‘नव्याची नवलाई’ संपली की, नात्यात सुरू होतो तो अपेक्षांचा भडिमार… आपल्यासाठी कधी क्षुल्लक वाटणार्‍या या ‘अपेक्षा’ पूर्ण करताना जोडीदाराची ‘दमछाक’ होऊ शकते, परिणामी ‘त्याची’, ‘तिची’ आणि नात्यातली ‘स्पेस’ संपुष्टात येऊ शकते. म्हणून विवाहाला केंद्रस्थानी ठेवूनच नात्यातली ही ‘स्पेस’ जपत, जोडीदाराच्या मतांचा ‘आदर’ करत नातं अधिक घट्ट करायला हवं…

साजिरी सांगत होती, ‘‘हा लग्नाआधी असा नव्हता. लग्नानंतर बदलला.’’

‘‘म्हणजे? प्रेमविवाह आहे ना तुमचा? नेमकं काय आवडलं तुला त्याचं म्हणून तू ओढली गेली होतीस त्याच्याकडे.’’

‘‘हा खूप लोकप्रिय होता आमच्या महाविद्यालयात. सतत मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात. अनेक उपक्रम करण्यात त्याचा पुढाकार असायचा. मलाही तो आवडायचा, पण मी त्या गोतावळ्यात नव्हते. मात्र त्या सगळ्या मैत्रिणी सोडून एक दिवशी त्यानं मला ‘प्रपोज’ केलं तेव्हा मला नवलच वाटलं! मी अनुमती दिली. बर्‍याच मुलींच्या मनात माझ्याबद्दल असूया निर्माण झाली होती तेव्हा! मी मात्र सुखावले होते.’’

‘‘मग, आता काय झालं?’’

‘‘अहो, लग्नानंतरही त्याचं तेच चालू आहे. अखंड मित्र-मैत्रिणी आणि त्यांच्यासोबत काही ना काही उपक्रम. मला द्यायला, घराकडे बघायला वेळच नसतो त्याच्याकडे. त्यावरून आमची सारखी भांडण होत राहतात.’’

सुजय म्हणाला, ‘‘मी असाच आहे पहिल्यापासून. चार वर्षं ही ओळखत होती मला. लग्न झालं म्हणून माझे सर्व उपक्रम एकदम थांबणार आहेत का? ते सांभाळून आम्ही दोघं एकत्र वेळही घालवतोच की! आमच्या उपक्रमांमध्ये तूसुद्धा सहभागी हो, हेही मी तिला म्हणत असतो.’’

तिचं म्हणणं, ‘तू मित्र-मैत्रिणींमध्ये असलास की तुझं माझ्याकडे काही लक्षच नसतं. बायको आहे ना मी तुझी?’ अगदी हेच वाक्य समरने उच्चारलं होतं. त्याची तक्रार होती, ‘ही अनेक निर्णय स्वत:च घेते आणि नंतर मला सांगते. मला आधी कल्पना नको का द्यायला? बायको आहे ना ती माझी.’

स्वराली म्हणाली, ‘‘अहो, मी अशीच आहे, स्वतंत्र विचारांची, सक्षम. ते आवडूनच याने माझ्याशी मैत्री केली. तो म्हणायचा, ‘काही मुली फारच अवलंबून असतात पुरुषांवर. तू तशी नाहीस. स्वत:ला काय हवं ते अगदी ठामपणे समजू, करू शकतेस. मला अशीच बायको हवी आहे. सारखी माझ्या खांद्यावर मान टाकणारी नको. मित्रांचं बघतो ना, ओझं व्हायला लागतं त्याचं नंतर. हो ना रे?’’

‘‘मग समर, आता तुझी काय तक्रार आहे?, हे तिचे गुण आवडूनच तू निवडलंस ना तिला?’’

‘‘हो, पण तेव्हा ती माझी मैत्रीण होती, प्रेयसी होती. आता बायको आहे. मला विचारायला नको का तिने निर्णय घेताना?’’

