– नंदिता थोरात

समाजमाध्यमावरची आज आलेली माधुरी सुर्वे नावाची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ अमेयचं लक्ष वेधून घेत होती. तसा अमेय ‘ट्रॅव्हलिंग ब्लॉगर’ असल्याने त्याला सातत्याने फ्रेंड रिक्वेस्ट येत असत. पण हे अस्सल मराठमोळं नाव आणि खरं तर अस्पष्टच दिसणारा, पण मोहक चेहरा बघून तिचं ‘अकाऊंट’ उघडून बघायची त्याला उत्सुकता लागली होती… फक्त दहाच फॉलोअर्स, पाच फॉलोिअंग आणि निसर्गरम्य ठिकाणी काढलेल्या फोटोंच्या चार पोस्ट…! म्हणजे या समाज माध्यमावर ती नवीन असली पाहिजे, पण आजकालच्या ‘रेग्युलर अपडेट’च्या काळात इतके कमी अपडेट्स बघून अमेयला आश्चर्य वाटलं. चारही फोटोंमध्ये तिचा चेहरा धूसर दिसत होता, पण फोटोसाठीची पार्श्वभूमी, नैसर्गिक प्रकाशाचा योग्य समन्वय साधत काढलेले फोटो आणि प्रत्येक फोटोत दिसणारे उठावदार डोळे याचं त्याला आकर्षण वाटत होतं…

अमेयने ती ‘फॉलो रिक्वेस्ट’ स्वीकारली. अमेय मुंबईतल्या एका आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याला प्रवास, ट्रेकिंग याची विशेष आवड होती. त्यामुळे शनिवार-रविवारी कधी वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुपबरोबर तर कधी एकट्यानेच नवनवीन ठिकाणी जाऊन त्याचे व्हिडीओ ब्लॉग बनवायचा छंदच होता त्याला…!

‘‘आजच्या लोणावळ्याच्या या धम्माल पावसाळी सहलीनंतर लवकरच बघू या, नाशिक त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावरील कमाल हिरवळ आणि खळखळत वाहणारे नैसर्गिक धबधबे… तोपर्यंत स्टे ट्यून..!’’, असं म्हणत अमेयने आजचा व्हिडीओ संपवला. रात्री घरी येऊन उशिराने त्याने तो व्हिडीओ पोस्ट केला. पाच मिनिटं होत नाहीत तोच ‘नोटिफिकेशन’ दिसलं. अमेयने उत्सुकतेनं अकाऊंट ओपन केलं, तर माधुरीचा मेसेज, ‘हाय अमेय, तुझे ब्लॉग्ज खूप छान असतात. पुढचा त्र्यंबकेश्वरचा व्हिडीओ बघण्यास खूप उत्सुक आहे…’ खरं तर एवढ्या रात्री आलेला मेसेज बघून अमेयला आश्चर्य वाटलं, आजच्या धमाल सहलींनंतर आरामासाठी पहुडलेला अमेय तो मेसेज बघून जणू ‘रिचार्ज’ झाला. दोघांमध्ये मेसेजवरच गप्पा सुरू झाल्या. बर्‍याच गप्पांनंतर मूळची कोल्हापूरची असलेली माधुरी पुण्याच्या आयटी कंपनीत कामाला असल्याचं त्याला कळलं.

दरम्यान, रोजच कामात अखंड बुडालेल्या अमेयला दिवसाच्या शेवटी त्याच्या अकाऊंटवर माधुरीचा हाय-हॅलोचा एखादा तरी मेसेज दिसायचाच…! दिवसभराच्या कामाने शिणलेल्या अमेयने इकडून रिप्लाय देताच माधुरीही त्याच्याशी लेखी गप्पांना सुरुवात करायची. अमेयसारखीच प्रवासाची आवड असलेल्या माधुरीच्या देशातल्याच नाही तर परदेशातल्याही अनेक निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देऊन झाल्याचं अमेयला तिच्या बोलण्यातून समजलं. तिने परदेशातल्या सहलींचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अमेयबरोबर शेअर केले. तिच्याशी बोलण्यातून अमेयला पहिल्यांदाच त्याच्याहीपेक्षा प्रवासाची अधिक आवड असणारं कोणी तरी भेटलं होतं. अमेयने आत्तापर्यंत बनवलेल्या वेगवेळ्या ‘ट्रॅव्हलिंग व्लॉग्ज’विषयीही माधुरी आवडीने व्यक्त होत होती, त्यामुळे दिवसेंदिवस त्याची तिच्याशी बोलण्याची ओढ वाढत होती. संध्याकाळ होऊ लागली की कधी एकदा हा कामाचा दिवस संपतोय आणि मी रात्री माधुरीशी मनसोक्त गप्पा मारतोय असं त्याला होऊन जायचं…

