|| रोहिणी हट्टंगडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटसृष्टीचं वरवर दिसणारं रूप कितीही चमकदार असलं, तरी त्यात प्रत्यक्ष वावरताना आपल्या समजांपेक्षा बरेच वेगळे असे अनुभव येतात. यातले काही अनुभव गंमत वाटावी असेच असतात, तर काही अगदी विचित्र किं वा धडा शिकवणारे. मलाही असे अनेक अनुभव आले. ‘हीरो-हीरोइन’व्यतिरिक्त इतर कलाकारांना मिळणारी वागणूक असो, ‘स्टार’ होण्यासाठी आपलं गाव, घर सोडून येणारी मुलंमुली असोत, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पाळल्या जाणाऱ्या एके क श्रद्धा असोत किं वा चित्रपटाच्या संकलनात घडवल्या जाणाऱ्या करामती. किती तरी किस्से! या दुनियेचं वास्तवात राहून आकलन करून घेण्यासाठी मला या प्रत्येक अनुभवाची मदतच झाली.            

माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात अनेक अनुभव आले. काही गमतीशीर, काही विचित्र, काही शिकवणारे आणि काही असेच! अर्थात प्रत्येक अनुभव प्रथम ‘अनुभवला’ पाहिजे. ‘गांधी’ चित्रपटानंतर लगेच मी जो चित्रपट केला, तो होता ‘अर्थ’. तसं बघायला गेलं, तर ‘कमर्शियल’ असा तो पहिलाच चित्रपट. दोन-चार दिवसांचं शूट झालं होतं माझं. शेवटचा सीन पोलीस ठाण्यातला होता, ‘फिल्मिस्तान’ स्टुडिओमध्ये. मुंबईतल्या स्टुडिओमध्ये जाण्याची तशी पहिलीच वेळ; पण सर्व व्यवस्था चांगली होती. मला माझी वेगळी मेकअप रूम होती. सीन झाला. संध्याकाळी साडेसात वाजता ‘पॅकअप’ झाला. (तेव्हा शिफ्ट्स ९ ते ६, २ ते १० अशा असायच्या.

९ ते ९अलीकडे चालू झाल्या आहेत. ‘डेली’ मालिका चालू झाल्यापासून फिल्मवालेही सोयीस्करपणे तसंच करायला लागले.) तर, पॅकअप झाला, मी ड्रेस बदलून खाली आले आणि सगळं सामसूम! युनिटमधलं कुणीच दिसेना. मी बावचळलेच. माझ्याबरोबर ना मेकअपमन, ना हेअरड्रेसर! आणि तेव्हा माझ्याकडे गाडीही नव्हती. एकटी नुसती इकडेतिकडे बघत उभी. अंधारून आलं होतं. नाटक झाल्यावर एकमेकांना ‘बाय- बाय’ म्हणत, ‘तू कशी जाणार? सोडू का?’ वगैरे विचारत बाहेर पडायची सवय! आणि इथे? सगळे गायब. बस्स, काम संपलं! तुम्ही तुमचे. ‘हीरोइन’ नव्हते ना मी! आजही मी माझी ती अवस्था विसरू शकले नाहीये. मला तसं बघून आवराआवर करणाऱ्या स्पॉटबॉयनं  विचारलं, ‘‘क्या हुआ मॅडम?’’ म्हटलं, ‘‘कुछ नहीं, सब चले गये क्या?’’ ‘‘हाँ मॅडम, आप…’’ बोलता बोलता थांबला. माझ्याकडे गाडी नाही, हे दिसतच होतं. ‘‘मैं टॅक्सी बुलाता हूँ,’’ म्हणून तो टॅक्सी घेऊन आला आणि मी स्टुडिओतून बाहेर पडले. इथे कुणी कुणाचा नाही, हे कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसलं. त्यामुळे नंतर शूटिंगहून निघताना पॅकअपनंतर नवीन मुलींना जायची व्यवस्था आहे ना, म्हणून चौकशी करायला लागले. ज्युनिअर आर्टिस्ट मुलींनी विचारलं, तर लिफ्टही द्यायला लागले. पण आता मात्र पहिल्यापेक्षा मुली स्मार्ट झाल्या आहेत आणि सोयीसुद्धा वाढल्या आहेत.

