गीताभ्यास – चित्ताची एकाग्रता

भगवंत अर्जुनाला ‘तू लढ’ असं सांगण्याऐवजी ‘तू योगी हो’ असं का सांगतायत् असं आपल्याला वाटेल. परंतु हाती घेतलेल्या कार्यात, एकाग्रता, समान दृष्टी, वैराग्य व सातत्य या गोष्टी जरूर हव्यात, मग ते कुठलंही काम असो.

भगवंत अर्जुनाला ‘तू लढ’ असं सांगण्याऐवजी ‘तू योगी हो’ असं का सांगतायत् असं आपल्याला वाटेल. परंतु हाती घेतलेल्या कार्यात, एकाग्रता, समान दृष्टी, वैराग्य व सातत्य या गोष्टी जरूर हव्यात, मग ते कुठलंही काम असो. हेच गुण प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगी बाणवावेत, ज्यामुळे त्यांचं कार्य व जीवन सुफळ संपूर्ण होईल, हा बोध आपण घ्यायला हवा.

स माजातील व्यावहारिक जीवन जगणाऱ्या लोकांची अशी भ्रामक कल्पना झाली आहे की, गीतेसारखे ग्रंथ किंवा परमार्थाचा मार्ग हा फक्त साधू, संन्यासी, योगी आणि निवृत्त झालेले वृद्ध यांच्यासाठीच आहे. खरं तर गीता सर्वासाठी आहे. आपल्या चिंताग्रस्त संसाराच्या जंजाळातून सुटून आपला व्यवहार शुद्ध व निर्मळ करून मनाचे समाधान व शांती कशी मिळवावी, हे सांगणारा पारमार्थिक मार्ग गीता आपल्याला दाखवते. जीवन कसं जगावं हे सांगणारं गीताशास्त्र आपल्याला आपली प्रगती, आपला उद्धार आपणच करू शकतो, ही महत्त्वाची शिकवण देते. मनुष्याने जीवन-व्यवहार शुद्ध करून परमोच्च स्थिती गाठावी ही गीतेची इच्छा आहे.
‘उद्धरेदात्मनात्मानं’ आपणच आपला उद्धार करावा, असा संदेश भगवंत आपल्याला देत आहेत. आपला विकास कसा करायचा हे आपणच ठरवलं पाहिजे. नोकरीत असू तर पदोन्नती कशी होईल? गरीब असू तर उत्पन्न कसं वाढेल? पुढचं पुढचं शिक्षण कसं घेता येईल? आपली स्थिती उन्नत कशी होईल, असा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारावा. विचारपूर्वक आपल्यातील एक-एक दुर्गुण किंवा कमतरता काढून टाकावी.
फक्त बाह्य़ आर्थिक परिस्थिती बदलून भागणार नाही, तर मनही त्याबरोबर शुद्ध, सुसंस्कृत, एकाग्र व्हायला हवं तरच खरी उन्नती झाली असं म्हणता येईल. मन व शरीर दोन्ही निरोगी हवं. बाह्य़ भौतिक स्थिती उंचावत असताना मनही तसंच समर्थ व शांत हवं.
असा अंतर्बाह्य़ उद्धार होण्यासाठी, गीता आपल्याला योगाभ्यासाचा मार्ग सांगते. गीतेच्या सहाव्या अध्यायाला ध्यानयोग किंवा चित्तवृत्तिनिरोध अशी नावं आहेत. या अध्यायांतील योगाभ्यास म्हणजे इंद्रियांवर ताबा! कारण योगाभ्यासात ‘योगश्चित्तवृतिनिरोध’ अशी योगाची व्याख्या केली आहे.
