रशिया आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धातील मोहरा ठरलेल्या अमेरिकेच्या रशियातल्या पहिल्या स्त्री गुप्तहेर होत्या, मार्था पीटरसन! अमेरिकी गुप्तहेर संस्थेत ‘सीआयए’ अधिकारी असलेले त्यांचे पती जॉन पीटरसन यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी ‘सीआयए’ मध्ये गुप्तहेर म्हणून प्रवेश घेतला, मात्र त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. अखेर गुप्तहेर म्हणून त्यांची निवड झाली आणि सुरू झाला एक प्रवास, धाडसाचा, गुप्ततेचा, देशाला वाचवण्याचा…

जगात कधीच, कुठंच युद्ध होऊ नये, कारण त्यात दोन्हीही बाजूंची अपरिमित हानीच होते. असं असतानाही युद्ध आणि अराजक यांनी इतिहास आणि वर्तमानही बरबटलेला आहे. दुसरं महायुद्ध संपलं तरी रशिया आणि अमेरिका यांच्यात शीतयुद्ध हे पुढं बराच काळ सुरू होतं. (साधारणत: १९४७ ते १९९१. तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १९७२ मध्ये मॉस्को येथे शस्त्र नियमन करार केला होता, तरीही.)

ते या काळात एकमेकांशी समोरासमोर लढले नाहीत, पण अवकाश संशोधन, परमाणू अस्त्रविषयक संशोधन, इतर राजकीय हितसंबंध, वित्तीय क्षेत्रातील चढाओढ, संरक्षणनीती…अशी अनेक आघाड्यांवर स्पर्धा कायम होती. अमेरिका आणि रशिया यांच्या गुप्तहेर संघटना ( सी.आय.ए. आणि के.जी.बी) यांच्यात सतत कुरघोड्या आणि छुपे खेळ चालूच होते. अशा परिस्थितीत अमेरिकी गुप्तचर संघटना ‘सी.आय.ए.’ नं त्यांचा एक मोहरा पुढे केला. त्यांची रशियामध्ये असणारी पहिली महिला गुप्तहेर, मार्था पीटरसन!

नोव्हेंबर १९७५, रशियामधील मॉस्को येथे हाडं गोठवणारी थंडी होती. आपले वजनदार बुट सांभाळत मार्था बागेतील एका बेंचपाशी गेल्या. त्यांना मिळालेल्या सूचनेनुसार बर्चच्या विशिष्ट झाडाशेजारील खूण केलेल्या बेंचखाली खोबणीत एक लांबुळकी डबी ठेवण्यात येणार होती. बागेतील काड्या गोळा केल्यासारखं करत सहजपणे त्यांनी ती डबी उचलली आणि तिथून निघाल्या. घरी गेल्याबरोबर त्यांनी ती डबी उघडून त्यातील अत्यंत महत्त्वाची माहिती मॉस्कोमधील ‘सी.आय.ए.’ स्टेशनपर्यंत पोचवली. तिथून ती माहिती अमेरिकेतील ‘सी.आय.ए.’ मुख्यालयात पोचवण्यात आली. अशा प्रकारे कुठलेही शस्त्र न वापरता, रक्तपात न करता मार्था यांनी असंख्य गुप्त बातम्या ‘सी.आय.ए.’ पर्यंत पोचवल्या. प्रत्यक्ष हेर एकमेकांना भेटत नसत. एका व्यक्तीनं कागदपत्र, वस्तू किंवा फोटो संकेतस्थळी लपवून तिथून ती दुसर्‍यानं ताब्यात घेऊन माहितीची देवाणघेवाण करण्यास ‘डेड ड्रॉप’ म्हणतात. या ‘डेड ड्रॉप’ मार्फत त्यांनी कोणकोणती माहिती पुरवली?