  मी व्यावसायिक चित्रपटात आणि अधिक प्रमाणात आईच्याच भूमिका केल्या. माझी सगळी  ‘मुलं’ माझ्यापेक्षा कमीत कमी दहा वर्षांनी मोठी. बहुतांशी सगळ्यांना एकटीनं वाढवलेलं! ‘यंग टू ओल्ड’ अशी भूमिकेची पार्श्वभूमी आहे, असं वर्णन करायचे माझ्याकडे विचारणा करताना. एकदा तर एका निर्मात्यांनी माझ्या भूमिकेला केंद्रस्थानी ठेवून गोष्ट अशी रंगवून सांगितली, की वाटावं मीच त्या चित्रपटाची हीरोइन! विचारलं, ‘‘किती दिवस लागणार आहेत?’’ तर म्हणाला, ‘‘पाच!’’ म्हटलं, ‘‘पांच दिनोंमें फिल्म बना रहे हैं आप?’’ ‘‘नहीं जी…’’ त्याला कळलं मला काय म्हणायचं आहे. अर्थात तो चित्रपट मी नाहीच केला; पण लक्षात ठेवण्यासारखं बरंच मिळालं. नंतर सेक्रेटरी ठेवल्यावर असा काही प्रसंग आला नाही.

 आणखी एक प्रसंग आठवतो. जयदेव (हट्टंगडी) तेव्हा नुकताच नाट्य शिबिरं घ्यायला लागला होता. तेव्हा आम्ही वडाळ्याला राहात होतो. एक मुलगा माझा पत्ता शोधत आमच्या घरी आला. दिसायला साधारण, मध्यम उंची, गव्हाळ वर्ण आणि चेहऱ्यावर कसले तरी व्रण. फिल्ममध्ये काम पाहिजे म्हणाला. सुदैवानं जयदेव घरात होता. त्यानं सगळी माहिती विचारली. तो मुलगा गावाकडची शेती सोडून मुंबईत चित्रपटात काम करायला आला होता. नाटकातही काम करायचा अनुभव शून्य. ‘‘कशाच्या जोरावर काम करायला आलास?’’ विचारलं, तर उत्तर मिळालं, ‘‘ओम पुरी के चेहरेपर चेचक (देवी) के दाग हैं. मेरे भी हैं. अगर वो हीरो बन सकते हैं… मैं भी बन सकता हूँ.’’ अवाक् झालो आम्ही! फिल्मी दुनियेबद्दल अशा विचित्र कल्पना, भावना असतात. हीरोंच्या ‘सक्सेस स्टोरीज’ना भुलून कित्येक जण घरदार, शेती, जमीन विकून, घरच्यांशी भांडून मुंबईत नशीब आजमावायला येतात. काही जमत नाही हे लक्षात आल्यावरही, ‘तोऱ्यात निघालो होतो, परत कोणत्या तोंडानं जाऊ?’ म्हणून येईल ते काम करत राहतात. माझ्याकडे त्या वेळी स्पॉटबॉय म्हणून काम करणारा लालचंद हा चाळिशीतला माणूस माझ्या समोरचं जिवंत उदाहरण होता. गाव सोडून आला, उमेदीच्या काळात सिनेमात काम मिळेल या आशेवर स्टारच्या घरची कामं करत राहिला, तो तिथेच अडकून पडला. परत जायची ‘हिंमत नहीं थी’ म्हणायचा. अर्थात हे सगळं तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं सांगते आहे. आता परिस्थिती जरा बरी असावी. निदान या क्षेत्रात येण्यासाठी नाट्य शिक्षणाची गरज असते, हे तरी लोकांच्या लक्षात आलंय. नाही तर ‘अभ्यासात काही प्रगती नाही हो याची, नाटकात घ्या ना याला!’ असं सांगणारे पालकही भेटले आहेत.

