लंडनच्या दक्षिणी भागात ‘बेक्सलीहीथ’ इथं छोटंसं घर… मागे-पुढे छानसं अंगण. एक आजी तिथं त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्या त्यांच्या बागेत वेगवेगळ्या भाज्या लावत, फळं पिकवून त्याचे जाम, सॉस आणि वेगवेगळे पुडिंग्ज बनवत. आपल्या बागेतील भाज्या, फळं शेजारी देणं, लहान मुलांचे लाड करणं, मोठ्यांना मदत करणं यामुळे त्या सगळ्यांच्या लाडक्या झाल्या होत्या. एका सेवानिवृत्त अधिकार्याचं असतं तसं आनंदी जीवन जगत होत्या. मात्र १९९९ मध्ये काही तरी विलक्षण घडलं. तिथल्या स्थानिक वृत्तपत्रात आजींच्या आयुष्यातल्या घडामोडींवर ‘काही’ छापून आलं आणि आजींबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण ते ना त्यांच्या मुला-नातवंडांच्या पचनी होतं, ना शेजार-पाजार्यांच्या.
सोव्हिएत संघाच्या गुप्तचर संघटनेचे (तेव्हाचे ठङश्ऊ म्हणजे ‘सोव्हिएत युनियनची अंतर्गत गुप्त सुरक्षा व्यवस्था – आताची के.जी.बी.) निवृत्त अधिकारी व्हासिली मित्रोखीन यांनी त्यांच्या गुप्तहेरांच्या यादीत आजींचं नाव घेतलं होतं. ते नाव होतं, मेलिटा नॉरवूड! (२६ डिसेंबर १९९१ला ‘युएसएसआर’ म्हणजे ‘सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक संघ’ विघटित होऊन रशियासकट १५ देश बनले. त्याच्या पुढे-मागे घडलेल्या या घटना.)
जगभर मेलिटा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि अखेर वयाच्या ८७ व्या वर्षी आजींनी कबुली दिली, की इंग्लंडमध्ये राहून नोकरी करून एक-दोन नाही, तर तब्बल चाळीस वर्षं त्यांनी सोव्हिएत संघासाठी हेरगिरी केली होती. सलग इतकी वर्षं एखाद्या देशासाठी हेरगिरी करणार्या त्या पहिल्या स्त्री गुप्तहेर ठरल्या. इंग्लंडमध्ये राहून तिथल्या सरकारकडे त्यांनी तशी जाहीर कबुलीही दिली. असं करण्याबद्दल आपल्याला जराही खेद किंवा पश्चात्ताप नसल्याचं त्यांनी सांगितलं, कारण मनानं, विचारानं त्या कायम एक कट्टर रशियन साम्यवादी होत्या.
सगळ्या पत्रकारांसमोर त्या म्हणाल्या, ‘‘हो. मी सोव्हिएत संघातर्फे एक ‘एजंट’ म्हणून इथं काम करत होते. माझं सांकेतिक नाव होतं, एजंट होला! हे सगळं कसं घडलं…? कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांनी प्रचंड प्रभावित असलेल्या तरुण मेलिटा यांची १९३० मध्ये अँड्र्यू रोथस्टीन या साम्यवादी नेत्याशी ओळख झाली. अँड्र्यू यांचे सोव्हिएत संघाशी फार जवळचे संबंध होते. दरम्यान, मेलिटा या ‘ब्रिटिश नॉन फेरस मेटल रिसर्च असोसिएशन’ मध्ये एक लिपिक म्हणून रुजू झाल्या होत्या आणि लवकरच त्यांना संशोधनप्रमुख यांच्या सचिवपदी बढती मिळाली होती. ब्रिटनच्या महत्त्वाकांक्षी संरक्षण आणि उद्योग क्षेत्रासाठी ही संस्था धातूविषयक संशोधन करत होती. सैन्याला लागणारी आयुधं, युद्धासाठी लागणारे शस्त्रास्त्र, विमानं यासाठी धातू कसे असावेत, यावर तिथे अतिमहत्त्वाचं संशोधन सुरू होतं. तिथं स्फोटकं बनवली जात नव्हती, पण अणुशक्ती संशोधनासाठी ही एक सहायक संस्था होती.
