लग्नानंतर २५-३० वर्षं सातत्याने सहवासात असताना एकमेकांविषयीची समरसता, नवीन प्रयोग, वैवाहिक नात्याची विविधता आणि संपन्नता यातून लैंगिक जीवनाचा आनंद, समाधान अनुभवता येतो. भीड, संकोच न बाळगता जपलेले नावीन्य जोडप्यातील लैंगिक जीवन खुलवतं. पर्यायाने विवाह आणि कुटुंब संस्था अधिक निरामय आणि समृद्ध होते, हे सांगणारा ‘वैवाहिक नात्यातील लैंगिक सहजीवन’ या लेखाचा उत्तरार्ध.
माझ्या मोठ्या मावशीचं लग्न जेव्हा आचार्य शंकर जावडेकर यांच्या मुलाबरोबर ठरलं, तेव्हा माझे आजोबा म्हणजे तिचे वडील, तिला तिच्या लैंगिक शिक्षणासाठी संततिनियमनाचे पुरस्कर्ते र. धों. कर्वे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले होते. ही गोष्ट आहे १९४६ मधली! तेव्हा आजोबांकडे र. धो.कर्वे संपादित ‘समाजस्वास्थ्य’ मासिक यायचं. ज्यात लैंगिक प्रश्नांची उकल व्हायची. विशेष म्हणजे ते कधी लपवून ठेवलेलं नसायचं. त्या काळी माझ्या मावशीने एक मूल झाल्यावर कुटुंब नियोजन केलं होतं.
असे काही अपवाद वगळता, लैंगिकता हा विषय खूप वर्षं आपल्या समाजात गुप्त राखण्याचा प्रयत्न केला गेला. गंमत म्हणजे पूर्वीच्या पिढ्या असोत वा आत्ताच्या ‘मिलेनियल्स’, ‘जेन झी’, ‘जेन अल्फा’ पिढीतल्या सर्वांनाच या विषयात नेहमीच रस होता आणि आहे. निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या शरीराच्या अवयवांपैकीच हे लैंगिक अवयव! लग्न होणं, मूल असणं याविषयी अत्यंत आग्रही असलेल्या समाजात, या दोन्ही गोष्टींच्या केंद्रस्थानी लैंगिक संबंध आहेत हे माहीत असूनही, त्यांना कायम अनुल्लेखानं मारायचं ही मानसिकता दिसून येते.
एका निष्णात, संवेदनशील डॉक्टरांशी गप्पा मारण्याचा नुकताच योग आला. ते सांगत होते की, त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत, लग्न आणि मूल याविषयीची भारतीय मानसिकता फारशी बदललेली दिसली नाही. आजही अनेक घरात लग्नानंतर दोन-तीन वर्षांनी बाळ झालं नाही तर कुटुंब अस्वस्थ होतं. तसंच गर्भ मुलीचा असेल तर अनेक कुटुंबात तिचे स्वागत तर होत नाहीच, उलट तिला मारून टाकण्याचे अघोरी कृत्य करणारे महाभागही आहेत. म्हणजे इथे सगळा लैंगिक ‘व्यवहार’ हा केवळ आणि केवळ मूल आणि त्यातही ‘मुलगा’ या भोवती फिरत असेल तर पती-पत्नी मधील परस्परांबद्दल प्रेम व्यक्त करणार्या शरीर संवादाला काही स्थान तरी असेल का?
नवविवाहितच नाही, तर अनेक वर्षं विवाहित असणार्या जोडप्यांनासुद्धा संपूर्ण लैंगिक क्रियेची माहिती असतेच असं नाही. लैंगिक क्रियेतील अत्युच्च आनंदाचे जे काही क्षण असतात त्या भावनोत्कटतेच्या (ऑरगॅझम) जैविक प्रेरणा तीन आहेत. प्रजोत्पादन (प्रोक्रिएशन), आनंदाचे निधान असलेली करमणूक (रिक्रिएशन) आणि मनोमिलन (बाँडिंग). आनंदनिधानात लैंगिक क्रियेतील नावीन्य अनुस्यूत आहे. यातूनच वेगवेगळ्या स्थितीतील लैंगिक क्रिया जन्माला आल्या. नित्यकर्मांमध्ये माणसाला काहीतरी नूतनता, उत्तेजकता अपेक्षित असते; नाहीतर गोष्टी कंटाळवाण्या होऊन त्यात रस वाटेनासा होतो. मनोरंजन करणारी लैंगिक क्रीडा रंजक आणि आकर्षक करण्यासाठी ठिकाण बदल (पर्यटन), केशभूषा-वेशभूषा बदल (जगातील अंतर्वस्त्र व्यवसाय यावर तर प्रामुख्याने पैसे कमावतो आहे!) शरीरसुखासाठीच्या विविध कृती (पोझिशन्स), विविध प्रकारचे सुगंध-संगीताची पार्श्वभूमी या गोष्टी उभयतांनी जाणीवपूर्वक आणि रसिकतेने करायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे परस्परांवर मनोमन प्रेम आणि विश्वास असेल तरंच या गोष्टी करता येतात आणि त्याची अनुपम्यता अनुभवता येते. त्यासाठी परस्परांमध्ये तेवढी मानसिक, भावनिक गुंतवणूक हवी.
