अश्विनी परांजपे – रानडे
झोपडपट्टीतच वाढलेल्या तिला सुख असं मिळालंच नव्हतं. ना कपड्यालत्त्याचं, ना चांगल्या खाण्याचं. लग्न झाल्यानंतर तर त्यात भर पडली ती नवर्याच्या माराची. कशाला जगायचं, म्हणून आत्महत्या करायला गेली खरी पण… तिला जगण्याची उमेद कायम ठेवणारी एक गोष्ट सापडली…तिनं डोळे उघडले तसं तिच्या डोळ्यापुढे एकदम अंधारीच आली. पिंजारलेले केस सावरत ती उठली. कोपर्यात ठेवलेल्या माठातील थोडं पाणी प्यायली तसं तिला जरा बरं वाटलं. तिनं थोडं पाणी तोंडावर मारलं. त्या गार पाण्याने तिला जरा भानावर आणलं.
तसंही हे आता रोजचंच झालं होतं. नवरा अट्टल दारुड्या होता. फुटकळ पैसे कमवायचा आणि दारूत उडवायचा. दारूच्या नशेत हिला बडव बडव बडवायचा. हीच चार ठिकाणी मोलमजुरीची कामं करून गुजराण करायची. घर चालवण्यासाठी तिलाच हातपाय मारावे लागत. त्यातच काही वेळा तर तिची कमाई नवरा हडप करत असे, वर मारही देत असे. मार खाऊन ती कोपर्यात पडून राही. अशा वेळी पोटात अन्नाचा एक कणही जात नसे.
तिला तो दिवस लख्ख आठवला. असाच नवर्याचा मार खाऊन ती हताश झाली होती. संपूर्ण दिवसच तो हात धुऊन तिच्या मागे लागला होता. दिवसभर ती वस्तीपासून दूर तोंड लपवून बसली होती. संध्याकाळी ती घरी आली तर तोच तमाशा. तिची जेवायची इच्छाच मेली होती. ती झोपडीबाहेर पडली. चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. गार वारा अंगाला झोंबत होता. कोपर्यावरच्या वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर ती टेकली. दोरे गुंडाळलेल्या वडाच्या झाडाकडे तिचं सहज लक्ष गेलं तसं तिच्या लक्षात आलं, अरे खरंच की, आज वटपौर्णिमा! सगळ्या बायका हाच नवरा जन्मोजन्मी मिळो म्हणून उपवास करत. तिच्या वस्तीतल्या बायकाही पूजा करत, उपवास धरत.
इतकी वर्षं हीसुद्धा भक्तिभावाने या सगळ्या पूजाअर्चा करत असे. त्या क्षणी मात्र तिच्या मनात आलं, बरं झालं लक्षात आलं ते नाही तर फुकट उपवास घडला असता. ती तिच्या तोडक्या- मोडक्या छपराच्या झोपडीकडे घाईनं पळाली. टोपातला उरलासुरला भाकर तुकडा तोंडात टाकला. गटागटा पाणी प्यायली. उपवास घडलाच नाही. असला नवरा तिला पुढच्या एकाही जन्मी नकोच होता. याच जन्माचा अगदी उबग आला होता तिला. खरं तर वस्तीतल्या सगळ्याच बायकांची अशीच परिस्थिती होती. आजूबाजूची वस्तीसुद्धा तसलीच. प्रत्येक बाई पिचलेली होती, तिचा मोडका संसार रेटताना…
आजही त्याच्या त्रासाला कंटाळून ती पार तुटली होती आतून. तिनं अगतिकतेनं बाजूला पिऊन पडलेल्या नवर्याकडे पाहिलं. मघाशी सैतान झालेला नवरा आता लहान बाळासारखा गाढ झोपी गेला होता. एकाच वेळी दया, चीड, प्रेम, संताप अशा सगळ्या भावना दाटून आल्या. असलं आयुष्य काय कामाचं? दोन-चार वेळा स्वत:ला संपवायचाही प्रयत्न केला, पण कोण जाणे तिची हिंमतच झाली नाही.
