमिका निभावणार्‍या नेहाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. नेहा म्हणाली, ‘‘बाबा, आजूबाजूचे लोक आम्हाला विचारतात, ‘तुझे आई-वडील आणि सासू-सासरे एकाच घरात एकत्र कसे राहतात? त्यांच्यात कधीच खटके उडत नाहीत का?’ पण आज तुमचा हा सोहळा एकत्र साजरा होताना पाहून लोकांचे सारे प्रश्न संपले असतील.’’

अमितने नेहाच्या सुरात सूर मिळवला, ‘‘हो ना! लोक म्हणतात वय झालं की काळजी वाटते, मागे-पुढे सांभाळणारं कोणी नसतं. पण तुम्ही चौघांनी वृद्धाश्रमाचा किंवा एकटे राहण्याचा पर्याय नाकारून हा जो एकत्र राहण्याचा सुवर्णमध्य काढलाय, तो खरोखरच आदर्श आहे.’’

चार वर्षांपूर्वी दोन्ही बाजूच्या या पालकांसमोर फार मोठी चिंता होती. दोन्ही जोडप्यांना एकेकच अपत्य असल्यामुळे वार्धक्यात कोणी कुणाला सांभाळायचं? शेवटी ती दोन जोडपी एकत्र बसली आणि त्यावरचा उपाय शोधू लागली. मुलांच्या घरात जाऊन कायमचं राहायचं, तर त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा येते. आजकालच्या मुलांची लाइफस्टाइल वेगळी असते. त्यांच्या वेळापत्रकात नाही म्हटलं तरी लुडबूड केल्यासारखं होतंच. त्यांनाही स्वतंत्रपणे संसार करायची हौस पूर्ण करू दे. आणि आपण काय सगळेच निवृत्त. कुणालाच घाई नाही की कसली गडबड नाही. आपल्याला काही त्यांचा वेग जमणार नाही. त्यामुळे यावर काही मार्ग काढला पाहिजे.’’ अशी चर्चा झाली. त्यावर सुधीररावांनी हा मार्ग सुचवला होता. ‘‘आम्हालासुद्धा ही चिंता सतावते. आपण चौघं एकत्र राहिलो तर?’’ विचार केल्यावर सगळ्यांना तो निर्णय पटला.

दोन्ही पालकांनी मिळून अमित आणि नेहाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर तीन खोल्यांचं घर घेतलं. नेहा आणि अमित त्याच इमारतीत सातव्या मजल्यावर राहत होते. ‘‘आपण समवयस्क एकत्र राहू. सुख-दु:खाला सोबती आणि मुलांवर ओझंही नाही. त्यांना त्यांचं खासगीपण सांभाळू देत आणि आपल्याला आपलं!’’ अविनाशरावांनी त्या कल्पनेला टाळी दिली होती. आणि दोन कुटुंबं एकाच घरात विसावली होती.

या घरात कोणीच कोणावर ओझं किंवा अवलंबून नव्हतं. चौघंही उच्च पदावरून निवृत्त झाले होते. सुधीरराव बँकेत व्यवस्थापक होते, अविनाशराव उच्च सरकारी अधिकारी, अनुराधाबाई महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तर सुमित्राबाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका! त्यामुळे घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोघांचाही वरदहस्त लाभला होता. आर्थिक सुबत्ता आणि वैचारिक प्रगल्भता यामुळे त्यांच्यात कमालीचा समजूतदारपणा होता.

स्वयंपाकघर मात्र एकच. या स्वयंपाकघराने गेल्या काही वर्षांत अनेक प्रयोग पाहिले होते. कधी दादीच्या हातचं पारंपरिक खानदेशी वांग्याचं भरीत, तर कधी नानीच्या हातचे कोकणी पद्धतीचे घावणे. दोन वेगवेगळ्या घराण्यांच्या अन्नपूर्णा इथं एकत्र आल्या होत्या, पण कधी सत्तेचा संघर्ष झाला नाही. कारण दोघींनी एक साधी गोष्ट स्वीकारली होती ‘हे किचन आपल्या दोघांचं आहे, कोणा एकाची मक्तेदारी नाही.’ त्याप्रमाणे आजवर ही दोन्ही जोडपी गुण्यागोविंदाने राहत होती.

सोहळ्याला आलेले पाहुणे परत गेले आणि अमित-नेहा मुलांना घेऊन आपल्या घरी निघून गेले. ते आपलं स्वतंत्र आयुष्य जगायला मोकळे होते, आणि खाली हे चार ज्येष्ठ नागरिक आपल्या हक्काच्या जगात!

मुलं गेल्यानंतर घरात समाधानी शांतता पसरली. सुधीररावांनी कपाटातून पत्त्यांचा कॅट काढला, अंगावरचा रेशमी झब्बा तसाच ठेवून ते बाल्कनीतल्या टेबलवर बसले आणि म्हणाले, ‘‘चला, आज सहस्र चंद्रदर्शनाच्या आनंदात एक मोठा डाव होऊ दे.’’ अनुराधाबाई आणि सुमित्राबाई दागिने आणि जड शालू बदलून सुती साड्या नेसून बाल्कनीत आल्या. पत्ते वाटले गेले आणि खेळ रंगला. हा त्यांचा रोजचा नित्यनेम होता. कधी पत्ते, कधी कॅरम, तर कधी जुन्या गाण्यांच्या अंताक्षरीचे नवनवीन खेळ रंगायचे. डावाच्या मध्यात अनुराधाबाईंनी गरमागरम कॉफीचे मग आणले. कॉफीचे घोट घेत, जुन्या आठवणींना उजाळा देत खेळ पुढे सरकला. हळूहळू रात्रीचे अकरा वाजले, डोळे पेंगुळू लागले तसा खेळ आटोपता घेऊन चारही जण आपापल्या खोल्यांमध्ये निद्राधीन झाले.

