विवाह व्यवस्था फक्त टिकून चालणार नाही, त्यातलं निकोपपण चिरंतन राहायला हवं असं अपेक्षित असेल तर दोन माणसांमधली भिन्नता संवादातून समजावून घ्यायला हवी आणि त्यासाठी एकमेकांसोबतचा सहवास महत्त्वाचा. ते शक्य नसेल तर शास्त्राचा आधार घेऊन विवाहपूर्व केलेली अभियोग्यता चाचणी सुखी  संसाराचा मार्ग मोकळा करेल.

माणसाला सतत वेगवेगळ्या गोष्टींचं कुतूहल वाटत आलं आहे. त्या प्रेरणेतून, तो अभ्यास करत राहतो, नवनवे अनुभव घेतो. त्यातून जिज्ञासा वाढत जाते तसे तो वेगवेगळे प्रयोग करतो. नवनवे सिद्धांत मांडतो. शास्त्र कुठलंही घ्या, त्यात प्रगती होत जाते. त्यात तंत्रज्ञान माणसाच्या मदतीला येतं.       

मानसशास्त्र हेही इतर शास्त्रां- सारखंच एक शास्त्र आहे. तेही दिवसेंदिवस प्रगत होत आहे. वैद्यकशास्त्राने प्रगतीची झेप घेत माणसाचं जगणं सुसह्य केलं. परंतु त्याच शरीरात एक मनही आहे आणि त्या मनाचं आरोग्य चांगलं राहिलं तरच जगण्याचा दर्जा उंचावतो हे आता मानवजातीच्या लक्षात आलेलं आहे. यातून मानसशास्त्र हा विषय विकसित होत आहे. त्यातून मानसिक, भावनिक आरोग्य, ‘सुदृढ मन, आनंदी जीवन’ यावर आज खूप लिहिलं, बोललं जात असलं, समाजमाध्यमावरील अनेक कार्यक्रम हा विषय घराघरात नेण्याचा प्रयत्न करत असले तरी आपल्या घराची आणि मनाची कवाडं खूप कमी लोकांनी मानसशास्त्रासाठी सहज खुली केली आहेत. त्याचा थेट परिणाम कुटुंबाकुटुंबांमधील विसंवाद, नात्यांमधील ताण, माणसं एकमेकांना दुरावणं आणि जगण्यातील अकृत्रिम आनंद हरवणं यात होत आहे. लग्न, वैवाहिक नातं, कौटुंबिक जीवन याबद्दल मनात सतत एक संदेह आणि अशाश्वतता, असुरक्षितता वाटत आहे. नातं तर हवं, पण लग्न करायचं तर शंकांचं मोहोळ उठतं. आपल्या समाजात मानसशास्त्र माणसं, कुटुंब, यांच्यासाठी इतकं अनाकलनीय का बरं आहे?

भौतिकशास्त्रातील गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सगळ्यांना माहीत असतो. झाडावरून खाली पडणारं फळ कधी तरी वर का बरं येत नाही असं कुणी म्हणतं का? झाडांची उंची वनस्पतिशास्त्राच्या नियमांनुसार ठरते, हेही आपण स्वीकारतो. कुठली रसायनं एकमेकांना पूरक होतात नि कोणती स्फोटक हे आपण जाणतो. मात्र माणसांचे स्वभाव कसे असावेत, नसावेत, बदलावेत याबद्दल आपण किती हट्टी, आग्रही असतो! लिंबू चाखावं आणि ते ‘किती ते आंबट’ अशी तक्रार करावी, अशातला तो प्रकार! मानस‘शास्त्र’ हेही शास्त्र आहे तर तेही त्याच्या नियमांनी चालणार ना?

गेल्या २५ वर्षांमध्ये माणसांचं जगणं प्रचंड बदललं. कुटुंब आणि विवाहसंस्थेचा भाग असलेली तरुण पिढी अनेक अर्थाने स्वतंत्र होत गेली. अनिका म्हणते, ‘‘मी आता आई-बाबांबरोबर राहत नाही. त्यामुळे ‘नाइट आऊट’ला का गेलीस?’ इथपासून ‘घरी यायला इतका उशीर का झाला?’ इथपर्यंतच्या त्यांच्या प्रश्नांची आता मला उत्तरं द्यावी लागत नाहीत. त्यांनी जे संस्कार केले ते मला माझं वर्तन जबाबदार ठेवायला मदत करतात. त्यांना माझ्या लग्नाची घाई आहे. मलाही करायचं आहे लग्न; परंतु एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी आता कुठे मला प्रगल्भता येते आहे. मला विचारपूर्वकच घ्यायचा आहे हा निर्णय; कारण त्यांनी केल्या तशा तडजोडी आम्हाला करायला जमणं अवघड वाटतं. ताण येतो त्याचा. चाललंय ते बरं आहे असं वाटतं…’’

