प्रा. दैवता पाटील
समाजमाध्यमांच्या गर्दीत आणि ३० सेकंदांच्या माहितीत गरज असते ती ‘हॅशटॅग’,‘व्हायरल’, ‘ट्रेंडिंग’ बातम्या कोणत्या आणि त्यामागचं ‘नॅरेटिव्ह’ समजून घेण्याची. ‘हॅशटॅग’चं म्हणणं म्हणजे पूर्ण सत्य नाही, तो प्रश्नाची सुरुवात असू शकतो; उत्तराचा शेवट नाही. म्हणूनच जेव्हा एखादा हॅशटॅग ट्रेंडिंग झाला, एखादी पोस्ट व्हायरल झाली किंवा एखादा व्हिडीओ आपल्याला खूप भावला, तर क्षणभर थांबून त्यावर विचार करायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने माध्यमसाक्षर होण्याची गरज आहे. याचं कारण आपण फक्त माहितीचे ग्राहक नाही, तर त्याचे वाहक असू शकतो.
समाजमाध्यमे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाली आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काही पाहत, वाचत, ऐकत किंवा शेअर करत असतो. एखादी बातमी, एखादा व्हिडीओ, एखादी पोस्ट किंवा एखादा ‘हॅशटॅग’ काही क्षणांत लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. आज # Justice, # Boycott, # StandWith, # Save अशा हॅशटॅगमधून लोक आपला आवाज व्यक्त करतात. एखादा हॅशटॅग एखाद्या प्रश्नाला आवाज देतो, लोकांना एकत्र आणतो आणि एखादा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणतो. म्हणून हॅशटॅग ही केवळ काही शब्दांपुढे लावलेली खूण राहिलेली नाही. तो कधी आवाज असतो, कधी आंदोलन असतो, कधी ओळख असतो आणि कधी एखादं ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्याचं साधनही असतो. त्यातून काही आंदोलने यशस्वी झालेलीही आहेत, परंतु तरीही या सगळ्याचा थोडं थांबून विचार करण्याची गरज आहेच.
‘व्हायरल’ झालंय म्हणजे ती गोष्ट खरी असते का? ‘ट्रेंडिंग’ आहे म्हणजे ते महत्त्वाचंच असतं का? आणि हजारो लोक एखादी गोष्ट मानत आहेत म्हणजे ती आपोआप योग्य होते का? उत्तर अर्थातच ‘नाही’ पण समाजमाध्यमांच्या वेगात आपण हा विचार करायला अनेकदा विसरतो. ‘हॅशटॅग’च्या चिन्हापुढे काय लिहिलेलं आहे? हे आपण वाचतो. एखाद्या विषयाकडे त्यामुळे आपले लक्ष वेधले जाते. पण त्यानंतर काय? एखाद्या घटनेची फक्त (विशिष्टच) बाजू आपल्यासमोर येते आहे का? कोणाची बाजू सांगितली जात आहे? कोणाचा आवाज ऐकू येत नाही? काही तथ्य मुद्दाम किंवा नकळत बाजूला राहिली आहेत का? याच प्रश्नांमधून ‘नॅरेटिव्ह’ हा शब्द समोर येतो.
नॅरेटिव्ह म्हणजे एखादी घटना आपल्यासमोर एका विशिष्ट पद्धतीने मांडली जाणं. घटना एकच असते; पण ती कोण आणि कशी सांगितली जाते, कोणता भाग प्राधान्याने सांगितला जातो, कोणत्या गोष्टीवर विशेष भर दिला जातो आणि कोणता संदर्भ मागे राहतो, यामुळे त्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलू शकते. म्हणूनच आजच्या काळात प्रत्येकाने माध्यम साक्षर होण्याची गरज आहे. माध्यम साक्षरता म्हणजे आपण जे पाहतो, ऐकतो आणि वाचतो त्यामागचा हेतू, संदर्भ, स्रोत आणि त्यातून तयार होणारा ‘नॅरेटिव्ह’ समजून घेण्याची क्षमता.
आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती हा माध्यमांचा ग्राहकही आहे आणि निर्माता, प्रसारकही आहे. त्यामुळे माध्यम साक्षरता ही आता फक्त पत्रकार किंवा माध्यमांच्या विद्यार्थ्यांची गरज राहिलेली नाही. एखादी बातमी खरी की खोटी या पलीकडे आपण विचार करण्याची गरज आहे. बातमी अशी का मांडली आहे? यात काय सांगितलं आहे? काय सांगितलेलं नाही? कोण बोलतंय? कोण गप्प आहे? आणि ही पोस्ट मला माहिती देत आहे की माझ्याकडून फक्त प्रतिक्रिया मिळवू पाहत आहे? हे प्रश्न विचारण्याची सवय म्हणजेच माध्यम साक्षरता. उदाहरणार्थ, एखाद्या घटनेचे वेगवेगळे दहा व्हिडीओ उपलब्ध असतील, पण त्यातील फक्त एकच विशिष्ट व्हिडीओ वारंवार आपल्या ‘फीड’वर येत असेल, तर आपल्या मनात त्या घटनेची जी प्रतिमा तयार होते ती संपूर्ण सत्य असेलच असे नाही. (‘जंतर मंतर’वर झालेल्या आंदोलनानंतर व्हायरल झालेले विविध व्हिडीओ आणि त्यातून तयार झालेले वेगवेगळे नॅरेटिव्ह- वरील मुद्द्यांना अधोरेखित करतो.)
