‘‘ही गोष्ट १९७० मधली. त्या वेळी पुण्याहून जुन्नरला जाणे हाच एक मोठा प्रवास असायचा. या जुन्नरच्या पुढे पश्चिमेला ३० किलोमीटरवर प्राचीन नाणेघाट. हा तर स्थानिक लोक सोडले तर बाकीच्यांच्या फारसा गावीही नव्हता. सार्‍या डोंगरदर्‍या, दाट जंगलाचा भाग. जुन्नरहून बैलगाडी जुंपत नाणेघाटाकडे निघावे लागे. त्या गाडीवान दादाला सोबत घेत खाचखळग्यातून वाट काढत, ऊन, वारा, थंडी, पाऊस झेलत, हिंस्र श्वापदांचे भय बाळगत, चोर-लुटारूंची दहशत मनात साठवत तिथे एकटीने जायचे. हे सारे कष्ट, चिंता, भय झेलत तिथे पोहोचले की तो प्राचीन नाणेघाट माझ्याशी बोलू लागायचा. मला दोन हजार वर्षे मागे घेऊन जायचा. ही प्राचीन वाट, त्यावरील पाण्याची कुंडे, जकातीचा रांजण, घाटातील प्राचीन गुहा, त्यातील सातवाहन राणी नागणिकेचे लेख सारे सारे मला वेगळ्या जगात घेऊन जायचे. या माझ्या विश्वात मी रमले की काही वेळापूर्वी जाणवणारे भय, चिंता सारे पळून जात मी महाराष्ट्राच्या या प्राचीन काळाच्या शोधात बुडून जायचे…!’’

‘जुने जाऊ द्या मरणालागुनी…’ असे केशवसुत म्हणाले असले, तरी माणूस मात्र सतत जुन्या, हरवलेल्या गोष्टींचा शोध, बोध आणि त्याच्या कुतूहलात अडकलेला असतो. आता हा जुना शब्द व्यक्ती आणि कालसापेक्ष आहे. काहींसाठी तो मागील पिढीपुरता असतो तर काहींसाठी थेट काही हजार वर्षे प्राचीन. काहींसाठी तर अगदी मानवी उत्क्रांतीचा प्रवास शोधणारा असा. या अशा प्राचीन, अतिप्राचीन काळाचा शोध घेणारे शास्त्र म्हणजे पुरातत्त्व…! भारतात ब्रिटिशांसोबत या शास्त्राची पावले पडू लागली. जी वाट पुढे एतद्देशीय पुरातत्त्ववेत्त्यांनी आणखीनच मोठी केली. यातीलच एक मोठे नाव डॉ. शोभना गोखले!

काही विषय मुळातच समाजमनापासून थोडे अंतर ठेवून जगत असतात. ‘पुरातत्त्व’ हा प्रांतही असाच सामान्यांच्या कुतूहलाचा पण तेवढाच परिघाबाहेरचा. नेमके इथे काय काम चालते, कसे चालते, कोण करते? असे नाना प्रश्न अनेकांना पडत असतात. पुरातत्त्व विषयात स्त्रियांचं काम अगदीच दुर्मीळ. महाराष्ट्रापुरता असा शोध घेऊ लागलो की मग डॉ. शोभना गोखले, डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. माया पाटील अशा निवडक नामवंतांची नावे पुढे येतात. या तिघींचा काळ, कार्यक्षेत्र, अभ्यासाचे विषय निराळे; परंतु काळाचे, त्यात दडलेल्या संस्कृतीचे उत्खनन हा या तिघींमधील समान धागा. हे धागे विणता-विणता त्यांनी या पुरातत्त्व विषयात मोलाची भर घातली आहे. डॉ. शोभना गोखले यांचा काळ सुरू होतो अगदी १९६० च्या दशकापासून. ज्या काळी बाहेर पडून उच्च शिक्षणापर्यंत उडी घेणे हेच मुळी स्त्रियांसाठी अवघड.

अशा काळात डॉ. गोखले यांनी पुरातत्त्वासारख्या वेगळ्या विषयाची वाट चोखाळली. बरे केवळ उच्चशिक्षण घेतले असे नाही, तर आपल्या ध्यासातून संशोधनाचे मानदंड प्रस्थापित केले. डॉ. गोखले मूळच्या अमरावतीच्या. लग्नानंतर पुण्यात आल्या. लहान असल्यापासून त्यांना संस्कृत, प्राचीन वाङ्मय, भाषा, लिपी या विषयांत रुची होती. त्यांचे काका पुरुषोत्तम विश्वनाथ बापट हे बौद्ध धर्माचे अभ्यासक. जागतिक कीर्तीचे अभ्यासक.

