वैभवी… एक मध्यमवयीन स्त्री. वय साधारण ४५ वर्षं. वैभवीचा नवरा जबाबदारीच्या पदावर नोकरी करणारा. पूर्णत: व्यग्र. वैभवी गृहिणी. मुलगा लहान असताना त्याची नीट काळजी घेता यावी म्हणून वैभवीने नोकरी सोडून दिली. आता मुलगा शिक्षणासाठी परदेशात असतो. त्यामुळे वैभवी अनेकदा एकटीच घरी असते.

हल्ली वैभवीच्या तब्येतीच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. कधी छातीत दुखतं, श्वास घ्यायला त्रास होतो, तर कधी दरदरून घाम फुटतो, बैचैन व्हायला होतं. काहीतरी मोठा आजार झालाय अशी भीती सारखी वाटत राहाते. अनेकदा डॉक्टरांना भेटून झालं आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या करून झाल्या आहेत. सगळेच रिपोर्ट ‘नॉर्मल’ आले आहेत. पण त्रास मात्र कमी होत नाही. पूर्वीची शांत, आनंदी वैभवी आता या त्रासामुळे खूप चिडचिडी झाली आहे. अखेर स्त्री आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यावर तिला समजलं की, हा सर्व त्रास रजोनिवृत्तीची वेळ जवळ आल्यामुळे होत आहे.

‘रजोनिवृत्ती’ (Menopause) हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा नैसर्गिक टप्पा. या काळात दर महिन्याला येणारी मासिक पाळी कायमची बंद होते. रजोनिवृत्ती का होते? तर मुलगी वयात येते तेव्हापासून बीजांडकोशाचं (Ovary) स्त्रीबीज निर्माण करण्याचं कार्य अविरतपणे चालू असतं. बीजांडकोशातून ‘इस्ट्रोजेन’ व ‘प्रोजेस्टेरॉन’ ही दोन संप्रेरकं निर्माण होतात. ही संप्रेरकं मासिक पाळीवर नियंत्रण ठेवतात. वयाच्या चाळिशीनंतर बीजांडकोशांची कार्यक्षमता कमी होते. काही काळाने बीजनिर्मितीची प्रक्रिया थांबते. संप्रेरकांची पातळी कमी होते व मासिक पाळी थांबते. म्हणजेच रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्ती म्हणजे प्रजननक्षम काळाचा शेवट समजला जातो.

रजोनिवृत्तीचा कालावधी तीन टप्प्यांत विभागला जातो. रजोनिवृत्तीपूर्वीचा काळ, रजोनिवृत्ती व रजोनिवृत्तीनंतरचा काळ. नियमित येणारी मासिक पाळी जेव्हा सलग बारा महिने येत नाही तेव्हा रजोनिवृत्तीचं निदान केलं जातं. रजोनिवृत्तीचं साधारण वय आहे ४० ते ५५ वर्षं. भारतातील स्त्रियांचं रजोनिवृत्तीचं सरासरी वय आहे ४६.५ वर्षं, तर पाश्चात्त्य देशातील स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती उशिरा येते (सरासरी वय ५२वर्षं) रजोनिवृत्तीपूर्वीचा काळ ( Peri- menopause) साधारणत: वयाच्या चाळिशीमध्ये सुरू होतो. या काळात संप्रेरकांमधील चढ-उतारांमुळे स्त्रियांना अनेक शारीरिक व मानसिक बदल जाणवतात. हे बदल प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळ्या कालावधीसाठी दिसतात.

काही स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या ८ ते १० वर्षं आधीपासूनच ही लक्षणं जाणवायला लागतात. रजोनिवृत्तीच्या आधीच्या काळात संप्रेरकांच्या कमतरतेमुळे मासिक पाळी अनियमित होते. रक्तस्रावाचं प्रमाणही कमी-जास्त होतं. रजोनिवृत्तीपूर्वीच्या या काळात बीजनिर्मिती अनियमित होते व प्रजनन क्षमताही कमी होते. हल्लीच्या काळात शिक्षण, करियर यामुळे उशिरा लग्न झाल्यावर गर्भारपणही उशिरावर ढकलतात. अशा वेळी प्रजननक्षमता कमी झाल्याने त्यांना गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. काही वेळेस वंध्यत्वावरील उपचारांचीसुद्धा गरज भासू शकते.

