डॉ. आनंद नाडकर्णी

व्यसनाधीनता दारू, सिगारेट, तंबाखूपुरती मर्यादित राहण्याचे दिवस केव्हाच संपले. आता युरोप-अमेरिकेत अनेक ठिकाणी ‘लीगलाईज’ केलेल्या ‘वीड’चे दाखले देऊन आपल्या देशातही तसे व्हायला हवे असा प्रतिवाद केला जातो. पण याच्याही पुढे जाऊन स्क्रीन ऑब्सेशन, मोबाइलमधील विविध आकर्षणे, पैसे लावून खेळायचे ऑनलाइन खेळ, यांचे व्यसनात कधी रूपांतर होते आहे, हे अनेकांना कळतही नाहीये. येत्या २६ जून २०२२ च्या ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिना’च्या निमित्ताने या व्यसनांच्या वाटांना लगाम घालताना ‘व्यसनी वृत्ती’ कशी निर्माण होते हे लक्षात घेऊन त्या वृत्तीला विधायक वळण देण्यासाठी अनेक ज्ञानशाखांना एकत्रित होण्याची गरज अधोरेखित होते आहे. त्यासाठी आपल्याला या मार्गावर एक एक पाऊल घट्ट रुतवतच पुढे जावे लागणार आहे..

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला इतकी वर्षे झाली.. आणि व्यसने तर वाढतच आहेत.. काय वाटते तुम्हाला?’ हा प्रश्न मला पत्रकार परिषदेमध्ये नाही, तर ‘मुक्तांगण’मध्ये रुग्णांचा उपचार गट घेताना एका रुग्णमित्राने अलीकडेच विचारला. ‘मुक्तांगण’च्या इमारतीमध्ये प्रवेश केला की संस्थेचे ‘मिशन स्टेटमेंट’ नजरेमध्ये भरते- ‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे उद्दिष्ट आहे..’ हे त्यातील पहिले वाक्य! त्या रुग्णमित्राला मी म्हणालो, ‘‘आज छत्तीस वर्षांनंतर आपल्या उद्दिष्टाचे महत्त्व तिळमात्र कमी झालेले नाही. किंबहुना त्या ध्येयाची समर्पकता (Relevence) वाढलेलीच आहे असे मी समजतो. समस्येचे स्वरूप आणि पदर बदलले आहेत, पण त्याच वेळी व्यसनमुक्त झालेल्या मित्रांची संख्यासुद्धा वाढली आहे आणि वाढते आहे!’’

‘मुक्तांगण’च्या या ३६ वर्षांच्या प्रवासामधल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सुनंदा (डॉ. अनिता अवचट) म्हणायची, ‘‘ देअर इज नो होपलेस केस ऑफ अ‍ॅडिक्शन.. ही धारणा घेऊनच आपण काम करायला हवे. नाही तर वाढत्या वयाबरोबर आणि वर्षांबरोबर आपलीच ऊर्जा कमी व्हायची.’’ ही धारणा रुजवल्यामुळेच आज व्यसनमुक्त सहकाऱ्यांच्या मदतीने वसवलेली ही संस्था राष्ट्रपती पारितोषिक विजेती तर ठरलीच, पण ‘आयएसओ’ मानांकन मिळवून टिकवणारी व्यावसायिक संघटनाही झाली. माझ्यासारखे, आमची संचालक मुक्तासारखे (मुक्ता पुणतांबेकर) मनआरोग्य क्षेत्रातले कार्यकर्ते

आणि व्यसनमुक्तीच्या वाटेवरचे शिलेदार यांच्या संगमामधून आज महाराष्ट्राच्या बावीस शहरांतील नियमित पाठपुरावा केंद्रांत येणाऱ्या व्यसनमुक्त मित्रांची उपस्थिती अनेक वेळा शेकडय़ांमध्ये मोजावी लागते.. त्यांच्या सहचरी, पालक आणि मुलेसुद्धा स्वयंविकासासाठी मार्गस्थ झालेली दिसतात.