डॉ. धर्मानंद कोसंबी यांचे ते शिष्य. यामुळे मूळची आवड आणि घरातील वातावरणामुळे त्यांची पावले नकळतपणे पुरातत्त्व विषयाकडे पडू लागली. या टप्प्यावरच त्यांच्या आयुष्यात जगविख्यात ‘डेक्कन कॉलेज’सारखी संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरातत्त्ववेत्ते डॉ. ह. धी. सांकलिया यांच्यासारखे मार्गदर्शक आले. या दोन्ही दर्शकांचे बोट पकडून त्या या विषयाच्या अंतरंगात शिरल्या. ‘पुराभिलेख’ आणि ‘नाणकशास्त्र’ या दोन विषयांतील संशोधनाची दिशा पकडली. पुरातत्त्व हे त्यांचे आयुष्यभराच्या कार्यकर्तृत्वाचे क्षेत्र. तर यातील ‘पुराभिलेखशास्त्र’, विविध ‘प्राचीन लिपी’, ‘नाणकशास्त्र’, ‘बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान’, ‘संस्कृत वाङ्मय’, ‘सातवाहन ते क्षत्रप’ भारतीय इतिहासातील प्रांताचा उपराजा या प्राचीन राजवटी, ‘लेणी स्थापत्य’ अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी मुशाफिरी आणि संशोधनाचे मानदंड निर्माण केले.

प्राचीन काळाचे उत्खनन करताना केवळ जमिनीखालचे जग किंवा ऐतिहासिक इमारती, वास्तू, वस्तू शोधून, पाहून चालत नाही. या सार्‍यांचे अर्थ लावावे लागतात. त्यासाठी विविध पुरातत्त्वीय विद्या, भाषा, लिपी, परंपरा, संदर्भ साहित्य, इतिहास, भूगोल, लोकजीवन, चालीरीती अशा अनंत विषयांचा अभ्यास आणि आवाका असावा लागतो. या अभ्यासाला ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत रानोमाळ भटकत प्रत्यक्ष दर्शन, अनुभूतीची जोड द्यावी लागते. या मंथनातून मग एकेक धागा जोडला जात विस्मृतीत गेलेल्या किंवा दुर्बोध वाटणार्‍या काळाचे पदर पुन्हा विणले जातात. हे काम एखादा क्रमिक अभ्यासक्रम शिकावा इतके सोपे नसते, त्यासाठी ‘तपश्चर्या’ नावाचा शब्द प्रत्यक्ष अंगीकारावा लागतो.

डॉ. गोखले यांनी आपल्या शोधकार्यातून अगदी महाराष्ट्राचे आद्य राजकुल, त्याची संस्कृती शोधण्यापासून ते प्राचीन महाराष्ट्राच्या विविध कालखंडांना बोलते केले. जुन्नरजवळील प्राचीन नाणेघाटापासून हा प्रवास सुरू झाला. १९६० च्या दशकात त्यांनी ही नाणेघाटाची वाट पकडली. त्या काळी नाणेघाटात पोहोचणे आणि त्यातही एका नागर बाईची पावले त्यावर उमटणे हे सगळेच अशक्य कोटीतील होते. पण बाईंनी हा ध्यास शिरी घेतला आणि गूढ नाणेघाटाला बोलते केले, शेकडो वार्‍या आणि हजारो भेटी घेऊन.