आज नॅरेटिव्ह केवळ चित्रपट, दूरचित्रवाणी, रेडिओ आणि वृत्तपत्रांमध्ये तयार होत नाही तर सगळ्याच समाजमाध्यमांची त्यात भर पडली आहे. एखादा छोटा व्हिडीओ एखाद्याला खूप प्रसिद्धी देऊ शकतो. (उदाहरणार्थ, सण-उत्सवाच्या काळातील ध्वनीकल्लोळाविषयी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांचे व्हिडीओ.) त्याची/तिची चांगली किंवा वाईट प्रतिमा तयार करू शकतो. एखादा फोटो किंवा व्हिडीओ एखाद्या घटनेचा अर्थ बदलू शकतो. एखादा जुना व्हिडीओ नव्या घटनेच्या नावाने फिरवला जाऊ शकतो. म्हणून कोणतेही मत तयार करताना कोणत्या पुराव्यानिशी आणि का सांगितलं जातंय?’ हेही पाहणं गरजेचं आहे.
‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली, तर ती फक्त ‘एक बातमी’ नाही. त्या बातमीकडे बघण्याच्या अनेक बाजू असू शकतात. प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी येते आणि आपण लगेच ‘हॅशटॅग’ करून राग व्यक्त करतो, पोस्ट शेअर करतो. पण या बातमीच्या मागे कोण आहे? कोणता मुद्दा चर्चेत आणला गेला? कोणते पुरावे सादर केले गेले? कोणी केले? माहिती पुढे करण्यासाठी कोणते शब्दप्रयोग केले, कोणाचे फोटो/ व्हिडीओ आणि कशा पद्धतीने मांडले गेले? कोणाला ‘नायक’ आणि कोणाला ‘खलनायक’ दाखविले गेले? या नॅरेटिव्हमधून नेमकं कोणत्या मुद्द्यांवर लोकांनी चर्चा केली. लाखो विद्यार्थी. त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट. पालकांची स्वप्नं. करिअरची चिंता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थेवरचा विश्वास. हे मुद्दे बोलले- मांडले गेले की मुद्दा इतरत्र फिरवला गेला. म्हणून माध्यम साक्षर नागरिक फक्त प्रतिक्रिया देत नाही, तो मूळ प्रश्नापर्यंत पोहोचतो. आणि हो, प्रश्न विचारणं म्हणजे आंदोलनाला विरोध करणं नाही. किंवा समर्थन करणंही नाही. प्रश्न विचारणं म्हणजे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणं. आजच्या नॅरेटिव्ह सेटिंगच्या काळात ही क्षमता लोकशाहीसाठी आणि समाजात समतोल राखण्यासाठीदेखील अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ज्याच्या हातात माहिती आहे तो प्रभाव निर्माण करू शकतो; पण ज्याला माहितीचे विश्लेषण करता येते, तो त्या प्रभावाचा गुलाम होत नाही.
