हेमा कुकडे
काशीची पावलं झपाझप घराकडे पडत होती. मालकाकडे निंदणाचे पैसे मागताना, त्याची गयावया करताना तिची दमछाक झाली होती. ‘‘निंदणाचे अन् वरचे पैसं कसं बी करून वीस हजार उसनवारी करून द्या…!’’ आठ दिवसापासून ती शेत मालकाला सांगत होती. तेव्हा कुठं आज तिच्या हातात बारा हजार रुपये पडले होते. या बोलीवर, की पैसे खंडेपर्यंत ती त्याच्या शेतात राबणार होती.
ते तिला चालणार होतं. कारण या पैशंातून तिची सुनंदा कोणी खूप मोठी होणार होती, म्हणून तिला घरी कधी पोहचतो असं झालं होतं. पाच वाजता निंदण संपून, पैसे हातात येता-येता सात वाजून गेले होते. अंधारून यायला लागलं होतं. चोळीतल्या काठावर सरकवलेल्या पैशाच्या पुरचुंडीला सतत चाचपडत ती घाईत चालू लागली. गावातल्या घरातून फोडणीचे सुगंध येऊ लागले होते. दिवाबत्ती होऊन तुळशीच्या जवळ मिणमिणते दिवे दिसू लागले होते. काशीचं मन हळवं, हळवं झालं होतं. मनात विचारांची गर्दी झाली होती. आज सुनंदाच्या वडिलांना जाऊन पाच वर्षं झाली होती. त्यांच्या नंतर काशीनं सुनंदाला शेतीतली काम करून मोठी केली होती. सुनंदा जात्याच हुशार होती. शिक्षणात गोडी होती. ती म्हणे, ‘आई मी मोठी झाल्यावर तुला अशी कामं करू देणार नाही’ तिला परिस्थितीची जाणीव होती. आईचे कष्ट तिला कळत होते.
नुकतीच बारावीची परीक्षा तिनं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती आणि एका चांगल्या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळणार होता. अभियांत्रिकीत प्रवेश घेण्यासाठी फीचे पैसे भरायचे होते म्हणून काशीने तिच्या भावाकडे काही पैसे मागितले ते सुनंदाच्या मामाने येऊन लगोलग भरले. काशी स्वाभिमानी होती. भावाला तिनं सांगितलं की ती ‘‘हे पैसे नक्कीच परत करणार,’’ मामासुद्धा समजूतीनंच हसत ‘‘बघू’’ म्हणाला.
अशा तर्हेने सुनंदाची महाविद्यालयात भरती झाली होती. काशीला आभाळ ठेंगण झालं होतं. ‘‘माह्यी पोरगी शिकून, सवरून मोठी व्हयील… मी अन् हिच्या बापासारखी तिची फरफट हुणार न्हाय… आमी शिकलो न्हाय तर शेती करावी लागली. त्यात शेतीच्या या अशा तर्हा, कधी पाऊस जास्त, कधी दुस्काल, वावरात पिकते तरी काय? बापानं शेतीसाठी कर्ज घेतलं तेही फेडेना झालं, दारूची संगत होतीच! काही दिवसांनी अन्न पचेना झालं. आजारी राहू लागला. तो जिवाला कंटाळला अन वावरांत झाडाले टांगून घेतलं. गावात वावडी उठली ‘कर्जबाजारी झाल्यानं शेतकर्याची आत्महत्या…’’ खरं कारण काशीला चांगलंच माहीत होतं. ‘‘दारूनं सुनंदाच्या बापाले खाल्लं होतं. होतं ते शेत इकून पैसं उसनवारीत गेले होते. आता सुनंदा शिकली तर हे सगळं संपून चांगलं दिस येतील…’’, काशी विचारात घराजवळ पोहचली.
सुनंदाच्या महाविद्यालयातून तीन-चार वेळा नोटिसा आल्या होत्या म्हणे फी भरा, पन पैसेच जमेना. सुनंदा जातीत बसत नव्हती म्हणून फीचे पैसे भरण्यात कोणतीच सूट नव्हती. सुनंदाने काशीला सांगितलं होतं की ‘‘आई! मला लाज वाटते. सारख्या नोटिसा येतात गं! कोनाले विचार नं पैशाचं काही होते का?’’ पन ‘फाटक्याचं आनिंच फाटतं’ तशी कथा होती. शेतमालकाकडे विनवनी करून आज हातात बारा हजार गावले होते. पाहू! सुनंदाले विचारू, एवढ्यानं भागन का?’’
काशी दारापाशी आली, घरापुढं अंधार होता. ‘‘पोट्टीनं दिवाबत्ती ही केली नाही वाटतं…’’ म्हणत तिनं दार ढकललं. अंदाजाने घरातला बल्ब पेटवला. पिवळा ठक्क प्रकाश घरात पसरला अन् काशीच्या डोळ्यापुढं मात्र अंधार पसरला…
सुनंदा खाटेवर आडवी उभी पसरली होती. तोंडातून फेस येत होता, डोळे विस्फारलेले होते. काशीबाई ओरडत बाहेर आली. चार लोकं गोळा झाले. गावात चर्चा सुरू झाली. लोक काही-बाही बोलायला लागले. अन् दोन दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी आली, ‘कर्जबाजारी शेतकर्याच्या मुलीनं महाविद्यालयात फी भरू न शकल्याने आत्महत्या केली.’
आपल्या शिक्षणाचं आता काही खरं नाही. आई तरी कुठून पैसे आणणार? या विचारानं आणि सारख्या नोटिसांमुळे सुनंदाला नैराश्य आलं होतं. त्याच दिवशी ती मैत्रिणीशी बोलली होती, ‘‘मला खूप लाज वाटते, की मी फी भरू शकत नाही. उद्या मी कॉलेजला येणार नाही.’’ मैत्रिणीला हे बोलणं साधं वाटलं होतं. पण सुनंदा आपल्या गरिबीमुळे नैराश्याच्या गर्तेत कोसळली होती, हे कुणालाच ठाऊक नव्हतं.
(सत्य घटनेवर आधारित)
hemakukade12@gmail.com
