एका बारा वर्षांच्या मुलीला पहिल्यांदाच पाळी येते. तिच्या तीस वर्षांच्या भावाला बहिणीच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग दिसतात आणि बहिणीनं कुणाशीतरी शारीरिक संबंध ठेवल्याची त्याला शंका येते. तो जाब विचारत तिला मारहाण करतो. या मुलीला जेव्हा रुग्णालयात आणलं जातं, तेव्हा तिचा मृत्यू झालेला असतो.. नुकत्याच घडलेल्या एका विचित्र घटनेच्या तपासात पुढे आलेली ही माहिती! बहुसंख्य पुरुषांच्या मासिक पाळीविषयीच्या उदासीनतेचं हे ढळढळीत उदाहरण. का होतं असं? काय करायला हवं ती दूर करण्यासाठी, याविषयी पुरुषांबरोबर, पौगंडावस्थेतील मुलांबरोबर आरोग्यसंवाद साधणाऱ्या डॉ. मोहन देस यांचा लेख. 

मुलगे आणि पुरुष मासिक पाळीविषयी काय विचार करतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं फारसं कुणाला वाटत नाही. पण माझ्या मते ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सर्वसाधारणपणे पुरुषांच्या मनात त्याविषयी एक कुबट अंधार आहे, असंच अनुभवाला आलं आहे.काही आदिवासी समूहांत आजही मासिक पाळी आलेल्या स्त्रियांसाठी एक झोपडी असते. गोंड समूहात तिला ‘कुरमा ता लोम’ असं म्हणतात. तशीच एक गूढ, खिडक्या-दरवाजा नसलेली झोपडी पुरुषांच्या मनात ठाण मांडून बांधलेली असते. या झोपडीत अज्ञान आहेच, जे काहीसं सोयीचंही आहे. काही अर्ध-वैज्ञानिक समज आहेत आणि काही ठाम अपसमजदेखील आहेत. मासिक पाळी आपल्याला येत नाही, तिच्याशी आपलं काही घेणंदेणं नसल्याचा एक सुप्त आनंद आणि अभिमान आहे. मुख्य म्हणजे या भावनेवर आधारलेली अखिल स्त्रीवर्गावर सत्ता गाजवण्याची वृत्ती आहे. आपल्या आईला ती बारा-तेरा वर्षांची होती तेव्हा मासिक पाळी आली, म्हणजे निसर्गानं आपल्या जन्माची पूर्वतयारी तिच्या ओटीपोटात करून ठेवली म्हणूनच आपण या जगात आलो, हे काही पुरुषांना, तेही अगदी पुसटसं माहीत असतं! आईवर नितांत प्रेम असणाऱ्या बहुतेक मातृभक्त भारतीय पुरुषांच्या ठायी आईच्या मासिक पाळीविषयी आस्था फारच कमी असते. आणि शास्त्रीय माहितीचा अभाव तर मोठाच. ही सारी विधानं आजवर मी असंख्य मुलग्यांशी आणि पुरुषांशी केलेल्या संवादाच्या अनुभवावर आधारित आहेत.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

 पुरुषांच्या या उदासीनतेविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी या विषयाचा थोडा इतिहास बघू या. फार फार वर्षांपूर्वी एक काळ असा होता, की मासिक पाळीचं रक्त हे प्रजननशक्तीचं प्रतीक मानलं जायचं. भारतातही पीक चांगलं यावं म्हणून त्यातलं थोडं रक्त पेरणीच्या आधी शेतात शिंपडलं जात असे, असं म्हटलं जातं.  काही समूहांत मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं स्वागत एखाद्या सणासारखं केलं जायचं. (आजही काही ठिकाणी ते आहेच.) आंध्र प्रदेश, कर्नाटकात आणि आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी पहिली मासिक पाळी आली की मुलीला मखरात बसवून तिची पूजा केली जाते. सर्जनाशी नातं जोडणारी ही प्रक्रिया निसर्गानं आपल्याला का दिली नाही, असा हेवा वाटून काही आदिम जमातींमधले (न्यू गिनी, फिलिपीन्स, आफ्रिकेतील काही जमाती) पुरुष आपल्या लिंगाच्या कातडीला जखम करून काही रक्त वाहू देत असत. जुन्या काळी मासिक पाळीचं रक्त कुष्ठरोग, गलगंड, वगैरे त्या काळी असाध्य समजल्या जाणाऱ्या रोगांवर ‘रामबाण’ उपाय म्हणून वापरलं जायचं, असंही म्हटलं जातं.