सुरुवातीला मेलिटा यांना त्या संस्थेच्या कामाचं नेमकं स्वरूप माहीत नव्हतं. एक दिवस काम करताना त्यांना एक फाइल दिसली. त्यातील चित्रं आणि माहिती बघून त्यांचे डोळे विस्फारले. कुणी बघेल म्हणून त्यांनी ती फाइल तशीच ठेवून दिली, पण तो विषय त्यांच्या मनात घोळत राहिला. नेमकं त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची भेट अँड्र्यू यांच्याशी झाली. मेलिटा यांच्या मनातली चलबिचल त्यांनी ओळखली. त्यांनी विचारलं, ‘‘मेलिटा, इतकी अस्वस्थ का आहेस…?’’
त्या म्हणाल्या, ‘‘आज एका देशासाठी काय महत्त्वाचं आहे? त्यांच्या नागरिकांना पोटभर अन्न, शिक्षण, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. अशा वेळी युद्ध आणि विनाशाकडे नेणारं संशोधन ही प्राथमिकता असायला नको. हे आणखी विषमता पसरवण्यास कारणीभूत ठरेल.’’
‘‘फक्त विचार करून जग बदलता येत नाही मेलिटा! तुला कृती करावी लागेल. ‘साम्यवाद’ हेच मूल्य असलेल्या देशासाठी काम करावं लागेल. तुझ्यासारख्या लोकांची त्यांना गरज आहे. तू मदत केलीस तर इतिहास बदलू शकेल. बोल, करशील…?’’ या अँड्र्यूंच्या प्रश्नावर मेलिटा यांनी होकार दिला. त्यांची ओळख रिचर्ड सोगा या रशियाच्या गुप्तहेराशी करून देण्यात आली. त्यांनी मेलिटा यांना गुप्तहेर जगत, त्यातील धोके, वेळेवर हवी असणारी चपळता आणि चातुर्य या सगळ्याबद्दल अवगत केलं.
दुसर्या दिवसापासून त्या विशिष्ट उद्देशाने कामाला जाऊ लागल्या. अणुऊर्जा तंत्रज्ञान, विविध धातू संयोगांची माहिती, हलक्या वजनाच्या शस्त्रवाहू विमानासाठी वापरल्या जाणार्या धातूंची माहिती या सगळ्याची त्यांनी नोंद घ्यायला सुरुवात केली. कधी प्रार्थनास्थळी, कधी सांस्कृतिक कार्यक्रमात सांकेतिक शब्द वापरून त्या कागदपत्र हस्तांतरित करू लागल्या. अत्यंत मोलाची आणि इतकी गोपनीय माहिती मिळत असल्याने रशियन गुप्तचर संघटना मेलिटा यांच्यावर बेहद खूश होती. मात्र युद्ध नको उलट जगात समानता यावी यासाठी आपण हे काम करत आहोत, असा मेलिटा यांचा ठाम विचार होता.
