कधी कधी मनात विचारांचं इतकं काहूर माजतं की, ते शब्दांत पकडल्याशिवाय मनाला उभारीच मिळत नाही. अशा वेळी मग आपसूकच ‘मनातलं कागदावर’ उतरत जातं; केवळ अक्षर म्हणून नव्हे, तर अनुभवाच्या जिवंत खुणा बनून, असाच एक मनाला भावलेला तरल अनुभव…
माणूस आणि निसर्ग यांचं नातं हे केवळ देण्या-घेण्यापुरतं मर्यादित नसतं, तर ते परस्पर संवादाचंही असतं. ग्रीष्म ऋतूची चाहूल लागली असतानाही माझ्या गच्चीतल्या छोट्याशा बागेत दोन छोटे हिरवेगार सवंगडी मोठ्या गुण्यागोविंदाने नांदत होते. एक सदाफुली आणि दुसरा मोगरा. त्यांची मुळं खोल रुजू लागली होती. माझं रोजचं जगणं मोगर्यामुळे सुगंधी झालं होतं.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि अचानक सगळ्यांचा सहलीला जाण्याचा बेत ठरला. मनाचा एक कोपरा या दोन सवंगड्यांभोवती रेंगाळू लागला. आत्ता कुठे ती रोपं बाळसं धरू लागली होती. त्यांच्या कळ्यांमधून सुवासाचे पुंजके उमलू लागले होते.
‘‘यांना आता पाणी कोण घालणार?’’ माझ्या या काळजीवर फुंकर घालायला आमच्या इमारतीतील एक मुलगी धावून आली.
‘‘तुम्ही जा बिनधास्त, मी घालीन झाडांना पाणी. मला आवडतं.’’तिने सांगितलं आणि आता माझ्या सवंगड्यांना रोज पाणी मिळणार या कल्पनेने मी निर्धास्त झाले. पण… अवघ्या दोन दिवसांत त्या मुलीलाही तातडीने बाहेरगावी जावं लागलं आणि माझ्या गच्चीतल्या त्या कोमल जिवांचा आधारच निखळला. सहल रद्द करणं शक्य नव्हतं. काही दिवसांनी मी घरी परतले. काहीशा काळजीने मी गच्चीचा दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून काळजात चर्रर्र झालं. दोन्ही झाडं कोरडी ठाक… चैतन्याने सळसळणारे ते हिरवे सवंगडी निष्पर्ण झाले होते. त्यांच्या कळ्या काळ्या ठिक्कर पडून मातीत मिसळल्या होत्या. त्या निष्प्राण झाडांकडे बघून मला रडू आवरलं नाही. जणू माझ्या हातून मोठा गुन्हा घडला असावा, या टोचणीने माझं मन मला खाऊ लागलं. मी त्या झाडांना कुरवाळलं. त्यांची माफी मागितली. आशेचा एखादा धागा सापडतो का, हे पाहण्यासाठी सदाफुलीला स्पर्श केला, पण तिच्या फांद्यांच्या काड्या उरल्या होत्या. कडकड मोडल्या त्या. मनातली उमेद खचत असतानाच मोगर्याकडे वळले. त्याच्या फांद्याही शुष्क होत्या, पण मुळापाशी नखाने किंचित खरवडलं तेव्हा तिथे ‘जिवंत’ वाटणारा हिरवट-करडा रंग दिसला. त्या भीषण कोरडेपणातही आशेची एक झुळूक स्पर्शून गेली. मी हाताच्या ओंजळीत पाणी घेतलं, त्या दोन्ही झाडांवर अभिषेक केल्यासारखं सिंचन केलं आणि भरल्या डोळ्यांनी त्यांनी पुन्हा मोहरून यावं म्हणू आर्त साद घातली. प्रार्थना केली.
त्यानंतरचे दहा बारा दिवस काहीच घडलं नाही. मी अस्वस्थ. सकाळ-संध्याकाळ गच्चीत जायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांचा रुसवा काढायचे, त्यांच्या कोरड्या देहावरून हात फिरवायचे. निसर्गाशी संवाद साधण्याचा तो माझा ध्यास होता. अखेर काही दिवसांनी चमत्कार घडला! मोगर्याच्या त्या वाळलेल्या फांदीवर एक इवलासा, नाजूक आणि मऊशार हिरवा कोंब डोकावला. इतका आनंद झाला ते पाहून की मी अक्षरश: लहान मुलीसारखी त्या झाडासमोर नाचू लागले. मग काय विचारता! पुढचे चार-पाच महिने मी आणि मोगरा आमची गट्टी अधिकच गहिरी होत गेली…
मोगरा पुन्हा बहरला. त्याचा शुभ्र पेहराव आणि फुलांचा मोहक सुगंध पुनश्च मन प्रफुल्लित करू लागला. पण त्याच वेळी शेजारची सदाफुली मात्र कायमची निजून गेली, हा सल मनाला बोचत होता. जड अंत:करणाने मी सदाफुलीच्या वाळलेल्या काड्या गोळा करू लागले, तेव्हा मनात विचारांचं चक्र सुरू झालं.
