अनुराधा काळे: परदेशात असलेल्या अंकित आणि आरोहीची वृद्ध डॉक्टर आई भारतात त्यांच्या घरी एकटीच राहत होती. पक्षाघातामुळे अंथरुणालाच खिळून असलेल्या आईला सांभाळायला त्यांनी काळजीवाहकांची नेमणूक केली खरी, परंतु तो अनुभव वाईट होता. त्यांच्याकडे घरकाम करायला येणार्‍या सहृदयी भागम्माला ते पाहावलं नाही आणि तिने थेट समोरच्या घरातल्या ताईंनाच हाक मारली. ताईंनी अंकित-आरोहीच्या मदतीने कसा सोडवला हा प्रश्न? आणि कशी घडली मायेची किमया?

दुपारी बारा वाजता दारावरची बेल वाजली. पाहते तर, भागम्मा आली होती. ‘एवढ्यात कशी आली ही दुपारची भांडी घासायला… आता तर समोरच्या डॉक्टरीणबाईंकडे जाते ती. आमच्याकडे दोन वाजता येते…’ माझे विचार विरायच्या आतच भागम्मा रडायला लागली. रडत रडत म्हणाली, ‘‘ताई! डाक्टरनीसाठी आपण काहीच करू शकत नाही का?’’ ‘‘भागम्मा! शांत हो. काय झालंय सांग बरं…’’ तिच्या पाठीवर हात फिरवत मी समजावलं.

‘‘ताई! जी डाक्टरनीसाठी बया ठेवली हाय ना तिचा आज ‘बड्डे’ हाय. तिने डाक्टरनीची भारी साडी नेसली हाय. तिचा बायफिरेंड येणार हाय. पिझा-केक काय काय मागिवलं हाय… मला म्हनाली, ‘दुसरीकडं कामाला जा. तीन वाजता ये. माझा बड्डे हाय. फिरेंड येणार हाय माझा, गेट औट…’ ताई तुम्ही आरोही आणि अंकितला फोन लावा. ती पोरं लहान असल्यापासून मी डाक्टरनीचं काम करते हाये. बघवत न्हाय मला हे…’’ मी भागम्माला शांत केलं.
‘‘हे बघ भागम्मा! आरोही आणि अंकित दोघं अमेरिकेत आहेत, आणि तिथे आता रात्र आहे.

तू तुझी सगळी कामं आटोपून ये. म्हणजे तोवर तिकडे सकाळ होईल. आपण बोलुयात दोघांशी…’’ मी समजवल्यावरही नाराजीतच ती निघून गेली.
खरं तर भागम्मा अशी रडणारी नाही. कामाला वाघ. उगीचंच दांड्या मारणारी नाही. प्रामाणिक बाई. मदतीला धावून येणारी… डॉक्टरीणबाईंकडे अगदी घरच्यासारखी वावरणारी. संध्याकाळी काम आटोपून भागम्मा आली. मी आरोहीला फोन लावला. आमच्या समोरच राहणार्‍या डॉक्टरीणबाई या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ. त्यांनी केलेल्या प्रसूती, शस्त्रक्रिया, उपचार याला गणतीच नाही.

पण त्यांना पॅरेलेसिसचा हलका झटका आला. डाव्या हाता-पायाची शक्तीच गेली. लगेच उपचार झाले. पण बोलणं खोल गेलं. त्यांचे डॉक्टर पती तीन वर्षांपू्र्वी वारले होते. दोघं पतीपत्नी मदतीला धावून येणारे. गावच्या चार मुलांना वैद्यकीय शिक्षण घ्यायला पूर्ण मदत केली. ती मुलंसुद्धा जाण ठेवून असणारी. असो. तर त्यांच्या मुलीला, आरोहीला फोन लावला. भागम्माशी बोल म्हणून सांगितलं. भागम्माने आजचा सारा प्रकार तिला सांगितला. भागम्माने हेसुद्धा सांगितलं की, केअरटेकर मॅडम औषधपाणी वेळेवर देते. स्पंजिंग नीट करते.

