मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘इंग्रजीच्या मोठेपणाचं खूळ भारतीय लोकांमध्येच जास्त आहे. अभियांत्रिकी विषयातील जर्मन भाषेची पुस्तकं तर इंग्रजी भाषेतल्या पुस्तकांपेक्षा जास्त चांगली आहेत. तिथलं प्राथमिकच नव्हे, तर व्यावसायिक शिक्षणदेखील जर्मन भाषेत असतं. मला वाटतं, आपण इथेच मागे पडतो. व्यावसायिक शिक्षण जर इंग्रजीतूनच घ्यायचं आहे, तर सुरुवातीपासून मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेलं बरं, असा विचार पालक करतात. इंग्रजीतून शिकल्यानं तुमचे गणित, विज्ञान हे विषय चांगले होत असतीलही, पण त्याआधी मूलभूत संकल्पना कळणं गरजेचं असतं हे लोकांना पटवून दिलं पाहिजे.’’ सांगताहेत, ‘टी.व्ही.एस. मोटर्स’ कंपनीचे सहयोगी उपाध्यक्ष  मेघश्याम दिघोले.

टी.व्ही.एस. मोटर्स कंपनीमध्ये सहयोगी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मेघश्याम दिघोले हे मूळचे मुंबईतील गिरणगाव म्हणजे काळाचौकी- परळ भागातले! वडील वारकरी व ‘बेस्ट’मध्ये कामाला होते. काळाचौकी येथील प्रसिद्ध मराठी शाळा, ‘एस. एस. एम. शिवाजी विद्यालय’ येथे मेघश्याम दिघोले यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्णपणे मराठी माध्यमातून झालं. विज्ञान आणि गणित हे विषयसुद्धा मराठीतूनच.

दहावीनंतर अभियांत्रिकीतील पदविकेसाठी त्यांना मुंबईतील व्ही.जे.टी.आय. या नामांकित संस्थेत मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश मिळाला. एल.एम.ई. या पदविकेनंतर त्यांची महाविद्यालयाच्या कॅम्पस मुलाखतीमधूनच ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीमध्ये निवड झाली. त्यानंतर ‘सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय’ येथून त्यांनी बी. ई. ही पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. नऊ वर्षांनंतर ते आपल्या करिअरला वेगळी दिशा देण्यासाठी ‘टी.व्ही.एस. मोटर्स’ या कंपनीत रुजू झाले. कंपनीतर्फे इंग्लंडला जाऊन त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

या पाश्र्वभूमीसह गिरणगावमधला मध्यमवर्गीय मुलगा ते ‘टी.व्ही.एस. मोटर्स’सारख्या ख्यातनाम कंपनीमध्ये सहयोगी उपाध्यक्ष हा त्यांचा प्रवास जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती, म्हणून मुलाखतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. त्याचाच हा गोषवारा.

प्रश्न : मेघश्याम, दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकल्यानंतर एकदम व्ही.जे.टी.आय.सारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयात इंग्रजीतून सर्व विषय शिकणं हे स्थित्यंतर जड गेलं नाही का?

मेघश्याम : नाही. सुरुवातीचे दोन-तीन आठवडे जरा कठीण गेले. इंग्रजी लिहिताना काही प्रश्न आला नाही, पण इंग्रजीतून बोलणं जमण्यासाठी सुरुवातीचे दीड-दोन महिने गेले. पण नंतर अडचण आली नाही. आम्हाला तिथे पहिल्या वर्षी ‘कम्युनिकेशन स्किल्स’ (संवादकौशल्ये) हा उच्च स्तरावरील इंग्रजीचा विषय होता. पण आमचे प्राध्यापक चांगले होते. त्यांनी खूप मदत केली. मित्रांशी, प्राध्यापकांशी इंग्रजीतून बोलून बोलून मग सवय झाली. मराठी माध्यमातून आल्यामुळेही आम्हाला विशेष फरक पडला नाही. मला एकही प्रसंग असा आठवत नाही, की मराठी माध्यमामुळे मी कुठे कमी पडलो, किंवा न्यूनगंड निर्माण झाला.

प्रश्न : इंग्रजीतून बोलणं जमण्यासाठी काही विशेष मेहनत घेतली का?