सोव्हिएत रशियाच्या परराष्ट्र नीतीसंबंधी माहिती, मॉस्कोमधून रशियन वकिलातीकडे पाठवले जाणारे अति महत्त्वाचे पत्र, तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची छायाचित्रफीत, रशियातील सुरक्षानीतीमधील बदल, त्यांच्या अंतर्गत नियुक्तीसंबंधी माहिती, इतर देशात होऊ घातलेली मोठ्या खरेदी-विक्री संदर्भातील योजना, अशी भरपूर माहिती त्यांनी पुरवली. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही माहिती त्यांना कोण पुरवत होतं? तर याचं उत्तर आहे, ट्रायगॉन (ळफकॅडठ)! हे अलेक्झांडर दिमित्रीवीच ऑग्रोदनिक यांचं ‘सी.आय.ए.’ नं दिलेलं सांकेतिक नाव. ट्रायगॉन हे स्वत: सोव्हिएत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात उच्चपदस्थ अधिकारी होते. त्यांच्या मनात रशियाच्या समाजवादी राजवटीबाबत नाराजी किंवा गैरसमज आहेत, ते एकटेपणामुळे ग्रासलेले आहेत, आणि पश्चिमी राष्ट्रांबाबत सहानुभूती बाळगून आहेत हे समजल्याबरोबर ‘सी.आय.ए.’ नं त्यांच्यासमोर अमेरिकेसाठी काम करण्याचा प्रस्ताव मांडला. नैराश्याने ग्रासलेल्या अलेक्झांडर यांनी तो स्वीकारला. ‘सी.आय.ए.’ साठी ती अर्थातच अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती. परराष्ट्र खात्यात काम करत असल्याने त्यांच्याकडे अमेरिकेला हवी असलेली अत्यंत महत्त्वाची गुपितं होती. त्यांनी पुरवलेली बहुतांश माहिती छायाचित्रित स्वरूपात असायची, कारण फिल्मची गुंडाळी आकारानं छोटी, हाताळायला सोपी जात असे.

मार्था यांना ट्रायगॉन यांचा ‘हँडलर’ म्हणून रशियात पाठवण्यात आलं होतं. ट्रायगॉन यांची सुरक्षा, त्यांच्यावर देखरेख, आर्थिक मदत, उपकरणं पुरवणं आणि कुठल्याही समस्यांपासून त्यांना दूर ठेवणं ही मार्था यांची जबाबदारी होती. खरा धोका मार्था यांना होता कारण रशियाच्या ‘केजिबी’ ची तिथल्या अमेरिकी दूतावासात काम करणार्‍यांवर सतत नजर असायची . त्यांची नजर चुकवून वेगवेगळ्या वेशात कागदपत्र किंवा फोटोग्राफ असलेली पाकिटं उचलून सुरक्षित ठिकाणी पोचवणं जीवावर बेतणारं होतं.

कोण होत्या या जिगरबाज मार्था? मार्टी म्हणजेच मार्था जेन डॅनी यांचा जन्म २७ मे १९४५ रोजी अमेरिकेतील मिसूरी राज्यामधील कॅन्सस येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण कनेक्टिकट येथे झालं आणि तिथंच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. १९६७ मध्ये न्यू जर्सी येथील ‘ड्र्यू’ युनिव्हर्सिटी मधून पदवी घेतल्यानंतर त्यांची ओळख जॉन पीटरसन यांच्याशी झाली. दोघांनी लग्न केलं, आणि काही काळातच जॉन पीटरसन अमेरिकी गुप्तहेर संस्था ‘सी.आय.ए.’ येथे अधिकारी म्हणून रुजू झाले. जेव्हा १९७० च्या सुरुवातीच्या काळात व्हिएतनाम युद्ध सुरू झालं तेव्हा दोघं लाओस येथे राहात होते. एका गुप्त कामगिरीसाठी जॉन यांना व्हिएतनाम येथे जावं लागलं. सगळीकडे युद्धाची धुमश्चक्री चालू होती. काही काळ ते त्या कामगिरीवर होते. अशात तिथं जाऊन गुप्त माहिती काढण्याची कामगिरी करताना १९७२ मध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला झाला. त्यांनी पॅराशूटद्वारे उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली. पतीच्या मृत्यूमुळे त्या दु:खी झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही. तिथून निघून येण्याऐवजी त्यांनी लगेचच १९७३ मध्ये स्वत: ‘सी.आय.ए.’ मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासारख्या कणखर वृत्तीच्या ्त्रिरयांची ‘सी.आय.ए.’ ला गरज होतीच. तिथून गुप्तहेर होण्याच्या त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली.

