‘मॉर्गन स्टॅन्ली’च्या अर्थशास्त्रज्ञांच्या मते, २०२६ मधील चालू ट्रेंड पाहता २०३० मध्ये अमेरिकेत २५ ते ४४ वयोगटातील जवळपास ४५ टक्के स्त्रिया अविवाहित आणि अपत्यहीन असतील. या पार्श्वभूमीवर भारताची परिस्थिती काय आणि कशी असेल याचाही आत्ताच विचार करायला हवा. कारण स्त्रियांच्या बाबतीतली ही आकडेवारी कुटुंब व्यवस्था आणि विवाह व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आहे. त्याची उत्तरे आत्ताच शोधायला हवीत.

आपल्या भारतीय समाजात, जन्माला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं लग्न करणं अपेक्षित धरलं जातं. ‘मला लग्न करावंसं वाटतं की नाही?’, या निवडीलाच नव्हे, तर विचारालाही फारसा थारा नाही. जन्म, बारसं, शिक्षण (ते नसेलही कदाचित!) यानंतर नोकरी करणं हे ठरलेलंच असतं. याच चालीप्रमाणे लग्न लावणं, संसार होणं, हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग. पण गंमत म्हणजे लग्न केलेली अनेक माणसं तर म्हणतात, ‘शहाण्या माणसानं लग्न करू नये!’, ‘शादी का लड्डू खाये तो भी पछताये…’ ही म्हण सर्व परिचित आहेच. मग लग्न करावं की करू नये?

गेल्या वीस-पंचवीस वर्षांत असं नेमकं काय घडलं की लग्न करावं की करू नये? याविषयीचा अनेक तरुण-तरुणींचा संभ्रम वाढला. इतका की त्यांना लग्नाऐवजी इतर पर्याय शोधावेसे वाटायला लागले? एकटं राहणं असो वा ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ मध्ये राहून बघावंसं वाटणं असो, ‘मला लग्न नाही करायचं. मला एकटं राहण्यातच जास्त आनंद वाटतो,’ ‘माझ्या जोडीदाराच्या प्रतिमेत बसणारी कुणी व्यक्ती सहज भेटली तर मी लग्नाचा विचार करेन.’ ‘पारंपरिक पद्धतीनं, जुळवाजुळव करत जमवलेलं लग्न मला मानवणार नाही,’ असं सांगणारे तरुण-तरुणी आता बरेच भेटतात.

गेल्या काही वर्षांमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचे विचार वेगळा आकार घेऊ लागले आहेत. वेगाने बदललेल्या समाजात स्त्री पुरुषांना परस्पर भेटीच्या, सहवासाच्या, सहज संधी मिळू लागल्या. पुरुषप्रधान विवाह-कुटुंब व्यवस्थेतील तडजोडीविषयक भययुक्त चिंता मानगुटीवर बसू लागल्या. (माझी मैत्रीण त्याला अतिविचार करणं म्हणते!). विवाहित असणं आणि एकटं राहणं या दोन्हीतील फायदे -तोटे बघताना, ‘एकटं राहिलेलं बरं.’ याकडे विचार झुकायला लागले.

विवाह-कुटुंब व्यवस्था समन्यायी नाही, स्त्री-पुरुष नैसर्गिक भेदातील सुंदरतेवर नवरा-बायको या भूमिकांचं रोपण झालं, की नात्यातील सहजतेवर संसारातील पारंपरिक वर्तन कुरघोडी करतं. मग वैवाहिक नातं कर्तव्य आणि जबाबदार्‍यांमध्येच अधिक अडकून पडतं, असं तरुण पिढीला वाटत असेल का? त्यापेक्षा स्वतंत्रपणे जगताना, जमेल तसा परस्परांच्या सहवासाचा आनंद घ्यावा, संसाररूपी ‘भानगडींमध्ये’ अडकू नये, असं अनेकांना वाटू लागलंय का? विवाहपूर्व प्रेमप्रकरणांचं प्रमाण बघता, विवाहोत्तर नात्याचं आकर्षणच उरत नाही की काय?, असंही आता वाटायला लागलं आहे. लैंगिक नात्याच्या बाबतीत अनेकांना वाटतं की, तुमच्या ‘शुचिते’च्या कल्पनांचा काळ वेगळा होता. लैंगिक आकर्षणाच्या लाटा तारुण्यात आल्यापासून उसळ्या मारत असताना त्यांना दहा-दहा वर्षं आम्ही कसं थोपवून ठेवणार? ‘आकाशवाणी’वर नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात एका समुपदेशकाने सांगितलं की, विवाहपूर्व लैंगिक अनुभव घेतलेल्या तरुण-तरुणींचे प्रमाण भारतात आता साठ टक्क्यांवर गेले आहे! सर्वांत जास्त वापरल्या जाणार्‍या ॲप्समध्ये ‘डेटिंग ॲप्स’ची गणना होते.