भागम्माकडून चादरी, अभ्रे रोज बदलून घेते. पण डाक्टरनीवर, तिच्यावर आणि स्वयंपाकाच्या मायावर सारखी खेकसते. कोणी आलेलं तिला चालत नाही; पन तिचा बॉयफ्रेंड मात्र रोज येतो. खूप खाणं-फळं मागवते. वरखर्च खूप करते. सेंट, ड्रेसेस, खायचं आणि वाणी सामान सारखी विकत घेते. डाक्टरीणबाई मात्र फक्त मेतकूट भात आणि सूप जेवते. वर हेही सांगितलं, ‘‘डाक्टरनी माझा हात हातात घेते तर ही ख्येकसते.

मी हात धुनच तुज्या आईपाशी जाते. बरं वाटतं आईला… पन ही बया जावू नाय देत… मग आईच्या डोळ्यात पानी येतं…’’ भागम्मा सांगत होती, ते खरंच होतं… हा अनुभव आम्हालासुद्धा होता. आम्ही पाळीपाळीने डॉक्टरीणबाईंना भेटायला जात होतो, पण ही आम्हाला घालवून द्यायची. आरोहीने भागम्माची समजूत काढली आणि माझ्याशी बोलू लागली. डॉक्टरीणबाईच्या अगदी समोरच घर आमचं. भागम्मा आम्हा दोघींकडे कामाला येते. आरोही, अंकितही मला मावशी म्हणतात. एकंदर वेव्ह लेन्थ छान जमलेली.

आरोही म्हणाली, ‘‘मावशी काय करावं कळत नाही. ब्युरोला फोन केला तर बाई बदलून मिळेलही; पण तीसुद्धा कशी असेल कसं सांगणार?’’
‘‘हो! आरोही, खरंच ही मोठीच समस्या झाली आहे. तुमच्या नात्यात कोणी आहे का जे येऊन राहील आईसोबत. त्या बाईवर वचक राहील थोडासा…’’
‘‘मावशी! आमची पुढची पिढीतले जवळजवळ सगळेच परदेशात आहेत. काही ज्येष्ठ मंडळी इकडे परदेशात, कोणी ज्येष्ठ नागरिकांसाठी खास असलेल्या घरात तर कोणाच्या आरोग्याच्या तक्रारी.’’आरोही सांगत होती.

मी तिला सुचवलं, ‘‘आरोही! अलीकडे चांगले वृद्धाश्रम आहेत. पैसे व्यवस्थित घेतात, काही बघावं लागत नाही.’’ आरोही म्हणाली, ‘‘मावशी! बाबा असताना यावर आमचं बोलणं झालं होतं. दोघांचंही ठाम मत असं की, आपलं घर प्रशस्त आहे. सगळ्या सोयी आहेत. बाबांचे चारही डॉक्टर विद्यार्थी केव्हाही धावून येणारे. तेव्हा घरीच मदतनीस ठेवायचे आणि उपचारासाठी वेळप्रसंगी रुग्णालयात दाखल करायला मागेपुढे जराही बघायचं नाही. म्हणून या केअरटेकरला ठेवलं.

मावशी, एक-दोन दिवसात डॉ. विनायक तुला भेटायला येईल. आमचं सर्वांचं बोलणं चालू आहे. मी जरा सवड काढून येते, मग ठरवू आपण.’’
मी विचारात पडले की, डॉ. विनायक म्हणजे डॉक्टरांचे एक विद्यार्थी, ते मला का भेटायला येणार आहेत? तो विचार बाजूला ठेवून शेवटी आम्ही सोसायटीतल्या मैत्रिणींनी ठरवलं की, त्या केअरटेकर बाईंना आवडो न आवडो आपण रोज डॉक्टरीणबाईंना पाळीपाळीने भेटायला जायचंच. थोडा बेरडपणा करायचा. दुसर्‍या दिवशी सकाळीच दारावरची बेल वाजली.

पाहते तर दारात डॉक्टरीणबाईंचे विद्यार्थी डॉ. विनायक! थोडा वेळ गप्पा झाल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘‘मी तुम्हाला एक विनंती करायला आलो आहे. आमचं चारही डॉक्टर मित्रांचं बोलणं झालं आहे. डॉक्टर मॅडमना औषध चालू आहेतच; पण त्याचबरोबर त्यांना मानसिक आधाराची खूपच गरज आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर राहायला येऊ शकता का?’’ त्यांची ही विनंती अगदी अनपेक्षित होती. पण मी लगेच विचार केला, की काय हरकत आहे? ‘‘पण आरोही-अंकितसोबतसुद्धा बोलायला हवं ना?’’ मी म्हटलं.