‘‘तिच्या निर्णयांचा काही त्रास होतोय का तुला?’’

‘‘तसं नाही, पण लग्न केल्यावर इतकं स्वतंत्रपणे वागून कसं चालेल? आता हे आमच्या दोघांचं विश्व आहे ना? माझ्या आई-बाबांनाही असंच वाटतं की, ही कधी कुणाचं मतच घेत नाही. ठरवून मोकळी होते आणि नंतर सांगते.’’

‘‘असं नाहीये हं. काही निर्णय वैयक्तिक, व्यावसायिक असतात. ते जेव्हा वैवाहिक, कौटुंबिक असतात, तेव्हा मी चर्चा करते. माझं मतही देते. शक्य असतं तिथे आनंदाने सहभागही देते, पण काही वेळा कामाची व्यग्रता, ताण इतके असतात की प्राधान्यक्रम ठरवावे लागतात. माझ्या नोकरीतील पदाच्या या मर्यादा समरला माहीत आहेत,’’ स्वराली म्हणाली आणि समर गप्प झाला.

खरंच काय होतं नेमकं लग्नानंतर? ठरवून केलेला विवाह असो वा प्रेमविवाह, लग्नाआधी एकमेकांचा जो जो स्वभाव आवडलेला असतो, लग्नानंतर नेमका तोच खटकायला का बरं लागत असेल? मला वाटतं, याला एक कारण असावं, लग्नानंतर होणारा ‘कंडिशन्ड भूमिकां’मधला प्रवेश. नवरा, बायकोनं कसं असावं (आणि कसं नसावं), त्या भूमिकांमध्ये त्यांनी कसं वागावं (आणि कसं वागू नये) याचे समाज वर्षांनुवर्ष संस्कारण करत असतो. माणसांनी त्या त्या भूमिकेत गेल्यावर तसं तसं वागावं यासाठी माणसांचं अनुकूलन किंवा तशी वैचारिक, मानसिक जडणघडण करत असतो. एखादी गोष्ट अनेकवार ठसवली गेली, आजूबाजूला तीच कृतीत आलेली दिसत राहिली की, तेच वर्तन अवलंबिलं जातं आणि मग सवयीनं अंगवळणीही पडतं. हाच विचार बरोबर असंही वाटायला लागतं. सामाजिक सुरक्षितता आणि स्वीकृती ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज असते. त्यामुळे तो अशा मन-मेंदूवर बिंबवल्या गेलेल्या विचारांच्या प्रवाहात राहणं पसंत करतो. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं त्याला भय वाटतं. आपण एकटे पडू असं वाटतं. त्यात आणखी भर म्हणजे वेगळा, नवा विचार करण्याचा बौद्धिक आळस!

इथे सासू वर्गाचं उदाहरण देण्याचा मोह होतो आहे. अनेक स्त्रिया बाहेरच्या जगासाठी खूप चांगल्या असतात, सगळ्यांशी चांगलंच वागत असतात, त्याच स्त्रियांचं सासू म्हणून घरातलं रूप पूर्णपणे वेगळं असू शकतं. आता स्वाभाविकपणे अनेकांच्या मनात हा प्रश्न येईल की, मग सुना (त्यातही हल्लीच्या!) काही कमी असतात का? प्रश्न कोण कमी, कोण जास्त हा नसून, व्यक्ती सासूच्या भूमिकेत गेली की बर्‍याचदा तशीच वागते- जशी तिची सासू (किंवा तिच्या आजूबाजूच्या सासू) वागलेल्या/ वागत असतात. ‘‘माझ्या सासूच्या ज्या वागण्याचा मला त्रास झाला, तो मी माझ्या सुनेला होऊ देणार नाही, माझा मुलगा-सून एकमेकांसोबत आनंदात आहेत हाच माझा आनंद. मग त्यांच्या इतर बाबींचा मी विचारच करत नाही. त्यांच्या गोष्टी ते सांभाळतील.’’ असं किती सासू म्हणताना आपण ऐकतो!