आधीच्या पिढ्यांची जी भौतिक, आर्थिक परिस्थिती होती त्यामध्ये अनेकांसाठी या गोष्टी आवाक्यातीलच नव्हत्या हे खरंच; पण त्याबद्दल फार कधी कल्पकताही दाखवली गेली नसावी, असं वाटतं. मुळात हा विषय किती जणांच्या विषय पत्रिकेवर होता हाच संशोधनाचा विषय! त्यात एकाचं व्यक्तिमत्त्व प्रणयरम्य (रोमँटिक) असेल आणि जोडीदाराचं नेमकं विरुद्ध असेल तर रंग भरण्याआधीच होणारा बेरंग आपल्या विवाहसंस्थेतील अनेक जणांनी गेल्या पंचवीस काय त्याआधीही अनेक वर्षं अनुभवलेला असेल. या विषयाबद्दलच उदासीनता किंवा संकोच विशेषत: अनेक ्त्रिरयांच्या मनात, पुरेपूर भरलेला असायचा. एकदा मराठी मित्र-मैत्रिणी अमेरिकेत दिवाळी साजरी करण्यासाठी एकत्र जमली. सगळ्या नवर्यांनी एकत्र येऊन योजना ठरवली आणि पाडव्याला आपापल्या बायकांना प्रणयरम्य अंतर्वस्त्रांची भेट दिली! त्यावेळी बायकांचे जे काही चेहरे झाले होते त्याच्या वर्णनांनी अनेक दिवस हशा पिकत राहिला.
सलज्जता, भीड, उदासीनता या भावना आजच्या तरुण पिढीतील किती जणांच्या भावविश्वात आहेत माहीत नाही; पण ते किमान त्यांच्या लैंगिक भावनांबद्दल सजग आहेत, खुल्या विचारांचे आहेत असं दिसतं. ते आंधळेपणाने परंपरांमध्ये आणि ‘टॅबू’ तसंच शुचितेच्या अविवेकी कल्पनांमध्ये अडकलेले दिसत नाहीत. मात्र विवाहपूर्व लैंगिक संबंधांमध्ये तरी प्रामुख्याने मनोरंजन हा उद्देश असणारे बरेच जण दिसतात. ‘वन नाइट स्टॅन्ड’च्या अनुभवात तर ‘रात गयी, बात गयी’ इतकी प्रासंगिक वृत्तीही दिसते. मात्र विवाहसंस्थेतील पतीपत्नीच्या नात्यात रंजन आणि मनोमीलन या दोन्हींचा अपूर्व संगम ही जोडप्याच्या लैंगिक सुखाची गुरुकिल्ली आहे. नर-मादीमध्ये नैसर्गिक आकर्षण असणारच; परंतु वर उद्धृृत केल्याप्रमाणे प्रणयासाठीची पूर्वतयारी असेल तर प्रणयाची उत्कट इच्छा निर्माण होते. ती स्पर्शातून संवेदना अनुभवत, एकमेकांच्या कायेचा आनंद घेणं, लाड/कौतुक करणं, चुंबन घेणं या भावोत्कट कृतींमधून अनुभवता येतं. स्त्री ही भावनाप्रधान अधिक असते. जोडीदाराला आपल्याविषयी वाटणारी आस्था, आत्मीयता, आदरभाव, औत्सुक्य, कदर, प्रेम हे सारं ती स्पर्शातून अनुभवत असते. आपण जशा आहोत तशा त्याला आवडतो हे तिला सुखावणारं असतं. पूर्वक्रियेतून ती भावनिक बंध जुळण्याचा (इमोशनल इंटीमसी) अनुभव घेते. मग ती लैंगिक प्रणयासाठी सिद्ध होते. आनंदाचं हे लैंगिक चक्र म्हणजे स्त्री-पुरुष नात्यातील लैंगिक सहजीवनाची सशक्त अनुभूती आहे. किती स्त्री-पुरुषांना हे माहीत असतं? व्यक्त करता येतं?
पूर्वी ही अभिव्यक्ती करताच येत नव्हती आणि आता ती उघडीवाघडी झाली, असं म्हणावं का? परंतु, अशी अनुभूती जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्वक उपभोगण्याचं भाग्य ज्या जोडप्यांना लाभतं, त्यांना आपल्या विवाहसंस्थेतील विवाह ‘बंधन’ कधीच क्लेशकारी, नकोसं होणार नाही. किंबहुना या समरसतेतून, नित्यनवीन प्रयोगांतून, वैवाहिक नात्याची विविधता आणि संपन्नता ते अनुभवत राहतील. त्यातून त्यांच्यामधील ‘बंध’च अधिक दृढ होतील. अशा विवाहांमध्ये स्वत:चा आणि नात्याचा विकासही हातात हात घालून होत राहतो. तसंच, या प्रयोगशीलतेमुळे विवाहव्यवस्थेच्या चौकटीत अडकल्याची भावना न राहता, वचनबद्धतेतील शाश्वतता नात्यात अनुभवता येते.