मेघश्याम : एक तर लालबाग-परळ भागात आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्यामुळे एक अंगभूत आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि मला मिळालेल्या सल्ल्यानुसार मी इंग्रजी वर्तमानपत्रं आणि कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. अजून एक सल्ला मला इंग्रजीमधून संवाद सुधारण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. तो म्हणजे वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या विषयांच्या बातम्या मनात न वाचता आपण वृत्तनिवेदक- म्हणजे बातम्या वाचणारे आहोत असं समजून मोठय़ानं वाचायच्या. त्यामुळे आपले उच्चारही सुधारतात. मी हा प्रयोग इतर अनेक जणांना सांगितला आहे आणि तो त्यांनाही खूप उपयोगी पडला आहे. शिवाय खरं आणि स्पष्ट सांगायचं तर इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांचं इंग्रजी खूप चांगलं असतंच असं नाही. आपल्याला ज्या विषयावर बोलायचं आहे त्या संदर्भातली पुस्तकं, लेख, जर्नल्स आदी  वाचून ज्ञान गोळा करणं जास्त महत्त्वाचं आहे. अर्थातच यामुळे त्या विषयातली शब्दसंपदाही आपल्याला अवगत होते. मग इंग्लिशमधून संवाद साधण्यासाठी आपोआप आत्मविश्वास येतो.

प्रश्न : सुरुवातीला कादंबरी अथवा बातम्या वाचताना जे अडथळे आले असतील त्यावर मात कशी केली?

मेघश्याम : ‘वीरकर’ यांचा शब्दकोश आणि ‘रेन अ‍ॅण्ड मार्टिन’ यांचं व्याकरणाचं पुस्तक यांची खूप मदत झाली. एखादी गोष्ट आपल्याला जमत नसली, तरी त्यावर मेहनत घेतली की ती साध्य होतेच. त्यापासून पळून जाता कामा नये. अडलेल्या शब्दाचा किंवा वाक्प्रचाराचा अर्थ आणि उच्चार हे दोन्ही समजून घेणं अत्यावश्यक आहे. आता तर खूप भाषांतर करणारी ‘टूल्स’ (साधनं ) उपलब्ध आहेत. त्यामुळे हे सहज शक्य आहे.

प्रश्न : अगदी बरोबर! तुम्ही जेव्हा इंग्लंडमध्ये पुढील शिक्षणासाठी गेलात तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट अनुभव आले का?

मेघश्याम : तोपर्यंत मला उद्योग क्षेत्रात दहा-बारा वर्षें झालेली होती. पुढचं शिक्षण नंतर घेतलं. त्या वेळी आमच्या वर्गात २० टक्के मुलं भारतीय आणि ८० टक्के परदेशी होती. परदेशातील मुलांपैकी म्हणजे फ्रें च, बेल्जियन, इटालियन, चिनी यांपैकी आमचं आणि इंग्लंडमधल्या मुलांचंच इंग्रजी जास्त चांगलं होतं. चिनी मुलांना तर फारच तोडकंमोडकं इंग्रजी यायचं. पण तिथले अध्यापक उदारमतवादी व समजून घेणारे आहेत. त्यामुळे त्यांनाही कठीण जात नाही. आणि माझं एक निरीक्षण आहे. इंग्रजीच्या मोठेपणाचं खूळ आपल्या भारतीय लोकांमध्ये जास्त आहे. जगात कुठेही असं आढळत नाही. अभियांत्रिकी विषयातील जर्मन भाषेची पुस्तकं तर इंग्रजी भाषेतील पुस्तकांपेक्षा जास्त चांगली आहेत. तिथलं प्राथमिकच नव्हे, तर व्यावसायिक शिक्षणदेखील जर्मन भाषेत असतं. मला वाटतं आपण इथेच मागे पडतो. व्यावसायिक शिक्षण जर इंग्रजीतूनच घ्यायचं आहे, तर सुरुवातीपासून मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेलं बरं, असा विचार पालक करतात. म्हणून इंग्रजीचं खूळ बोकाळलं आहे. याला अपवाद आयुर्वेदिक अभ्यासक्रमाचा आहे. माझ्या एका मित्राची मुलगी ‘कॉन्व्हेंट’मध्ये शिकली आणि ती आता आयुर्वेदिक डॉक्टर होणार आहे. तिचा सर्व अभ्यासक्रम मराठीतून आहे. इतकंच नव्हे, तर तिला संस्कृत हादेखील विषय आहे, कारण आयुर्वेदिक ज्ञान त्या भाषेत आहे. हा माझ्यासाठी एक गोड धक्का होता.

प्रश्न : तुम्हाला इंग्रजी येत असल्यामुळे परदेशातील शिक्षण सोपं गेलं. पण इथे व्यावसायिक शिक्षण मराठीतून घेतलेल्या मुलांना ते जड जाणार नाही का?