या आश्वासक वास्तवाबरोबरच आहे लाखोंच्या संख्येने वाढणारी व्यसनाधीन व्यक्तींची संख्या. नव्याने उसळलेल्या वीडच्या (चरस, गांजा – कॅनाबीस) व्यसनसाथीचे उदाहरण घेऊ या. मद्य आणि तंबाखू यांच्याशी स्पर्धा करणाऱ्या या पदार्थाची दखल आपल्याला नव्याने घ्यावी लागणार आहे. या संदर्भात भारतामध्ये तीन महत्त्वाच्या शोधपाहाण्या झाल्या आहेत. (२००१, २००४ आणि २०१९). त्यातील तिसरी पाहाणी (National Drug Dependence Treatment Centre and AIIMS) सांगते, की ‘वीड’ची ‘सवय’ लागलेल्यांची संख्या देशामध्ये ७२ लाख असून ‘व्यसन’ लागलेल्यांची संख्या २५ लाखांवर गेली आहे. दुसऱ्या बाजूला या पदार्थाचे अतिशय प्रभावी मार्केटिंग होते आहे, की ते ‘सॉफ्ट ड्रग’ आहे म्हणून. सल्ल्यासाठी येणाऱ्या अनेक तरुण-तरुणी आम्हा कार्यकर्त्यांना युरोप आणि अमेरिकेमध्ये ‘लीगलाईज’ केलेल्या या वनस्पतीचे दाखले देतात. या विषयाच्या खोलात जाऊन चर्चा करणारा वेगळा लेख लिहिता येईल. आपल्या देशातही कॅनाबीसवरील बंधने उठवण्याची चर्चा सुरू झाली आहे. भांग, चरस, गांजा ही ‘सांस्कृतिक दृष्टीने आपली’ मंडळी आहेत असाही प्रचार सुरू झाला आहे. ‘कॅनाबीस पार्लर्स’मधून मिळणाऱ्या कररूपी उत्पन्नाची समीकरणे रचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतातल्या दोन मोठय़ा नामवंत कंपन्यांनी या वनस्पतीवर आधारित ‘औषधे’ तयार करण्याची आखणी सुरू केली आहे. नजीकच्या भविष्यकाळात आपल्या देशाला ‘वीड’ या विषयावर सांगोपांग चर्चा करून एक धोरण निश्चित करावे लागणार आहे.’ ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाच्या ताज्या अंकामध्ये जपान देशात ‘कॅनाबीस’च्या निमित्ताने येऊ घातलेल्या विवादावर बातमी वाचायला मिळाली. ही समस्या जगातील सर्व राष्ट्रांपुढे येणार आहे. एकाच मूलस्रोतापासून निर्माण होणारे उपयुक्त पदार्थ आणि अपायकारक पदार्थ ही काही नवी गोष्ट नाही. अफूपासून अणुऊर्जेपर्यंत अनेक विषयांना ती लागू आहे. प्रत्येक देशाला या संदर्भात एक ठाम आणि शास्त्रीय भूमिका घ्यावी लागणार असून अभिनिवेश सोडून चर्चाही करायला लागणार आहे. ताडीसारख्या मादक पेयांमधली अमली तीव्रता वाढवण्यासाठी ‘ट्रायक्लोराल हायड्रेट’सारख्या रसायनांचा वापर झाल्याची प्रकरणे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली होती. नफा कमावण्याच्या ध्येयामध्ये लोकांच्या आरोग्याची तमा बाळगण्याची अपेक्षा तरी आपण कशी धरावी?

  त्यात भर पडली आहे ‘Nonchemical’ व्यसनांची. जुगाराचे व्यसन आधीपासून होतेच. क्रिकेटवरची सट्टेबाजीसुद्धा होती. त्यात भर पडली आहे ‘खेळातल्या टीमस्’ बनवणाऱ्या अनेक ऑनलाइन मोहांची. टीव्हीवर दिसणाऱ्या प्रत्येक जाहिरातीच्या शेवटी, गडबडीने, तोंडातल्या तोंडात बोलली जाणारी वाक्ये महत्त्वाची, पण ‘न ऐकण्यासाठीच’ असतात. ‘आयपीएल’ हंगामात क्रिकेट संघटनेच्या प्रसिद्धी प्रसारण हक्कांच्या प्राप्तीबद्दलची अब्ज-विधाने आपण ऐकतो-पाहातो पण दर आठवडय़ाला नियमितपणे केंद्रात मदतीसाठी येऊ लागलेल्या तरुणांनी या ‘खेळात’ लाखो रुपये गमावलेले असतात आणि त्यातल्या बहुतेकांच्या घरी असलीच तर फक्त मनाची श्रीमंती असते. याशिवाय हातातील ‘स्क्रीन’ काढून घेतल्यावर आपापल्या शारीरिक वयानुसार विविध शैलींमध्ये आकांत करणाऱ्यांचे काय? करोनाच्या काळात या संख्येमध्ये प्रचंड भर पडली आहे. ‘स्क्रीन ऑब्सेशन’ ही एक नवी समस्या नुसती आलेलीच नाही, तर स्थिरावली आहे. तर या सर्व लाटांना आपण तोंड कसे देणार? व्यसनांच्या वाटांना लगाम घालताना ‘व्यसनी वृत्ती’ कशी निर्माण होते हे लक्षात घेऊन त्या वृत्तीला विधायक वळण देण्याचे मार्ग शोधण्यासाठी अनेक ज्ञानशाखांना एकत्रित व्हायला हवे. मनआरोग्य, शिक्षण, प्रशासन, कला, क्रीडा अशा विभागांनी एकत्र येऊन आपापल्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रयोग करायला हवेत. असे अनेक ‘पायलट-प्रोजेक्ट’ होतील, तरच त्यातून एक ‘मॅन्युअल’ तयार होईल. ‘From projects to Policy’ असा क्रम असायला हवा. आपण अनेकदा ‘पॉलिसी’ म्हणजे धोरणे बौद्धिक काथ्याकूट करून तयार करतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगांकडे वळतो. या दोन्हींचा मेळ घालणारी स्वायत्त आणि उत्साही यंत्रणा हवी. या क्षेत्रातील जाणीव-जागृती संसाधने निव्वळ प्रचारी न होता कल्पकपणे कशी वापरता येतील, यावर खल होणे गरजेचे आहे. फक्त भीती आणि धाक या भावना प्रभावी प्रतिबंधासाठी पुरेशा नाहीत. तरुणांशी बोलताना आम्ही कार्यकर्ते