एकदा मेलिटा यांना आणखी खोलात जाऊन माहिती घ्यायची होती. त्यासाठी त्यांना खास फायटर जेटसाठी धातू संशोधन करणारी प्रयोगशाळा जिथे होती त्या अणुऊर्जा तंत्रज्ञान संशोधन विभागात जायचं होतं. त्यासाठी संध्याकाळी उशिरापर्यंत त्या काम करत राहिल्या. बाकी सहकारी एक एक करून निघून गेले होते. नंतर त्यांनी मुद्दाम तिथली वीज घालवली आणि अंधारात पलीकडच्या कक्षात ‘अत्यंत गोपनीय’ असं लिहिलेल्या कपाटापाशी गेल्या. आवाज न करता कपाटाची कडी त्या काढणार इतक्यात अचानक एक अधिकारी तिथं आले. मेलिटा यांनी ताबडतोब त्यांची दिशा बदलून चाचपडत चालण्याचं नाटक केलं. त्या अधिकार्यानं त्यांना हटकलं, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘या लोकांना दिवे बंद करण्याची किती घाई! मी चुकून इकडं आले.’’ त्यांनी वेळ मारून नेली, परंतु अधिकार्यास संशय आलाच. नंतर काही दिवसांनी मेलिटा यांना हवी असलेली फाइल चोरण्यात यश आलं. त्यांनी अंगावरच्या कोटात ती फाइल लपवली आणि कार्यालयाबाहेर पडल्या. ‘ब्रिटिश गुप्तहेर संघटना’ ‘एमआय५’चे दोन अधिकारी त्यांच्या मागावर होते. मेलिटा यांनी वेग वाढवला आणि समोर आलेल्या बसमध्ये त्या चढल्या. ते दोन अधिकारीही त्यांच्या मागे चढले. मेलिटा यांनी बसमध्ये धक्का लागून तोल गेल्याचं नाटक केलं. तिथल्याच आसनावरच्या एका बॅगेत अत्यंत शिताफीनं ती फाइल टाकली आणि उठून सावरल्यासारखं दाखवलं. तत्क्षणी एक जण गुपचूप ती बॅग घेऊन खाली उतरून गेला. ‘‘एक मिनिट मॅडम! तुमची बॅग दाखवता का?’’
‘‘का बरं? तुम्ही कोण आहात?’’ मेलिटा यांनी न घाबरता उलट विचारलं. ‘‘आम्ही पोलीस अधिकारी आहोत आणि सुरक्षा कारणांसाठी तपासणी करण्याचे आदेश आहेत.’’ मेलिटा यांनी अगदी साळसूदपणाने त्यांची बॅग अधिकार्यांच्या हातात दिली. त्यात काहीही संशयास्पद सापडलं नाही. बसमधून उतरलेल्या ‘त्या’ व्यक्तीमार्फत ती फाइल ‘के.जी.बी’कडे रवाना झाली होती. त्या प्रसंगानंतर मात्र त्या अधिक सावध झाल्या. कधी एखादी छोटीशी चिठ्ठी, कधी एखादं रेखाटन, तर कधी बघून उतरवून काढलेलं लिखाण या स्वरूपात त्या नियमित माहिती पाठवत राहिल्या. त्या वेळी सोव्हिएत संघ स्वत:चं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील होता. अशा वेळी इंग्रजी शास्त्रज्ञांनी विकसित केलेलं तंत्रज्ञान मेलिटामार्फत आयतं मॉस्कोपर्यंत पोहोचणं ही किती मोठी पर्वणी असेल याचा अंदाज नक्कीच करू शकतो.
मेलिटा असं का वागल्या या प्रश्नाचं उत्तर त्यांचं बालपण आणि त्यांच्या कौटुंबिक वातावरणात सापडतं. मेलिटा सर्नस यांचा जन्म इंग्लंडमधील बॉर्नमॉथ इथं २५ मार्च १९१२ला झाला. वडील अलेक्झांडर सर्नस हे डाव्या आणि साम्यवादी विचारसरणीचे कार्यकर्ते होते आणि आई गेरट्रूड स्टेडमन या गृहिणी होत्या. घरात समाजवादी आणि साम्यवादी वारे वाहत असल्याने मेलिटा यांच्यावरसुद्धा त्याच विचारांचा पगडा होता. कामगारांचे हक्क, त्यांच्यावरील अन्याय, त्याविरुद्ध लढा अशा चर्चा घरात नेहमी होत असत. समज येऊ लागली तसं मेलिटा यांना ग्रेट ब्रिटनमध्ये असलेली असमानता जाणवू लागली होती. श्रीमंत आणि गरीब यामधील दरी कमी करण्यासाठी आपण काही तरी करायला हवं, हा विचार त्यांच्या मनात बळावू लागला आणि मग संधी मिळाली तशा त्या साम्यवादी देशाकडे आकृष्ट झाल्या. त्यांच्या समविचारी कंपूत एक रसायनशास्त्राचे शिक्षक होते, त्यांच्याशी मेलिटा यांची मैत्री झाली आणि १९३५ मध्ये मेलिटा आणि हिलरी नॉरवूड विवाहबद्ध झाले.आयुष्याच्या शेवटापर्यंत दोघं एकत्र होते.