ती कोण? कुठली? कुणास ठाऊक? तिला आठवतं तेव्हापासून ती याच वस्तीत वाढली. याच वस्तीतली बयो आजी… तिनंच हिला वाढवलं. बयो आजी मंदिराबाहेर बसून चप्पल सांभाळत दोन-पाच पैसे कमवत असे. ती एकटीच होती. तिचं कोणीच नव्हतं. त्या दिवशी ही तिला मंदिराच्या पायर्यांवर रडताना सापडली.आजी म्हणायची, ‘‘इतक्या ग्वाड लेकराला दूर लोटता येईना. मंदिरातल्या देवानच ह्यो परसाद माझ्या फाटक्या झोळीत घातला बघ. त्या दिसापास्नं मी तुझा हात काही सोडला नाही.’’ ती तेव्हा खूपच लहान होती. तिला यातलं काहीच आठवत नसे. तिच्यासाठी बयो आजीच सर्वस्व होती. आजीचा सुद्धा तिच्यावर जीव होता. बयो आजीनं जसं जमेल तसं तिला वाढवलं. तिला खाऊ घातल्याशिवाय आजीच्या घशाखाली घास उतरत नसे. वस्तीमध्ये काही वाईट लोकही होते. ही वयात आली तसं त्या वाईट नजरांपासून सांभाळणं आजीला अवघड वाटू लागलं. आजीही आता थकली होती. शेवटी तिथल्याच वस्तीतील एक बरा मुलगा पाहून तिचा संसार थाटून दिला.
नवरा आधी बरा होता. मोलमजुरी करून पैसे आणत असे. पण त्याला वाईट संगत लागली आणि तो दारूच्या आहारी गेला. मग कसला संसार? फाटक्या चिंध्यांचं जिणं उरलं नशिबी. हिचं लग्न झालं आणि पुढच्या दोन वर्षात बयो आजी गेली. तिचा आधारच हरपला. ती पुरती कोलमडून पडली. तसं पाहिलं तर या लग्नानं तिला कोणतंच सुख दिलं नाही, पण तिचं बाईपण तेवढं जपलं. गळ्यातल्या चार काळ्या मण्यांच्या डोरल्यानं तिला वाईट नजरांपासून वाचवलं. खरं तर नवर्यानं बाकी काही नाही, पण तिला मातृत्वाचं सुख देऊ केलं होतं, पण तिनंच ते झिडकारलं. बाळाची चाहूल लागली तेव्हा आधी तिला खूप आनंद झाला खरा, पण सिग्नलवर हात पसरून उभा असलेला एक मुलगा तिच्या डोळ्यांपुढे आला. अगतिक भावनेनं तिनं पोटावरून हात फिरवला आणि मनाशी पक्क केलं… अजून एक गटारात वळवळणारा किडा तिला जन्माला घालायचाच नव्हता. गावात एक वैदू बाबा होता. तो त्याच्या गावठी उपायांनी गर्भ पाडण्यात मदत करत असे. तिरीमिरीत उठून ती त्या वैदू बाबाकडे गेली. त्याच्याकडच्या जालीम जडीबुटीनं तिचं काम सोपं केलं होतं. ती पार गळाठून गेली. इवल्या लेकराचा जीव घोटताना तिच्या मनानं आकांत मांडला. ती रडरड रडली, पण मनाला समजावत मोठ्या हिमतीने पुन्हा उभी राहिली. सगळं सोसलं, पण नवर्याला कानोकान खबरही लागू दिली नाही.
आताही आठवताना तिचा हात आपसूक पोटावर फिरला. डोळ्यात दाटलेलं पाणी गालावर ओघळलं. तिनं बळंच ते पुसलं आणि बाहेर आली. बाहेर कडाक्याची थंडी होती. नवर्याचा मार खाऊन झालेल्या जखमा त्या थंडगार वार्यानं अधिकच झोंबल्या. अंगावरचा फाटका पदर तिनं घट्ट ओढला आणि चालू लागली. काही अंतरावर गेल्यावर तिला कुठून तरी आवाज येतो आहे, असं जाणवलं. तिनं नीट कान देऊन ऐकलं तर तो बाळाचा आवाज वाटला. आपसूक आवाजाच्या रोखानं तिची पावलं पडू लागली. तिनं पाहिलं तर समोर एक कचराकुंडी होती. त्या सगळ्या कचर्यात तिनं नीट पाहिलं तर काही तरी हलताना दिसलं. ती लगबगीनं जवळ गेली तसं एका फडक्यात गुंडाळलेलं एक तान्हं बाळ रडत होतं. तिला राहवलं नाही. तिनं उचलून त्याला आपल्या पदरात धरलं. त्याला थंडी सहन होत नसणार. तिनं तसंच त्याला उराशी कवटाळलं आणि ती तडक झोपडीकडे निघाली. मघाशी जड वाटणारी पावलं आता मात्र झपझप पडत होती. ती तडक झोपडीत शिरली. आत आल्यावर तिनं त्या लेकराला एका पटकुर्यावर ठेवलं तसं त्यानं भोकांड पसरलं. तिनं घाबरून बाजूला झोपलेल्या नवर्याकडे पाहिलं तर तो हललासुद्धा नाही. तिनं हुश्श केलं. गाठोड्यात बयो आजीची फाटकी साडी तिनं आठवण म्हणून जपून ठेवली होती. तिनं त्याच साडीत त्याला गुंडाळलं.