बदलत्या काळाने माणसं व्यावहारिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी होण्याच्या सर्व शक्यता सुलभ केल्या आहेत. पर्यायाने, व्यवहारातील परस्परावलंबन वेगानं कमी होत आहे. इथे ‘सांगाती’ होण्याची जागा ‘मोबाइल’नं घेतली आहे. तो स्त्री-पुरुष, नवरा-बायको असा कुठलाही भेद न करता, त्याला सांगितलेली सर्व कामं तो बिनबोभाट करतो. ‘पैसे द्या आणि सेवा घ्या.’ अशा या ‘ऑनलाइन’च्या जगात, कुणालाच कुणावर अवलंबून राहावं लागत नाही. विवाहाकडून एकमेकांना जे मिळणं अपेक्षित आहे, तो म्हणजे भावनिक, वैचारिक, लैंगिक आनंद. त्या अनुरूपतेचीच जर शाश्वतता नसेल आणि त्या गरजा विवाह न करताही भागवता येत असतील, तर विवाह म्हणजे ‘संसारात अडकण्याचं बंधन’ असं वाटणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते आहे. परंतु कोणत्याही नात्यात तडजोडही असतेच. ती करूनही वैवाहिक नात्याचा आस्वाद घेणारी आनंदी जोडपीही असतातच की. आयुष्याच्या ताळेबंदामध्ये सुखदु:खही असणारच ना? पण आपल्या विवाह व्यवस्थेने भावनिक-वैचारिक-लैंगिक साथसंगत या दृष्टीनं लग्नाकडे कधी बघितलंच नाही, असं वाटत नाही का? विवाहाबद्दल पिढ्यान् पिढ्या मुलांवर काय बिंबवलं गेलं बरं? मर्यादित जगात याचा प्रभाव टिकून राहिलाही. परंतु अवाढव्य माहिती घेऊन सगळं जगच जेव्हा घरात, आपल्या वैयक्तिक विश्वात आलं, तेव्हा पुढच्या पिढ्यांना प्रश्न पडू लागलेले दिसतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या विचारात, बोलण्यात पडू लागलं आहे. लग्नाळू तरुण-तरुणींवर पडणार्‍या एकमेकांच्या विचारांच्या परिणामांची ही उदाहरणं बघा.-

एक तरुणी सांगत होती, ‘‘आमची ओळख होऊन काही दिवस झाले होते. एकदा माझी तब्येत थोडी बरी नव्हती. ‘मेसेज’ मध्ये ते न लिहिता फक्त मी त्याला लिहिलं की, मला आज ऑफिसला जावंसं वाटत नाहीये. त्यावर त्याने ‘थम्पस् अप’ चा इमोजी टाकला आणि आमचं ‘चॅटिंग’ थांबलं. ‘का गं, तुला का जावंसं वाटत नाहीये आज कामावर? तब्येत बरी आहे ना तुझी?’, असं जर इतक्या ओळखीनंतरही याला विचारावंसं वाटत नसेल, तर पुढेही याने असाच भावनिक कोरडेपणा किंवा तुटकपणा दाखवला तर? की, ही याची मला द्यायच्या ‘स्पेस’ ची संकल्पना आहे? मला कळलं नाही.’’

एक तरुण सांगत होता, ‘‘मला भेटलेली तरुणी म्हणाली, ‘मी पर्यावरणवादी आहे. मला पाणी जपून वापरायला आवडतं आणि मी टॉयलेट टिशूचा वापर करत नाही.’ आता हे सगळं ऐकायला छान आहे. पण उद्या मी दात घासताना, दाढी करताना, अंघोळ करताना किती पाणी वाया घालवतो आहे, यावर जर ती रोज लक्ष ठेवायला लागली तर? त्यापेक्षा नकोच ती भानगड…’’

‘‘माझा पगार अनेकांना जास्त वाटतो. संभाव्य नवर्‍याशी याबाबत बोलण्याआधी त्याचे पालकच नको म्हणतात. मी असे किती नकार पचवायचे? माझी काही चूक आहे का यात?’’ अशी खंत आणखी एकीनं व्यक्त केली. ‘‘मला समाजमाध्यमांवर रमायला आवडत नाही. या कारणासाठीही मला नाकारणार्‍या मुली आहेत!’’ एका तरुणाची तक्रार ‘‘विविध विषयांवर गप्पा मारताना मतभेद झाले तर गाडी शेवटी प्रत्येकाच्या अहंकारावर येऊन घसरते. ‘kAgree to disagree’, असं कधी होतच नाही. मग लग्न झाल्यावर तर भांडणच होणार ना?’’