मेलिटा काम करत त्या संशोधन केंद्रात १९४०च्या सुमारास युरेनियम आणि प्लुटोनियमवर संशोधन सुरू झालं. अणुबॉम्बची रचना, त्याचे वेगवेगळे रूप, संयुगानुसार येणारी ताकद, मॅनहॅटन प्रकल्प, त्यावर अमेरिका आणि इंग्लंडमधील संयुक्त अभ्यास यासंबंधी सगळी माहिती तिथं नोंद केली जात होती. मेलिटा यांच्यासाठी ही मोठी पर्वणी होती. अनेक वर्षं तिथं काम केल्याने आणि त्यांच्याविरुद्ध पुरावे नसल्याने त्यांच्यावरील संशय दूर झाला होता. अशा वेळी अणुऊर्जेवरच्या सगळ्या संशोधनावरील संपूर्ण वैज्ञानिक अहवाल त्यांच्या हाती लागला. त्यांनी ती सगळी कागदपत्रं चक्क घरी नेली. त्याच्या प्रती तयार केल्या आणि ‘खजिना सापडला’ असा गुप्त संदेश पाठवला. दुसर्या दिवशी एखादी सामान्य स्त्री ऑफिसला जाते तशा त्या निघाल्या. रस्त्यात काही सामान घेत असल्याचं भासवत दुसर्या गुप्तहेराजवळ शिताफीनं ते कागद दिले. एका मोठ्या देशाच्या इतक्या मोठ्या तयार संशोधनाला असं अलगद दुसर्या देशात पाठवण्यात आलं होतं. रशियाच्या शास्त्रज्ञांसाठी हे अत्यंत मोलाचं आयतं घबाड होतं.
आश्चर्य म्हणजे इतकी वर्षं हेरगिरी करूनही ब्रिटिश सरकारला किरकोळ अपवाद सोडता मेलिटा यांच्या ‘दगाबाज’ हालचालीचा सुगावा लागला नाही. जेव्हा १९९९ मध्ये ही बाब प्रकाशात आली, तेव्हा ‘एमआय५’ला त्या काळात आपल्याला आलेली शंका खरी ठरल्याचं लक्षात आलं. मध्ये फार मोठा काळ गेला होता. गंमत अशी, की ब्रिटिश सरकारजवळ मेलिटा यांनी कबुलीजबाब दिला तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, कारण तेव्हा त्या ८७ वर्षांच्या झाल्या होत्या. दुसरं असं की, त्या वेळी त्यांनी चोरलेली सगळी माहिती आणि संशोधन आताच्या काळासाठी कालबाह्य झालं होतं.
आपण राहत्या देशाशी मोठा विश्वासघात केला असं त्यांना वाटलंच नाही, याचं कारण अणुऊर्जा आणि त्यासंबंधी संशोधनाचा वापर युद्धासाठी किंवा जगाच्या विनाशासाठी होणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं. हेरगिरी करण्यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता किंवा त्यातून मोबदल्याची अजिबात अपेक्षाही नव्हती. साम्यवादी राष्ट्र या संशोधनाचा गैरवापर करणार नाही असा विश्वास असल्यानं त्यांनी सगळी माहिती सोव्हिएत संघास पुरवली ही त्यांची भूमिका होती. इतकी त्यांची सोव्हिएत संघाविषयी अढळ निष्ठा होती.
वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. रशियाच्या तंत्रज्ञान विकासाच्या गतीमागे मेलिटासारख्या कडव्या साम्यवादी व्यक्तीचं मोठं योगदान आहे, हे नक्की.
