scorecardresearch

नातीशी केला मोबाइल शिकण्याचा करार!

आमची नात राधा दहावीत होती. तिला लॅपटॉपवर ऑनलाइन शिकवणी ‘अटेंड’ करावी लागत असे. इंटरनेट, वायफायचा गोंधळ झाला की ती त्रासायची.

नातीशी केला मोबाइल शिकण्याचा करार!

श्रीनिवास स. डोंगरे

आमची नात राधा दहावीत होती. तिला लॅपटॉपवर ऑनलाइन शिकवणी ‘अटेंड’ करावी लागत असे. इंटरनेट, वायफायचा गोंधळ झाला की ती त्रासायची. तिची सारखी चिडचिड बघून माझ्या बायकोनं, म्हणजे राधाच्या आजीनं नातीला जवळ घेतलं आणि म्हणाली, ‘‘अगं राधा, शाळेचा अभ्यास, परीक्षा, मार्क म्हणजेच सर्वस्व नाही. अभ्यासातून जरा बाहेर पडण्यासाठी काहीतरी वेगळं म्हणून आजपासून मी तुला घरातल्या साध्या साध्या व्यवहारी गोष्टी विरंगुळा म्हणून शिकवते. तुझाही वेळ छान जाईल.’’

राधा तयार झाली. बायको म्हणाली, ‘‘पण एका अटीवर हं, त्या बदल्यात तू मला आणि यांना (आजोबांना) मोबाइल आणि टॅब कसा वापरायचा हे शिकवशील ना?’’
‘‘ओके आजी, डन!’’ म्हणत राधानं मूठ बंद करत ‘थम्स अप’ अंगठा दाखवला. आजी म्हणाली, ‘‘अंगठा दाखवून गंडवू नको म्हणजे झालं!’’ राधाचं उत्तर तयारच होतं, ‘‘हो आजी, पण मला घरातली कामं नको सांगू म्हणजे झालं!’’ तर अशी आमच्या शिकण्याला नव्यानं सुरुवात झाली.
गणपती जवळ आले होते. राधाला आजीनं फुलांचे हार, तोरणं करणं, ठिपक्यांची रांगोळी शिकवली. ठरलेल्या कराराप्रमाणे राधानं मला जुन्या साध्या फोनच्या बदल्यात प्रथम स्मार्टफोन व ‘अँड्रॉइड’चा टॅब घ्यायला सांगितलं. त्याची किंमत बघूनच मी हबकून गेलो. पण मी आणि बायकोनं निश्चय केला होता. मग गणपतीच्या निमित्तानं खरेदी केली.

शिकण्याची यादी ठरलीच होती. त्याप्रमाणे तिनं आम्हाला मेसेज कसा करायचा, आलेला मेसेज कसा बघायचा, नातलगांचे नंबर कसे ‘सेव्ह’ करायचे व ‘व्हॉटस्पॲप’ कसं बघायचं आणि करायचं ते शिकवलं. कॉल लॉगमध्ये जाऊन कुणाचा फोन आला होता हे कसं बघायचं ते शिकलो.
बऱ्याच बारीकसारीक गोष्टी मोबाइलवर शिकलो, पण आमचं सहस्रचंद्रदर्शनाच्या जवळ वय झाल्यामुळे मधूनमधून शिकवलेल्या काही गोष्टी विसरायचो! राधा, मुलगा, सून यांना परत परत विचारलं, की ते वैतागायचे. मग मी आणि बायकोनं छोटी डायरी काढली. त्यात बारीकसारीक मोबाइलमधल्या स्टेप्स, चिन्हांसकट लिहून काढल्या. एकंदरीतच मोबाइल वापरायचा सराव पाहिजे हे पटलं.

तिकडे राधा कपडय़ांना इस्त्री करणं, शर्टाला बटण शिवणं, चहा करणं अशी साधी कामं शिकत होती आणि ॲग्रिमेंटप्रमाणे आम्ही मोबाइलवर फोटो कसा काढायचा आणि कसा पाठवायचा ते शिकलो. ‘व्हॉट्सॲप’वर चॅट करू लागलो. ‘यूटय़ूब’ उघडून पाहता यायला लागलं.
आता मुलगा बाहेरगावी गेला की ‘व्हिडीओ कॉल’ करून गप्पा मारतो. सुनेकडून टॅबवर मराठी फाँटवर टाइप करायला शिकलो. त्यामुळेच छोटेमोठे लेख टाइप करून पेपरात पाठवू शकतो. या वयात वेळ फार छान जातो. विचारांना चालना मिळते.

बायको ‘यूटय़ूब’वर नवीन नवीन रेसिपी शिकते. ती भगिनी समाजात आणि मी आमच्या कट्टय़ावर गेल्यावर सराईतपणे मोबाइल वापरतो. फालतू फॉरवर्डस् पुढे पाठवत नाही! चांगली माहिती, लेख, घरच्या समारंभांचे फोटो हे आम्ही स्टेशनरी दुकानवाल्याला ई-मेल करून पिंट्र काढून आणतो आणि त्यांची स्प्रिंग फाइल बनवतो, फोटो अल्बममध्ये लावतो. नंतर फोन मेमरीतून डिलीट करतो.

आम्ही मुंबईत मध्यवर्ती भागात वस्तीस आहोत. त्यामुळे मोबाइलवरून ऑनलाइन खरेदी, टॅक्सी आणि उबर बुकिंग वगैरे शिकलो असलो तरी ते वापरत नाही. भलीभली माणसं ऑनलाइन व्यवहारात फसल्याची उदाहरणं पेपरात वाचत असतो.. असो! मित्रमंडळी आणि नातेवाईकांत मात्र सहजपणे मोबाइलचा वापर करतो. दोघांनी एकमेकांचा ‘डीपी’ ठेवला आहे!

मोबाइल हे कोलीत नाही तर ज्येष्ठांना वरदानच आहे याचं पुरेपूर भान ठेवून वापर करतो, त्यामुळे वेळ एकदम झकास जातो. आणि याबाबतीत माझं आणि हिचं एकमत आहे!
tatyadongre@gmail. com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 00:04 IST

संबंधित बातम्या