आईवडील मात्र हे समजून घेऊ शकत नाहीत. त्यांचं उद्दिष्ट असतं वेळेवर (?) लग्न होणं. मुलांचं लग्न ही त्यांना त्यांची जबाबदारी वाटते. मुलांचं उद्दिष्ट असतं जोडीदाराच्या निवडीबद्दल विश्वास वाटणं. त्यांना ही मोठी जबाबदारी वाटते. निवड फसणार तर नाही ना याचा ताण असतो त्यांच्या मनावर! त्यात काही जण स्वभावत:च चिंतातुर जंतू असतात. काही अनुभवही आलेले असतात. त्यांना निर्णय घ्यायला वेळ लागत राहतो. आईवडील अस्वस्थ होत राहतात. त्याचे ताण त्यांच्या नात्यात येतात. वाद होतात. मुलं त्यांना टाळायला बघतात. कुटुंबसंस्थेची घडी विस्कटते.

माणसांच्या मतभेदांत, भांडणात जे अनेक विषय असतात, त्यात मुख्यत्वे ‘अपेक्षा आणि अपेक्षाभंग’ हा विषय असतो! अतिशय अंतर्मुख स्वभावाची, चारचौघांपेक्षा वेगळ्या, स्वतंत्र विचारांची किंवा बंडखोर वृत्तीची मुलं, भारतीय समाजाला स्वीकारणं सहसा जड जातं. पालकांना वाटतं या मुलाचा काही तरी ‘प्रॉब्लेम’ आहे. ते सारखी त्याची इतरांशी तुलना करतात. कोणती शाळा, शिक्षक कसे, यावर शाळेतला स्वीकार ठरतो. परंतु माणसांच्या व्यक्तिमत्त्वांचे बहुविध प्रकार असतात. पदार्थ कसे अनेक चवींचे असतात, निसर्गातही किती वैविध्य असतं, तसंच माणसांच्या स्वभावाचंही आहे. ‘शोले’ चित्रपट आठवतो? तिथला शत्रू एकच! गब्बर! पण त्याच्या जाचाला सामोरं जाण्याच्या पद्धती प्रत्येकाच्या किती वेगळ्या! कारण त्यांची व्यक्तिमत्त्वं पूर्ण भिन्नभिन्न आहेत.

व्यक्तीला आपली सुदृढ स्वओळख सापडत असेल, त्याचा जो कल आहे त्या क्षेत्रात ती कालांतराने चांगली स्थिरस्थावर होत असेल, अशा व्यक्तीचा इतरांना काही त्रास नसेल, ती तिच्या ‘सुरक्षित जागेत’ (कन्फर्ट झोन) मध्ये शांतपणे जगत असेल तर ती समस्याग्रस्त कशी बरं होते? अडचण ही असते का की आपण माणसांना ते आहेत तसे स्वीकारू शकत नाही? मग आपण त्यांच्या बदलण्याच्या अपेक्षा करतो का? पण ती नाही बदलली/ नाही बदलू शकली स्वत:ला, तर आपली चिडचिड, नाराजी, वैताग असं होत राहतं. मग त्या भावना आपल्या वर्तनातून उघड व्यक्त होतात. मूल अंतर्मुख असेल तर अधिकच मिटत जातं, तर बोलकी माणसं बाहेर रमायला लागतात. बंडखोर मुलं ऐकेनाशी होतात. अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचं हे चक्र चालूच राहतं. अशी मुलं मोठी होऊन घर सोडतात तेव्हा स्वत:बरोबर फारशा सुखद आठवणी कशा बरं घेऊन जातील? मुळात आपलं मूल समजून घेण्यात कमी पडलेल्या पालकांमुळे निर्माण झालेलं हे अंतर, पालकांनाच नंतर खूप जाचत राहतं. मुलं स्वत:च्या सुरक्षित जागा शोधत स्वत:च्या जगात स्थिरावतात, रमतात. मात्र पालक-मुलांमध्ये पडलेलं अंतर मिटतंच असं नाही.