या आधीच्या (७ फेब्रुवारी) लेखातील वानप्रस्थाश्रमाचा मुद्दा घेऊन एका वाचक बाईंची फार छान प्रतिक्रिया आली. त्यांनी लिहिलं आहे, ‘‘आमचं लग्न झाल्यावर सासुबाईंनी मला सांगितलं, ‘‘आत्तापर्यंत हा आमचा मुलगा होता. आता तो तुझा नवरा झाला आहे. तुम्ही एकमेकांना आणि तुमच्या संसाराला सांभाळा.’ एकत्र राहूनही आमच्या वैवाहिक जीवनात त्यांनी कधीही दखल दिली नाही. त्यामुळे आम्ही सगळेच आनंदात राहिलो.’’

अनेकदा असंही दिसतं की, पालकांच्या भूमिकेत गेलो की कित्येकांचं वागणं ‘अधिकारशाही’चं बनतं. शिक्षक, मुख्याध्यापक, पोलीस, अनेक क्षेत्रातील उच्चपदस्थ, आपापल्या नोकरीतील ‘भूमिका’ घेऊनच घरात येतात. कामावर गरजेचं असलेलं; परंतु घरी अजिबातच गरजेचं नसलेलं वर्तन आपला जोडीदार आणि मुलांसमवेत करतात. घरातली ज्येष्ठ मंडळी तो/ ती लहानपणापासून असाच/ अशीच आहे म्हणत त्यांना सांभाळून(?) घेतात. ‘त्यांची चांगली बाजूही बघा की’, अशी वर मल्लिनाथीही असते. (मात्र असे वर्तन सुनेनं केलेलं चालत नाही.) इथे नात्यांपेक्षा ‘व्यक्तिमाहात्म्य’ महत्त्वाचं बनतं. संत यालाच ‘उपाधी’ म्हणतात. ‘जोड्यांबरोबर, चपलांबरोबर तुझी उपाधीही घराबाहेर ठेवून मग आत ये,’ असं सांगतात.
टिकून राहण्यासाठी स्वबचाव ही सर्व जीवित सृष्टीची नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे नात्यातील या भूमिकांचा ‘जाच’ माणसांना जाणवतो. स्वत:ची सुरक्षितता बघणार्‍या मेंदूसाठी ते आपल्या ‘अवकाशावर’चं नियंत्रण/ आक्रमण असतं. ‘आक्रमण’ या भावनेला मेंदू आपापल्या व्यक्तिमत्त्वानुसार लढा, पळा आणि दोन्ही करता येत नसेल तर थिजून जा, ( fight- flight- freeze)अशी प्रतिक्रिया देतो. म्हणून राग, भीती आणि असहाय्यता या आपल्या मूलभूत ‘बचावात्मक’ भावना समजल्या जातात. यात नाती आक्रस्तात.

कोणत्याही नात्यात ‘स्वअवकाश’ ( Self Space) आणि ‘नात्याचा अवकाश’ याचा एक तोल सांभाळता आला तर सगळ्यांनाच ते नातं सुखाचं होतं. आपल्या उत्क्रांत झालेल्या मेंदूत अनेक भावना वास करतात. भूमिकांच्या टणक कवचातून स्वत:ला बाहेर काढलं तर या ‘ठरीव’ भावनांच्या आणि ठाकून-ठोकून बनवलेल्या विचारांच्या बाहेर जाऊन सगळ्या नात्यांकडे मोकळ्या मनानं बघता येतं.

