scorecardresearch

Premium

ऐतिहासिक क्षणाच्या शिल्पकार

भारताने मंगळाला गवसणी घालण्याची मोहीम यशस्वी करून दाखवली, त्यातलं एक अग्रगणी नाव होतं, ‘इस्रो’च्या अहमदाबाद येथील प्रयोगशाळेतल्या सिस्टीम इंजिनीयर मीनल रोहित यांचं.

ऐतिहासिक क्षणाच्या शिल्पकार

भारताने मंगळाला गवसणी घालण्याची मोहीम यशस्वी करून दाखवली, त्यातलं एक अग्रगणी नाव होतं, ‘इस्रो’च्या अहमदाबाद येथील प्रयोगशाळेतल्या सिस्टीम इंजिनीयर मीनल रोहित यांचं. भारताचं नाव अभिमानानं उंचावणाऱ्या या स्त्री वैज्ञानिकेची खास मुलाखत आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त.

पृथ्वीशिवाय, चंद्रानंतर वस्ती करण्यायोग्य ठिकाण म्हणून मंगळ आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या ना परतीच्या बोलीवर ‘मार्सवन’ ही मंगळावर सामान्य माणसाला पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे. जिवावर उदार होऊन काही भारतीयांनी त्यात नावेही नोंदवली आहेत. आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया, युरोपीय समुदाय यांच्यानंतर भारताने मंगळाला गवसणी घालण्याची मोहीम यशस्वी करून दाखवली. ६५० दशलक्ष किलोमीटरचे अंतर केवळ १० महिन्यात म्हणजे किलोमीटरला ७ रुपये दराने कापून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. याची आणखी वैशिष्टय़े म्हणजे सर्वात कमी म्हणजे ४५० कोटी रुपये खर्च व पहिल्याच प्रयत्नात आलेले यश! (आतापर्यंत मंगळावर जाणाऱ्या मोहिमांत कुठल्याही देशाची मोहीम पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली नव्हती). यातून भारताची तंत्रसिद्धता अधोरेखित झाली ते वेगळेच. या मोहिमेचा उद्देश मंगळावर पाणी व मिथेन आहे की नाही हे शोधण्यासह आपण पृथ्वीवरून मंगळावर यान पाठवून ते नियंत्रित करण्याची दूरनियंत्रण तंत्रक्षमता प्राप्त केली आहे की नाही हे पाहणेसुद्धा होतेच. याशिवाय मंगळ मोहिमेमुळे चीन, युरोपीय समुदाय, क्रायोजेनिक इंजिने नाकारणारे रशिया व अमेरिका यांच्यावर मात करून मिळवलेली स्वयंपूर्णता हे एक वैशिष्टय़ होते. त्यातील सर्व उपकरणे भारतात बनवलेली असल्याने ते ‘मेक इन इंडिया’चे ते यशस्वी उदाहरण होते. २४ सप्टेंबरला ही मोहीम सफळ संपूर्ण झाली तेव्हा जगाला आश्चर्य वाटले. ‘इस्रो’च्या आतापर्यंतच्या मोहिमांपेक्षा ही मोहीम दुसऱ्या एका अर्थाने वेगळी होती ती म्हणजे स्त्री वैज्ञानिकांचा सहभाग.
स्त्रिया अडचणींवर मात करण्यात पुरुषांपेक्षा वरचढ असतात, त्यामुळे त्यांचाही वाटा व जिद्द यात मोठी होती. रोहिणी अग्निबाण सोडल्यापासून एकदाही ‘इस्रो’तील कुठल्या स्त्रीची छबी वृत्तपत्रात विराजमान झाली नव्हती;  ती या मोहिमेमुळे झाली. या यशामागे स्त्री वैज्ञानिकांचे हात आहेत हे या निमित्ताने दिसून आले.
ch17भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे ‘इस्रो’च्या अहमदाबाद येथील प्रयोगशाळेत काम करणाऱ्या सिस्टीम इंजिनीयर व मंगळ मोहिमेत विशेष कामगिरी करणाऱ्या मीनल रोहित यांच्या रूपाने या कसरतीवरही मात करणाऱ्या स्त्री वैज्ञानिकांचे उदाहरण ताजे आहे. आज ‘इस्रो’मध्ये २० टक्के महिला आहेत, त्यांच्यापकी बहुतेकांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने भारताच्या मंगळ मोहिमेच्या यशाला हातभार लावला आहे. या मोहिमेच्या यशानंतर या महिलांनी एकमेकींचे अभिनंदन केले. त्याचे जे छायाचित्र प्रसिद्ध झाले,      