आता मुळात पालकांनाच आपलं मूल समजता वा स्वीकारता येत नसेल तर आत्तापर्यंत अनोळखीच असणार्‍या नवरा-बायकोंना तर ते किती अवघड जाईल? त्यात हल्ली तर अनेकदा नवरा-बायकोचं नातं जवळपास तिशीत निर्माण होतं. त्या वयापर्यंत दोघे सज्ञान होऊन दहा-बारा वर्षं उलटलेली असतात. दोघांच्या व्यक्तिमत्त्वांची रचना मेंदूने पूर्ण केलेली असते. मानसशास्त्रीय भाषेत त्याला स्वभावाचं ‘हार्डवेअर’ असं संबोधतात. सर्वसामान्यांच्या भाषेत स्वभावाचा ‘पिंड’. या रचनेवर पालक, शिक्षक, समाज आणि सभोवताल यांचे संस्कार होतात. मुलांची जडणघडण होते. शिवाय काही स्वभाववैशिष्ट्यं आनुवंशिकतेनेही येतात. दोन माणसांची व्यक्तिमत्त्वं आणि जडणघडण संपूर्णत: भिन्न असेल तर वैवाहिक नात्यातील अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचा ऊन-सावलीचा खेळ कसा असू शकेल याची अनेक उदाहरणं आपण रोजच्या जीवनात घरात, दारात, आजूबाजूला बघत, अनुभवत असतो. हा ऊन-सावलीचा खेळ जेव्हा गडद होतो, अपेक्षाभंगाचे सल टोकदार होतात, त्यातून मग टोकाचे वाद, भांडणं व्हायला लागतात, तेव्हा वैवाहिक नात्यातील संघर्ष तीव्र होतो. त्याला इतर घटकांची, अन्य ताणतणावांचीही किनार असते. त्यामुळे तडजोड कुठे कुठे करायची? त्यापेक्षा लग्नाआधीचं आयुष्यच चांगलं होतं, असं अनेकांना वाटत असतं. त्यामुळेही निर्णय लवकर होत नाहीत

अनेकदा आपल्या स्वभावाच्या नेमकी उलट स्वभावाची व्यक्ती भेटते. एक शांत, संयमी असते तर दुसरी उतावीळ. काही जण अबोल असतात तर काही बोलके. काही खूप उत्साही तर काही निवांत. काही खूप भावनाप्रधान तर काही भावना सहज व्यक्त न करणारे. ही ती स्वभावातील भिन्नता! माणसांचं व्यक्तिमत्त्व हे अनेक रंगी, अनेक ढंगी असतं. त्यात चांगलं – वाईट, चूक – बरोबर असं काही नसतं. हा फक्त व्यक्तिमत्त्वांमधील फरक असतो. शिवाय त्याची दुसरी बाजूही असतेच. भावनांची अभिव्यक्ती मर्यादित असते तेव्हा संतापाचे स्फोट होत नाहीत. व्यक्ती कमी बोलणारी असते तेव्हा नको ते बोललं जाण्याच्या शक्यता कमी होतात.

सांगायचा मुद्दा असा की, माणसांची व्यक्तिमत्त्वं ही नाण्याच्या दोन बाजूंसारखी असतात. एकदा नाणं उचललं की दोन्ही बाजू आल्याच! शिवाय जडणघडण, लग्नापूर्वी घालवलेलं आयुष्य, कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबात अनुभवलेली माणसं, त्यांचे स्वभाव, बदलत्या, वेगवान जीवनातील आव्हानं, नोकरी-व्यवसायामधील ताण, कौटुंबिक जबाबदार्‍या… एक ना अनेक! त्यामुळे परस्परांचा आहे तसा आणि समजुतीने स्वीकार सोपा नाहीच. स्वत:ला स्थिर, संयत ठेवता येणं तर त्याहून अवघड झालंय हल्ली. त्यात हा वैवाहिक जीवनाचा अज्ञात प्रवास बर्‍याचशा अनभिज्ञ जोडीदारासोबत समोर आलेला! म्हणजे हीसुद्धा एक परीक्षाच!

