पावसाची प्रतीक्षा करताना तो लवकर यावा यासाठीची काही व्रतं, तोडगे, समजुती लोकपरंपरेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. पाऊस यावा, जमीन सुफलित व्हावी यासाठी लोकपरंपरेतल्या स्त्रिया ही व्रतं करतात. मंदिरात पुजारी अभिषेक करतात. चातुर्मासातल्या विविध कहाण्यांमध्ये पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करणार्‍या स्त्रियांचं वर्णन आहे. सगळी व्रतं विशेषत: जी सुफलन व्रतं आहेत ती पावसांच्या महिन्यांत होत असतात. एका अर्थाने जमिनीच्या आणि माणसांच्या सुफलनीकरणासाठी त्यांचं आचरण होत असतं. पावसाची प्रतीक्षा करताना लोकपरंपरेतली स्त्री पावसाला म्हणते, ‘‘पड पड पावसा, काय पडूसं वाटंना, पाप धरतीला साठवंना…’’

‘‘असा उशिरा आलेला पाऊस
तळहातावर झेलून घ्यावा,
टिपून ल्यावा पापण्यांवरती,
कपाळीच्या घामामध्ये भिजवावा,
डोईत पेरावा त्याचा ओलावा,
पाठीवरतून निथळू द्यावा,
कोरडे पडले ओठ उघडून,
वरच्यावरती चुंबून घ्यावा,
त्याला बोलू नये अधिक उणे आणि
काढू नये त्याचे बहकणे
खोटे भरवसे देत राहणे,
बहाणे सांगणे, वेळा चुकवणे…’’

कवी अनिल यांची ही खूप जुनी कविता आहे, परंतु त्याचा अनुभव आपण वर्ष-दोन वर्षांनी सतत घेतच असतो आणि तो आजचाच अनुभव आहे, असं दरवेळी वाटतं. यंदाही तसंच काहीसं आहे. हे शहरी कवीने जरी म्हटलं तरी लोकपरंपरेमध्ये पावसाचं महत्त्व अधिक. याचं कारण ते नातं जमिनीशी बांधलेलं आहे. पाऊस पडला तर जमीन हिरवी होणार आणि त्यातून उत्पन्न निघणार. ज्यावेळी पाऊस पडत नाही त्यावेळी लहान मुलं म्हणत असतात, ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा…’ हे लहान मुलांचं गाणं असलं तरी अशाच आशयाचं पर्जन्यसूक्त वेद काळातल्या ऋषींनीही म्हटलेलं आहे. एका अर्थाने ‘ये रे ये रे पावसा… ’ हे लोकपरंपरेतलं पर्जन्यसूक्त आहे. पाऊस पडला नाही तर लहान मुलांपासून, नागर जनांपासून शेतकर्‍यांपर्यंत आणि त्याही आधी वैदिक ऋषींपर्यंत सगळ्यांच्या जीवाला ओढ लागलेली असते. पर्जन्यसूक्ताला आणखी एक मजेशीर नाव आहे. त्याला ‘मंडूकसूक्त’ असं म्हटलेलं आहे. मंडूक म्हणजे बेडूक. पावसाळा सुरू झाला, की बेडकांचे आवाज यायला लागतात. ग्रामीण भागामध्ये बेडकांचे आवाज यायला लागले की, नक्की पाऊस येणार… असा अंदाज माणसं करत असतात म्हणून ते मंडूकसूक्त. त्यात मजेने असं म्हटलेलं आहे की, अनेक जण एका सुरामध्ये जर एखादा मंत्रघोष करत असतील तर त्याचा आवाज बेडकांच्या आवाजासारखा येतो म्हणून त्याला मंडूकसूक्त असं म्हटलेलं आहे. त्यामुळे लहान मुलं, नागरजन, शेतकरी किंवा वैदिक ऋषी यापैकी कुणीही असो, सगळ्यांना उशिरा आलेला पाऊस हा काळजी लावणारा असतो.

आपल्या लोकपरंपरेमध्ये माणसं काही तोडगे करतात. काही व्रतं करतात. काही तोडगे इतके मजेशीर असतात पण ते खूप मनापासून केले जातात. एका अर्थाने ती ‘यात्वात्मक’ कृती (यातुविधी) असते म्हणजे ‘मॅजिकल राइट’ असतो. उदाहरणार्थ, लोक बेडूक आणि बेडकीचं लग्न लावतात. बेडूक आणि बेडकीचं लग्न कशासाठी? आपल्याला अपेक्षित आहे ती घटना घडावी असं वाटत असेल तर प्रतीकात्मक एखादी कृती करायची. प्रतीकांचं माहात्म्य आपण या आधीच्या लेखाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, त्यामुळे बेडूक-बेडकीचं लग्न हा पर्जन्यासाठी केलेला एक लोकविधी आहे, असं म्हणायला हरकत नाही.