या सगळ्या चर्चेत आणखी एक प्रश्न विचारायला हवा, या ‘नॅरेटिव्ह’मध्ये स्त्री कुठे आहे? माध्यमं केवळ राजकीय मत तयार करत नाहीत. ती स्त्री-पुरुषांविषयीच्या कल्पनांना पुढेही नेत असतात. एखादी तरुणी ठामपणे आपलं मत मांडते तेव्हा तिला ‘ओव्हरकॉन्फिडंट’ किंवा ‘भावनिक’ म्हटलं जाऊ शकतं. तोच सूर एखादा तरुण लावतो तेव्हा त्याला ‘ठाम’ किंवा ‘नेतृत्वगुण असलेला’ म्हटलं जातं. ‘जेन झी’ निदर्शनात अशी अनेक उदाहरणे पाहिली आपण. मुलं आणि मुली यांच्या व्हिडीओला वेगवेगळे नॅरेटिव्ह देण्यात आले होते. दोघांनी अभद्र भाषेचा प्रयोग केला. शिवीगाळ केली. सभ्यपणाच्या समाजमान्य मर्यादादेखील ओलांडल्या. पण नंतरच्या चर्चेत मात्र मुलींनी दिलेल्या शिव्या आणि भाषाप्रयोगावर अधिक उपदेश दिले गेले. कोणालाही त्यात काहीच वावगं वाटलं नाही. हा फरक आपण किती सहज स्वीकारतो, हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. समाजमाध्यमांवर हा दुहेरी निकष आणखी स्पष्ट दिसतो. एखाद्या स्त्री पत्रकाराने किंवा प्रतिष्ठित स्त्रीने राजकीय भूमिकेवर भाष्य केलं की तिच्या मतापेक्षा तिच्या दिसण्यावर, कपड्यांवर, वैयक्तिक आयुष्यावर किंवा कुटुंबावर चर्चा सुरू होते. पुरुषाच्या मताशी असहमती व्यक्त करताना त्याच्या विचारांवर बोलतो तर स्त्रीच्या बाबतीत मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वावर अनेकदा हल्ला केला जातो. हीसुद्धा एक प्रकारची ‘नॅरेटिव्ह बांधणीच’ आहे. म्हणून माध्यम साक्षरता शिकवताना ‘ही बातमी स्त्री आणि पुरुषांकडे समान नजरेने पाहते आहे का?’ हा प्रश्न विचारायला हवा. लिंगभाव समानता म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या क्षमतेकडे, चुका होण्याच्या शक्यतेकडे, अधिकाराकडे आणि मत मांडण्याच्या स्वातंत्र्याकडे समान नजरेने पाहणं म्हणजे लिंगभाव समानता.
डिजिटल जगातही हीच गोष्ट लागू होते. एखाद्या मुलीचा फोटो तिच्या परवानगीशिवाय शेअर केला जातो, ‘मॉर्फ’ केला जातो किंवा त्यावर अश्लील कमेंट्स केल्या जातात, तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. म्हणून लिंगभाव संवेदनशीलता ही केवळ ्त्रिरयांची बाब नाही; ती मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माध्यम साक्षरतेबद्दल बोलताना आपण शाळा, महाविद्यालय, माध्यमं आणि सरकार यांची भूमिका बोलतो. पण एक महत्त्वाची जागा अनेकदा विसरतो, घर. आई-वडिलांनी मुलांना फक्त ‘फोन कमी वापर’ असं सांगून थांबू नये. ‘‘आज काय पाहिलंस? त्याबद्दल तुला काय वाटलं? हा व्हिडीओ तुला का पटला?’’ हे प्रश्नही विचारले आणि चर्चा केली तर कदाचित मुलांच्या वागण्यातही बदल दिसू लागू शकतो. मुलं मोबाइल फोनवर काय बघतायत आणि त्यामुळे त्यांच्या ‘नॅरेटिव्ह सेटिंग’मध्ये परिणाम होत असेल तर हे बघणेही पालकांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबरीने मुलांच्या बोलण्यात एखाद्या विशिष्ट इन्फ्लुएन्सरचा सतत उल्लेख होतोय का? एखाद्या राजकीय किंवा सामाजिक विषयावर अचानक खूप आक्रमक भाषा वापरली जातेय का? लिंगभावाविषयीचे पूर्वग्रह त्यांच्या बोलण्यात दिसू लागले आहेत का? हे पाहणं म्हणजे मुलांवर पाळत ठेवणं नाही. त्यांच्या डिजिटल जगात त्यांच्यासोबत चालणं आहे. मुलाने चुकीचा किंवा आक्षेपार्ह व्हिडीओ पाहिला म्हणून लगेच फोन काढून घेणं हा नेहमीच उपाय नसतो. त्याऐवजी त्यांना विचारायला हवं, ‘‘तुला यात काय खरं वाटलं? हा व्हिडीओ तुला असं का वाटायला लावतोय? याचा दुसरा अर्थ असू शकतो का? याचा पूर्ण संदर्भ आपल्याला माहीत आहे का? हे शेअर करण्याआधी आपण तपासलं का?’’ आणि सर्वात महत्त्वाचं ‘‘याबद्दल माझ्याशी बोलताना तुला भीती वाटतेय का?’’ मुलांना घरी प्रश्न विचारण्याची आणि असहमत होण्याची जागा मिळाली पाहिजे. आपण प्रत्येक प्रश्नाचं तयार उत्तर मुलांना दिलं, तर बाहेरची उत्तरं त्यांना अधिक आकर्षक वाटू शकतात. त्यामुळे विचारातील समतोलपणा आणायला हवा.