लिहिल्यानंतर अक्षरं अदृश्य होतील अशा शाईचा वापर करून संदेश लिहिणं, आलेला वाचणं, रस्त्यानं जाता जाता अगदी सहज एखादी वस्तू समोरील व्यक्तीकडे हस्तांतरित करणं, याचं प्रशिक्षण सुरू झालं. गुप्त ठिकाणी वस्तू ठेवणं किंवा ठेवलेली वस्तू उचलणं,( डेड ड्रॉप) पुढे आपल्या सहकार्‍यानं ती मिळवली की नाही यावर लक्ष ठेवणं. रोजच्या वापराच्या वस्तूत निरोप लपवणं जसं की पेन, नाणं, चष्मा, किल्ली याचाही त्यात समावेश होता. खोटी ओळख घेऊन वावरणं हे तर प्रत्येकच हेरास करावं लागे. एखाद्या ठिकाणावरून चटकन गायब होण्याचं अजब कसब मार्था यांनी आत्मसात केलं होतं. त्यांनी अत्यंत बारकाईनं रशिया आणि तिथल्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला. रशियाची भाषा अवगत केली, कारण त्यांना आतल्या गोटातील बातम्यांसाठी रशियात पाठवण्यात येणार होतं.अखेर १९७५ मध्ये एका अतिशय तयार स्त्री ‘सी.आय.ए.’ एजंटचा अमेरिकी दूतावासात अधिकारी म्हणून रशियात प्रवेश झाला होता.

१५ जुलै १९७७ रोजी मार्था यांना सांकेतिक भाषेत एक निरोप मिळाला. मॉस्कोमधील प्रसिद्ध पुलावर एका ठिकाणी ‘डेडड्रॉप’ साठी जावं लागणार होतं. मार्था यांनी कपड्यात कॅमेरा, आणि रेडिओ सिग्नल पकडणारं मशीन लपवलं. रशियन गुप्तचर विभागाचे हेर तिथं सक्रिय असतील तर त्यांना मशीनमुळं सावध होऊन परत फिरता येणार होतं. रात्री दहाच्या सुमारास त्या पूर्ण तयारीनिशी पुलावर गेल्या. आधी सिग्नल पकडणारं मशीन वापरून तिथं धोका नसल्याची खात्री केली. तिथल्या टॉवरच्या एका दगडाच्या कपारीत पार्सल ठेवलेलं होतं ते ताब्यात घेतलं आणि अचानक तीनचार जणांनी त्यांच्यावर झडप घातली. आजूबाजूला कुठे ‘ट्रायगॉन’ असतील तर त्यांना सावध करावं म्हणून त्या जोरजोरात ओरडल्या. सर्व ताकदीनिशी विरोध केला, परंतु त्या लोकांची पकड मजबूत होती. हातात पार्सल घेतलेले, सोबत छुपा कॅमेरा आणि इतर साधनं असलेले मार्था यांचे फोटो तर त्यांनी काढून घेतलेच शिवाय त्यांना ताब्यातही घेतलं. त्यांच्या कंपूमधील कुणीतरी फितुरी करून माहिती दिल्यानं मार्थासारख्या चतुर आणि चपळ हेर पकडल्या गेल्या.