सर्जनशक्तीचा आदर ते मासिक पाळी म्हणजे शाप, असा विचार करणं हा पुरुषांच्या मानसिकतेचा प्रवास एका अर्थानं उलटा प्रवास आहे. ज्या काळी शरीर विज्ञान माहीत असण्याची सुतराम शक्यता नव्हती, त्या काळात तर्क लढवून मासिक पाळीचा गर्भधारणेशी काहीतरी संबंध आहे आणि पुढची पिढी यातूनच निर्माण होते याची जाणीव तेव्हाचा पुरुष मनात ठेवून होता असं म्हणता येईल. मासिक पाळीच्या स्त्रावाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती अगदी १९३० पर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्रालाही फारशी नव्हती. गर्भाशयातलं अस्तर वाढणं, गर्भधारणा न झाल्यामुळे ते बाहेर पडणं, त्यातले बदल आणि या प्रक्रियेची नेमकी अंत:स्रावी कारणंही १९५० पर्यंत माहिती नव्हती. एकूणच अंत:स्रावासंबंधीचं म्हणजेच ‘एंडोक्रायनोलॉजी’चं ज्ञान तोपर्यंत प्राथमिक अवस्थेत होतं. मात्र मध्ययुगात काहीच नीट माहिती नसताना जवळपास सर्व धर्मग्रंथांमध्ये मासिक पाळीविषयी जे काही ‘ज्ञान’ म्हणून लिहून ठेवलं आहे, त्याचं आश्चर्य वाटतं. उदा.पाळी चालू असताना स्त्री अमंगळ असते, ती अस्पृश्य असते, त्या दिवसांत साध्या साध्या गरजेच्या गोष्टीसुद्धा तिनं करू नयेत किंवा अमुक रीतीनं कराव्यात अशी बंधनं घातली गेली. आयुर्वेदातही अशी काही बंधनं सांगितली आहेत. ‘कौमार भृत्यतंत्र’ हा ग्रंथ आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासात महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथात नमूद केलेली बंधनं जाचक आहेत. या काळात दर्भाच्या शय्येवर झोपावं, नखं कापू नयेत, स्नान करू नये, दिवसा झोपू नये, साजशृंगार नको, आहार अल्प असावा, शरीरसंबंध तर नकोच, कारण गर्भधारणा झालीच तर अपत्य मृत किंवा विकृत होतं.. नंतर याच ठिकाणी असंही म्हटलं आहे, की हे नियम मनाचं आणि शरीराचं आरोग्य टिकण्यासाठी हितकारक आहेत. लोकरूढींमध्ये काही वेळा त्याचा विपर्यास झालेला दिसतो. भावप्रकाशकारांनी सांगितलेली या नियमांविषयीची कार्यकारण मीमांसा वास्तुस्थितीस कितपत धरून आहे हे सांगता येणार नाही. कदाचित नियम योग्य रीतीनं पाळले जावेत म्हणून केवळ धाकही घातला असावा. अर्थात ही बंधनं आजच्या मुली मुळीच पाळत नाहीत, हे बरंच आहे.(हे संपूर्ण आयुर्वेदावरचं भाष्य वा टीका नाही हे कृपया ध्यानात घ्यावं.)