कधी कधी गंमतशीर प्रकार घडतात. अनेक प्रकारची माणसं भेटतात. एक प्रसंग आठवतोय. एक प्रसंग आणि दोन बघायचे दृष्टिकोन वेगवेगळे! मी ‘कृष्णा’ चित्रपटात सुनील शेट्टीच्या आईची भूमिका करत होते. प्रसंग असा होता, की सुनील शेट्टीला पकडून एका गाडीतून नेतायत. समोरून अंत्ययात्रा जाते आहे आणि ती आपल्या आईची आहे हे सुनीलला कळतं वगैरे. साहजिकच चेहरा तर दिसायला हवा, त्यामुळे (मृतदेहाच्या जागी) डमी वापरून चालणार नव्हतं. मलाच तिरडीवर झोपायला लागलं. तेही ठीकच. शूट रस्त्यावर चालू होतं. माझ्या सेक्रेटरी जीत खुराना मला तिथे भेटायला आल्या. शॉट संपला होता. रस्त्याच्या बाजूला तिरडी ठेवत होते. कोणाला तरी त्यांनी विचारलं, ‘‘रोहिणीजी कहाँ हैं?’’ उत्तर आलं, ‘‘वो क्या वहाँ पडी हैं!’’ एकदम भडकल्याच त्या. ‘‘अच्छेसे, तमीजसे नहीं बोल सकते? ये ‘पडी हैं’ ऐसा बोलते हैं क्या?’’ डोळ्यांत पाणी होतं त्यांच्या. इतका संवेदनाहीन होऊन जातो का माणूस रोजच्या रोज तेच तेच करून? याच्या उलट दुसरा प्रसंग. मद्रासला (आताचं चेन्नई) एका हिंदी चित्रपटाचं चित्रीकरण. त्यात माझ्या व्यक्तिरेखेचा मृत्यू झालाय आणि पांढऱ्या चादरीवर मला झोपून राहायचं होतं. छोटाच सीन होता. सीन संपला. मी उठले आणि बाहेर मेकअप रूमकडे जात होते, तेव्हा दाराच्या आतच स्पॉटबॉयनं अडवलं. ‘थांबा’ म्हणाला. माझ्यावरून नारळ ओवाळून टाकला आणि म्हणाला, ‘‘अब ठीक हैं. जाओ!’’ मी विचारलं, ‘‘हे कशासाठी?’’ तर ‘‘अम्मा, तुम वो उदर सोया था ना? डेडबॉडी करके. तो ऐसा करके ठीक होता!’’ भारी वाटलं मला! राम गोपाल वर्मांचा ‘रात’ चित्रपट केला त्याचा ‘डीओपी’ (कॅमेरामन) सूर्या होता. आणखी एका हिंदी चित्रपटात तो ‘डीओपी’ होता, तेव्हा असाच एक सीन केला. असाच पांढऱ्या चादरीवर क्लोजअप झाला. मी उठायला लागले, तर तो म्हणाला, ‘‘रोहिणीजी, एक मिनिट…’’ कॅमेरा सुरू करून म्हणाला, ‘‘उठते उठते कॅमेरामें देखकर स्माईल किजीये! यू प्लेड डेड इसलिये.’’ एकेकाची श्रद्धा असते, विश्वास असतो! नकारात्मकता कु णालाच नको असते. मग श्रद्धा असो किंवा नसो.

 इंडस्ट्रीमध्ये चित्रपट पूर्ण न होणं, पूर्ण झाला तरी प्रदर्शित न होणं, कधी चित्रीकरण सुरू व्हायच्या आधीच पूर्ण प्रोजेक्ट रद्द होणं, असे बरेच अनुभव येतात; पण मला एक अगदी वेगळाच अनुभव आला. पूर्वी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी पूर्ण पैसे मिळावेत म्हणून ‘लॅब लेटर’ घ्यायची सोय होती. निर्मात्यानं फिल्मची प्रिंट रीलीजसाठी लॅबकडून घेताना कलाकारांची बाकी रक्कम लॅबकडे द्यायची आणि मग लॅब त्यांची त्यांची रक्कम कलाकारांना देणार. तर अशी दोन-तीन लॅब लेटर्स माझ्याकडे होती. खूप जुनी गोष्ट आहे ही. वीस-पंचवीस वर्षं झाली असतील. झाली गंमत अशी, त्या वेळी ‘दूरदर्शन’वर रविवारी दुपारी दीड वाजता हिंदी चित्रपट दाखवले जायचे. एकदा अचानक मी आणि सईद जाफरी असलेला सीन सुरू झाला. त्या चित्रपटाचं लॅब लेटर माझ्याकडे होतं. म्हटलं, हा चित्रपट पूर्ण झाला, टीव्हीवर आला आणि आपल्याला माहीत नाही? घाईघाईनं माझ्या सेक्रेटरीला फोन केला. म्हटलं, टीव्ही लावून बघ! पण नंतर कोणी तरी वेगळेच अभिनेते दिसले. विचार आला, हे काय गौडबंगाल आहे? मग त्या चित्रपटाचं नाव बघितलं, व्हिडीओ लायब्ररीमध्ये गेले आणि त्या नावाचा चित्रपट आहे का, ते विचारलं. चक्क होता! घरी आणून तो बघितला आणि काय सांगू? दोन वेगवेगळे चित्रपट एकत्र करून तो चित्रपट तयार केला होता. आमच्या चित्रपटात ऋषी कपूर, जयाप्रदा, राज बब्बर, माधवी, अशी स्टारकास्ट होती आणि दुसऱ्यामध्ये धर्मेंद्र, जयाप्रदा! डबिंग करताना त्यातलं जयाप्रदाचं नृत्य असलेलं गाणं मी बघितलं होतं. त्या मूळ गाण्यात ऋषी कपूर बघतोय असं होतं. तर आता त्याचे क्लोजअप्स काढून एडिटिंगमध्ये धर्मेंद्रचे टाकले होते! माधवी आणि राज बब्बरची चित्रपटात दोन गाणी आणि टायटल्समध्ये नावही नाही. चित्रपट तर धन्यवादच होता! कसलाच मेळ लागत नव्हता. हा प्रकार पाहून राज बब्बरशी संपर्क  साधला. (तोही राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचाच ना!) त्याच्या सेक्रेटरीनं सांगितलं, की हा सगळा प्रकार त्यांना माहीत आहे आणि केस कोर्टात आहे; पण आशा कमीच. मग काय बोलणार? पण एडिटिंग टेबलवर काय होऊ शकतं, ते कळलं.