सह्याद्रीच्या ऐन कड्यावरील तो प्राचीन व्यापारी मार्ग म्हणजे नाणेघाट, त्याच्या पोटातील अनघड लेणे, त्यातील महाराष्ट्राचा आद्य राजवंश सातवाहनांचे ब्राह्मी लिपीतील लेख, शिल्पकाम, या राजवटीचे महत्त्व त्यांचे कार्य, युवराज्ञी नागणिका, तिचे योगदान, वाजपेय यज्ञकार्य, दान, लेखातील भाषा, लिपी, शब्द, त्यांचे अर्थ, संख्यांचे आद्य पुरावे, तत्कालीन राजवट, धर्म, समाजव्यवस्था, चालीरीती, परंपरा अशा अनेक गोष्टींवर गोखले बाईंनी प्रकाश टाकला. त्यांच्या या एका संशोधनामुळे महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाला अनेक संदर्भ प्राप्त झाले. कान्हेरीच्या गुंफांमधील त्यांचे संशोधनही असेच अफलातून. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाच्या आतील भागात असलेल्या या लेणी समूहात फिरणारी माणसेआजही संध्याकाळ होऊ लागली की पावले झपझप उचलतात. अशा निर्जन स्थळी गोखले बाई १९७३ सालापासून एकेक महिना मुक्काम करत आपले संशोधन कार्य करत होत्या. त्या वेळी तिथे जंगलात केवळ तीन घरे होती. यातील एक पुरातत्त्व विभागाचे कार्यालय तर दुसरे काळजीवाहकाचे घर. या दोन घरांच्या वस्तीत तिसर्‍या छोट्याशा खोलीत गोखले बाईंनी आपला संसार मांडला. ऐन जंगलातील या घराला आतून कडीदेखील नव्हती. दरवाज्याला टेबल लावून त्या राहायच्या.

रोज दिवसभर जंगलात त्या लेण्यांचा अभ्यास करत फिरायचे. हिंस्र प्राण्याचे भय घेत वावरायचे. सोबतीला एक स्थानिक आदिवासी महिला, एक मदतनीस. हे सारे कष्ट उपसत मुक्कामाच्या जागी यावे तो पहिले घरात साप, विंचू शिरले नाहीत ना याची काळजी घ्यायची. एके रात्री शेजारच्या घरातून जोरजोरात ताटे वाजू लागली, आरडाओरडा सुरू झाला. शेजारचे ओरडून सांगू लागले, ‘‘गोखले बाई दरवाजा घट्ट दाबून धरा. तुमच्या खोलीबाहेर वाघ आला आहे…!’’ आज हे वाक्य वाचताना गंमत वाटते, पण त्याच वेळी शोधाचे वेड घेतलेल्या या संशोधकांच्या अचाट कार्याची जाणीवही होते.

त्या सांगायच्या, कान्हेरीच्या लेण्यांमध्ये अनेक शिलालेख उंचावर होते. ते वाचण्यासाठी दिवस दिवसभर शिड्यांवर चढून त्या अक्षरांमध्ये बोटे फिरवत त्यांचा अर्थ लावण्याचे काम करावे लागे. त्यात पुन्हा कान्हेरीतील लेखाजवळील भाग खडबडीत. त्यावर जागोजागी खड्डे. यामुळे खोदलेली अक्षरे आणि खड्डे यातून मार्ग काढताना हे काम आणखी अवघड होई. गोखले बाईंचे १९७३ मध्ये सुरू झालेले हे कान्हेरी संशोधन पुढे कित्येक वर्षे सुरू होते. त्या दरवर्षी ही दुर्गम वाट तुडवत राहिल्या. यातून कान्हेरीतील १०४ दालनांची त्यांनी ओळख पटवली, दरीत पडलेले तब्बल २७ शिलालेख शोधून काढत त्याचे वाचन केले. कान्हेरी हे तत्कालीन बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान शिक्षणाचे किती मोठे केंद्र होते यावर त्यांनी प्रकाश टाकला. हे वाचले की जाणवते झपाटलेली माणसे केवढे काम करतात…! नाणेघाटात त्या जसे बैलगाडीने हिंडल्या तसेच कच्छच्या ओसाड मुलखात घोड्यावर बसून त्यांनी तिथल्या प्राचीन शिलालेखांचा शोध घेतला.