‘‘मी गेले आठ वर्षं नोकरी करते – करतो आहे. चांगली बचत केली आहे. आता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा असं वाटतं आहे. एक-दोन वर्षांत जम नाही बसला तर आहेच नोकरीकडे परतणं. पुरेशा अनुभवामुळे ती मिळेलही; मला खात्री आहे. पण व्यवसायाची कल्पना सांगितली की समोरची व्यक्ती नकोच म्हणते. त्यांना ती जोखीम वाटते. लग्न आणि महत्त्वाकांक्षा यांचा तोल कसा साधायचा मी?’’ असे अनेक विचार तरुण-तरुणी बोलून दाखवतात. त्यामुळे त्यांची लग्न करण्याची इच्छा मागे पडत जाते. अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती याबाबतीत ती अतिसावध असतात का?

अमेरिकेतील ‘मॉर्गन स्टॅन्ली’ या संस्थेने ११ सप्टेंबर २०२४ मध्ये अविवाहित आणि अपत्य नसलेल्या अमेरिकेतील स्त्रियांच्या वाढत्या संख्येवर सखोल संशोधन केलं.

‘Rise of the SHEconomy’ हा त्यांचा अहवाल प्रसिद्ध झाला. संशोधनातील प्रमुख निष्कर्ष असे होते, १) अर्थशास्त्रज्ञांच्या मते, २०२६ मधील चालू ट्रेंड पाहता २०३० मध्ये अमेरिकेत २५ ते ४४ वयोगटातील जवळपास ४५ टक्के स्त्रिया अविवाहित आणि अपत्यहीन असतील.

२) २०१८ मध्ये हे प्रमाण ४१ टक्के होते, जे २०२६ मध्ये अधिक वाढले असून, ही इतिहासातील सर्वात मोठी टक्केवारी ठरू शकेल.(अधिक माहितीसाठी तुम्ही ‘ Morganstanley- Rise of the SHEconomy’ या अधिकृत संकेतस्थळावरील संशोधन पाहू शकता.) यामागील मुख्य कारणे आहेत : १. आर्थिक स्वावलंबन (शिक्षण-नोकरी-व्यवसायातील स्त्रियांचा वाढता सहभाग), २. करिअरला प्राधान्य (पारंपरिक कौटुंबिक जबाबदार्‍यांपेक्षा स्वत:च्या व्यावसायिक प्रगती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला स्त्रिया अधिक महत्त्व देत आहेत),अमूर्त (Abstract) आणि ठोस (Concrete) यातील हा फरक आहे. शिक्षण जसे पदवीचे प्रमाणपत्र देतात, नोकरी-व्यवसाय जसं वाढतं उत्पन्न, पदोन्नती, वेगवेगळ्या पुरस्कारामधून तुम्हाला ओळख मिळणं अशा ठोस गोष्टी देतात, आत्मसन्मान वाढवतात, तसं विवाह देऊ शकत नाहीत. कारण मुळातच नातेसंबंध हे अमूर्त असतात. ३. बदलते सामाजिक निकष जसं की, लग्नाचं वय वाढणं, मुलांविषयीच्या विचारांमध्ये बदल होणं आणि विवाहाच्या मानकांमध्ये वाढ होणं. ४. स्त्रियांना स्वातंत्र्य आवडतं आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वत: घेऊ इच्छितात.

विवाहाबद्दलची भारतीय मानसिकता वेगळी आहे. अनेकांना वाटतं, की यातून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. जसं, पारंपरिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते. करिअरचा भर ओसरल्यावर एकटेपणा येऊ शकतो. आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कुणी नसेल तर प्रगती, पद आणि पैशांचा काय उपयोग? वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. काहींना समाजाचे एकूण संतुलन आणि भविष्यातील स्थिरता याबद्दल चिंता वाटते आहे. समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणं ही खरी प्रगती आहे, असं त्यांना वाटतं. परंतु हे संतुलन राखण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने उचलायच्या जबाबदारीबद्दलही बोललं पाहिजे ना? ‘आपला’ समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का? असा प्रश्नही अनेकांना भेडसावत आहे. समाज हा कुटुंबांनीच बनतो. या कुटुंबातील मूल्य समन्यायी कशी बनतील हे पाहणं ही बदलत्या समाजाची गरज वर्तमानात दुर्लक्षून आपण भविष्याबद्दलच्या चिंता कशा वाहणार? खरं तर विवाह आणि संतती हे आयुष्यातील आनंदाचे टप्पे आहेत. निसर्गाने स्त्रियांना सृजनाची ही विशेष भेट दिली आहे, तर प्रगत बालमानसशास्त्राने उभयपक्षी
आनंदी पालकत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.

त्यामुळे ‘मुलंमुली लग्नाला नकार का देत आहेत?’ या प्रश्नाच्या निमित्तानं काही प्रश्न स्वत:ला विचारायला हवेत, विवाहातून सदृढ नाती, मजबूत एकसंध कौटुंबिक रचना कशी निर्माण करता येईल? हा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न.
uvankulk57@yahoo.co.in