ते म्हणजे भारतातील स्त्रीशक्तीच्या सक्षमीकरणाचे एक प्रतीकच मानायला हवे.
 मूळच्या राजकोट येथील सौराष्ट्रच्या मीनल रोहित यांनी लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यांनी सांगितले की, ‘डॉक्टर होऊन लोकांची सेवा करावी असे वाटत होते, त्याचा पैसे कमावण्याशी काही संबंध नव्हता, सामाजिक प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती. सामान्य माणसासाठी काहीतरी करावे ही ऊर्मी तेव्हापासून होती. माणूस ठरवतो व देव ती गोष्ट आपल्याकडून करून घेतो, असे म्हणतात, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. वैद्यकीय शाखेच्या जागा शिल्लक उरल्या नाहीत. त्यामुळे मी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला, त्यात इलेक्ट्रॉनिक्स हा विषय होता. जे काही मिळाले होते त्यावर मी समाधानी होते व त्यात चांगले काम करून दाखवायचे हा निर्धार होता. एक दिवस ‘इस्रो’चे रॉकेट उड्डाण थेट प्रक्षेपणामुळे पाहण्याचा योग आला व तो माझ्या आयुष्यातील उत्कंठेचा क्षण होता. त्याचवेळी मी ‘इस्रो’त जाण्याचा निर्णय घेतला. जे लोक रॉकेट (अग्निबाण) उडवण्यासारख्या गोष्टी करू शकतात, त्यांच्या संस्थेत वैज्ञानिक म्हणून जायचे ठरवले. नंतर ते स्वप्न साकार झाले. मॅन प्रपोझेस गॉड डिसपोझेस.. (इथे मॅन हा शब्द स्त्री-पुरुष या दोन्ही अर्थानी आहे) हे वचन इथे मात्र मला अनुभवायला मिळाले.’
ch18 स्त्री वैज्ञानिक, करिअर व कुटुंब यांचा मेळ कसा घालतात या प्रश्नावर त्यांनी प्रामाणिक उत्तर दिले की ‘मी नेहमी कामालाच प्राधान्य दिले. घरच्या आघाडीवर व कामाच्या ठिकाणीही झपाटय़ाने काम करणे ही हातोटी साधली. तसेच कुटुंबीय व सहकाऱ्यांचा पाठिंबा यामुळे हा समतोल सांभाळणे सुकर झाले.’ मीनल यांनी करिअर केले ते समर्पित वृत्तीने. विज्ञान क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या आजच्या मुलींना त्यांचे एकच सांगणे आहे; ‘तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा, कधीच ती सोडू नका, जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा.’ मीनल यांचा हा संदेश फक्त इतरांनाच आहे असे नाही तर स्वतसाठीही त्यांनी उत्तुंग स्वप्ने पाहिली आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची पहिली स्त्री अध्यक्षा बनण्याचे स्वप्न त्या बाळगून आहेत. ‘इस्रो’चे आतापर्यंतचे सातही अध्यक्ष हे पुरुष आहेत. त्यांचा मुलगा आता सहा वर्षांचा आहे, त्याला वडिलांप्रमाणे अभियंता व्हायचे आहे. ‘‘त्याचे बाबा त्याला कुठलीही गोष्ट दुरुस्त करणारे सुपरहिरो वाटतात, पण तरीही त्याच्यासाठी मी त्याची मैत्रीण बनू शकले यात मला समाधान आहे, तो अनेक गोष्टी माझ्याशी बोलतो, शेअर करतो,’’ असे त्या सांगतात.