पंचेचाळीस वर्षाच्या प्रगतीची मासिक पाळी गेले वर्षभर अनियमित झाली होती. गेले ४-५ महिने मासिक पाळी आलीच नव्हती. रजोनिवृत्तीची वेळ जवळ आल्यामुळे पाळी अनियमित झाली असावी या समजुतीत ती होती. गेले दोन-तीन दिवस मात्र प्रगतीला पोटात काहीतरी हालचाल जाणवू लागली होती. डॉक्टरांकडे गेल्यावर गर्भधारणेचं निदान नक्की झालं. गर्भ चार महिन्यांचा झाला होता व त्याचीच हालचाल प्रगतीला जाणवू लागली होती. रजोनिवृत्तीपूर्वीच्या या काळात बीजनिर्मिती अनियमित झाल्याने मासिक पाळीतील प्रजननक्षम काळाचा (Fertile Period) अंदाज चुकतो व अनपेक्षितपणे गर्भधारणा होऊ शकते. म्हणूनच या काळात गर्भनिरोधक साधनांचा वापर नियमितपणे करणंही संयुक्तिक ठरतं.

रजोनिवृत्तीच्या काळात बहुतांशी स्त्रियांना होणारा त्रास म्हणजे ‘हॉट फ्लॅशेस’. या वयातील ५० ते ८० टक्के स्त्रियांना हा त्रास कमी-जास्त प्रमाणात जाणवतो. कधी-कधी थोडीशी अस्वस्थता येते, तर काही वेळेस नीट झोप लागत नाही. लोकांच्यात मिसळायला लाज वाटते. काही स्त्रियांच्यात दैनंदिन जीवनही अवघड होते. ‘हॉट फ्लॅशेस’ आल्यावर स्त्रीला अचानक खूप गरम वाटतं. शरीरातून गरम लहरी गेल्याचा भास होतो. दरदरून घाम फुटतो. त्वचा लालबुंद होते. कधी कधी छातीत धडधडतं, खूप बैचेनी येते.

‘इस्ट्रोजेन’ संप्रेरकाच्या कमतरतेमुळे हे त्रास होतात. ‘हॉट फ्लॅशेस’चा त्रास होत असल्यास मसालेदार पदार्थ, कॉफी व इतर गरम पेय टाळा. खूप गरम पाण्याने अंघोळ करू नका. धूम्रपान व मद्यापानाने ‘हॉट फ्लॅशेस’चा त्रास वाढतो, भरपूर पाणी प्या. जेवणामध्ये सोयाबीन, जवस, हरभरा व इतर कडधान्यांचा समावेश करा. आजूबाजूचे वातावरण थंड ठेवा. व्यायामाने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होत असल्याने नियमित व्यायाम करा. ‘हॉट फ्लॅशेस’चा जास्त त्रास होत असल्यास वैद्याकीय सल्ला घ्या, ‘इव्हिनिंग प्रिमरोज’ वनस्पतीचं तेल व जीवनसत्त्व ‘इ’ या औषधांनी ‘हॉट फ्लॅशेस’चा त्रास कमी होतो. गरज भासल्यास थोड्या काळासाठी संप्रेरकयुक्त औषधं देता येतात.

रजोनिवृत्तीचा काळ हा मानसिक आरोग्यासाठी अत्यंत नाजूक काळ. शारीरिक बदलांबरोबरच अनेक मानसिक समस्याही या वयातील स्त्रियांना जाणवू लागतात, संप्रेरकांमधील असंतुलन हे त्याचं महत्त्वाचं कारण. या काळात ‘इस्ट्रोजन’ या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे मेंदूतील ‘सिरोटोनीन’ नावाच्या रासायनिक पदार्थाची पातळी कमी होते. ‘सिरोटोनीन’ला आनंददायी द्रव्य (Happy hormone) म्हटलं जातं. ‘सिरोटोनीन’मुळे मनाची अवस्था आनंदी राहते, चित्त शांत राहातं. ‘सिरोटोनीन’ कमी झाल्याने चिडचिड होणं, नैराश्य येणं, भीती वाटणं, मानसिक असंतुलन यांसारखे त्रास जाणवू लागतात. ज्या स्त्रियांमध्ये मानसिक आजारांचा पूर्वेतिहास असतो, त्यांना रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक समस्यांचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो.

