बीना समीर बाचल
‘‘मी म्हणते, हा नाश्ता इथे आणलाच कोणी? गारढोण झालाय नुसता. मुलीकडच्यांना सांगा कोणीतरी. असेलच खाली हॉलमध्ये कोणी ना कोणी त्यांचं. नाहीतरी चिक्कार वर्‍हाड घेऊन आलीत मंडळी.’’ विहीणबाई अर्थात मुलाची आई लग्न सभागृहाच्या खास वरपक्षासाठी राखीव असलेल्या एसी रूममध्ये बसून फिस्कारत होत्या.

तोवर कोणीतरी त्या ‘गारढोण नाश्त्याची’ खबर वधूपक्षात नेऊन सोडली. इकडे वधूपक्षात अगदी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. शेवटी वधुमाय वैतागलीच. ‘‘कमाल करतात या बाई! स्वत:च सांगितलं की, नाश्ता त्यांच्या खोलीतच हवाय आणि तिथे नेऊन दिला तर ही भाषा! वरमाई असली म्हणून काय झालं? आतापासूनच अशा क्षुल्लक गोष्टींसाठी असं बोलू लागल्या तर पुढे कसं व्हायचं? आणि लग्न म्हटलं की, थोडं इकडे तिकडे चालायचंच. त्यात एवढा गहजब करण्यासारखं काही आहे का? थांबा मीच वर जाऊन खबर घेते यांची. आताच इतका ताप असेल तर माझी लेक कशी नांदेल यांच्या घरी? देवा, बघ बाबा तूच, सांभाळून घे सगळं.’’ आधीच लेकीच्या लग्नप्रसंगाने हळवी झालेली वधुमाय आणखीनच रडवेली झाली. तरीही माघार न घेता, डोळे पुसत ती तरातरा वरपक्षाच्या खोलीत गेली.

समोर गेल्यावर येतानाचा तिचा सर्व आवेश ओसरला खरा, तरीही तिनं मनाचा हिय्या करून विचारलंच, ‘‘ताई, तुम्हीच म्हणाला होतात ना की, नाश्ता आमच्या खोलीत हवाय असं आणि आता तो थंड झाला म्हणून तक्रार करताय?’’

‘‘तुम्हीच खाऊन बघा तो, म्हणजे कळेल?’’ वरमाईसुद्धा कमी नव्हतीच. वधूच्या आईनं थोड्या हिमतीने ती नाश्त्याची प्लेट स्वत:समोर ओढली आणि तिथेच खुर्चीत आरामात बसून खायला लागली, पण मनात विचारांची गाडी जोरात धावू लागली होती, ‘‘फार काही गारढोण नाहीये खरं, थोडा कोमट झालाय नाश्ता इतकंच! त्यात एवढा गहजब कशाला कोण जाणे? जाऊ देत, पहाटे उठल्यापासून नाहीतरी आता सवड झालीये बसायला. एकामागोमाग एक… हे विधी आणि ते विधी, ही वस्तू कुठंय… ती कुठंय हेच सुरू आहे. पाहुणे रावळे आणि त्यावर कहर म्हणजे आपल्या सासूबाई, एका जागी बसू देतील तर शपथ! आपली मुलीची बाजू, सतत पायाला भिंगरी हवीच कार्य पार पडेपर्यंत! असू देत मिळालीय संधी तर बसून नाश्ता करूयाच. राहू दे वरमाई उपाशी. भूक असेल तर येईल खाली हॉलमध्ये खायला!’’ मनातल्या मनात होत असलेली चिडचिड दाबत समोरचा नाश्ता केव्हा संपला तिचं तिलाच समजलं नाही. शिवाय या एसी रूममध्ये काय शांत आणि छान वाटलं तिला. ‘चला निघू यात, नाहीतर खाली सासूबाई माझा जीव नकोसा करतील.’ तिच्या मनातल्या विचारांच्या गाडीनं अधिकच वेग घेतला होता. ती बोलायला तोंड उघडणार तोवर वरमाई पुन्हा चढ्या आवाजात गरजलीच, ‘‘आता नाश्ता इथे माझ्या समोरच उरकला आहातच तर खाली जाऊन स्वत: ही नीट तयार व्हा जरा. लग्नात एकटी नवरी छान सजलेली आणि तुम्ही मंडळी असे अजागळासारखे वावरलात तर आम्हाला लाज आणाल. लग्नासाठी खूप मोठे लोक येणार आहेत. त्यांना तुमची ओळख करून देताना उगाच आम्हाला लाजल्यासारखं व्हायला नकोय.’’

वधुमायला आता असह्य झालं.