लैंगिक नात्यांमध्ये संप्रेरकंही महत्त्वाची भूमिका बजावत असतात ‘मेंदूचे कामशास्त्र’ या विषयाचे अभ्यासक डॉ. जयदेव पंचवाघ यांची मांडणी इथे सर्वांना उपयोगी पडावी. ते म्हणतात, ‘‘कामशास्त्र हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? याचं साधं उत्तर म्हणजे निसर्गाने अगदी सामान्य व्यक्तींसाठीसुद्धा आत्यंतिक व अत्युच्च आनंदाचा अनुभव घेण्याचा रस्ता त्यातून उघडलेला आहे. हा अनुभव तात्पुरता असला तरी तृप्त समाधानाचा अनुभव देण्याची क्षमता त्यात आहे. अर्थातच निसर्गाचा यातला मूळ उद्देश प्रजनन हा आहे. म्हणूनच इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्यालाही कामक्रीडेकडे अत्यंत तीव्रतेनं खेचून घेण्याचं हे तंत्र निसर्गानं निर्माण केलं आहे.’’ गंमत म्हणजे आधीच्या पिढ्यांनी याकडे अधिकतर प्रजनन म्हणूनच बघितलं तर अलीकडच्या पिढ्या त्यातील तात्पुरत्या अनुभवावर भर देताना दिसतात. ‘कामा’तील ‘क्रीडे’चा गाढ, दीर्घ व प्रगल्भ अनुभव ना मागच्या पिढ्यांनी घेतलेला दिसला, ना आजच्या घेताना दिसतात!
नव्या संशोधनाचे दाखले देत डॉ. पंचवाघ सांगतात, ‘‘काम क्रीडेतल्या अत्युच्च आनंदाच्या क्षणी मेंदूतले एकमेकांपासून दूर असलेले अनेक भाग एकाच वेळी उद्दीपित होतात. लैंगिक भागांतील संवेदना जाणणारी, ज्या ठिकाणी आनंददायक चेतारसायनं स्रवतात अशी, शरीरातील विविध संप्रेरकं स्रवणार्या ग्रंथी जिथून नियंत्रित होतात अशी, काही स्मृतीविषयक, तसंच विशिष्ट व्यक्तीबरोबर भावनिक बंध निर्माण करणारी अनेकानेक केंद्रं या अनेक भागांना एकाच वेळी उद्दीपित करतात. त्याच वेळी अत्यंत आनंद निर्माण करणार्या रसायनांचा लोंढा फुटतो. त्यात उद्दीपनाच्या अगदी शेवटच्या काळात ‘डोपामाइन’ (आनंद निर्माण करणारे संप्रेरक) आणि त्यानंतर क्षणार्धात अत्यंत सुखद शांततेत ढकलणारं ‘एंडोर्फिन’ संप्रेरकं पाझरतात. त्यामुळे तृप्त शांततेचा अनुभव येतो. या प्रक्रिया इतक्या वेगळ्या प्रकारचा अनुभव निर्माण करतात की, या अनुभवाकडे माणसं अत्यंत तीव्रतेने खेचली जातात.’’
ही सगळी शास्त्रीय माहिती करून घेणं राहिलं बाजूलाच, मात्र भारतासारख्या देशातील अनेक पिढ्यांवर अतिकर्मठ विचारसरणीचा प्रभाव! त्यामुळे अनेक माणसे आनंदी लैंगिक अनुभवांना मुकली. नव्या पिढ्यांतील काही जण प्रयोगशील आहेत, मात्र आजही याविषयीचे परिपूर्ण शिक्षण सुयोग्य वेळी देण्याचा अभाव, पूर्वीही होता आणि आताही आहेच. वात्सायनासारख्या व्यक्तींनी लैगिंकतेच्या विषयावर आस्थापूर्वक चिंतन का केलं आणि आजही अनेक स्तरावर विषयातील संशोधन का चालू आहे याचा, सामाजिक, कौटुंबिक धाक आणि भयगंड बाजूला ठेवून, विचार व्हायला हवा. तरच जोडप्याला कामशास्त्रातला डोळस अनुभव निर्भेळपणे आणि तणावमुक्त पद्धतीने घ्यायला शिकता येईल.
त्यानंतरच या अनुभवाच्या संपूर्ण खोलीपर्यंत पोहोचून आपण आपले आयुष्य आणि पर्यायाने आपली विवाह आणि कुटुंब संस्था अधिक निरामय आणि समृद्ध करू शकू.
(उत्तरार्ध)
uvankulk57@yahoo.co.in