 विज्ञान क्षेत्रात स्त्री-पुरुष भेदभाव आहे का यावर मीनल यांचे उत्तर असते, ‘‘इस्रोत काम करताना कधीही स्त्री-पुरुष असा भेदभाव जाणवला नाही. ‘इस्रो’चा पोशाख अंगावर चढवल्यानंतर स्त्री-पुरुष हा भेद राहत नाही. तुम्ही देशाचे एकनिष्ठ सेवक बनता. तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे पाहून तिथे कामाचे वाटप होत नाही. तुम्ही काय काम करता याचा लिंगभावाशी संबंध नसतो. ते सगळे मनाचे खेळ असतात.’’
 ‘इस्रो’त अनेक वर्षे काम केल्याचा अनुभव मीनल यांच्या गाठीशी आहे. मंगळ मोहिमेतही दोन वर्षे अथक काम सुरू होते. या मोहिमेत ‘सिस्टीम इंजिनीयर’ ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेल्या पाच मुख्य उपकरणांपैकी Methane Sensor for Mars  अर्थात एमएसएमच्या कॅमेऱ्याच्या प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. या कॅमेऱ्याची जोडणी, एकात्मीकरण व गुणवैशिष्टय़े (स्पेसिफिकेशन्स) ठरवण्याचे काम त्यांनी पाहिलं. मिथेनविषयी अचूक माहिती मिळवणे हा या उपकरणाचा मुख्य हेतू आहे. आता या एमएसएम कॅमेऱ्याकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करण्याचे कामही मीनल पाहत आहेत.
 एमएसएम प्रकल्पाच्या महत्त्वाविषयी मीनल रोहित म्हणतात, ‘‘मंगळावर जर मिथेन असेल तर तेथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. कारण सजीवांच्या निर्मितीसाठी कार्बनी संयुगांची गरज असते. त्यामुळे मंगळावरील हा वायू मोजण्यासाठी आम्ही एमएसएम पेलोडची निवड केली. मंगळावर मिथेन आहे की नाही याची तपासणी आतापर्यंत अनेक अवकाशयानांनी केली आहे, पण त्यांना निश्चित अंदाज वर्तवता आलेला नाही. त्यामुळे मिथेनचे प्रमाण ‘पार्टिकल पर बिलीयन’ म्हणजे ‘अब्जांश कणातील त्याचा भाग’ इतके अचूक प्रमाण शोधायचे आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर मिथेनचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. ते ठिकठिकाणी बदलते, ते शोधण्याचा प्रयत्न हे उपकरण मिथेन संवेदकाच्या मदतीने करीत आहे. मिथेन हा तेथील खडकात शोषला जातो. तेथील खडकांवर पाण्याची क्रिया होऊन तो पुन्हा त्यातून बाहेर पडतो. तेथे मिथेन निर्माण करणारे मिथोजेन्स व मिथेन सेवन करणारे मेथॅनोट्रॉफस हे सूक्ष्म जीव असू शकतात. आमच्या एमएसएम उपकरणात फॅब्री पेरॉट एटॅलॉन फिल्टर्सवर आधारित रेडिओमीटर असून त्याच्या मदतीने मिथेनचे प्रमाण मोजता येते. मंगळाच्या सगळ्याच पृष्ठभागावरून निघणाऱ्या प्रारणांचे शोषण करून नंतर तेथील मिथेनचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे इतर मोहिमांपेक्षा यातील अचूकता जास्त असणार आहे. मंगळावर मिथेन थोडय़ा प्रमाणात व कार्बन डायॉक्साईड अधिक असल्याने ते गवतात सुई शोधण्यासारखे आहे. तिथे जो मिथेन ज्या जैविक व अजैविक क्रियांमधून तयार होतो त्याचीही माहिती यातून आपल्याला मिळणार आहे. यात उपकरणाचे वजन कमी ठेवणे हे मोठे आव्हान होते, तर कमीत कमी वेळात ते तयार करण्याचे दुसरे आव्हान होते, त्यात आम्ही यशस्वी झालो.’’