‘‘आम्ही गेल्या काही दिवसांपासून या विषयावर विचार करत आहोत. आरोही, अंकितलासुद्धा असंच वाटतंय, पण ते संकोचतायत. मग मी पुढाकार घेऊन विचारावं तुम्हाला असं ठरलं आमचं… आणि आम्ही दुसरी केअरटेकर मावशी ओळखीतली बघतो आहोत. कारण तुम्हालासुद्धा सध्याच्या केअरटेकर मॅडमकडून त्रास व्हायला नको. आरोहीसुद्धा तुम्हाला फोन करणार आहेच. तुम्ही हो म्हणालात. तुमचे कसे आभार मानू?’’ डॉक्टरांनी विचारलं.

‘‘तुम्ही मला हक्काचं समजून विचारलं, मग आता आभार वगैरे नाही.’’ मी म्हटलं. आम्ही कॉफी घेतली. डॉक्टर निघाले. ‘‘आरोही-अंकितने मला व्हिडीओ कॉल केला. ‘‘मावशी! आज खरंच तू आमची मावशी झालीस. भागम्माला हाताशी घेऊन डॉक्टर तुझी चांगली व्यवस्था करतीलच. दुसरी केअरटेकरसुद्धा शोधत आहेत.’’ तीन-चार दिवसांनी माझा नवीन दिनक्रम सुरू झाला. डॉक्टरीणबाईंचं घर ४ खोल्यांचं प्रशस्त. त्यांच्या खोलीत माझ्यासाठी दिवसभरात बसण्यासाठी-झोपण्यासाठी छान सोफा-कम-बेड लावला.

रात्री मात्र दुसर्‍या खोलीत. माझीसुद्धा झोप नीट व्हायला हवी म्हणून… दुसर्‍याच दिवशी केअरटेकर ‘मॅडम’ जाऊन नवीन केअरटेकर ‘मावशी’ आल्या एकदम तत्पर. मनापासून काम करणार्‍या.. मी, माया, भागम्मा, डॉक्टरीणबाईं सगळ्यांसोबत त्या छान रुळल्या. मी सकाळी समोरच माझ्या घरी जाऊन अंघोळ, देवपूजा, वॉशिंग मशीन लावून यायची. मग मुक्काम इकडेच. माया नाश्ता डॉक्टरीणबाईंच्या आवडीनुसार करायची. जेवणसुद्धा त्यांच्या-माझ्या आवडीचं… भागम्मा आमच्या घरी जाऊन रोजची सर्व कामं करायची. त्यामुळे माझं घरसुद्धा स्वच्छ राहायचं.

डॉक्टरीणबाईंमध्ये हळूहळू, पण निश्चितपणे बदल होत होता. मावशी आयुर्वेदिक तेलाने हलके हलके छान मालीश करायच्या. खाणं-पिणंसुद्धा आनंदानं व्हायला लागलं. संध्याकाळी पाच वाजता आमच्या नेहमीच्या मैत्रिणी यायला लागल्या. डॉक्टरीणबाई अगदी वाट बघायच्या. दोघीजणी गाणं छान म्हणायच्या. तास दीड तास कसा जायचा, समजायचं नाही. डॉक्टरीणबाईंचं बोलणंही आता स्पष्ट व्हायला लागलं. सकाळी दुपारी सोयीने एकतरी डॉक्टर येणारच… हळूहळू त्यांना उठायला मदत करून फेरी मारण्यापर्यंत सुधारणा होत होती.