मानसिक समस्यांसाठी संप्रेरकांमधील असंतुलनाबरोबरच इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असतात. या काळात वाढणाऱ्या वयामुळे काही शारीरिक व्याधी सुरू होऊ शकतात. त्यामुळे कार्यक्षमता व शक्ती कमी होते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील ताण सहन होईनासा होतो, ‘हॉट फ्लॅशेस’ व मानसिक तणावामुळे नीट शांत झोप लागत नाही. पुरेशी विश्रांती न झाल्याने चिडचिड होते. उत्साह वाटत नाही व अशक्तपणा येतो. या वयात होणाऱ्या संप्रेरकांमधील बदलांमुळे वजन वाढू लागतं, स्वत:ची शरीरयष्टी, आता बेढब वाटू लागते. केस पांढरे व्हायला लागतात. त्वचेवर वयाचे परिणाम दिसू लागतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो.

या वयातील स्त्रियांच्या मुलामुलींनी बहुतेकदा पौगंडावस्थेत किंवा तारुण्यात पदार्पण केलेलं असतं. मुलं स्वत:च्याच भावनाविश्वात रमलेली असतात. आईपेक्षा मित्रमंडळींबरोबर त्यांची भावनिक जवळीक होते. आई-वडिलांवर अवलंबून राहाणं कमी होतं. या उलट मुलं स्वतंत्र झाल्यामुळे त्यांना आपली गरजच नाही, असे अनेक जणींना वाटू लागतं. मुलांबरोबर असलेली ही भावनिक नाळ सैल करायला त्यांना अवघड जातं. परंतु हाच काळ स्त्रियांनी स्वत:ला समजून घेऊन सांभाळण्याचा आहे.

या काळात स्त्रियांना गरजेचं असतं व्यक्त होणं, कुणाशी तरी संवाद साधणं. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये स्त्रियांना मन मोकळं करायला घरातच कुणीतरी असायचं. आता मात्र घरी कुणीच नसतं. याच काळात तिचा जोडीदारही त्याच्या व्यवसायात खूप व्यग्र असतो. या काळात बायकोसाठी वेळ द्यायला हवा हेच अनेक पुरुषांना माहीत नसतं तर काहींना वेळच नसतो. यामुळे एकटेपणाची भावना तिला सतावत राहाते.

स्मरणशक्तीवर होणारे परिणाम (Brain Fog) ही ‘सिरोटोनीन’ची पातळी कमी झाल्यामुळे रजोनिवृत्तीच्या काळात होणारी एक महत्त्वाची समस्या आहे. कधी लक्ष केंद्रित करायला अवघड जातं, तर कधी गोष्टी लक्षातच राहात नाहीत. शब्द आठवत नाहीत, नावे विसरतात. आपण काय बोलत होतो किंवा काय करत होतो हे मध्येच विसरायला होतं. मनात गोंधळ निर्माण होतो. मानसिक थकवा जाणवतो, आपण काहीतरी महत्त्वाचं विसरू, अशी भीती वाटत राहाते. झोप नीट न झाल्याने, मानसिक ताणतणावाने हे त्रास वाढतात.

आता या वयातच विसरायला लागले आहे, म्हातारपणी काय होईल? ही ‘स्मृतिभ्रंशा’ची (Dementia) तर सुरुवात नाही ना अशी भीती अनेकींना वाटू लागते. हा त्रास बहुतेकदा तात्पुरता असतो. संतुलित आहार, पुरेशी झोप व व्यायामाने हे त्रास कमी होतात. कोडी व सुडोकूसारखे स्मरणशक्तीचे खेळ, पाठांतर, काहीतरी नवीन शिकणं यामुळे स्मरणशक्ती नीट राहायला मदत होते.

रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या मानसिक समस्यांसाठी वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. औषधांबरोबरच ‘संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी’ (Cognitive Behavioural Theapy) व समुपदेशनाने अनेक त्रास कमी व्हायला मदत होते. व्यायामाने ताणतणाव कमी होतात, मन आनंदी राहाते, नीट झोप येते. ओमेगा ३ फॅटी अॅसिड व जीवनसत्त्व ‘ब’ सारखे घटक आहारात असावेत. योगासनं, प्राणायाम, ध्यानधारणेने (Meditation) ताणतणाव कमी होतो. चांगल्या जीवनशैलीने रजोनिवृत्तीचा हा काळ नक्कीच सुखद करता येतो.