एक मजेशीर प्रथा अशी आहे, की एखाद्या पाच वर्षांच्या लहान मुलाला किंवा मुलीला विवस्त्र करून पहिल्या पावसामध्ये भिजवायचं. यात अपेक्षा अशी असते, की त्या विवस्त्रतेकडे पाहून आकाशातल्या पावसाला जमिनीची ओढ लागावी म्हणजे एका अर्थाने आकाश हे पुरुषतत्त्व आणि भूमी हे स्त्रीतत्त्व. त्या पुरुषतत्त्वाला स्त्रीतत्त्वाची, जमिनीची ओढ लागावी अशा प्रकारची अपेक्षा या प्रतीकात्मक कृतीतून व्यक्त होत असते. आणखी एक प्रथा असते, इतर वस्त्रं घालायची नाहीत, पण कडुलिंबाचा पाला कंबरेला गुंडाळायचा आणि पहिल्या पावसात भिजायचं किंवा डोक्यावर पाणी घ्यायचं. एक अशीही लोकप्रथा आहे की, जसं बेडूक-बेडकीचं लग्न लावलं जातं तसं गाढव- गाढविणीचं लग्न लावलं जातं. गाढव आणि गाढवी आपल्याकडे फार पवित्र मानले जात नाहीत. परंतु ज्याला आपण ‘बहुप्रसवशीलता’ म्हणतो, म्हणजेच अनेक अपत्य निर्मिती करणारा प्राणी म्हणून गाढव-गाढवी यांचं लग्न लावलं तर पर्जन्य नीट पडेल.

पृथ्वीचं सुफलन होईल, अशी धारणा असते. या खेरीजही काही लोकप्रथा आहेत. थोडं प्रगत अवस्थेत याचा विचार केला तर पुरोहित मंडळी मंदिरामध्ये देवावर अभिषेक करतात. विशेषत: शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणं. देवाला पाण्यात ठेवणं, अशा प्रकारचा वसा किंवा व्रतं अनेक ठिकाणी केली जातात. त्यासाठी चातुर्मासातल्या विविध कहाण्यांमध्ये ‘खुलभर दुधाची’ कहाणी प्रसिद्ध आहे. खुलभर म्हणजे चमचाभर दूध. पाऊस पडेना म्हणून देवाचा संपूर्ण गाभारा दुधाने भरायचा अशा प्रकारचं व्रत माणसाने केलं. सगळ्यांनी आपल्या घरातलं दूध आणून ओतलं. गाभारा काही भरेना. तेव्हा एक म्हातारी आली. तिने घरातल्या सगळ्यांना जेवू घातलं.

दूध-तूप दिलं. आणि सर्वात शेवटी थोडंसं खुलभर दूध शंकराला वाहिलं आणि गाभारा भरला. मनापासून एखादी कृती केली तर देव प्रसन्न होतो, एवढाच या कथेचा अर्थ आहे. म्हणजेच काय तर, पावसाच्या प्रतीक्षेसाठी लोकपरंपरेमध्ये काही व्रतं, तोडगे, समजुती या मोठ्या प्रमाणात असतात. अशा वेळी संस्कृत काव्यात कालिदास कवी ‘आषाढास्य प्रथम दिवसे’ म्हणत मेघदूताची सुरुवात करतो.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ संपतो. ज्येष्ठीपौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा होते. वटपौर्णिमा झाल्यानंतर पाऊस सुरू व्हावा, अशी अपेक्षा असते. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि मार्गशीर्ष हे पावसाचे चार महिने. चातुर्मास म्हणून ते प्रसिद्ध आहेत. सगळी व्रतं विशेषत: जी सुफलन व्रतं ती पावसांच्या महिन्यात होत असतात. एका अर्थाने जमिनीच्या आणि माणसांच्या सुफलनीकरणासाठी, समृद्धीसाठी त्यांचं आचरण होत असतं. अशा वेळी पावसाचं वर्णन करताना लोकपरंपरेतली स्त्री म्हणत असते,

‘‘पड पड मेघराजा
काय पडूसं वाटंना,
पाप धरतीला साठवना
पड पड पावसा
नको बघूस ताला मला
ताईत बंधू माझा अट्टलाचा भ्याला’’

एरवी माझा भाऊ खूप धाडसी आहे. परंतु, पाऊस पडत नाही म्हणून त्याला भीती वाटायला लागते. मग कुठूनतरी ढग येतात. ढगांची गर्जना व्हायला लागते. पाऊस कोसळायला लागतो, तो पहिला वळिवाचा पाऊस. त्याला आपण ‘मान्सूनपूर्व पाऊस’ म्हणतो. त्याचंही वर्णन बाई करते,