अर्थात सारे धर्मग्रंथ आणि पुरातन वैद्यकीय ग्रंथ हे अर्थातच पुरुषांनीच लिहिले हे उघड आहे. आश्चर्य याचं वाटतं, की वैज्ञानिक माहिती नीट नसताना इतक्या ठामपणे निष्कर्ष त्यांनी कसे काढले असतील, जे पूर्णत: चुकीचेच नव्हे तर स्त्रीविरोधी आहेत. मातृसन्मान (तोही पुत्रास जन्म देणाऱ्या विवाहित बाईचा) सोडला, तर स्त्रीशरीराचा, मनाचा सन्मान त्यात कुठेही दिसत नाही. याबाबत एक खास ‘सर्वधर्मसमभाव’ सर्व जगभर सर्व धर्मग्रंथांनी कसोशीनं पाळला आहे. त्याचा विपरीत परिणाम आपल्या आया, आज्या, पणज्या यांनी झेलेला आहे. स्त्रीच्या सर्जनशक्तीचा सन्मान सोहळा करण्यापासून मासिक पाळीविषयी घृणा, तिरस्कार, दुर्लक्ष आणि तिच्यापासून शक्यतो विचारानं आणि म्हणून जबाबदारीनंसुद्धा दूर राहण्याची वृत्ती मनवळणी पडणं.. इथपर्यंत झालेल्या पुरुषांच्या मानसिक प्रवासाबद्दल फार संशोधन झालेलं नाही. अलीकडे प्रगत पाश्चात्त्य देशात याबाबत पाहणी झाली, पण त्यातही अगदी शिकलेल्या पुरुषांमध्येसुद्धा काही विशेष जाणिवा वा प्रगल्भता दिसली नाही

अगदी सुरुवातीला वाटणारं रक्ताचं भय, धोका, सर्जनाचं आकर्षण, हेवा आणि त्याविषयी अपार गूढता, कुतूहल.. पुढच्या काळात याच भावनांनी अंधश्रद्धा, अपसमज, बंधनं, रूढी ही रूपं घेऊन पुरुषांचं (म्हणून स्त्रियांचंही) भावविश्व भरून टाकलं. कधीतरी याच दरम्यान अपत्यजन्माच्या कार्यात पुरुषांचा- म्हणजे वीर्याचा सहभाग असतो याची निश्चिती झाल्यावर पुरुषसत्ता अफाट वाढली. पुरुषबीज धारण करणारी स्त्री ही केवळ जमीन, मृदा राहिली. त्यात बीज पेरणारा तो पुरुष. संस्कृतमध्ये स्त्रीसाठी एक शब्द वापरला जातो- ‘भस्रा’. म्हणजे अपत्यांना जन्म देणारी कातडी पिशवी. तिची शक्ती ती काय असणार? तिला आपोआपच दुय्यम स्थान मिळालं. सर्जनावर निर्णायक ताबा मिळवण्यासाठी हे करण्यात आलं हेही उघड आहे. भारतातच नव्हे, तर हे जगभर झालं. स्त्रीचा गौरव असलेली पाळी आता शाप म्हणून रुजू झाली.

    आधुनिक स्त्री आरोग्य विज्ञानाच्या इतिहासातही अशाच, पण थोडय़ा वेगळय़ा ‘ज्ञाना’च्या खुणा पाहायला मिळतात. उदा. अमेरिकेत १८७४ मध्ये डॉ. एडवर्ड क्लार्क यांनी सांगितलं, की ‘स्त्रियांना शिक्षण दिल्यास त्यांच्या प्रजननकार्यासाठी रक्त पुरवठा कमी पडतो, कारण रक्त मेंदूकडे जातं. म्हणून त्यांना फार शिक्षण देऊ नये.’ (याच काळात आपल्या म. ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती!) १९०९ मध्ये डॉ. हॉल यांचं म्हणणं असं होतं की ‘बाईच्या सर्व रोगांचं मूळ गर्भाशयात असतं.’ ‘हिस्टेरिया’ या मानसिक आजाराचं नाव ‘हुस्टेरा’ (म्हणजे गर्भाशय) या शब्दावरून पडलं होतं. आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये सर नॉर्मन जेफकॉट यांचं स्त्री आरोग्याचं पुस्तक प्रमाण मानलं जातं. त्यातही वैज्ञानिक माहिती देता देता अकारण कवित्व दाखवून, ‘मासिक पाळी म्हणजे निराश झालेल्या गर्भाशयाचे अश्रू..’ असं म्हटलं आहे.