सकाळी नेहमीप्रमाणे चौघांचं वेळापत्रक घड्याळाच्या काट्यासारखं सुरू झालं. सकाळी साडेपाचला एकत्र मॉर्निंग वॉक, त्यानंतर बागेत थोडा वेळ योगासने आणि प्राणायाम. घरी आल्यावर एकत्र बसून ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाची तयारी. दुपारी दीड वाजता अर्णव आणि अनन्याच्या शाळेची बस आली की चौघेही मिळून त्यांच्या स्वागताला तयार असायचे. मुलांचे कपडे बदलणं, त्यांचं खाण्यापिण्याचं कौतुक आणि लाड करणं यात दुपार कशी निघून जायची, कळायचंही नाही. संध्याकाळी मुलांचा अभ्यास घेण्याची जबाबदारी दादी आणि नानींनी स्वत:कडे घेतली होती. शिक्षिका असल्यामुळे त्या दोघांचाही अभ्यास खेळत-हसत आणि उत्तम रीतीने पूर्ण करून घ्यायच्या. नातवंडांना योग्य संस्कार, उत्तम शिक्षण आणि संस्कार आणि दोन्ही बाजूंच्या आजी-आजोबांचे लाड एकाच वेळी मिळत होते. रात्रीची वेळ झाली की मुले वर आपल्या घरी निघून जायची आणि खाली या प्रशस्त घरात एक तृप्त शांतता पसरायची.

आजही बाल्कनीत बसून गप्पा मारताना सुधीररावांनी सहज आकाशातील पूर्ण चंद्राकडे पाहिलं. त्या लख्ख प्रकाशात त्यांना नुकताच झालेला तो सोहळा डोळ्यांसमोर उभा राहिला. तो डोक्यावर घातलेला भरजरी रेशमी फेटा, गळ्यातला पुष्पहार, मंत्रघोषांच्या गजरात झालेलं ते मंगलमय औक्षण आणि दोन्ही नातवंडांनी आजोबांना घातलेली ती प्रेमाची मिठी! आयुष्यात १००० पूर्ण चंद्र पाहिल्याची ती कृतज्ञता आणि कृतार्थता आजही त्यांच्या मनात जशीच्या तशी ताजी होती.

सुधीररावांनी अविनाशरावांच्या खांद्यावर हात ठेवत मिश्कीलपणे विचारले, ‘‘काय अधिकारी साहेब, पुढच्या डावाची काय तयारी?’’ त्यावर दोघेही खळखळून हसले. बाजूलाच बसलेल्या अनुराधाबाई आणि सुमित्राबाईंनीही त्या हास्यात सूर मिळवला. हा आनंद आणि हे समाधान त्यांना सहजासहजी मिळालं नव्हतं; तर ते त्यांनी स्वत:च्या समजूतदारपणानं कमावलं होतं.

आजूबाजूचे लोक ज्या वयात एकटेपणानं खचून जातात, त्याच वयात या चौघांनी एकत्र येऊन आनंदाचा एक नवा सुवर्णमध्य शोधला होता. इथं अहंकार बाजूला सारून एकमेकांच्या अस्तित्वाचा आदर करण्याची प्रगल्भता होती. त्यामुळेच तो ‘सहस्रचंद्रदर्शन सोहळा’ केवळ एका दिवसाचा सण नव्हता, तर तो त्यांच्या रोजच्या तृप्त जगण्याचा उत्सव होता.

वय केवळ आकडा असतो, मनं तरुण आणि समजूतदार असतील तर आयुष्याची संध्याकाळही किती सुवर्णमयी असू शकते, हेच हे एकमेवाद्वितीय कुटुंब जगाला सांगत होतं.

ujwalrahane1969@gmail.com

उतरवा तुमचं जग लघुकथेतून…

प्रत्येकाच्या मनात एक कथा दडलेली असते. कधी पाहिलेला प्रसंग, घेतलेला अनुभव मेंदूच्या कप्प्यात खोल रुतून बसलेला असतो. कधी तरी मग कल्पनेचा वारू उधळतो आणि अलगद उतरते ती कथा तुमच्या मनात. पाठवत राहा तुमच्या नव्या कोर्‍या, भावपूर्ण, प्रवाही, आशयघन, आधुनिक लघुकथा. १२०० शब्दांपर्यंतच्या. उत्कृष्ट कथेला मिळेल प्रसिद्धी ‘लोकसत्ता चतुरंग’मधून. या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. एकदा पाठवलेली लघुकथा कृपया पुन्हा पाठवू नये. कथा फक्त आणि फक्त स्त्रियांनी पाठवायच्या आहेत. ईमेल पाठवताना सब्जेक्ट मध्ये ‘लघुकथा २०२६’ असा उल्लेख आवश्यक. कृपया पीडीएफ फाइल पाठवू नये. ओपन किंवा वर्ड फाइल पाठवावी.

chaturang.loksatta@gmail.com