एका सुनेच्या आईला आणि तिच्या मोठ्या बहिणीला त्यांच्या त्यांच्या सासूंनी खूप छळलं. त्यामुळे सासूपासून फटकूनच राहायचं, हाच विचार घेऊन ती सासरच्या कुटुंबात आली. खरं तर तिची सासू छळणारी नव्हती. आता हे समजून घेऊन, सुनेला आपल्या सासूची व्यवस्थित ओळख पटेपर्यंत संयम ठेवणं एवढंच त्या सासूच्या हातात उरतं, नाही का? चिंता, भय, तेढ, नाराजी, राग… या भावना पार करून ‘विश्वास’ या भावनेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसतो. त्यात एखाद्याचा स्वभाव सगळं ‘धरून’ ठेवण्याचा असतो. त्यामुळे आपण फक्त सासू या भूमिकेत न अडकता आपलं स्वतंत्र आयुष्य छान जगत राहणं आणि योग्य वेळ येण्याची शांतपणे वाट पाहणं हे आपण करूच शकतो, नाही का? हा एक प्रकारे त्या सुनेला दिलेला आणि आपण आपल्यासाठीही घेतलेला अवकाशच आहे. हा अवकाश दिला-घेतला तर ‘भूमिकां’चा विचार-भावना -वर्तनाची ओझी आपल्याला खांद्यावर वागवावी लागत नाहीत. मानसशास्त्रात ‘फॅक्टर विदीन माय कंट्रोल’ आणि ‘फॅक्टर बियाँड माय कंट्रोल’ ही संकल्पना आपल्या वर्तनबदलासाठी फार महत्त्वाची मानली जाते. इथे त्या मुलीला ‘सून’ या भूमिकेत अडकवलेच नाही आणि आपणही स्वत:ला ‘सासू’ या भूमिकेत अडकवून घेतलं नाही, तर आपल्या जे हातात नाही त्यावरून लक्ष हटवता येतं. अपेक्षांना ‘पूर्णविराम’ नाही तरी ‘स्वल्पविराम’ देता येतो. आपलं जीवन आनंदी करण्यासाठी, आपल्या हातात काय आहे, यावर लक्ष केंद्रित करता येतं. हे अवघडच आहे, पण अशक्य नाही ना? आपल्याच चित्तशुद्धीचा प्रवास म्हणा हवं तर! मग तो उलट आपल्या लाभाचाच नाही का?

सुजय आणि स्वराली हेही आपल्या जोडीदारांकडून आपला ‘अवकाश’ जपला जावा ही रास्त अपेक्षा करत आहेत, असं तुम्हाला वाटतं का? अर्थात, हा अवकाश मागताना, केंद्रस्थानी त्यांचं वैवाहिक नातं आहे, हे त्यांना विसरून चालणार नाही. आपलं हे नातं रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी, परस्परांना वेळ देणं, सोबत करणं, एकमेकांच्या भावनांची दखल घेणं, विविध विषयांवर मोकळ्या गप्पा मारणं, त्यात परस्परांच्या मतांचा आदर करणं, उभयतांच्या समान आवडीचे उपक्रम आवर्जून करणं आणि एकमेकांच्या वेगळ्या आवडीनिवडींमध्ये एकमेकांना सामावून घेणं, तसंच निकोप नात्याचा प्राण असलेल्या लैंगिक सहजीवनाकडे दुर्लक्ष न करणं… हे सारं जाणीवपूर्वक आणि प्राधान्याने करणं, ही पती-पत्नी दोघांचीही सुयोग्य आणि रास्त जबाबदारी आहे. कारण एकटं राहण्याचा पर्याय असताना आपण लग्न करण्याची निवड केली आहे! आपला अवकाश घेणं आणि दुसर्‍याला त्याचा घेऊ देणं याचा तोल म्हणजे यापूर्वीच्या लेखात पाहिलेला, लग्नातील ‘सॅक्रीफाईज-रिवॉर्ड’ रेशिओच आहे. मला असा अवकाश लागत नसेलही कदाचित, पण दुसर्‍याला तो लागत असेल तर त्याचा आदर करायला हवा. लग्नाआधी या अवकाशाची आपली गरज समजणं आणि त्याबद्दल व्यक्त होणं गरजेचं. त्याविषयी पुढच्या भागात…

vankulk57@yahoo.co.in