‘हे कसं काय ऐकून घेतोय आपण? ही माझी होणारी विहीण नसती आणि आज लग्न नसतं तर सडेतोड उत्तर दिलं असतं तिला. अजागळ म्हणतेय आपल्याला, हद्द झाली!’ तिच्या विचारांना खळ नव्हता पण स्पष्टपणे काही न बोलता तिनं ठरवलं आता खाली जाऊन त्या लेकीच्या मेकअपवालीला सांगते की मलाही अशी तयार कर की या विहीणबाईला धक्काच बसू देत.’

तिरमिरीत वधूची आई खाली आली. सगळ्यांनी तिला भंडावून सोडलं की, वर नक्की काय झालं दोन विहिणींमध्ये? पण हिनं काहीही न बोलता सरळ लेकीची रूम गाठली. जाण्यापूर्वी सर्वांना कोणी आहेर करायचाय, कोणी आहेराची पाकिटं सांभाळायची आहेत, कोणी हळदी- कुंकवाची जबाबदारी घ्यायची आहे त्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. लेकीच्या खोलीत जाऊन सरळ मेकअप करणारीसमोर जाऊन बसली आणि म्हणाली, ‘‘तुझी कोणी मदतनीस असेल तर तिला माझ्यासोबत दे. मलाही आज लेकीच्या लग्नात छान सजायचं आहे. प्रत्येक विधीला वेगळी साडी नेसेन म्हणते. बघू या मग तरी विहीणबाईच्या पाहुण्यांसमोर शोभतेय की नाही ते.’’

कधी कधी साडीला पिन-अप करायलाही विसरणारी आपली आई आज चक्क मेकअप, साड्या अशा गोष्टी बोलतेय हे पाहून स्वत: वधूच आश्चर्यचकित झाली होती, पण तिनं लगेच मेकअप करणार्‍या मुलीला आवश्यक सूचना देत वेळ सांभाळली. मुहूर्ताची वेळ झाली तशी सुंदर, साजिरी वधू लाजत मंडपात आली. सर्वांच्या डोळ्यांत तिच्याबद्दलचं कौतुक, प्रेम दिसतच होतं म्हणा. पण तिच्या पाठोपाठ जेव्हा तिची, वधूची आई येती झाली तेव्हा आलेल्या प्रत्येक पाहुण्यांची नजर तिच्यावरून हटेना. ‘‘ही एवढी सुंदर आहे?, कधी जाणवलंच नाही.’’

‘‘दहा वर्षांनी तरी तरुण दिसतेय हो.’’,‘‘अशी नेहमी सजत जा गं, नेहमीच आपली कामात तू, आरशात बघ जरा स्वत: लाच ओळखायची नाहीस.’’ अशा एकावर एक कौतुकाची थाप वधूच्या आईला मिळत होती. आणि वधूची आई मात्र वरमाईला शोधत होती. अखेर कोणाशी तरी बोलताना ती दिसली आणि वधूची आई तिच्या शेजारी जाऊन उभी राहिली. ‘‘काय, वरमाई आता तरी शोभतेय ना तुमची विहीण की काही बाकी आहे?’’

वरमाईनं साफ दुर्लक्ष करत पुन्हा तोंड उघडलं, ‘‘हे सगळं ठीक आहे, पण तो रुखवत जो मांडलाय ना तो पुन्हा तुमच्या घरीच न्या. तुम्हाला काय वाटलं? आमच्या घरी काय पलंग, कपाटं, भांडीकुंडी नाहीयेत की काय? केवढा तो पसारा? आमच्याकडे सगळं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं तरीही उपद्व्याप कशाला?’’

वधुमाय चिडली, पण जरा अवघडलीही, खरंच मुलाकडच्या लोकांनी सांगितलं होतं तरीही सासूबाई आणि इतर वडीलधार्‍यांच्या धाकानं सगळं घेतलं होतं. ‘‘असू देत आता. बघू काय करायचं त्या रुखवताचं ते,’’ असं म्हणत दोघीही दोन दिशांना पांगल्या ते थेट शेवटच्या व्याही भोजनाच्या पंगतीलाच समोरासमोर आल्या.

मुलाकडची सगळी पाहुणे मंडळी व्यवस्थित जेवली ना, कोणी राहिलं तर नाही ना हे जातीने बघत असताना पुन्हा वरमाईनं, वधूच्या आईला बोलावणं धाडलं. ‘‘विहीणबाई जेवण चाखून तर बघा, काय आणि कसा गोंधळ घालून ठेवला आहेत ते.’’