मग इतर कोणतीही परीक्षा सोपी जावी म्हणून तुम्ही काय करता? अभ्यासच ना? तेच इथं! स्वत:ला आणि ज्याला जोडीदार म्हणून निवडायचं त्याला ‘जाणून’ घेण्यासाठी काय करायला हवं? एक, स्वओळख (ज्याबद्दल मागच्या लेखात बोललोच आहोत). दुसरं, मुळातून आणि स्वतंत्र विचार! विचार करू शकणारा (cognitive) मेंदू कशाला दिला आहे माणसाला? तिसरं म्हणजे विचार नेमका कशाचा करायचा? म्हणजे अनेक मुद्दे आले. आपलं आणि दुसर्‍याचं व्यक्तिमत्त्व कळणं, ते समजून घेणं हा यातील कळीचा मुद्दा. ते कसं कळणार? एक तर सहवासाने; पण ते शक्य नसेल तर मानसशास्त्राने सहजी उपलब्ध करून दिलेल्या आणि खात्रीची माहिती देणार्‍या मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग करून हे समजून घेता येतं. हल्ली सगळे जण करिअर नक्की करण्यासाठी ‘अभियोग्यता चाचणी’

(Aptitude tests)ची  मदत घेतातच की नाही? कंपन्याही कर्मचार्‍यांची निवड करताना अशा चाचण्यांची मदत घेऊ लागल्या आहेत. तशीच ही व्यक्तिमत्त्व समजण्याची चाचणी. ऑनलाइन उपलब्ध असलेली ही एक साधी वस्तुनिष्ठ (objective) संगणकीय चाचणी आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्टस ती करतात. अध्र्या, पाऊण तासात ती घेऊन चाचणी होते. आठवडाभरात अहवाल मिळतो. एकूण स्वभाववैशिष्ट्यं आणि त्या प्रत्येकाची उपवैशिष्ट्यं, वर्तनाच्या समग्रतेसह समजावणं आणि ‘रीडिंग बिटवीन द लाइन्स’ करता येणं हे हुशार, प्रशिक्षित आणि अनुभवी समुपदेशकांचं कसब असतं. चाचणीचा अहवाल समजून घेताना अनेक जण थक्क होतात. माझी ‘स्वभाव’कुंडली तुम्ही एवढी नेमकी कशी काय मांडली? तर काहींना वाटतं, हां मी असं वागतो/ वागते खरं, पण का तसं वागतो/ वागते हे आत्ता कळलं!

सुरुवातील उदाहरण दिलेल्या अनिकाला तिचा निर्णय घेताना याची किती मदत होईल. अनेकांना परस्परांच्या स्वभावातील ठळक फरक कळतील. आपल्याला या फरकांशी जुळवून घेता येईल का हे पडताळून बघता येईल. आई, वडिलांना, होणार्‍या जोडीदाराला आणि मुख्य आपल्या स्वत:ला आपलं व्यक्तिमत्त्व शास्त्रीय पद्धतीने समजून घेता आलं तर अपेक्षा कमी आणि स्वीकार सोपा होईल.

आपण वारंवार बोलतो आहोत की नव्या पिढ्यांसाठी लग्न ही घटना पूर्वीसारखी सामान्य राहिलेली नाही. तरीही ही व्यवस्था टिकावी असं सर्वांनाच वाटतं आहे. परंतु नुसती व्यवस्था टिकून उपयोग नाही. तिचं निकोपपण चिरंतन राहायला हवं टिकलं तरच विवाह आणि कुटुंबव्यवस्था अबाधित राहतील. व्यक्तिमत्त्व चाचण्या जोडीदार निवडीच्या अंतिम निर्णयासाठी लागणारा दिलासा द्यायला मदत करतील. निराशा टळेल. परस्परांना ओळखण्यातील गोंधळ, चिंता, भय, अस्वस्थता कमी करतील. एकमेकांकडून अविवेकी अपेक्षा ठेवायला लगाम लावतील. विवाहोत्सुक मुलंमुली योग्य अपेक्षा ठेवून आत्मविश्वासाने आणि निश्चिंत मनाने लग्नवेदीवर चढतील. कारण अप्रिय आश्चर्य (Unpleasant Surprises) आता कमी असतील! तडजोडींसाठी मनाची तयारी झाली असेल. वैवाहिक नातं मनासारखं जुळलं तर या व्यवस्थेतील सर्वच माणसं समाधानी राहतील. त्यातून इतर कौटुंबिक नातीही निरामय राहतील. आजकाल कुठेही टिकून राहायचं तर तंत्रज्ञानाइतकंच मानसशास्त्रही समजणं गरजेचं झालं आहे. विचार, भावना आणि वर्तनाचं हे शास्त्र समजून घेणं विवाह आणि कुटुंबव्यवस्था सदृढपणे टिकण्यासाठी आता अपरिहार्य! हे हवं, ते मात्र

नको, एखादी व्यक्ती हवी पण तिचा ठरावीक स्वभाव नको असं कसं चालेल, नाही का!

vankulk57@yahoo.co.in