पुरुषांच्या मनावर या सगळय़ाचे पिढय़ान्पिढय़ा, कळत न कळत एकावर एक थर चढले. परंतु याचा अतिशय विपरीत परिणाम स्त्री आरोग्यावर होत गेला. अशा विपरीत ज्ञानाचे विविध थर मला लहानथोर पुरुषांच्या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यांचंही दर्शन काही प्रमाणात इथं घडवावं असं वाटतं. अर्थात हे घट्ट थर काढून टाकून स्वत:ला नितळ स्वच्छ करणारे काही पुरुष आणि मुलगेही मला काही ठिकाणी दिसले, हेही मुद्दाम सांगायला हवं.

  युवकांबरोबर या विषयावरच्या कार्यशाळेतले माझे काही अनुभव-

मुलग्यांना/ पुरुषांना मी प्रश्न विचारतो, की तुम्हाला प्रथम कधी कळलं, की ‘मासिक पाळी’ असं काहीतरी असतं आणि ते मुलींनाच असतं? त्याविषयीच्या भावना काय होत्या?..

यावर काही उत्तरं अशी असतात-

‘‘आई किंवा मोठी बहीण बाजूला बसायची तेव्हा. वाईट वाटलं. राग आला.’’

‘‘ ‘पी.टी’च्या तासाला दोन-चार पोरी झाडाखाली निवांत बसलेल्या असायच्या. सर ‘पारशालिटी’ करतात असं वाटायचं. आम्ही मात्र पी.टी. करत उन्हात हात-पाय हलवत बसायचं! तेव्हा आमच्यात कुजबुज व्हायची.’’

‘‘बहिणीच्या स्कर्टवर लाल डाग दिसला.’’

‘‘वर्गातल्या मुली आपसात काहीतरी गुप्त गुप्त बोलतात तेव्हा कळायचं. आम्हाला पाहून त्या गप्प व्हायच्या.’’

‘‘जाहिराती पाहतात हो सगळी मुलं! त्यांच्यापासून काय लपून राहतं का आजकाल काही? त्यांना सगळं माहीत असतं.’’

‘‘मी पाच वर्षांचा होतो, तेव्हा मला कपाटात एक पॅड सापडलं. माझ्या बाहुलीला (हो, मुलगा असून माझी होती एक बाहुली.) गादी म्हणून किती छान आहे असं वाटलं आणि मी ते घेतलं. आईनं पाहिलं आणि रागावली. माझ्या हातातून ते खेचून घेतलं.. मला काही कळलंच नाही. नंतर कळलं.’’

‘‘आमच्या दहावीच्या धडय़ात आहे ना ही माहिती.. पण ऑप्शनला टाकली होती. बाईंनी शिकवलाच नाही तो धडा. घरी वाचा म्हणाल्या. मी वाचला, काही कळलं नाही.’’

‘‘काय होतं नेमकं माहीत नाही, पण ओव्हरीज फुटतात! एवढं माहिताय..’’

‘‘काही स्त्रियांमध्ये ‘पीएमएस’ असतं. म्हणजे जास्ती राग येतो, उगाच रडतात, फ्रस्ट्रेशन येतं. ते हॉर्मोन्समुळे होतं. पण आमच्या ऑफिसमध्ये काही स्त्रिया त्याचा  फायदा घेतात. आपली भडास काढतात, नाहीतर बसून राहतात.. काम करत नाहीत.’’

‘‘..पोटात दुखतं, कंबर दुखते. त्यात काय एवढं?  त्या मुलींनी गोळी घ्यावी, बाऊ करू नये.’’

‘‘आम्ही लहानपणी पोरींना पाळीवरून चिडवायचो..’’

‘‘ ‘ब्लडी’ ही शिवी यावरून आली असावी!’