संध्याकाळी देवासमोर दिवा लावून आम्ही शुभंकरोती, रामरक्षा, गणपती स्तोत्र असं सुरू केलं होतंच. भागम्मा तर इतकी खूश झाली की, एके दिवशी खडीसाखर देवापुढे ठेवली आणि म्हणाली, ‘‘पेढे नको. बाधायला कारण. खडीसाखर बेस्ट.’’ डॉक्टरीणबाईंनी मला पुस्तकाचं कपाट उघडून दोन-तीन पुस्तकांची नावं सांगितली. ‘‘वाचून दाखवशील का?’’ विचारलं. मलाही वाचनाची आवड. ‘स्मृतिचित्रे’ पहिलंच पुस्तक मी काढलं. संध्याकाळी आमच्या गाणार्‍या मैत्रिणींनी ठरवलं की, सोमवारी शंकराची गीतं, मंगळवारी देवीची भजनं, गुरुवारी दत्ताची गीतं.

इतर वारी डॉक्टरीणबाईंच्या आवडीची गाणी… अशा रीतीने चार महिने केव्हांच उलटले. चारही डॉक्टर विद्यार्थी उत्साहानं काही काही सुचवत. एकदा आरोहीचा फोन आला, की अंकित आणि ती एक महिना सुट्टी घेऊन येत आहेत. म्हणाली, ‘‘आईचा वाढदिवस आहे. छान बेत करू या.’’
आता त्या वॉकर घेऊन घरातल्या घरात चालू शकत होत्या. त्यांचे स्वत:चे प्रयत्न, प्रतिसाद खूप सकारात्मक होता. आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितले, ‘‘तुमच्या आवडीचं एक एक पुस्तक सांगा. आरोही ऑनलाइन मागवणार आहे.’’ अंकित-आरोही आले.

जवळचाच एक छोटा हॉल घेतला होता. भोजनाचा छान बेत केला होता. आम्ही मैत्रिणी आणि त्यांची कुटुंब, चारही डॉक्टर ते माया, भागम्मापासून, आणखी मोजके नातेवाईक मित्रमंडळी…आरोहीने सगळ्यांसाठीच ड्रायफ्रुट्सचे पुडे आणले होते. आमच्या ग्रुपला, भागम्मा, मायाला सारख्या साड्या घेतल्या आणि डॉक्टरीणबाईंनासुद्धा तशीच साडी नेसवली होती. डॉक्टर विनायक बोलायला उभा राहिला. आरोही-अंकितने मला व्यासपीठावर नेलं. डॉक्टर विनायक म्हणाला, ‘‘मावशी मी तुझे विशेष आणि तुमच्या मैत्रिणींचे आभार कसे आणि किती मानू कळत नाही.

आज आरोग्य विज्ञान खूप म्हणजे खूपच पुढे गेलं आहे; पण डॉक्टर सर आम्हाला नेहमी सांगत असत की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वैद्यकीय उपचारांच्या जागी वैद्यकीय उपचारच, पैशांच्या जागी पैसेच, वेळेच्या जागी वेळच आणि माणसाच्या मायेच्या जागी मायाच लागते. आज तू आणि तुझ्या मैत्रिणी, माया ताई, भागम्माताई, नवीन मावशी या सर्वांच्या प्रेमळपणाने मॅडम त्यांच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.’’

डॉक्टर विनायकने माझा हात हातात घेतला आणि मनगटावर छान घड्याळ बांधलं. अनेक गोष्टी त्या नव्या तंत्रज्ञानाच्या घड्याळात दडल्या होत्या. डॉक्टरीणबाईं तर मला बिलगल्याच… आम्ही फोटो काढले. मोगर्‍याच्या गजर्‍यांचा दरवळ सोबत घेऊन डॉक्टरीणबाई, आरोही, अंकित, डॉक्टर्स सहकुटुंब, आम्ही सोसायटीतल्या मावशी, माया आणि मुख्य म्हणजे भागम्मा आनंदाचे डोही आनंदून घरी परतलो.

दोन-चार दिवसांनी मीसुद्धा ‘बॅक टु पॅव्हेलियन’… म्हणजे आमच्या समोरच्या घरात परतले. संध्याकाळचा आमचा गप्पा गाणी गोष्टी उपक्रम चालूच होता.दारावरची बेल वाजली. पाहते तर भागम्मा होती. डोळ्यात, आनंदाश्रू!! ‘‘ताई…’’ ही हाक तिने ज्या प्रेमानं घातली त्यातच सगळं आलं…