  Healthy High आणि Unhealthy High असे शब्दप्रयोग करतो. आमचा राहुल जाधव हा कार्यकर्ता व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी यातून बाहेर पडून मॅरेथॉन धावपटू झाला, हे असेच एक उदाहरण. ‘आवाहन आयपीएच’ या यूटय़ूब चॅनलवर ‘राष्ट्रीय वेध’ या कार्यक्रमात त्याची कहाणी पाहाता-ऐकता येईल. अशी उदाहरणे सर्वांपर्यंत पोहोचणे अगत्याचे आहे.

एका बाजूला ग्राहकवादी जीवनशैली आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिस्वातंत्र्य (Indivisuality) अर्थात ‘मी’पणाची वाढती जाण यामुळे फक्त कायद्याच्या पातळीवर या समस्येचे निराकरण होणे अशक्य आहे. अमली पदार्थाचा व्यापार आणि जागतिक सत्ताकारण यांचा जवळचा संबंध आहे तो काही काल-आजचा नव्हे. जिज्ञासू मंडळींनी फक्त ओटीटीवरची ‘नार्कोस’ ही मालिका पाहिली तरी त्यातील जटिल धागेदोरे लक्षात येतील. कायदेशीर नियंत्रण, व्यसनाधीनतेवरचे उपचार आणि समाजप्रबोधन यांचा मेळ घालणारे प्रयोग होऊन त्यांचे दस्तावेजीकरण व्हायला हवे. मध्यंतरी, बेकायदेशीर अशा अमली पदार्थाना नष्ट करण्याच्या ‘समारंभा’साठी अमली पदार्थविरोधी दलांनी मुक्ता पुणतांबेकरला आमंत्रित केले होते. अशा प्रयोगाला प्रभावी बनवून समाजमाध्यमांद्वारे समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक ठरणार आहे.

  प्रशासन, पोलीस, कायदा यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या, तर उपचार आणि प्रबोधनाचे वाढते महत्त्व सहजच लक्षात येईल. अगदी महाराष्ट्रापुरतेच बोलायचे, तर व्यसनमुक्ती उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांच्या दर्जामध्ये कमालीची तफावत आहे. रुग्णमित्र आणि नातेवाईकांची व्यापारी पिळवणूक करणारी ‘व्यसनमुक्ती’ केंद्रे आजही राजरोसपणे सुरू आहेत. ज्या संस्थांचे उद्देश प्रामाणिक आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या योजनांचेच सक्षमीकरण झालेले नाही. वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित असे व्यसनमुक्ती विभाग, ‘मुक्तांगण’सारख्या संस्था आणि खासगी व्यवसायातील मनोविकासतज्ज्ञांनी चालवलेली रुग्णालये, अशा सर्वाचे मिळून एकत्र व्यासपीठ अजूनही बनलेले नाही. ‘मुक्तांगण’तर्फे आम्ही आमच्या मर्यादित कुवतीमध्ये असे प्रयत्न करत आहोत; परंतु ते अत्यंत तुटपुंजे आहेत याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे.

या क्षेत्रामध्ये चार दशके काम करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला एक शिकवणूक नक्की मिळाली आहे आणि पक्की झाली आहे.. उत्साहासाठी पाहायचे ते एका उदात्त ध्येयाकडे, पण चालायचे असते जमिनीवरच. तिथे घाई-गडबड करून चालत नाही. एक एक पाऊल घट्ट रुतवत पुढे जावे लागते. व्यसनाधीनतेसारख्या वरकरणी एकसंध वाटणाऱ्या समस्येचे खूप सारे धागेदोरे असतात. त्यांना हलक्या हाताने, परंतु चिकाटीने हाताळले नाही तर गुंता सुटत नाही, तर जास्त गहन होत जातो. व्यसनमुक्तीच्या वाटेवर चालणाऱ्या रुग्णासाठीचे एक परवलीचे वाक्य असते- ‘One day at a time…’ ‘फक्त आजचा दिवस.. रोज नवा दिवस!’ हाच संदेश आम्हा सर्वासाठीसुद्धा तितकाच अर्थपूर्ण असतो.

‘मुक्तांगण’मध्ये गट-उपचाराचे सत्र संपन्न झाले, की आम्ही ही प्रार्थना मन:पूर्वक म्हणतो. ‘त्या’ दिवशी मी ती प्रार्थना अधिकच निष्ठेने आळवतो –

जे टाळणे अशक्य।

दे शक्ती ते सहाया।।

जे शक्यसाध्य आहे।

निर्धार दे कराया।।

मज काय शक्य आहे।

आहे अशक्य काय।

माझे मला कळाया।

दे बुद्धी देवराया।।

anandiph@gmail.com