४० वर्षांपूर्वी स्वत:चा देश, अमेरिका सोडून सेनेगलला येऊन या कामाला वाहून घेतलेल्या मॉली मोल्चिंगचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. परंपरागत प्रथेचा नायनाट करून आफ्रिकी समाजाला जगण्याची नवी दिशा आणि दृष्टिकोन देणाऱ्या मॉली विषयी..
फिमेल जेनीटल कटिंग (एफजीसी) हा आफ्रिकेतील परंपरागत प्रथेचा एक अघोरी प्रकार. आफ्रिकेतील अनेक देश याच्या कचाटय़ात सापडलेले होते. स्त्रियांना त्यातून सोडवण्याचा एकच उपाय म्हणजे त्यांना त्याच्या दुष्परिणामांची माहिती देणे. ते काम केलं मॉली मोल्चिंग आणि तिच्या संघटनेने. अमेरिकेत रहाणाऱ्या मॉलीने त्यासाठी आपला देश सोडला आणि तब्बल चाळीस वर्षे ती सिनेगलला येऊन राहिली, केवळ या प्रथेच्या विरुद्ध लढण्यासाठी!
१९९१मध्ये ना नफा तत्त्वावर मॉलीने सेवाभावी संस्था स्थापन केली ती ‘तोस्तान’ (TOSTAN), ज्याचा अर्थ होतो अडचणींवर मात करून पुढे जाणे. सेनेगल येथील डकारमध्ये असणाऱ्या ‘तोस्तान’ या सेवाभावी संस्थेचे ध्येय आहे, आफ्रिकी समाजाचे सबलीकरण! कारण मॉलीला माहीत आहे की, ज्यायोगेच सकारात्मक, सामाजिक बदल होऊन तिथे विकास सातत्याने टिकून राहू शकेल. याचा आधार अर्थातच आहे, मानवी हक्कांबद्दल असलेला आदर. मॉलीचा अनौपचारिक शिक्षण कार्यक्रम मानवी हक्कांवर आधारित आहे. या कार्यक्रमाचं तत्त्व आहे, जमिनीची मशागत आणि बीज पेरणं. लोकशाही, मानवी हक्क, रोजच्या गरजा सोडवण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे, लघुउद्योगांचा विकास, स्थानिक भाषेतील साक्षरता यांचा त्यात अंतर्भाव आहे. पण त्याहीपेक्षा तेथील स्त्रीसबलीकरण हे तिचे सर्वात मोठे कार्य ‘तोस्तान’ आणि म्हणूनच मॉली यांच्या या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
स्त्रियांच्या गुप्तांगांना छेद देणे (FGC), तसेच बालविवाह आणि जबरदस्तीने केलेले विवाह यांच्याविरोधात अनेक स्तरांवर काम सुरू होतेच. मॉलीने ‘तोस्तान’च्या समाज सबलीकरण कार्यक्रमाअंतर्गत त्याला अधिक सशक्त ताकद मिळवून दिली.आफ्रिकेतील २८ देशांत एफजीसी ही एक रूढ झालेली सामाजिक प्रथा आहे. मुलींचे विवाह होण्यासाठी आणि समाजाचा ‘इज्जतदार’ सदस्य होण्यासाठी ती आवश्यक अट. मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही प्रथा अतिशय घातक आहे, तसेच त्यांच्या मानवी हक्कांची ती पायमल्ली असून त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांना ती धरून नाही, याची जाणीव झाल्याने तो निर्णय घ्यायला या स्त्रिया प्रवृत्त झाल्या. एप्रिल २०१३ मध्ये ‘तोस्तान’ कार्यरत असलेल्या ६४०० जमातींनी या मोहिमेत भाग घेतला. त्यात गिनी, गिनी बिसाऊ, गाम्बिया आणि सोमालिया या प्रांतांचाही समावेश आहे. त्या गावातील निर्णयामुळे सेनेगलमधल्या ५४२२ जमातींनी या प्रथेचा बीमोड करण्याचा निर्णय जाहीर केला.
‘तोस्तान’ने आणखी एका सेवाभावी संस्थेच्या भागीदारीने २३ गावांत एफजीसीची प्रथा बंद पाडली. युनोने ‘तोस्तान’च्या कामगिरीची दखल घेऊन हा एक अतिशय नावीन्यपूर्ण, शैक्षणिक कार्यक्रम असल्याचे जाहीर केले. १९९८ मध्ये हिलरी आणि बिल क्लिंटन यांनी एका विशेष भेटीत ‘तोस्तान’ कार्यक्रमाची पाहणी केली. २०१२ मध्ये ‘तोस्तान’ला ‘अ‍ॅवॉर्ड इन अ‍ॅक्शन’ देण्यात आले. सिसिलिया अ‍ॅटलास फाऊंडेशनतर्फे आरोग्य आणि सामाजिक पातळीवर सुधारणा घडवून आणणे, यासाठी हा पुरस्कार होता.
