श्रेया बापट
‘‘एक होकार दे
फार काही नको,
फार काही नको
फक्त नाही नको!’’

या ओळी वाचून वैभव जोशींच्या कवितांचं पुस्तक वेदानं बंद करून पर्समध्ये ठेवलं. डोळे मिटून पाठी सीटवर डोकं टेकवून ती शांत बसली. विमानाच्या लँडिंगला फक्त अर्धा तास राहिला होता. तिची घालमेल वाढत चालली होती. किती उत्कट लिहितो ना गं हा, अप्पू? कसं काय सुचतं याला?’’ अप्पूबरोबर वाचलेली ही कविता आताही वेदाला साथसोबत करत होती. खरं तर प्रियकराने प्रेयसीला म्हटलेली ही कविता, पण आज वेदाच्या मनात प्रार्थनेसारखी घोळत होती. ‘‘या पहिल्या दोन ओळी फक्त प्रियकर प्रेयसीच नाही तर इतर अनेक बाबतींत लागू होतील नाही गं अप्पू?’’ परत परत अप्पू तिच्या डोळ्यासमोर येत होती. कविता बहुआयामी असते. प्रत्येकजण त्यातून आपला अर्थ शोधत असतो. अप्पू तिला कायम सांगे. विचारांच्या गर्दीत विमान कधी पोहोचलं तिचं तिलाच कळलं नाही. उतरल्यानंतरचे सगळे सोपस्कार यांत्रिकपणे पार पाडून वेदा थेट टॅक्सीच्या काउंटरवर जाणार एवढ्यात तिला तिची वाट पाहात असलेले नाना-नानी दिसले.

‘‘नाना, कमाल आहे तुमची! एवढ्या पहाटे धडपडत एअरपोर्टवर यायची काही गरज होती का? वय आहे का तुमचं आता धावपळ करायचं?’’ ‘‘धावपळ मेली पाचवीला पुजलीय नानांच्या. ते कधी स्वस्थ बसलेत? आणि आज तर मी काही बोलूही शकले नाही. दुधावरची साय ना तू! तीही त्यांच्या लाडक्या अप्पूची! मग बोलणंच खुंटलं.’’

‘‘आजी नाती झाल्या का एक! अगं, आशीषने गाडी आणि ड्राइव्हर दिला मग तुझा हा ऐंशी वर्षांचा नाना वयाचं कारण कसं काय पुढे करेल?’’

वेदा आनंदाने गाडीत बसली. बोलता बोलता नानीचं घर कधी आलं कळलंच नाही. ‘‘नानी, माझ्या नावाचं काही पत्र आलंय का गं?’’ वेदाची घालमेल नाना-नानीला स्पष्ट कळत होती. कसं समाजवावं या पोरीला? ‘‘तुझ्या अप्पूला पोचल्याचं कळवलंस का गं?’’ नाना विषय बदलत म्हणाले.

अप्पू अर्थात अपूर्वा कधीची वेदाच्या मेसेजची वाट बघत होती. परदेशातून एवढ्या लांबचा प्रवास…आणि त्यात वेदाची ही मन:स्थिती…रात्र होत आली होती आणि वेदाचा अजूनही काही मेसेज नव्हता, अपूर्वा अस्वस्थ होती.

‘‘बाबा, मी नीट पोचले. अप्पूला मेसेज जात नाहीये. तिला सांगशील प्लीज?’’ ‘‘ घ्या, तुमच्या कन्यका पोचल्या मुंबईला हो. तुला ती अप्पू म्हणते ना हे मला अजिबात पटत नाही. आईला आई म्हणण्यात काय प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही मायलेकी ना….!’’

‘‘जाऊ दे रे रवी! मला उलट आवडतं तिनं अप्पू म्हटलेलं. त्याने माझा अपमान होतो असं मला अजिबात वाटत नाही. अरे आपण केलेले संस्कार स्मरून त्याप्रमाणे वागणं म्हणजे आपल्या आईवडिलांचा मान राखणं, नाही का रे? ती सुखरूप पोचली, हे महत्त्वाचं.’’

‘‘एक तर तू तिला एकटीला जाऊ दिलंस हेच मला पटलेलं नाही. फार स्वातंत्र्य दिलंयस तू तिला पहिल्यापासूनच. आता काय करतेय कोण जाणे?’’ रवीचा सा्त्विवक संताप अपूर्वाला कळत का नव्हता! पण त्याची तिला तीस वर्षांत सवय झाली होती.

‘‘ नानी मी जाऊन येते गं. नीलिमा ताईंना भेटून येते.’’ वेदा नानीला म्हणाली.

‘‘अगं जरा जेट लॅग तरी जाऊ दे तुझा, मग जाऊ. एवढी काय घाई आहे?’’

‘‘नाही नानी, मला आत्ता गेलंच पाहिजे. तुला कारण माहितेय.’’ ‘‘म्हणूनच जीव टांगणीला लागलाय. तिथे अपूर्वा आणि रवीची काय अवस्था असेल कोण जाणे?’’ नानी स्वत:शीच पुटपुटली. ‘‘आम्ही पण येतोय. आशीषला कल्पना होतीच. गाडी आणि ड्रायव्हर आज पूर्ण दिवस आपल्या- साठीच आहे.’’, नाना म्हणाले.