 एडिटिंगचा आणखी एक गमतीशीर किस्सा आठवला. मी ‘हमसे ना टकराना’ चित्रपटाचं डबिंग करत होते. त्या वेळी धरमजी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या एका मारामारीत शेवटी मी येते असा काहीसा सीन होता. तेव्हा आमचे दिग्दर्शक दीपक बहारींनी मला विचारलं, ‘‘रोहिणीजी, इस सीन में कुछ खास हैं. बताइये क्या हैं?’’ त्यांनी पूर्ण सीन मला परत दाखवला. माझ्या काही लक्षातच येईना. साधीसुधी मारामारी. त्यात ना पाठलाग, ना उड्या, ना गाडीघोडे. मग तेच म्हणाले, ‘‘यात धरमजी आणि शत्रूजी यांचा एकही एकत्र शॉट नाहीये! दोघांच्या तारखाच एकत्र मिळत नव्हत्या. मग फायटर्सबरोबर, बॉडी डबलबरोबर शॉट्स घेतले आणि पूर्ण केला सीन. काय करणार!’’  जगदीश सधाना हे दिग्दर्शक स्वत: एक चांगले एडिटर (संकलक). त्यांनी एका चित्रपटात क्लायमॅक्ससाठी धरमजींच्या तारखा मिळूनही ते चित्रीकरणाला येऊ शकले नाहीत, म्हणून त्यांचे बरेचसे शॉट्स बॉडी डबल घेऊन संपवले आणि नंतर एक दिवस फक्त काही तासांत त्याच चित्रपटाचा दुसरा हीरो ऋषी कपूरला विनंती करून धरमजींचे क्लोजेस आणि त्या दोघांचं एकत्र चित्रीकरण पूर्ण केलं. चित्रपट बघताना वाटतही नाही हे असं काही केलेलं.

 खूप गमतीजमती होत असतात. काही लक्षात येतात, काही खपून जातात. एकाच सीनमध्ये एका खोलीत एक साडी, तिथूनच बाहेर येताना दुसरी आणि परत त्याच खोलीत आल्यावर पहिली! असं माझ्या एका चित्रपटात झालं आहे. खोलीतला सीन आणि बाहेरचा सीन यांचं शूटिंग वेगवेगळ्या दिवशी झालं आणि सहाय्यक दिग्दर्शकानं ‘कन्टिन्युइटी’- म्हणजे दृश्यामधली सलगता बघण्यात चूक केली. किती तरी गोष्टींचं भान राखावं लागतं.

अगदी लेखनापासून चित्रपट पूर्ण होईपर्यंत हजारो गोष्टी असतात. ही सोपी गोष्ट नाही. पुढच्या वेळी चित्रपट बघताना तो वाईट निघाला तरी थोड्या सहानुभूतीनं बघाल ना?…

hattangadyrohini@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Me rohini author rohini hattangadi article tales serious and funny akp
First published on: 23-10-2021 at 00:02 IST