एक-दोन नव्हे, तर तब्बल चार दशके सेनेगलमध्ये कार्य करणाऱ्या मॉलीच्या कामाची सुरुवात कशी झाली, ते पहावे लागेल. १९७४ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ डकारची विद्यार्थिनी असताना मॉलीला लहान मुलांसाठी काम करण्यात रस निर्माण झाला. ‘अन्निको’ नावाचे चित्र असलेले पुस्तक तिने मुलांसाठी लिहिले. त्याचे प्रकाशन ‘न्यू एडिशन्स’ने नोव्हेंबर १९७६ मध्ये केले. नंतर ती ‘पीस कॉर्प्स’मध्ये सामील झाली. सेनेगलच्या मुलांच्या संस्कृती आणि वातावरणाशी जुळणारी पुस्तके विकसित करून प्रकाशित करणे आणि ते काम पुढे चालू ठेवणे, यासाठी तिने Demb ok tey ( Yesterday and Today) केंद्र स्थापन केले. हे केंद्र आफ्रिकी सांस्कृतिक केंद्रात उघडण्यात आले. मेदिनाच्या डकार या भागात सर्वाधिक लोकवस्तीच्या रस्त्यांवरच्या मुलांना या केंद्राने सेवा देणे सुरू केले. गाणी, गोष्टी, म्हणी, थिएटर आणि इतर आफ्रिकी मौखिक साहित्याचा उपयोग करून मॉली आणि तिच्या सेनेगलच्या गटाने पश्चिम आफ्रिकी संस्कृतीशी संबंधित बालसाहित्याचा विकास कला. पारंपरिक आफ्रिकी कथांची लोकप्रियता आणि शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरता येण्याची त्यांची क्षमता बघून मॉलीने साप्ताहिक रेडिओ कार्यक्रम सुरू केला. आरोग्य आणि परिसर, त्यांच्यावरच्या संदेशांचा त्या कार्यक्रमात अंतर्भाव करण्यात आला. रेडिओवरचा हा कार्यक्रम हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचला, त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने त्यात संयुक्तिक माहिती होती.
१९८२ मध्ये स्पेन्सर फाऊंडेशनकडून ‘तोस्तान’ ला त्याचे उपक्रम चालू रहावेत यासाठी अनुदान देण्यात आले, त्यामुळे मॉलीला सेनेगलमध्ये वास्तव्य करणे शक्य झाले. १९८८ मध्ये मॉलीने युनिसेफच्या मदतीने हा कार्यक्रम अधिक र्सवकष स्वरूपात आणि इतर भाषांतही विस्तृत प्रमाणावर राबवण्यास सुरुवात केली. या कामात स्त्रीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेऊन मॉलीने त्यांना साक्षरतेचे आणि मूलभूत प्रशिक्षण देण्याची गरज ओळखली. युनिसेफच्या पाठिंब्याने पूर्ण देशात हजारो स्त्रियांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्यात आला. तसेच पौगंडावस्थेतील धोक्याच्या वळणावर असणाऱ्या शाळेतून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना मूलभूत जीवन प्रशिक्षणाची कौशल्ये शिकवण्याची महत्त्वाची कामगिरीही निभावण्यात आली.
‘तोस्तान’च्या विविध कार्यक्रमामुळे स्वत:च्या आयुष्यावर परिणाम करणारे निर्णय घेण्यासाठी स्त्रियांचे सबलीकरण होण्यासाठी मदत झाली. आरोग्य आणि स्वच्छतेच्या कार्यक्रमांमुळे माता आणि नवजात अर्भकांच्या मृत्यूदरातही लक्षणीय घट झाली. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले. मुलांचे लसीकरण, बाळाच्या जन्माआधी आणि नंतर डॉक्टरांचा सल्ला घेणे, मुलींना शाळेत घालणे, याचे प्रमाण वाढले. मुलांची जन्मनोंदणी करण्यात आली. आर्थिक स्तर वाढविण्यासाठी उत्पन्न देणारे व त्यात सातत्य राखणारे कार्यक्रम राबवण्यात आले. मुख्य म्हणजे येथील स्त्रियांना निर्णयप्रक्रियेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करण्यात आले.
सामाजिक परिवर्तनाची ही धुरा आता सेनेगलच्या जास्तीत जास्त लोकांपुढे नेली पाहिजे, हे ओळखूनच मॉलीने १९९७ मध्ये सेनेगलमधील स्त्रियांच्या एका गटाला सामाजिक चळवळ सुरू करायला प्रोत्साहित केले. त्यातूनच मालिगुंडा बाबारा या गावातील महिलांच्या एका गटाने स्त्रियांच्या लैंगिक अवयवावरील अत्याचाराची वा एफजीसीची प्रथा मोडीत काढायचे ठरवले. आणि त्यातून पुढे अनेक जमातींनी, गावांनी आणि हळूहळू देशांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठवला.
मॉलीचा हा सगळा प्रवास मांडणारे, एमी मोलाय या सुप्रसिद्ध लेखिकेने लिहिलेले, ‘हाऊ एव्हर लाँग द नाइट- मॉली मोल्चिंग’ज् जर्नी टू हेल्प मिलिअन्स ऑफ विमेन अ‍ॅन्ड गर्ल्स ट्राइंम्फ, हे पुस्तक एप्रिल २०१३ त ‘हार्पर वन’ तर्फे प्रकाशित केले. ४० वर्षांपूर्वी स्वत:चा देश अमेरिका सोडून सेनेगलला येऊन या कामाला वाहून घेतलेल्या मॉलीच्या वैयक्तिक अनुभवांच्या कथा हे पुस्तक वाचकांना सांगते. तिला भेटलेले आणि तिच्यामुळे प्रभावित झालेले लोक, आणि तिने तिथेच राहण्याचा घेतलेला निर्णय, ‘तोस्तान’ची स्थापना आणि अविश्वसनीय अशी सामाजिक बदल घडवून आणणारी आफ्रिकेतील ही चळवळ आणि याची खोलवर माहिती ‘हाऊएव्हर लाँग द नाइट..’ मध्ये मिळते.
अनिष्ट सामाजिक प्रथांच्या दीर्घ काळरात्रीनंतर अशा वंचित स्त्रियांच्या आयुष्यात, तेही एका परदेशात, उष:काल आणणाऱ्या मॉली मोल्चिंगचे काम आफ्रिकेतल्याच नव्हे, तर जगभरातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरावं. हॅटस ऑफ टू मॉली!
(संदर्भ- विकीपीडिया, इंटरनेट)
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)