अशा नाजूक क्षणी वेदाला एकटं सोडणं त्यांना बरोबर वाटत नव्हतं. ही बया डोक्यात राख घालून कुठे गेली तर अप्पूला काय तोंड दाखवू? शेवटी हो नाही करत तिघेही गाडीत बसले. ‘नंदनवन बालकाश्रम’जवळ गाडी थांबताच वेदा जवळजवळ पळत सुटली. कमानीखालून थेट नीलिमाताईंच्या ऑफिसमध्ये. ‘‘ताई काही कळलं?’’ धापा टाकतंच तिनं विचारलं. ‘‘अगं वेदा, एवढी उतावीळ होऊ नकोस गं. बस जरा, पाणी पी. कधी आलीस लंडनहून? आईबाबा कसे आहेत?’’ अपूर्वाने एवढी वर्षं झाली तरी ‘नंदनवन’शी जाणीवपूर्वक संपर्क ठेवला होता. आज ना उद्या हा दिवस येणार आणि नीलिमाताईंची मदत आपल्याला लागणार याची तिला पूर्ण कल्पना होती. तसं वेदाला त्यांनी हळूहळू समजावलं होतं… खूप लहानपणापासूनच. आणि तिने तिच्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य खूप समजूतदारपणे स्वीकारलंही होतं. पण गेले सहा महिने तिच्या मनात काय चाललं होतं कोण जाणे. तिने तिच्या जन्मदात्रीला भेटायचा ध्यास घेतला होता. कायद्याने वेदाला हे करण्यापासून कोणीही अडवू शकत नव्हतं. त्यामुळेच वेदा काल मुंबईला निघाली होती. अपूर्वाने तिच्याबरोबर न जाण्याचा निर्णयही खूप विचार करून घेतला होता. वेदाचा निर्णय तिचा स्वत:चा असावा असं तिला मनापासून वाटत होतं. आपण तिला योग्य-अयोग्य, बर्‍या-वाईटाची जाण दिलेय तेवढं पुरेसं आहे. वीस वर्षांची आहे ती. तिचे निर्णय आता तिनेच घ्यायला हवेत.

‘‘मी आजच पहाटे आले. ताई, ती काय म्हणाली, सांगा ना? भेटणार आहे ना ती मला? तिचा होकार आहे ना?’’ वेदा अगदी घायकुतीला आली होती. अशा अनेक वेदा नीलिमाताईंनी आत्तापर्यंत बघितल्या होत्या. वेदाच्या उतावीळपणाचं त्यांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही.

‘‘वेदा, तिने नकार कळवलाय.’’ त्या तटस्थपणे म्हणाल्या. वेदाचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. ती एकदम स्तब्ध झाली. काही न बोलताच तिथून निघाली. डबडबलेल्या डोळ्यांनी गाडीत येऊन बसली. बाहेर नाना-नानीचा जीव टांगणीला लागला होता. गाडी घराच्या दिशेने जाऊ लागली.

‘‘नानी, माझ्या आयुष्याची सुरुवातच नकाराने झाली गं? जन्मल्या जन्मल्याच मला कोणीतरी नाकारलं. आताही तिने मला भेटायला नकार दिला. एवढी वाईट आहे का गं मी?’’

सगळा धीर एकवटून नानी म्हणाली, ‘‘परिस्थितीमुळे तुला जन्मदात्रीने नाकारलं. आणि निसर्गाने रवी आणि अपूर्वाचा जन्मदाते व्हायचा अधिकार नाकारला, पण कायम लक्षात ठेव वेदू, two negatives make a positive! हे तू, रवी आणि अप्पूने किती छान सिद्ध केलंय. नकाराच्या दोन सुयांवर तुमच्या नात्याची वीण किती घट्ट विणली गेलीय. किती मिसळून गेलायत अगं तुम्ही तिघे एकमेकांत. जन्मदाते आपल्याला काय देतात? बाह्यरूप? अप्पू आणि रवीने तुला काय काय दिलंय? अशा बर्‍याच गोष्टी ज्या चिरंतन तुझ्याबरोबर असणारेत. ज्या तुझ्या बाह्यरूपापेक्षा तुझ्या भावी आयुष्यात खूप महत्त्वाच्या ठरणारेत. तुझ्यासारख्या समजूतदार मुलीला मी हे सांगायची गरज नाही, नाही का?’’ नानी एवढं बोलून थांबली. नानांच्या हळव्या स्वभावाला अनुसरून त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

नीलिमाताईंच्या डेस्कवरचा फोन खणखणला. पलीकडून ‘ती’ बोलत होती. ‘‘येऊन गेली का हो ती?’’

‘‘हो, धक्का बसला तिला तुम्ही भेटायला नकार दिल्याचं ऐकून.’’ ‘‘कल्पना आहे मला. पण मला काय अधिकार आहे तिला भेटण्याचा? जन्मत:च जिला मी नाकारली, तिचं आता नीट घडी बसलेलं आयुष्य बिघडू नये यासाठी हा नकारही तितकाच महत्त्वाचा होता! हो ना?’’ आणि फोन डिस्कनेक्ट झाला.

bapat.shreya@yahoo.co.in