कोकणातील एका मंदिरातील शिलालेख पाहण्यासाठी त्या कंबरभर पाण्यातून गेल्या. दापोलीजवळचे ‘पन्हाळेकाजी’ आजही दुर्गम भागातील एक लेणीसमूह. १९७० च्या दशकात गोखले बाईंनी बैलगाडीतून प्रवास करत तिथल्या लेखांवर संशोधन केले. विदर्भातील आताच्या वाशिम जिल्ह्यातील हिस्सेबोराळा गावी त्यांनी शोधून, संशोधित केलेल्या शिलालेखाने वाकाटक आणि विदर्भाच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडला. संशोधन करण्यासाठी तंगडतोड करावी लागली, डोंगरकडे चढण्याचे तंत्र अवगत करावे लागले. संशोधनासाठी आवश्यक ठसे घेणे, फोटो काढण्याचे कसब शिकावे लागले. सातारा जिल्ह्यातील माण प्रदेशात वळई गावी सापडलेल्या ताम्रपटावरील त्यांच्या संशोधनामुळे राष्ट्रकूट राजघराण्याचे मूळ स्थान शोधता आले. या राजवंशातील मानांक हा ‘मान’ प्रदेशाचा राजा होता हे यामुळे समजले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तुळईवरच्या एका लेखाचे गोखले बाईंनी वाचन केले. ज्यातून कर्नाटकातील होयसाळ राजा सोमेश्वर याने इसवी सन १२३७ मध्ये विठ्ठलासाठी काही दानधर्म केल्याचे तपशील पुढे आले. या लेखामुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा इतिहास काळ ठरवणे सोपे गेले. या लेखाच्या महत्त्वामुळे हा पुढे ‘तुळईचा लेख’ म्हणून प्रसिद्ध पावला. ‘सातवाहन’, ‘क्षत्रप’ आदी राजवटींच्या नाण्यांचा अभ्यास करत बाईंनी महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर मोठा प्रकाश टाकला. यासाठी कुठे नाणी मिळाल्याच्या बातम्या आल्या की बाई तिथे धाव घ्यायच्या. या ध्यासातूनच त्यांनी अगदी पैठणच्या बाळासाहेब पाटील संग्रहालयापासून ते लंडनमधील ब्रिटिश संग्रहालयातील नाणेसंग्रहावर संशोधन केले. सातवाहनांच्या नाण्यांवरील त्यांचे ‘लॉर्ड ऑफ दक्षिणापथ’ हे पुस्तक या विषयातील अभ्यासासाठी एक मानदंड ठरले आहे. त्यांची या विषयातील कीर्तीच त्यांना १९९१ साली ब्रसेल्स येथे भरलेल्या ‘जागतिक नाणकशास्त्र परिषदे’च्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेली. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी हा सगळा प्रवास ‘ललाटलेख’ नावाने आत्मचरित्रातून प्रसिद्ध केला.

बाईंसोबत नाणेघाटात जाण्याचा अनेकदा योग आला. त्या प्रत्येक वेळी बाई या स्थळाबद्दल, तिथल्या लेखांबाबत भरभरून बोलत. जुन्नर भागातील लेण्याद्री, तुळजा लेण्यांचे दर्शनही त्यांच्यासोबत करता आले. संशोधनासाठी वाटा, आडवाटा, दुर्गम डोंगरदर्‍या, घाटवाटा अशा प्रत्येक आव्हानाला घेत त्या सर्वत्र वावरल्या. उतारवयात त्यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली. या वेळी त्यांनी डॉक्टरांना सांगितले. ‘मला डोंगर चढता आले पाहिजे…!’ अखेरच्या टप्प्यात शरीर थकले. त्यांचे भटकणे जवळजवळ थांबले. पण त्यांच्यातील संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुस्तके, जुने ग्रंथ, कागद, नाणी, ताम्रपट यावरचे त्यांचे काम त्यांनी घरातूनच अखेरपर्यंत सुरू ठेवले. अशा वेळी कुठे दुर्गम ऐतिहासिक स्थळी निघालो की बाई त्यांचे प्रश्न, कामाची यादी द्यायच्या. मग त्यांनी सांगितलेले कुठले छायाचित्र, माहितीचा अन्य तपशील मिळवून आणला की त्यांचे संशोधनाचे कार्य आणखी जोमात सुरू व्हायचे. खर्‍या अभ्यासक, संशोधकाला निवृत्ती नसते याचेच हे प्रत्यंतर. ही निवृत्ती त्यांनी अखेर २२ जून २०१३ या दिवशी देह ठेवतानाच घेतली…! गोखले बाई अनेकदा म्हणायच्या, एक बाई म्हणून या कामाकडे पाहू लागलो की ते अवघड, अशक्य वाटते. आव्हानांनी भरलेली ही वाट वाटते. पण खरे सांगू का, संस्कृतीच्या शोधाचे, संशोधनाचे हे कार्य आहे. कुठल्याही हरवलेल्या संस्कृतीचा शोध एक स्त्रीच जास्त छान घेते, हरवू पाहणार्‍या धाग्यांना तीच जिवापाड जपते.