मेघश्याम : सर्वच मुलं परदेशात पुढील शिक्षणासाठी जात नाहीत. फार तर १० टक्के मुलं जातात, आणि माझ्या आणि माझ्या कित्येक मित्रांच्या अनुभवावरून ठामपणे सांगता येईल, की परदेशात इंग्लिशमधून शिक्षण घेणं फारसं जड जात नाही.

प्रश्न : मराठी शाळांच्या सद्य:स्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मेघश्याम : आज ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार मराठी शाळांचं प्रमाण घटतं आहे ही दुर्दैवाची बाब आहे. आमच्या शिवाजी विद्यालयातील २१० प्रवेश जागांपैकी आज जेमतेम ३० जण प्रवेश घेत आहेत. त्यामुळे शाळा चालवण्यासाठी आता ‘सेमी इंग्लिश’ आणि इंग्रजी माध्यम शाळेला सुरू करणं भाग पडलं आहे. हे थांबवण्यासाठी सर्व स्तरावर चर्चा करण्याची, पालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे. कारण तीन-चार वर्षांच्या मुलाला कोणत्या माध्यमाच्या शाळेत घालावं, हा निर्णय मुलं नाही, तर पालक घेतात. यासाठी प्रशासनानं, सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे. शासनानं मराठी शाळांना आधार, पाठबळ, प्रोत्साहन आणि आर्थिक मदत दिली पाहिजे, जेणेकरून मराठी शाळांमध्ये सुधारणा करता येतील. शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव यांसारख्या शासकीय पातळीवरून जनसंवाद घडवून आणला पाहिजे. ज्यांनी मराठी भाषेतून शिक्षण घेऊन चांगलं ‘करिअर’ घडवलं आहे, अशा माणसांना समाजापुढे आणून मराठी भाषेतून निदान प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कठोर पावलं उचलावी लागतील. पण या गोष्टी करणं गरजेचं आहे. इंग्रजी भाषेतून शिकल्यानं तुमचे गणित, विज्ञान हे विषय चांगले होतात असं नाही, तर त्यासाठी मूलभूत संकल्पना कळणं गरजेचं असतं हे लोकांना पटवून दिलं पाहिजे. मी राहात असलेल्या कर्नाटक राज्यात शासन कन्नड भाषेवर पूर्ण लक्ष ठेवतं. भाषेचं संवर्धन होण्यासाठी या भाषेतून सांस्कृतिक कार्यक्रम, कन्नड भाषेतून असलेल्या शिक्षणामध्ये सबलीकरण, असे सतत काही ना काही उपक्रम सुरू असतात. सर्व सार्वजनिक जागी नावांच्या पाटय़ा कन्नड भाषेतूनच लिहिणं बंधनकारक आहे, आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.

प्रश्न : मराठी भाषेत इतर बोर्ड्स आल्यास त्याचा मराठी भाषेला फायदा होईल का?

मेघश्याम : होईल. पण त्यावर राज्याचंही नियंत्रण असलं पाहिजे. त्या बाबतीत राज्याला काही प्रमाणात स्वायत्तता असली पाहिजे. त्या त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोलपण शिक्षणात असला पाहिजे.

प्रश्न : मराठी माध्यमात शिकल्यामुळे तुम्हाला फायदा झाला की तोटा?

मेघश्याम : शंभर टक्के फायदा झाला.  कारण मराठी भाषा शिकल्यानं मी समृद्ध झालो. मराठीत पुस्तकं, नाटकं, साहित्य विपुल आहे. मराठीतील संतवाङ्मय, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा हा आपला ठेवा आहे. तो ठेवा आणि मराठी भाषेत असलेली समृद्धी पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे.

संवादी इंग्रजी वाढवण्यासाठी मी इंग्रजी वर्तमानपत्रं आणि कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. आणखी एक सल्ला मला इंग्रजीमधून संवाद सुधारण्यासाठी अतिशय उपयोगी पडला. तो म्हणजे वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या विषयांच्या बातम्या मनात न वाचता आपण वृत्तनिवेदक- म्हणजे बातम्या वाचणारे आहोत, असं समजून मोठय़ानं वाचायच्या. त्यामुळे आपले उच्चारही सुधारतात. मी हा प्रयोग इतर अनेक जणांना सांगितला आहे आणि तो त्यांनाही खूप उपयोगी पडला आहे.