हल्ली योगासनांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. त्यात शारीरिक दुखणी, वजन कमी करण्यासाठी जाणारे जास्त असतात; परंतु योगासनं शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींचा विचार करतात. खरं स्वास्थ्य हे या अंत:स्रावी ग्रंथींवर अवलंबून असतं आणि त्यांना मजबूत व कार्यक्षम करण्यावर योगासनांचा खरा भर आहे. म्हणून शारीरिक विकार न होण्यासाठी, तसंच शुद्ध व स्थिर मन होण्यासाठी योगासनं महत्त्वाची भूमिका बजावतात.  योगाभ्यास करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने प्रथमत: आपलं जीवन कमालीचं नियमित व प्रमाणबद्ध करणं गरजेचं आहे. खाणं-पिणं-झोपणं म्हणजेच आपला आहार-विहार यात प्रमाणबद्धता हवी. गीता सांगते, ‘युक्ताहारविहारम्य युक्तचेष्टस(स्थ) कर्मसु’ म्हणजे योग्य आहार-विहार व व्यवहार जो करतो त्यालाच योग साध्य होईल. जीवन परिमित म्हणजे मोजकं हवं. कशाचाही अतिरेक नको. शरीर व मन दोन्ही संपन्न होईल व राहील असं आचरण असावं.
जीवन असं निश्चयपूर्वक जगण्यासाठी मनाची एकाग्रता व निश्चयाचं बळ हवं. इंद्रिय-संयमाचा निर्धाराने अभ्यास करणाऱ्याला योग जमेल- योगी होता येईल. एकाग्रता जमेल व मन परमात्म्यावर स्थिर होण्यास मदत होईल. ६ व्या अध्यायात अशी एकाग्र मनाने करण्याची ध्यानाची प्रक्रिया सांगत आहेत. ध्यान कसं, कुठं व कशाचं करावं हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. योगाभ्यास म्हणजे फक्त योगासनं नसून अष्टांग योगाच्या आठ पायऱ्या चढत ध्यानधारणा समाधीपर्यंत जाणं हे गीतेला अभिप्रेत आहे. गीता सांगते, शुद्ध जमिनीवर दर्भ, मृगाजिन किंवा वस्त्र पसरून त्यावर चित्त व मन एकाग्र करून, शरीर, डोकं, मान सरळ रेषेत अचल ठेवून शांत अंत:करणाने, सावध योग्याने चित्त भगवंतांच्या ठिकाणी लावून त्यांच्या आश्रयाने राहावं.
पुढे असा प्रश्न पडतो की, एकाग्रता जमली आणि आपण ध्यानप्रक्रियेच्या मार्गात पुढे जात आहोत हे ओळखायचं कसं?  ध्यानाचा परिणाम किंवा फळ म्हणून काम-क्रोध आणि रजोगुण शांत होऊन साधकाला आत्यंतिक आनंदाची अनुभूती येते.  ही समत्व दर्शनाची पहिली पायरी. संपूर्ण सृष्टीच्या मागे एकच एक परमात्म तत्त्व आहे. त्यामुळे प्रत्यक्षात विभिन्नता दिसत असूनही कुठंही भेद नाही. सर्वत्र एकाचीच रूपं! एकता ही दुसरी पायरी व परमात्मदर्शन ही तिसरी पायरी. या अभेदाच्या जाणिवेने होणारा परम आनंद ही या चित्तवृत्तिनिरोध योगाची परिणती होय.
   ध्यानयोगासंबंधीचं भगवंताचं असं सगळं विवरण ऐकल्यावर अर्जुन खरं तर गांगरून गेला. कारण इतक्या उच्च स्थितीतला इंद्रियांचा संयम, एकाग्रता या गोष्टी जमल्या तरी फार काळ टिकतील की नाही अशी भीती अर्जुनाला वाटली. पण अर्जुन नेहमीच प्रांजळपणे आपल्या मनातल्या शंका भगवंतांना अगदी बेधडक विचारताना दिसतो. या वेळीही अर्जुनाने भगवंतांना सरळ विचारलं, ‘भगवंता, मन हे मोठं चंचल असतं. योगावर श्रद्धा असूनही संयम कायम न टिकल्याने एखाद्या साधकाचं मन विचलित झालं तर तो कोणत्या गतीला जातो? तो योगभ्रष्ट होऊन नाश पावतो का?’ यावर भगवंतांनी अर्जुनाला दिलासा दिला की, आत्मोद्धारासाठी कर्म करणारा साधक अधोगतीला जात नाही. त्याने आधी केलेला अभ्यास कधीच फुकट जात नाही. असा योगभ्रष्ट पुरुष नंतरच्या जन्मांत चांगल्या ज्ञानी योग्यांच्या, श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. आधीच्या जन्मांतल्या अभ्यासामुळे पुन्हा तो भगवंताकडेच आकर्षिला जातो. योगाभ्यास कधी वाया जात नाही. उलट पुढील जन्मी तो उपयोगी पडतो, असं भगवंत सांगत आहेत.