त्यांची कसून चौकशी झाली परंतु मार्था अत्यंत शांत होत्या. धैर्यानं सगळ्या प्रश्नांना सामोर्‍या जात होत्या. त्या पूर्ण सत्य सांगत नाहीयेत हे समजल्यावर अधिकारी कडाडले, ‘‘मॅडम, तुम्ही अलेक्झांडर(ट्रायगॉन) यांना वाचवण्यासाठी खोट्या कहाण्या रचणं बंद करा. अलेक्झांडर या जगात नाहीत.’’ हे ऐकून मात्र मार्था यांना फार मोठा धक्का बसला. त्यांनी तब्बल अठरा महिने रशियात राहून हेरगिरी केली होती. त्या काळात त्या आणि ट्रायगॉन समोरासमोर न भेटता एकमेकांची सावली बनले होते. अलेक्झांडर यांच्यावर ‘केजिबी’ला संशय होता म्हणून त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. ‘सी.आय.ए.’ प्रतिनिधीशी बोलताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं . चौकशी दरम्यान त्यांना कबुलीजबाब पत्रावर सही करण्यास सांगण्यात आलं. त्यांनी सही करण्यासाठी स्वत:चं पेन मागितलं. पेन हातात आल्याबरोबर त्यांनी पेनच्या टोकाशी असलेली छोटी ‘कॅप’ उघडली आणि त्यातील सायनाईड गिळून आयुष्य संपवलं. कबुली देणं किंवा कुठलीही माहिती देण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करलं. (अटीतटीच्या वेळी आत्मघातासाठी अलेक्झांडर यांनी ‘सी.आय.ए.’ कडून ते पेन मागून घेतलं होतं असे उल्लेख आहेत) इतक्या मोठ्या पदावर असताना आपण रशियाची एक नाही तर असंख्य गुपितं अमेरिकेस पुरवली त्यामुळे पकडल्या गेल्यावर देहांताची शिक्षा अटळ आहे याची अलेक्झांडर यांना कल्पना होतीच.

ताब्यात घेतल्यानंतर मार्था यांना लुब्यांका येथे ‘केजीबी’ मुख्यालयात नेण्यात आलं. त्यांच्या सुटकेसाठी रशियातील अमेरिकी दूतावासाकडून दबाव आणण्यात आला. त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून राजनैतिक दर्जा आणि दबाव यामुळं त्यांची सुटका झाली. मार्था यांना रशियातून हद्दपार करण्यात आलं असलं तरी त्या बचावल्या ही फार दुर्मिळ बाब होती. अमेरिकेत परत गेल्यावर २००३ मध्ये वरिष्ठ गुप्तचर अधिकारी म्हणून निवृत्त होईपर्यंत त्यांनी ‘सी.आय.ए.’ साठी काम केलं .

३२ वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्यांनी ‘द विडो स्पाय’ हे पुस्तक लिहिलं, पण त्यात पकडल्या गेल्यानंतरच्या काळाबद्दल फारसं लिहिलेलं नाही. त्यांनी कायम जोखीम उचलून पुरवलेल्या माहितीमुळे अमेरिकेला फार मोठा राजनैतिक फायदा झाला. त्यासाठी त्यांना ‘जॉर्ज एच. डब्ल्यू अवॉर्ड’, ‘डिस्टिंग्विशड् करिअर इंटेलिजन्स मेडल’ , ‘विल्यम डॉनली अवॉर्ड’ आणि काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं .‘सीएनएन’ चॅनलच्या (Declassified TRIGON: KGB chess game) या मालिकेच्या पहिल्या भागात ‘ट्रायगॉन’ यांच्यावरील भागात मार्था यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे.

दुसर्‍या देशात एक राजनैतिक अधिकारी म्हणून जाऊन अशा प्रकारे हेरगिरी करणं किती नैतिक-अनैतिक आहे हा कायम वादाचा मुद्दा असेल, पण जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा नैतिकतेच्या सीमारेषा पुसट होत जातात हे नक्की.
adaparnadeshpande@gmail.com