काही दिवसांनी अमेय त्र्यंबकेश्वरच्या सहलीची तयारी करू लागला. आदल्या दिवशी अर्थातच त्याने माधुरीशीदेखील या आगामी सहलीची माहिती म्हणजे कधी पोहोचणार, कुठल्या- कुठल्या ठिकाणी जाणार वगैरे सांगितलं होतंच. त्र्यंबकेश्वरला पोहोचताच तिथले दाट हिरवळीने सजलेले डोंगर अनेक ठिकाणी वाहणारे धबधबे हे सर्व निसर्गसौंदर्य नजरेत साठवून घेत होता. अचानक ‘‘अमेय’’ अशी हाक आली. सावळी चमकदार कांती, नाजूक कमनीय बांधा आणि वार्‍यावर भुरभुरणार्‍या केसांनी झाकोळलेल्या चेहर्‍यावरचे काळेभोर डोळे बघताच अमेय जरासा दचकला आणि प्रश्नार्थक नजरेने त्या तरुणीकडे बघू लागला. ‘‘अरे, असं काय बघतोय, ओळखलं नाही का मला? मी माधुरी!’’ एकीकडे आनंद आणि दुसरीकडे आश्चर्य यामुळे भांबावलेला अमेय तिला बघताच म्हणाला, ‘‘माधुरी, तू इथं अशी अचानक? आणि येणार होतीस तर मला बोलायचं नाहीस का?’’ ‘‘अरे सांगितलं तर मग सरप्राइज कसलं?’’ माधुरी लडिवाळपणे म्हणाली. ‘‘तेही खरंच म्हणा, एनीवेज इट्स सच अ प्लेझन्ट सरप्राइज,’’, अमेय उत्तरला.

दोघांनी दिवसभर या निसर्गरम्य सहलीचा आनंद लुटला. अमेयच्या ‘रिल्स’ बनविण्याच्या कौशल्याची माधुरीला मजा येत होती. ‘‘माधुरी, मी आत्तापर्यंत एवढे फोटो काढले, रिल्स तयार केले, दरवेळी तू कॅमेर्‍यापासून दूर जाऊन उभी राहतेस. ये आता या धबधब्याच्या बॅकग्राउंडवर एक मस्त सेल्फी घेऊ या,’’ असं म्हणत अमेयने कॅमेरा पुढे केला. पण माधुरी झटदिशी दूर होऊन म्हणाली, ‘‘ते फोटो-व्हिडीओ वगैरे आवडत नाही रे मला. ‘कॅमेरा फोबिया’ आहे, असं समज वाटल्यास. फोटोला काय ‘एक्सप्रेशन’ द्यायचं हे समजतच नाही आणि मग खूपच वाईट फोटो येतात माझे…’’ अमेयही ‘‘एवढ्या सुंदर चेहर्‍याचे फोटो वाईट कसे येतील?’’ असे म्हणत तिच्याकडे रोखून बघू लागला. त्याच्या या अनपेक्षित वागण्याने काहीशी कावरीबावरी होऊन माधुरी लाजली. दिवसभर मनमुराद भटकंती करून ते घरी जायला निघाले.

दोघांनाही आपापल्या घरी पोहोचायला बराच वेळ झाला होता. पोहोचताच माधुरीने अकांऊंटवर पोहोचल्याचा मेसेज केला. अमेयनेही त्यावर लगेच ‘थम्सअप’ इमोजी टाकला आणि स्वत:ला बिछान्यावर झोकून दिलं. एरवी पडल्या पडल्या झोप लागणारा अमेय माधुरीबद्दलचं आकर्षण म्हणा की गूढ… तिच्या विचारांमध्येच हरवला होता. पण तिथून निघताना आपण एवढी विनंती करूनही माधुरीने तिचा फोन नंबर का दिला नाही हे काही केल्या त्याला समजत नव्हतं. माझ्याकडे सध्या ऑफिसचं सिमकार्ड असून यावर पर्सनल चॅट करता येत नाही, ही तिची कारणे त्याला पटत नव्हती. पण या विचारांपेक्षाही माधुरीचा लाजणारा मोहक चेहरा आठवून तो मनोमन सुखावत होता.

ट्रिपनंतरचा कामावरचा आजचा पहिला दिवस अमेयसाठी खूप थकविणारा होता तरीही त्याने सवयीप्रमाणे झोपण्याआधी अकाऊंट उघडलं. आज माधुरीचा मेसेज नव्हता तेव्हा अमेयनेच दोन-तीन मेसेज केले. मात्र खूप वेळ वाट बघूनही तिचा काही रिप्लाय आला नाही तेव्हा आधीच थकलेला अमेय मोबाइल बंद करून झोपी गेला. सकाळी ऑफिसला निघण्याआधी त्याने पुन्हा अकाऊंट पाहिलं. माधुरीने मेसेज पाहिले नव्हते. दमली असेल असा विचार करून अमेय त्याच्या पुढच्या कामांना निघाला. पण दिवसभर त्याचे विचार माधुरीभोवतीच फिरत होते…