इथे एक उदाहरण विचारात घेता येईल ते म्हणजे चांगदेवांचं! चांगदेव १४०० र्वष जगले असं म्हणतात. त्याचा अर्थ असाही होतो की, त्यांना त्यांच्या योगाभ्यासामुळे मागील अनेक जन्म आठवत होते. जन्मोजन्मींचे बऱ्या-वाईट घटनांचे, विचारांचे संस्कार त्यांचं मन शुद्ध होण्याच्या आड येत होते. हे सर्व संस्कार पुसले जाऊन स्वच्छ ‘कोरा कागद’ होणं त्यांना ज्ञानेश्वर भेटेपर्यंत शक्य झालं नव्हतं. ज्ञानेश्वरांसमोर त्यांचा ‘कोरा कागद’ झाला ज्यावर ज्ञानाची अक्षरं उमटवता आली.
भगवंत पुढे योगी हा इतर तपस्वी पुरुषांहून श्रेष्ठ आहे असंही सांगत आहेत. तप करणारे तपस्वी एखाद्या विषयाचा बारा र्वष ध्यास घेऊन त्याचं अध्ययन करतात. शास्त्रांविषयीचं निरीक्षण, प्रयोग करतात व निष्कर्षांप्रत पोहोचून, काही अभ्यासू, त्या विषयांचे ज्ञानी होतात. काही लोकोपकार करून महात्मेही होतात. परंतु या सर्वाचं काम-क्रोध सुटलेले नसतात. याउलट योगी मात्र सुख-दु:ख, जय-पराजय, मान-अपमान या सर्व घटनांच्या वेळी आपली वृत्ती पूर्णपणे शांत ठेवतात. कुठल्याही परिस्थितीत जिवाची तगमग होऊ देत नाहीत. ते निरनिराळय़ा स्वभावाच्या लोकांशी समान भाव ठेवून वागू शकतात. अशी मन:शांती त्यांनी मिळवलेली असते. त्यांची इंद्रियांची वखवख वैराग्यवृत्तीमुळे शमलेली असते. एकाग्रता परिमितता, समान दृष्टी वैराग्य या गुणांमुळे योगी हे इतर जनांपेक्षा श्रेष्ठ होत असं भगवंतांचं म्हणणं आहे.
योगाभ्यासाचं व योगी होण्याचं माहात्म्य या ‘ध्यानयोग’ नावाच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं आहे. अध्यायाच्या सुरुवातीलाच त्यांनी हे सर्व करण्यासाठी स्वत:च निर्धार करणं जरुरीचं आहे, आपणच आपल्या जीवनाचं ध्येय मुक्रर करून त्या दृष्टीने दृढ निश्चय करून तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे असं सांगितलं आहे. या अध्यायाच्या शेवटी भगवंत पुन्हा अर्जुनाला सांगतात, ‘तस्मात् योगी भव’ अर्जुन, तू योगी हो. या ठिकाणी इतका वेळ ‘तू लढ’ असं सांगण्याऐवजी ‘तू योगी हो’ असं का सांगतायत् असं आपल्याला वाटेल. परंतु हाती घेतलेल्या कार्यात, एकाग्रता, समान दृष्टी, वैराग्य व सातत्य या गोष्टी जरूर हव्यात, मग ते कुठलंही काम असो. तसेच असे चांगले गुण प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगी बाणवावेत, ज्यामुळे त्यांचं कार्य व जीवन सुफळ संपूर्ण होईल हे नक्की!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Moral lesson of the bhagavad gita