प्रणिता खंडकर
विशाखाला भाचीच्या लग्नाला जायचं होतं. तिची आणि लेक सईची तयारीसुद्धा झाली होती पण; सकाळीच सासूबाई घरात पडल्याचं निमित्त झालं आणि त्यांची शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्णालयात त्यांच्याजवळ थांबणं गरजेचं होतंच. जवळच्या नातेवाईकांनी हात वर केले आणि आता लग्नाला कसं जायचं याचा पेच तिच्यासमोर उभा राहिला… तेवढ्यात एक फोन आला… आईला शस्त्रक्रियागृहात नेलं, तसा प्रसन्न काळजीनेच बाहेरच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती. आज पहाटे साडेपाचला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन ‘करुणा ऑर्थोपेडिक’ रुग्णालयात आले होते.
एक्स-रे बघून शस्त्रक्रियेशिवाय गत्यंतर नाही, असं डॉक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकीचे रिपोर्ट्स चांगले आले. आणि लगेचच नऊ वाजता शस्त्रक्रिया सुरूही झाली. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायलादेखील सवड मिळाली नव्हती. रुग्णालयातील कॅन्टीनमधला मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला. आणि पुढे कसं करावं याचा विचार करू लागले.
चहा पिऊन झाल्यावर प्रसन्नाने त्याच्या वरिष्ठ अधिकार्याला फोन करून ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या सख्ख्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरिवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि तिची लेक, सई तिच्या माहेरी जाणार होत्या आणि आज सकाळी अचानक हे सगळं घडलं होतं. तिनं ठाण्यातच राहणार्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ‘‘अरे देवा! अगं आम्ही आलो असतो गं, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन.’’
‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस!’ विशाखा मनात म्हणाली.
‘‘अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?’’ तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा आणखी एक भाऊ. प्रसन्न सगळ्यात धाकटा. ‘‘करू सावकाश शस्त्रक्रिया झाल्यावर. तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरिवलीला. मी करतो काहीतरी इथे. तसंही रुग्णाचं जेवणखाण इथेच मिळणार आहे.’’
‘‘अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असंच ठेवून गेले तर माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्या येतात धावून मदतीला.’’ मीरा ही प्रसन्नची बहीण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.
थोड्याच वेळात शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पुढचे पाच-सहा दिवस तरी आईला रुग्णालयात राहावं लागणार होतं. तिला एका रूममध्ये हलवण्यात आलं. एकामध्ये दोन रुग्ण असणार होते. प्रसन्न आणि विशाखा त्या रूममध्ये गेले. आई अजूनही गुंगीतच होती. रूम तशी बर्यापैकी मोठी होती. बाजूच्या कॉटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाची शस्त्रक्रिया झालेली दिसत होती. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाइल फोनमध्ये व्यग्र होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बघितलं आणि पुन्हा मोबाइल फोनकडे नजर वळवली.
एवढ्यात सईचा फोन आला, ‘‘मी येऊ का आई आजीजवळ बसायला?’’ तिनं विशाखाला विचारलं. उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती! पण विशाखानं तिला घरीच थांबायला सांगितलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वत:चं आवरून आणि जेवून आला की, विशाखा घरी जाणार होती.
विशाखा सासूबाईंच्या कॉटजवळ येऊन बसली. लग्नाला कसं जायचं याचा विचार चालू होता. काही वेळानं तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’च्या संस्थापक कुलकर्णी काकू बोलत होत्या. ‘‘अगं, तुझ्या सासूबाईंचा दररोज न चुकता येणारा ‘सुप्रभात’ संदेश आला नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तोही उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून सगळा प्रकार कळला. झाली का सुधाताईंची शस्त्रक्रिया? कशा आहेत त्या आता?’’
‘‘हो, काकू शस्त्रक्रिया झाली व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, असं सांगितलंय डॉक्टरांनी.’’
‘‘बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सईनं सांगितलं मला, मग ग्रुपवर कळवलं मी! आम्ही सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा-नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्नाला येता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर वडके, कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच.’’ असं म्हणून काकूंनी फोन ठेवलासुद्धा!
‘जिव्हाळा’, हा खरं तर सासर्यांच्या निवृत्त मित्रमंडळींचा गट. ठाण्यात राहणार्या या पंधरा जणांनी हा गट बनवला होता. त्यांच्यापैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी. तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी- व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता. सासर्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’चा मेसेज टाकला म्हणजे, ‘ऑल इज वेल’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. यानिमित्ताने सगळ्यांच्या ओळखी झाल्या. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या गटाला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.
कुलकर्णी काकूंचा फोन झाला आणि विशाखाला अगदी भरून आलं. जिथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती तिथं ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं, मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.
pranitakhandkar@gmail.com
उतरवा तुमचं जग लघुकथेतून…
प्रत्येकाच्या मनात एक कथा दडलेली असते. कधी पाहिलेला प्रसंग, घेतलेला अनुभव मेंदूच्या कप्प्यात खोल रुतून बसलेला असतो. कधी तरी मग कल्पनेचा वारू उधळतो आणि मग अलगद उतरते ती कथा तुमच्या मनात.आजपर्यंत अनेक कथा तुम्हा वाचकांकडून आम्हाला मिळत आहेत, जानेवारीपासून त्यातल्या कित्येक प्रसिद्धही झाल्या आहेत. अशाच पाठवत राहा तुमच्या नव्या कोर्या, भावपूर्ण, प्रवाही, आशयघन, आधुनिक लघुकथा. उत्कृष्ट कथेला मिळेल प्रसिद्धी ‘लोकसत्ता चतुरंग’मधून. या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. कथा फक्त आणि फक्त स्त्रियांनी पाठवायच्या आहेत. ईमेल पाठवताना सब्जेक्ट मध्ये ‘लघुकथा २०२६’ असा उल्लेख आवश्यक तसेच ओपन किंवा वर्ड फाइल मध्ये यापैकी फक्त एकाच ईमेलवर लघुकथा पाठवावी, ईमेल chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com