वधूच्या आईच्या तोंडाला कोरडच पडली, सगळे पाहुणे- रावळे जेवणाचं कौतुक करून गेले आणि मेलं सगळ्यात महत्त्वाच्या पंगतीला काय घोळ झाला कोण जाणे?’’ तिच्या मनात आलं.
वरमाईनं आपल्या शेजारची जागा रिकामी केली आणि वधूच्या आईला तिथे हात धरून बसवलं. ‘‘घ्या, खा ही बासुंदी पुरी, हा मसाले-भातही खा म्हणजे समजेल.’’ वरमाईचं फर्मान! तसा वधूच्या आईनं एक घास घेतला मात्र ‘इतक्या सुंदर चविष्ट स्वयंपाकाला ही बाई वाईट का म्हणतेय? तेच वधूच्या आईला कळेना! अखेर तिची लेक आणि जावई तिच्यासमोर हसत हसत आले आणि त्यांनी तिला एक घास भरवला. ‘‘आई,कशात म्हणजे कशातच काही कमी नाहीये अगं.’’ पण आपली लेक काय म्हणतेय ते तिला समजेना.

वरमाईनेही हसून दुजोरा दिला आणि आपल्या नव्या सुनेला हातच जोडले, ‘‘बाई गं, आता हे नाटक पुरे करते मी. सकाळपासून मला जी खलनायिका बनवलंय ना तुम्ही सर्वांनी ते पुरे झालं. हा काही कुठल्या मालिकेचा एपिसोड नाहीये, तेव्हा बस करा. बघा, माझ्या लाडक्या विहीणबाईंच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं आहे.’’

इकडे नववधू आपल्या आईच्या जवळ येत म्हणाली, ‘‘आई,खरंच सॉरी अगं, खरं तर आम्ही सगळेच माफी मागतो तुझी. हे सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं. ’’

लेक काय म्हणतेय ते न समजल्यानं त्यांनी विहीणबाईकडे पाहिलं तर त्या म्हणाल्या, ‘‘अहो,लेकीचं लग्न ठरल्यापासून बघतेय, तुम्ही सतत एका दबावाखाली वावरताय. मुलीची बाजू म्हणून सतत न्यूनगंड बाळगून वावरताय. मी तुम्हाला रुखवत वगैरे काही नको असे सांगूनही तुम्ही नको बाई, मुलाकडचे काय म्हणतील, असं म्हणत हे सगळं सामान जमवलं. स्वत:कडे मुळीच लक्ष नाही तुमचं. इतका भार स्वत:वर घेतलात की लग्नात ही आम्हा मुलाकडच्या लोकांना एसी रूम आणि तुम्ही सगळे खाली हॉलमध्ये! का बरं असं? आताही फक्त मुलाकडचे सगळे जेवले की नाही तेच पाहताय तुम्ही. तुम्ही स्वत: काही खाल्लं नव्हतं म्हणून वर बोलवून घेतलं. तुम्ही रागाच्या भरात का होईना एसीच्या थंड हवेत नाश्ता तरी केलात! आणि आपल्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नात आपण नाही सजायचं तर कोणी? पण तुम्ही स्वत:हून करणार नाही म्हणून बोलले. अहो, हा आपलाही कौतुक सोहळा आहेच की, एवढया कोडकौतुकात वाढवलेल्या आपल्या लेकरांना आपण एकत्र आणणार म्हणजे आपलं कौतुक व्हायलाच हवं, अर्थात हे सगळं मी गोडीने सांगितलं असतं पण तुम्ही ते मनावर घेतलंच नसतं असं खुद्द तुमच्या लेकीनंच मला सांगितलं आणि नाईलाजानं का होईना पण मला हे असं खलनायिका व्हावं लागलं. शेवटी हाडाची शिक्षिका आहे मी. समोरच्याकडून शिस्तीत काम करून घेता येतंच मला.’’

विहीणबाईचं बोलणं संपलं आणि वधुमायला रडू आवरेना. ‘‘अहो, तुम्ही माझ्या कौतुकासाठी झटत होतात आणि मी किती राग राग केला तुमचा. अगदी माझी लेक कशी नांदेल तुमच्याकडे, इथपर्यंत डोक्यात राख घालून घेतली. माफ करा.’’ म्हणून हात जोडेपर्यंत वरमाईने त्यांचे हात आपल्या हातात घेतले.

‘‘अहो, माफी कसली त्यात? आता मैत्रिणी आहोत आपण, असंच एकमेकींना सांभाळत मैत्री वाढवू या. हा पण असं स्वत:ला पुन्हा कमी लेखलं तर मात्र पुन्हा खलनायिका व्हावं लागेल मला.’’

‘‘नको बाई ते खलनायिका प्रकरण,’’ असं म्हणत वधूच्या आईनं वरमाईला बासुंदीपुरीचा घास भरवला आणि या खलनायिकाविरहित मालिकेचा एपिसोड अगदी हास्य विनोदात संपला.

sbeena80@gmail.com