 ‘‘सोबत राहायचं, तर तिचं सगळं समजून घ्यायला पाहिजे ना.. तिच्याकडूनच कळलं. पण त्या काळात सेक्स नको असं वाटतं मलाही. फार ‘मेसी’ वाटतं.’’

‘‘आमच्या शाळेत एका डॉक्टरकाकांनी आम्हा, मुला-मुलींना वेगवेगळय़ा वर्गात बसवून माहिती दिली होती. आम्हाला ‘मेल’बद्दल आणि थोडी माहिती ‘फीमेल’बद्दल. पीपीटी होती. आम्ही खाली मान घालून हसत होतो. दुसऱ्या वर्गात मुली होत्या, तिथे लेडी डॉक्टर होत्या. त्यांनी त्यांना मुलींबद्दलच सांगितलं असणार असं वाटतं.’’

‘‘त्यांनी मंदिरात जाऊ नये. म्हणजे त्या अपवित्र असतात म्हणून नाही, आता त्या अंधश्रद्धा नाहीयेत बहुतेक, पण त्यांच्या बॉडीतून निगेटिव्ह इलेक्ट्रॉनिक वेव्हज् निर्माण होतात आणि त्याचा मूर्तीवर वाईट परिणाम होतो. ऑर रिव्हर्स! तेव्हा इम्युनिटीसुद्धा ड्रॉप होते. आय डोन्ट नो, पण व्हॉट्सअ‍ॅपवर वाचलं होतं. सो,मला वाटतं बरोबर आहे ते.’’

‘‘इच्छा खूप होती, पण माझ्या मुलीला मी सांगूच शकलो नाही. तिच्या आईनं वेळेवर सगळं सांगितलं असणार. मुलगी काहीच बोलत नाही माझ्याशी त्याबद्दल. कधीच.’’

विचारांच्या या गोंधळावर काय करावं?

या सगळय़ा अगाध पुरुषी ‘ज्ञाना’वर चांगला उपाय असा, की मुलं आणि मुली यांना एकत्र बसवून नीट सारी माहिती तर द्यायचीच, पण ती अशा रीतीनं द्यायची, की त्यातून स्त्री-शरीर आणि स्त्री-मन यांचा सन्मान प्रतीत होईल. नुसती शुद्ध वैज्ञानिक पुस्तकी माहिती देऊन काहीच चांगला परिणाम होत नाही. हे शिक्षण म्हणजे केवळ शंका समाधानदेखील नव्हे. अर्थात विज्ञानाशी बिलकूल प्रतारणा न करता, साध्या शब्दांत (फॅलोपियन टय़ूब, ग्रीवा, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन- वगैरे अवघड शब्द नकोत!) आणि साध्या नेहमीच्या आवाजात (कुजबुजीच्या नव्हे.) बोलायला हवं. समोर बसलेली मुलं आणि मुली पिढय़ांची संस्कृती ओझं म्हणून घेऊन बसलेली असतात, याचं भान अशा संवादकाला हवं. या संस्कृतीत, रूढी-परंपरांमध्ये चांगलं काय, टाकून देण्यासारखं काय, हे संवादकाला माहीत हवं. ‘जुनं ते चांगलं’, ‘आपले पूर्वज काय वेडे होते का?’, ‘बाईला त्या काळात विश्रांती हवी म्हणून तिला अस्पृश्य मानलं गेलं. ते योग्यच’ असं म्हणणारा शिक्षक नको. तसंच ‘या सगळय़ा तुमच्या, स्त्रियांच्या जुन्या अंधश्रद्धा आहेत. त्या टाकून द्या.’ असं ‘व्हिक्टिम ब्लेमिंग’सुद्धा नको आहे. सरतेशेवटी पुरुष बदलू शकतात असा विश्वास वाटला आणि त्यांच्याशी या विषयावरदेखील संवाद पूर्ण झाला याचा आनंद झाला.. तो अधिकाधिक मुलग्यांमध्ये झिरपायला हवा..