 मीनल सांगतात, ‘‘मंगळ मोहीम जाहीर झाल्यापासून मी रोज १६ ते १८ तास काम करीत होते; त्यात शनिवार, रविवार अशा सुटय़ांचे मोह केव्हाच बाजूला पडले होते. मुलगा तापाने आजारी असताना मी त्याच्यापासून दूर होते. त्यावेळी मी त्याच्याजवळ असणे आवश्यक असले तरी कामावरची एकाग्रता ढळणे परवडणारे नव्हते. प्रत्येक काम पूर्ण करण्याची कालमर्यादा सांभाळणे, सहकाऱ्यांशी समन्वय साधणे व यासाठी नेहमी अहमदाबाद-बंगळुरू असा प्रवास करणे याला पूर्ण वाहून घेतले होते. त्यावेळी कुटुंब बाजूला ठेवून काम करण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण वेळ फार थोडा होता व मंगळ मोहिमेचे आव्हान मोठे होते. घर व काम यात थोडी ओढाताण झाली, पण कुटुंबाला बाजूला ठेवून काम करण्यातही एक वेगळे आव्हान असते. काहीवेळा तसे करता आले पाहिजे असे वाटते. एक टीम म्हणून आम्ही मंगळयान मोहीम यशस्वी करण्याचे आव्हान पेलले होते, सर्व आव्हानांवर मात करून जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा संकल्प सोडला होता. सांघिक भावना व एकमेकांना समजून अनेक तास काम केल्याशिवाय मंगळ मोहिमासारख्या योजना सिद्धीस जात नाहीत.’’
 मंगळ मोहीम यशस्वी झाली तेव्हा त्यांची भावना, ‘याचसाठी केला होता अट्टहास’ अशीच होती. मीनल सांगतात की, ‘‘भारतासाठी ती तंत्रज्ञानातील स्पर्धा होती. ही मंगळ मोहीम अवघ्या जगासाठी, अवकाश संशोधनविश्वासाठी चर्चेचा विषय ठरली होती. विकसनशील देश असूनही प्रगती कशी साधता येते हे या मोहिमेने जगाला दाखवले. अनेक आव्हानांवर मात करीत आम्ही ध्येयपूर्ती केली. अडचणी असल्या तरी प्रत्येक गोष्ट शक्य आहे हा विश्वास मनात होता. जर तुम्ही खरोखर परिश्रम केलेत व मनापासून इच्छा असली तर सगळे काही साध्य होऊ शकते अशी माझी धारणा आहे.’’
 मीनल यांच्या मते तरुण मुलामुलींनी लिंगभेद वगैरे बाजूला ठेवून विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात यायला हवे. आपल्या सुंदर देशाला आज त्यांची खरोखर गरज आहे. हे सांगताना त्यांची तळमळ स्पष्ट जाणवत होती. ‘‘फळाची अपेक्षा न धरता काम करीत राहा. मनापासून काम करा, व्यक्तिगत फायदा न पाहता पूर्ण समाधानाने काम करा. कठोर परिश्रम, सद्हेतू, संघभावना, कामाच्या ठिकाणीही प्रसंगी गंमतजंमत हे सगळे हवंच. मात्र, तुमचे काम तुमच्याआधी तुमच्याविषयी बोलले पाहिजे. शेवटी यश मिळवणे हा एक प्रवास असतो, पण त्यात सातत्य असणं अतिशय आवश्यक असतं.’’
विशेष म्हणजे परदेशात लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या साद घालत असतानाही स्वदेशीच्या अभिमानाने मीनल देशाच्या विज्ञान प्रगतीसाठी स्वदेशी राहून काम करीत आहेत. स्त्री वैज्ञानिक सहसा प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असतात, पण त्यांच्या कहाण्याही अनेक तरुण मुलींना प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.
मीनल यांच्या रूपाने अशीच एक कहाणी पुढे आली आहे. एका वैज्ञानिक महिलेलाही, करिअर व घर यांच्यातली कसरत चुकलेली नसली तरी असंख्य आव्हाने पेलत एखादे काम करण्याची जिद्द त्यांच्याठायी नक्कीच दिसून येते. शिक्षणात मुलीही आघाडीवर आहेत.  विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात स्त्रींना अनेक संधी आहेत. त्यांनी
फक्त इच्छाशक्ती दाखवून त्याचा लाभ घेतला पाहिजे; तरच भारताला महासत्ता बनवण्यात त्यांचाही मोठा वाटा असेल.
राजेंद्र येवलेकर -rajendra.yeolekar@expressindia.com

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2015 at 01:11 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×