पुढचे जवळपास चार ते पाच दिवस हेच चक्र सुरू राहिलं. तेव्हा मात्र अमेय अस्वस्थ होऊ लागला. तिला संपर्क करावा तरी कसा हेच त्याला समजत नव्हतं. ‘तिच्या ऑफिसचा नंबर शोधावा का’ असा विचार त्याच्या मनात चालू असतानाच अचानक तिचा मेसेज आला. अमेय खूप खूश झाला. मेसेजला रिप्लाय न दिल्याबद्दल माधुरी त्याची माफी मागत होती. पण इकडे अमेय काहीसा चिडला होता. तिनं सारं सांगितलं. गेले चार दिवस ती कोल्हापूरमध्ये होती. तिच्या आईला कर्करोगाचं निदान झालं होतं. एकटी कमावती असणार्‍या तिच्यावर चारही बाजूने संकटे आल्याचे अमेयला तिच्या बोलण्यातून समजले. आईच्या उपचाराचा खर्च एकटीला झेपणार नसल्याचे माहीत असलेले गावातलेच एक नातलग उपचाराचा खर्च उचलण्यास तयार होते. मात्र त्याबदल्यात माधुरीने त्यांच्या मुलाशी लग्न करावं असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे माधुरी चिंतेत होती.

पुढचे दोन-तीन दिवस त्याने माधुरीला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र चिंतेत असलेली माधुरी आता त्याच्याशी पूर्वीसारखी बोलत नव्हती. तेव्हा एक दिवस अमेय काही तरी ठरवल्यागत माधुरीकडून आईच्या उपचारांची आणि खर्चाची माहिती घेऊ लागला. माधुरीने सर्व माहिती सांगितल्यानंतर अमेयने तो कोल्हापूरला येणार असल्याचे सांगितले. पण तिच्या तिथल्या नातेवाईकांना ही गोष्ट आवडणार नसल्याचे तिने सांगताच अमेयने आईच्या उपचाराचा शक्य तितका खर्च उचलायची तयारी दाखविली…! अनेकदा हो-नाही करत माधुरीने शेवटी पैसे पाठवण्यासाठी अमेयला एक क्रमांक पाठवून सुरुवातीला एक लाख आणि दोन-दोन दिवसांच्या अंतराने दोन-दोन लाख असे एकूण पाच लाख पाठवण्यास सांगितले. पैसे पाठवण्यासाठी दिलेला क्रमांक आंतरराष्ट्रीय असल्याचं अमेयच्या लक्षात आलं, मात्र हा बॉसचा नंबर असून तेच आपल्याला रोख देऊ शकतात, असं तिने अमेयला सांगितलं.
दरम्यान, अमेयने आपल्याला एवढी मोठी मदत केल्याचं बघून माधुरी भारावून गेली होती. त्यांच्या रोजच्या चॅटिंगमधूनही त्यांच्या प्रेमाला आलेला बहर साफ कळत होता. या दिवसांमध्ये पुढच्या एक वर्षात घरी सांगून अमेयशीच लग्न करायचं आश्वासनही माधुरीने त्याला दिलं होतं.

माधुरीच्या आश्वासनाने सुखावलेला अमेय गेल्या काही दिवसांत एका वेगळ्याच उत्साहात वावरत होता. आज माधुरीशी बोलून आपल्या घरी या नात्याबद्दल कल्पना द्यावी आणि माधुरीला घरच्यांना भेटायला बोलवावं याचा विचार तो दिवसभर करत होता.

ठरल्याप्रमाणे त्याने रात्री आपलं अकाऊंट उघडलं आणि क्षणार्धात त्याच्या पायाखालची जमीनच सरकली…! आत्तापर्यंतचे माधुरीबरोबरचे सर्व चॅट तर डिलीट झालेले होतेच, शिवाय माधुरीचं अकाऊंटही दिसत नव्हतं. ‘कॅमेरा फोबिया’, ‘ऑफिसचे सिमकार्ड’ हे शब्द आता त्याच्या डोक्यात घुमायला लागले आणि आपण फसवलो गेलो हे समजायला त्याला वेळ लागला नाही…

‘‘अहो पण बोलत होतात इतके दिवस तर काही तरी संपर्क क्रमांक असतील ना तुमच्याकडे?’’, सायबर क्राइम विभागाचे पोलीस निरीक्षक अमेयला विचारत होते. डोक्याला हात लावून बसलेल्या अमेयने त्याही परिस्थितीत काही तरी आठवल्यागत माधुरीच्या पुण्यातल्या कंपनीचं नाव सांगितलं. थोड्याच वेळात माहिती काढून आलेले शिपाई त्यांच्या साहेबांकडे बघून म्हणाले, ‘‘साहेब, आम्ही नाव सांगितलेल्या कंपनीत चौकशी केली तर माधुरी सुर्वे नावाची मुलगी त्यांच्या कुठल्याच शाखेत कामाला नसल्याचं समजतंय…!’’

nanditachavan20@gmail.com