‘‘मेघराजाचा वाजे डफ,
वीजबाईचं नर्तन,
मागं पावसाचं येणं,
हा वळिवाचा पाऊस,
वळिवाच्या पावसानं
जीमीनबाई भरदार…’’

वळिवाच्या पावसाने जमीन भरदार झाल्यावर ती भावाला सांगते, ‘‘बंधुराया आता ओटी भर…’’ आता जमीन प्रसवशील झालेली आहे, आता तिचं स्वागत करायचं, ओटी भरायची आणि नंतर धुवाधार पाऊस सुरू होतो. आषाढातला पाऊस सुरू झाला, की जिवाला बरं वाटायला लागतं. दिलासा मिळतो आणि ती स्त्री म्हणते, ‘‘पावसानं फळी मांडली कोसावरी, माझ्या बंधूच्या उसावरी…’’ दूरवर धोधो पाऊस पडायला लागलाय. उसाला पाऊस जास्त लागतो. पाणी जास्त लागतं. आता सगळ्यांना समाधान वाटायला लागलेलं आहे. पाऊस आल्याच्या समाधानाचं वर्णन शहरी कवींनी, लोककवींनी, लहान मुलांनी आणि आमच्या बहिणाबाई चौधरींनी केलेलं आहे, ‘‘धरित्रीच्या कुशीमध्ये बीय बियानं निजली, वर्‍हे पसरली माती, जशी शाल पांघरली’’ धरित्रीच्या कुशीमध्ये बीज पेरलं जातं. वर माती पसरली जाते म्हणजे जणू शाल पांघरली जाते मग त्या बीज बाळाची वाढ व्हायला सुरुवात होते.

पिकाची वाढ व्हायला सुरुवात होते. अशा वेळेस पाऊस आणि माणूस यांच्यातलं नातं हे अतिशय गहिरं होत जातं. यात आषाढ महिन्याचा जो मध्य येतो. त्यावेळी आठवण येते ती पंढरीच्या विठ्ठलाची. पावसाने चंद्रभागा भरायला लागलेली असते. चंद्रभागेमध्ये नावा चालायला लागतात. ‘भरली चंद्रभागा नाव झालीया नवरी.’ आता नाव नदीमध्ये घालण्याइतकं पाणी साचलंय. नाहीतर पाणी पार आटलेलं होतं, पण आता पात्र तुडुंब भरलंय म्हणून एखाद्या नव्या नवरीसारखी ती नाव आता त्या पाण्यात प्रवेश करते आणि ‘प्रीतीचा पांडुरंग शेला जरीचा आवरी.’ पांडुरंग आता जरीचा शेला सावरीत त्या नावेमध्ये बसायला आलेला आहे. ही बायकांची प्रतिभाशक्ती आहे. आषाढी एकादशीची ही पूर्वसूचना आहे असं म्हणायला हरकत नाही.

अशा वेळेस विहिरींनाही पाणी वाढायला लागतं. विहिरीला पाणी वाढलं की ती म्हणते, ‘नवस करू गेले विहिरी बाई तू सुंदरी, जतन कर माझे चारी बैल, मोटकरी.’ (मोट चालवणारा तरुण). कृषी जीवनातली बाई त्या शेतीशी-मातीशी इतकी जुळलेली आहे की विचारता सोय नाही. अशा वेळेला मला संत सखूचं गाणं आठवतं. संत सखू कराडला राहणारी. कराडमधून कृष्णामाई वाहते आहे आणि संत सखू धुणं धुवायला नदीवर गेलेली आहे. त्यावेळी आषाढ महिना असतो. एकादशी जवळ येऊ लागलेली असते. नदीच्या कडेने पंढरीकडे वारी चाललेली असते. पंढरपूरचे वारकरी चालतात. तिच्या माहेरी पंढरीच्या वारीची प्रथा असते. तिच्या मनामध्ये पंढरीची ओढ लागते आणि मग त्याचं वर्णन केलं जातं.

‘‘आषाढ मासी एकादशी यात्रा चालली पंढरीसी,
ब्राह्मणाची सून सखूबाई
गेली होती ती पाण्यासी,
तिच्या मनामध्ये देव संचारले
जाईन म्हणते पंढरीसी
गंगेवरती घागर ठेवून
सखू चालली पंढरीसी’’

एकादशी यायला लागते कारण आषाढी आणि कार्तिकी या दोन महत्त्वाच्या एकादशी. त्यातली आषाढी एकादशी आली की सगळ्या लोकजीवनाला पंढरीच्या विठ्ठलाची रुक्मिणीची आठवण यायला लागते.

शेतातल्या पेरण्या झालेल्या असतात. कामातून थोडी उसंत मिळते आणि मग तिला श्रावणातल्या व्रतांची, सणांची आणि नागपंचमीच्या निमित्ताने माहेरी यायची ओढ लागते.

chaturang@expressindia.com