लगबगीनं आजूबाजूच्या काटक्या, कागद गोळा करून शेकोटी पेटवली. त्या उजेडात तिची झोपडी उजळून निघाली. त्या शेकोटीमुळे बाळाच्या अंगात जरा ऊब आली. त्यानं हळूच डोळे उघडले. पण अजूनही त्याची रडरड संपेना. तिनं त्याला पदराखाली घेतलं. तिला गहिवरून आलं. माया दाटून आली. डोळ्यातून पाणी वाहतच राहिलं. तिनं त्याला अजूनच जवळ घेतलं. फाटका का असेना पण मायेचा पदर पांघरला. पार चिपाड झालेल्या छातीशी लावताच तिला वात्सल्याचा पान्हा फुटला. ते तिला लुचू लागलं. कोरड्या आणि रुक्ष झालेल्या उरी त्याला कुठलं समाधान गवसलं कोण जाणे? पण जादू झाल्यासारखं ते रडायचं थांबलं. बाळ आता तिच्याकडे किलकिल्या नजरेनं पाहू लागलं. ती त्याच्याकडे भान हरपून पाहू लागली. पाहताना तिला तिचंच उमजलं, तिनं नाकारलेलं मातृत्व पुन्हा एकदा तिच्यापुढे हात पसरून उभं होतं. तिच्यातल्या आईनं तिला साद घातली. त्या काही क्षणांनी आईपण खोलवर रुजलं तिच्यात. तिचा निश्चय होत होता. तिला या बाळाला नाकारलं गेलेलं आयुष्य पुन्हा द्यावंसं वाटत होतं, पण या वस्तीपासून दूर. या असल्या वस्तीत त्याला तिला लोटायचं नव्हतं. तिनं बाजूला दारू पिऊन पडलेल्या नवर्याकडे पाहिलं. त्याला कशाचंच सोयरसुतक नव्हतं. त्याच्याकडे पाहताना तिला सगळे दिवस आठवून गेले. त्या नरकयातना आठवून ती केविलवाणी झाली. इतक्यात तिचं लक्ष तिचं बोट घट्ट पकडलेल्या त्या तान्हुल्याकडे गेलं. तिनं त्याला पुन्हा उराशी कवटाळलं. त्याचे मुके घेतले तसं ते खुदकन हसलं.
त्या क्षणी तिच्या पार थकलेल्या देहात कोणती ताकद आली कोण जाणे. ती तिरीमिरीत उठली. गळ्यातलं डोरल तिनं जोरात खेचलं तसे त्यातले काळे मणी विखुरले. त्यात एक लहानसा सोन्याचा मणी होता. तो सोन्याचा मणी तिला बयो आजीनं तिच्या लग्नात दिलेला होता. तिनं तो जिवापाड जपला होता. बयो आजीचा आशीर्वाद समजून तिनं तो मुठीत घट्ट पकडला. नवर्यानं सगळं ओरबाडून घेतलं, पण हा मणी तेवढा तिने वाचवला होता. तिच्या अडचणीच्या काळात तोच आशीर्वाद तिला मदत करेल असं तिच्या मनात आलं. हातात गाठोडं आणि कडेवर लेकराला घेऊन ती तडक निघाली. तिला आता जगायचं होतं तिच्या बाळासाठी. बयो आजीचा वारसा जपण्यासाठी…तिनं पाहिलं तर आजही पौर्णिमा होती. चंद्राच्या लख्ख प्रकाशात तिची पावलं भरभर पडू लागली वस्तीपासून दूर, कायमसाठी…
uashwiniranade0106@gmail.com