आपल्या आयुष्यातली काही नाती ही अशीच असतात का? काही नात्यांची सदाफुली ही कधीकधी क्लिष्ट गैरसमजांमुळे कोमेजून जाते आणि त्याच नात्यातला मोगरा साध्याशा समंजसपणामुळे फुलूनही येतो. काय गंमत आहे ना, म्हणूनच संवादाला महत्त्व आहे. पण भावनेच्या वावटळीत वाद सुरू होतात आणि संवाद थांबतात. कदाचित आपापल्या जागी सगळे बरोबरच असतात. वास्तव पटत असूनही, मैत्रीतले किंवा नात्यातले मतभेद केवळ विसंवादामुळे इतक्या टोकाला जातात की, ते त्या नात्याच्या मुळाशी असलेला स्नेह आणि प्रेमाचा ओलावाच शोषून घेतात.
साद तर मी माझ्या दोन्ही हिरव्या सवंगड्यांना सारखीच घातली होती. मग मोगरा मोहरला, पण सदाफुलीपर्यंत ती का पोचली नसावी? याचं उत्तर निसर्गानेच माझ्यासमोर मांडलं होतं. माझी सदाफुली, नावाने जरी ‘सदाफुली’ असली, तरी तिची मुळं कोरडेपणानं पोखरून निघाली होती. याउलट माझा मोगरा… तो वरून पूर्णपणे सुकून गेला होता, पण त्याने आपल्या मुळाशी असलेली नात्याची ओल मात्र जिवंत ठेवली होती. माझ्या प्रेमाची ओल आणि त्याच्या मुळातली धुमसती जीवनेच्छा जेव्हा एका बिंदूवर भेटले, तेव्हा तो मोगरा पुन्हा बहरून आला, टवटवीत झाला.
मोगरा-सदाफुलीच्या त्या जोडीने मला केवळ निसर्गाचा नियमच शिकवला नव्हता, तर मानवी नात्यांमधल्या ओलाव्याची एक नवी, नाजूक, दाहक तरीही आश्वासक अशी व्याख्याही समजावून दिली होती…
आज हा प्रसंग आठवला आणि वाटलं, मानवी नाती आणि त्या नात्यातली मैत्री हिरव्या निसर्गातून उमलून आली तरच ती हिरवी राहतील. कुणीही व्यक्ती भावनेच्या भरात, परिस्थितीमुळे गैरसमजुतीतून किंवा अनवधानाने चुकीचं बोलूच शकतं आणि चुकीचं वागूही शकतं. कधीकधी व्यक्ती-व्यक्तींमध्ये मतभेद टोकालाही जातात. पण ज्या नात्यांच्या मुळाशी असलेला ‘संवादाचा ओलावा’ पूर्णपणे आटून जातो, तिथे प्रेमाचं कितीही पाणी शिंपलं तरी ती नाती पुन्हा जिवंत होत नाहीत. विसंवादाचा, अहंकाराचा किंवा अविश्वासाचा कोरडेपणा एकदा का नात्याच्या मुळापर्यंत पोहोचला की संवादाच्या वाटा बंद होतात. मग मार्ग निघणार कसा? याउलट ज्या नात्याच्या मुळाशी मैत्रीची आणि विश्वासाची ‘ओल’ शिल्लक असते, ती नाती मात्र प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतात. तिथे थोडा काळ मनस्ताप सोसावा लागला, झुकून माफी मागावी लागली किंवा शब्दांनी कुरवाळावं लागलं, तरी ती नाती पुन्हा पालवी धरतात. खरं तर कोणतंच नातं सहजासहजी तुटत नसतं, पण मनात घर करून बसलेले टोकदार गैरसमज ते नातं कापून काढत असतात. अशा वेळी गरजेचं असतं ते म्हणजे रागाच्या भरात टोकाचा निर्णय न घेता, काळ पुढे जाऊ देणं. कारण ती नाती सुकलेली असली तरी आतलं चैतन्य आटलेलं असतंच असं नाही. ती नाती माझ्या मोगर्यासारखी असतात. कितीही वाद झाले, कितीही मतभेद झाले तरी मुळाशी असलेला मैत्रीचा ओलावा घट्ट पकडून ठेवणारी…
आता माझी सदाफुली रुसून निघून गेली, ही खंत मनाला फारशी बोचत नाही कारण मोगर्याचा सुगंध अंत:करणात अनंत काळापर्यंत दरवळत राहील ही खात्री आहे. शेवटी मोगरा काय किंवा माणूस काय, जिवंतपणा हा वरवरच्या फांद्यांमध्ये थोडाच असतो? तो असतो, मुळाशी जपलेल्या ओलाव्यात… हा ओलावा जपणं आणि टिकवणं, हेच खर्या अर्थाने ‘माणूस’ म्हणून जगणं…
trupti. chaware@gmail.com