समाजमाध्यमं वापरत असताना आपण आपल्या ‘फिल्टर बबल’मध्ये तर राहत नाही ना, हा विचारदेखील महत्त्वाचा आहे. फिल्टर बबल म्हणजे आपल्या आवडीच्या आणि आपल्या विचारांशी जुळणार्या गोष्टीच आपल्याला वारंवार दिसत राहणे. आपण समाजमाध्यमांवर काय पाहतो, काय लाइक करतो, काय शोधतो यावरून अल्गोरिदम आपल्याला पुढे काय दाखवायचे हे ठरवतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या विषयावर एका बाजूच्या पोस्ट सतत पाहिल्या, तर त्याच प्रकारच्या आणखी पोस्ट तुमच्या फीडवर येत राहतील. त्यामुळे असं वाटू शकते की, सगळ्यांचे मत माझ्यासारखेच आहे. पण प्रत्यक्षात दुसरे मतही असू शकते, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नसते. यासाठीच कधी कधी मुद्दाम आपल्या मताच्या विरुद्ध असलेली बाजू ऐकणं गरजेचे आहे. त्यासाठी आपले मत बदलणे आवश्यक नाही. आणि इथेच ‘कन्फरमेशन बायस’ (विशिष्ट विचारांना पुष्टी देणारी माहिती शोधणे)चा प्रश्न येतो. आपल्याला जे आधीपासून खरं वाटतं, त्यालाच दुजोरा देणारी माहिती आपण सहज स्वीकारतो. म्हणून माध्यम साक्षरता म्हणजे इतरांच्या पूर्वग्रहांना ओळखणं नाही; स्वत:चे पूर्वग्रहही ओळखणं आहे.
समाजमाध्यमांवर माहिती पाहताना चार ‘फिल्टर’ आपल्याकडे असायला हवेत. हे फक्त विचार करण्याचे मुद्दे नाहीत. प्रत्येक पोस्ट, बातमी, रील किंवा व्हिडीओ पाहताना वापरता काही फिल्टर लावून प्रश्न विचारता येतील अशी ही एक छोटी कृतिशील चौकट आहे.
१. तथ्यांचा फिल्टर – ‘हे खरं आहे का?’
२. संदर्भाचा फिल्टर – ‘पूर्ण गोष्ट नेमकी काय आहे?’
३. पूर्वग्रहांचा फिल्टर – ‘मला हे खरं का वाटतंय?’
४. लिंगभावाचा फिल्टर – ‘समान घटना, समान नजर आहे का?’
चारही फिल्टर वापरल्यानंतरच ठरवा, शेअर करायचं? कमेंट करायची? फॉरवर्ड करायचं? की फक्त पाहून पुढे जायचं? प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नाही. कधी कधी ‘मला अजून माहिती नाही’ असं म्हणणं हीदेखील माध्यम साक्षरतेची खूण आहे.
तथ्य – तपासा, संदर्भ – समजून घ्या, पूर्वग्रह – स्वत:ला तपासा, लिंगभाव – समान नजर ठेवा, मगच प्रतिक्रिया द्या.
हे फिल्टर्स समजता आले तर माध्यम साक्षरता केवळ ‘फेक न्यूज ओळखण्याचं कौशल्य’ राहत नाही, तर ती समाजाकडे अधिक समतोल आणि संवेदनशील नजरेने पाहण्याची प्रक्रिया बनते. हॅशटॅगच्या वेगापेक्षा विचाराचा हा छोटासा विराम अधिक महत्त्वाचा आहे.
हॅशटॅग, व्हायरल, ट्रेंडिंग होण्याच्या पलीकडे जाणे म्हणजे काय? तो वाईट नाही. तो आवाज देऊ शकतो. लोकांना जोडू शकतो. अन्यायाकडे लक्ष वेधू शकतो. पण ते सगळं म्हणजे पूर्ण सत्य नाही. तो प्रश्नाची सुरुवात असू शकतो; उत्तराचा शेवट नाही. आजच्या काळात आपण फक्त माहितीचे ग्राहक नाही. आपण माहितीचे वाहक आहोत. प्रत्येक शेअरसोबत आपण एखाद्या नॅरेटिव्हला ताकद देत असतो.
लोकशाहीचा किंवा सर्जनशील समाजाचा खरा विजय ‘कोणता हॅशटॅग ट्रेंड झाला’ यात नाही. कोण जिंकले, कोण हरले यातही नाही. खरा विजय आहे: प्रश्न विचारणार्या, माहिती तपासणार्या, वेगळे मत ऐकणार्या आणि स्वत:चा विचार स्वत: तयार करणार्या नागरिकांचा. थोडक्यात त्या हॅशटॅग, व्हायरल, ट्रेंडिंग होण्याच्या पलीकडे जाणे म्हणजे समाजमाध्यमांचा वापर बंद करणं नाही तर समाजमाध्यमांकडे अधिक सजगपणे पाहणं आणि आपला विचार कोणीतरी आपल्यासाठी तयार करू नये, याची काळजी घेणं आहे.
daivata.c@gmail.com
लेखिका मुंबई विद्यापीठाच्या माध्यम व पत्रकारिता विभागप्रमुख आहेत.