१९९८ मध्ये बाईंसोबत एकदा नाणेघाटात गेलो होतो. नेहमीप्रमाणे नाणेघाट, त्यातील ते सातवाहनांचे लेणे, राणी नागणिकेचा लेख वाचला आणि परत फिरलो. वाटेत तिथलीच घाटावरच्या गावातील एक माउली भेटली. बाईंनी त्यांना थांबवले, त्या त्यांच्या गळ्यातील पदक न्याहाळू लागल्या. सातवाहनांचे एक दुर्मीळ नाणेच पदक म्हणून तिने दोेर्‍याने बांधून गळ्यात घातले होते. बाईंनी थोडा वेळ ते नाणे पाहिले, न्याहाळले, नोंदी घेतल्या, ते पाहत गूढ हसल्या आणि आम्ही परतू लागलो… एक स्त्री संस्कृतीचा शोध घेत होती तर दुसरी तिचे जतन…!

वारसास्थळांशी नाते !

पुरातत्त्व संशोधिका डॉ. मंजिरी भालेराव हे नाव उच्चारले की डोळ्यांपुढे लगोलग कलात्मक मंदिरे, कोरीव लेणी, प्राचीन शिल्प-चित्रकला, नाणी असे अनेक विषय तरळू लागतात. काही नावांचे काही विषयांशी असेच तादात्म्य पावलेले असते. औपचारिक अर्थाने डॉ. भालेराव पुण्याच्या ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठा’त भारतीय प्राच्यविद्या शाखेच्या विभागप्रमुख. मात्र त्यांचा या क्षेत्रातील परीघ वर सांगितले तसा याहून विस्तारलेला. प्राचीन भारताचा इतिहास, संस्कृती आणि कला सांगणार्‍या स्थळकाळाचा शोध घेणे, त्याला बोलते करणे आणि त्यांची खरी ओळख समाजाभिमुख करण्याचे काम त्या करत आहेत.उत्खनन स्थळे असतील, प्राचीन कलात्मक लेणी, मंदिरे, जलवास्तू, शिल्प-देवता, शिलालेख, प्राचीन साहित्य, कलावस्तू, नाणी अशा विविध विषयांमध्ये त्यांची अभ्यासू मुशाफिरी चालू असते.

कधी त्या प्राचीन लेण्यांच्या स्थापत्यकलेपासून तिथे नांदून गेलेल्या संस्कृतीचे विविध आयाम सोडवत असतात. कधी त्या एखाद्या कोरीव मंदिराच्या इतिहासापासून त्यावरील शिल्पांच्या शारीर आणि ता्त्विवक भावांबद्दल बोलतात. तर कधी त्या शब्दांना साठवून ठेवणारे ताम्रपट-शिलालेख, जुन्या ग्रंथांची पाने, चित्रे अशांमधील कोडी सोडवताना दिसतात. खरा शिक्षक कधी शिकवत नसतो तर तो त्या विषयाची अनुभूती, दर्शन घडवत असतो. पुरातत्त्व विश्वात भटकणार्‍यांच्या लेखी डॉ. भालेराव या अशाच निरनिराळ्या रंगच्छटांमध्ये सापडतात.

अवघ्या समाजाला याबद्दल कसे सजग, सहजमित्र बनवता येईल यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यासाठी संशोधन, सर्वेक्षण, उत्खनन, लेखन, व्याख्याने अशा अनेक पातळ्यांवर त्या कार्यरत असतात. प्राचीन लेणी – मंदिर स्थापत्य, बौद्ध साहित्यातील कथा, अष्टविनायकांच्या पुरातत्त्वीय पार्श्वभूमीचा शोध, यादव काळातील अभिलेख असे त्यांचे संशोधनाचे एकेक विषय पाहिले तर त्यांच्या कामाची खोली लक्षात येते.

डॉ. भालेराव म्हणतात, ‘‘सामान्य जनतेत आपल्या वैभवशाली वारशाबद्दल प्रेम, जागृती, जाणीव निर्माण केली तरच त्यांचे जतन-संवर्धन सोपे आणि शक्य होईल. ही जबाबदारी सरकारबरोबर अभ्यासकांचीही आहे!’’

उत्खननातील जग !

‘‘उत्खनन हे केवळ हरवलेल्या काळाचे नसते तर ते करता करता भवताल, वर्तमानातील समाजजीवनात देखील होते. एक संस्कृती शोधताना प्रकृतीशीदेखील आपण जोडले जातो!’’ पुरातत्त्व संशोधिका डॉ. माया पाटील (शहापूरकर) यांच्याशी बोलताना या विषयात दडलेली दुसरी बाजू अशी बाहेर आली.