संवादक म्हणजे फक्त माहिती देणारा डॉक्टर किंवा शिक्षक किंवा उपदेशक नव्हे. संवादक म्हणजे संवाद घडवून आणणारा माणूस. या संवादामुळे मुलींना स्वत:च्या शरीराबद्दल माहिती तर मिळेलच, पण त्यांना स्व-सन्मानाचा साक्षात अनुभव मिळेल आणि त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलग्यांमध्ये स्त्री-सन्मान जागा होईल. हीच गोष्ट मुलींना पुरुष शरीर-मनाविषयी वाटेल.) मुलं आणि मुली अशा संवादानंतर एकमेकांशी याही विषयावर बोलू शकतील. चिडवणं, टिंगलटवाळी करणं तर बंद होईलच, पण गरज पडल्यास ही मुलं एकमेकांना नि:संकोचपणे मदत करतील. जुन्या स्त्रीविरोधी प्रथा आणि अनाठायी बंधनं टाकून देतील आणि त्यावर घरच्यांशी संवाददेखील करतील. सगळी शास्त्रीय माहिती त्यांच्या लक्षात राहील असं नाही, पण दृष्टिकोन परस्पर सन्मानाचा निश्चित राहील.

याचा साक्षात संवादी अनुभव मी आणि माझ्या संवादक सहकाऱ्यांनी अनेकदा घेतला आहे. आमचा ‘रिलेशानी’ (म्हणजे ‘शानदार रिलेशनशिप’- स्वत:शी आणि इतरांशी!) हा आयुष्याच्या ‘दुसऱ्या दशका’त असणाऱ्या, मोठय़ा होणाऱ्या, मोठय़ा झालेल्या मुलामुलींचा एक जिंदादिल संवादी उत्सव असतो. त्यातला एक प्रसंग इथे सांगतो-

शिबिरात मुलामुलींनी मिळून एक नाटय़प्रसंग सादर केला होता. तो असा-

वर्गाची सहल जायची आहे. एक मुलगी कोपऱ्यात एकटी बसलीय. मैत्रिणी विचारतात, ‘‘काय झालं गं.. अशी का बसलीयस?’’

‘‘परवा जायचीय ना पिकनिक.. आणि आज माझी मासिक पाळी सुरू झालीय. आता आई, आजी नको म्हणणार..’’

तेवढय़ात दोन मुलगे येतात. ‘‘काय झालं, ही अशी का बसलीय? काही होतंय का?’’

मुली त्यांना म्हणतात, ‘‘तुमचं काय काम इथे? आमचा प्रॉब्लेम आहे.’’

पोरं ऐकत नाहीत. मग मुली सगळं सांगतात. त्यावर मुलगे म्हणतात, ‘‘ तिच्या घरी जाऊ, नीट सांगू. आपण काळजी घेऊ..’’ वगैरे.

सीन दुसरा. घरात आजी, आई, मुलगी आणि ही मुलं. मुलं आई आणि आजीला छान पटवून सांगतात.

आजी म्हणते, ‘‘ठिकाय! काळजी घ्या. पण मंदिरात तिला जाऊ देऊ नका.’’ एक मुलगा म्हणतो, ‘‘आजी, तिची पाळी देवानंच निर्माण केलीय ना?’’ आजी फक्त हसून बघते. सगळी पोरं आनंदानं बाहेर पडतात!

यातला मुलग्यांचा पुढाकार मला महत्त्वाचा वाटतो. असा नाटय़प्रसंग सादर झाल्यावर त्यातल्या प्रत्येक पैलूवर चर्चा होते. त्यात मुलींसाठी स्वच्छतेच्या सोयी, त्यांचं आरोग्य, जुन्या पिढीत रुजलेले अपसमज, मंदिर, पावित्र्य, देव म्हणजे सृष्टीनिर्माता आणि स्त्रीच्या ओटीपोटातली सृष्टी.. या सगळय़ा गोष्टी आल्या.

(लेखक डॉक्टर असून आरोग्य संवादाच्या क्षेत्रात गेली सत्तावीस वर्ष कार्यरत आहेत.)