पुरातत्त्व क्षेत्रात डॉ. पाटील यांच्या विषयी आदर आहे तो याच कारणाने. मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील डॉ. पाटील सांगतात, ‘‘घरामध्ये शिक्षणासाठी उत्साही वातावरण होतेच, त्यातच अंगणातील धाराशिव लेण्यांच्या जवळिकेने मी या वेगळ्या विषयाकडे ओढले गेले. पुरातत्त्व याच विषयातील उच्च शिक्षण, पीएच.डी., संशोधन कार्य, ‘डेक्कन कॉलेज’, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’, ‘राज्य पुरातत्त्व विभाग’ अशा संस्थांमधील विविध पदांवरील जबाबदार्‍यांनी घडलेला त्यांचा या विषयातील कार्याचा आलेख थक्क करणारा आहे.

डॉ. पाटील यांनी केलेल्या केवळ उत्खननांचा विचार केला तरी त्यांचा एक मोठा पट उलगडतो. सोलापूर मधील नरखेड, कारकल, वाकाव आणि धाराशिवमधील तेर येथे त्यांच्या नेतृत्वाखाली उत्खनने झाली. शिवाय नांदेडमधील शिरूर, नागपूरमधील थारसा, छत्रपती संभाजीनगरमधील पैठण आणि हरियाणातील फर्माना येथील उत्खननात त्या सहभागी झाल्या. या सार्‍या उत्खननांतून या स्थळांचे प्रागैतिहासिक काळापासून ते प्राचीन काळापर्यंतचे असंख्य धागेदोरे तर उलगडलेच, पण जोडीने आपल्या हरवलेल्या संस्कृतीचे असंख्य बिंदूही जोडले गेले. कुठे प्राचीन मातीची भांडी मिळाली, मौल्यवान दगड, दागिने सापडले; हस्तिदंती कलाकृती, घरगुती वस्तू, अवजारे, प्राचीन घर-नगरांचे अवशेष असे बरेच काही या काळाच्या उदरातून बाहेर आले. नरखेडच्या उत्खननात सातवाहन काळातील सांगावे घेत गहू, ज्वारी आणि मुगासारखी धान्ये मिळाली. धान्य साठवण्यासाठी जमिनीच्या आत तयार केलेली हवाबंद जागा अर्थात पेवही आढळल्या. तेरच्या उत्खननात तर एका मडक्यात एकत्रित कालवलेले तांदूळ आणि मूग मिळाले. एकप्रकारे आजवरची सापडलेली ही सर्वात प्राचीन खिचडी मानली जाते. या उत्खननांतून तत्कालीन नागरी जीवन कळले, व्यवसाय- व्यापार उलगडला, शेती समजली, एवढेच काय नरखेडमध्ये सापडलेल्या सातवाहनकालीन सांगाड्यांमधून आपल्या शरीररचनेपासून ते दफन परंपरांच्या पद्धती थक्क करत समोर आल्या. हे प्रत्येक उत्खनन आणि त्यातून मिळणार्‍या या अवशेषांनी आपल्याच हरवलेल्या संस्कृतीला नवे आयाम, संदर्भ दिले. मानवी उत्क्रांतीचा प्रवास सांगितला. एवढ्यावर न थांबता त्यांनी या सापडलेल्या जगाला संग्रहालयाचे छत्रही दिले. त्यांच्या याच उत्साहातून सोलापूर विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजच्या मदतीने जुन्नरला पुरातत्त्व संग्रहालये उभी राहिली. त्यांची ही सारी उत्खनने दुर्गम खेड्यांत घडली. जिथे खाण्यापिण्याचेच हाल तिथे अन्य सुविधा काय असणार? अशात एकेक महिना राहत संशोधनाचे हे कार्य त्यांनी सुरू ठेवले. हे करताना डॉ. पाटील या भोवतीच्या जगाशी देखील जोडल्या गेल्या. यातूनच त्यांनी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबासाठी मदतीचे कार्य सुरू केले. हरवलेल्या संस्कृतीचा शोध घेणार्‍या संशोधिकेने वर्तमानाचाही वेध घ्यावा यातून त्यांचे संवेदनशील मनच दिसून येते!
abhijit.belhekar@ expressindia.com