नीलिमा किराणे

वातावरणात जशी हवा, तशी भावनिक वातावरणात मातृभाषा! प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व घडण्यामधली मातृभाषेची सर्वव्यापी भूमिका समजून घेतली, तिच्या ‘असण्या’तला अर्थ समजला, तर ती सहजपणे मिळालेलं बलस्थान असते. वयाची ३ ते ५ वर्ष ही शब्दसंपत्ती वाढण्यासाठी सर्वोत्तम, तर दुसरी भाषा शिकण्यासाठी १० ते १६ ही वर्ष महत्त्वाची असतात. याचाच अर्थ, भाषेचं जे काही भलंबुरं रुजतं, ते लहानपणी. त्याउलट आजकाल ‘शिकण्या’पेक्षा ‘माध्यम’ महत्त्वाचं हाच निकष चहूबाजूंनी पेरला जातोय, म्हणूनच याविषयीच्या आजूबाजूला पाहिलेल्या, ऐकलेल्या काही प्रसंगांचं हे एक कोलाज, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या (२१ फेब्रुवारी) निमित्तानं. 

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आता चाळिशीला आलेलं मित्रमंडळ एका वर्गमित्राच्या घरी जमलेलं. शाळेतल्या गंमती आठवून धमाल चालू होती. इंग्रजी माध्यमात दुसरीत शिकणाऱ्या एकाच्या मुलीनं कुतूहलानं विचारलं, ‘‘बाबा, तुम्ही कुठल्या शाळेत होतात?’’ बाबांनी शाळेचं नाव सांगताच, ‘‘शीऽऽ, तुम्ही मराठी मीडियममध्ये होतात?’’ ती किंचाळली. गोरेमोरे होऊन बाबा उत्तरले, ‘‘अगं, आमच्या गावात इंग्रजी मीडियम नव्हतंच त्यावेळी.’’

मराठीतून शिकणं ‘शीऽऽ’ आहे, हा संदेश शहरी, ग्रामीण, गरीब, श्रीमंत मुलांपर्यंत, असा पालकांकडूनच पोहोचतो. तर ‘आदिवासी मुलींना इंग्रजी माध्यमात शिकवून एअरहोस्टेस बनवणं’ ही काहींना देशाच्या प्रगतीची खूण वाटते. ‘शिकण्या’पेक्षा ‘माध्यम’ महत्त्वाचं हाच निकष चहूबाजूंनी पेरला जाणं दारुण आहे. आपल्याला जन्मापासून आपोआप येणाऱ्या भाषेत शिकणं सहजसोपं असल्यामुळे शिक्षणाची गोडी लवकर लागते. शिकणं रुजलं की पुढे समज आल्यावर नवीन भाषेसाठी थोडे प्रयत्न पुरतात, इतकी साधीसरळ गोष्ट समजून घेणं शहाणेसुरतेच नाकारतात. त्यात विरोधाभास असा, की मराठीप्रेमीदेखील ‘प्रमाणभाषे’ला अतिरेकी महत्त्व देताना, मराठी बोलीभाषांची हेटाळणी करतात. विविधतेतली एकता आणि परस्परांचा आदर ही शाळेत रोज म्हटल्या जाणाऱ्या प्रतिज्ञेतली मूल्यं प्रत्यक्षात कशामुळे रुजतील?

बोलीभाषेचा आदर

एका शाळेत बालवाडीच्या मुलांबरोबर ताई (शिक्षिका) ‘फोनेटिक’ पद्धतीनं मराठी अक्षर-ओळख शिकवण्यासाठी ‘अमुक अक्षर ऐकू येणारे शब्द सांगा’ असा खेळ खेळत होत्या. ताईंनी ‘ल’ ऐकू येणारे शब्द विचारले. मुलांनी लपाछपी, लवकर, लोणी, लाडका, लीना, लांब असे शब्द सांगत शाबासक्या घेतल्या. एका मुलीनं ‘लई’ असा शब्द सांगितला. लई हा ‘अप्रमाणित’ शब्द! पण ताई तिला ‘शाब्बास’ म्हणाल्या. बालवाडीतल्या मुलांना प्रमाण व बोलीभाषा (ज्यांना आजही काही जण शुद्ध, अशुद्ध शब्द वा भाषा म्हणतात) हे शब्द माहीत नव्हते, तसाच ‘लई’ शब्दही अनेकांना माहीत नव्हता. ताईंनी सांगितलं, ‘‘आपण सगळे मराठीच असलो, तरी प्रत्येकाच्या घरातल्या मराठीत थोडा थोडा फरक असतो. काहींच्या घरात जसं ‘खूप’ म्हणतात, त्याला तिच्या घरातल्या भाषेत ‘लई’ म्हणतात.’’ लईमध्ये ‘ल’ ऐकू येतोच, त्यामुळे तिला शाब्बासकी. ‘ख’चे शब्द सांगताना कुणी ‘खूप’ सांगितलं तर त्यालाही शाबासकी. मग कुणाकडे कुठल्या भाषा बोलतात, त्याबद्दल ताईंनी गप्पा सुरू केल्या. शाबासकीमुळे आनंदलेल्या त्या मुलीच्या डोळय़ांत, पुढच्या अक्षराची उत्सुकता आणि आत्मविश्वास चमकत होता. बोलीभाषेतला शब्द म्हणून ताईंनी त्या छोटीला ‘चूक’ दिलं असतं तर?

शब्द मोजायचा खेळ 

मुलांसाठी ‘भाषांच्या गंमतीजमती’ असं बहुभाषिक शिबीर चालू होतं. ताईंनी मुलांना विचारलं, ‘‘समजा, हैदराबादजवळच्या एखाद्या खेडय़ातून तेलुगू बोलणाऱ्या आई-बाबा आणि तीन-चार मुलांचं कुटुंब पोटासाठी इथं आलंय. आई-बाबा दिवसभर बांधकामावर मजुरीसाठी जातात. मुलं शाळेत जात नाहीत. हिंदी, मराठीतले गरजेपुरते शब्द त्यांना येतात. तर ही मुलं कुणाकुणाशी काय काय बोलत असतील? सगळे मिळून त्यांच्याकडे किती शब्द असतील?’’

‘‘तेलुगूत खाण्यापिण्याबद्दल बोलत असतील, घरात तेलगूमधून भांडणार, शेजारच्या मुलांशी हिंदीत भांडताना ‘तेरेकू दिखाऊंगा, शाणे’ असे काही शब्द, दोन्ही भाषांतल्या शिव्या देतील, आईबाबांकडे एकमेकांच्या तक्रारी करतील, दुकानदारांशी बोलायला डाळ, तांदूळ, तेल, मॅगी असे शब्द लागत असतील..’’ होत होत यादी साधारण चारपाचशे शब्दांपर्यंत पोहोचली. 

‘‘म्हणजे महाराष्ट्रात राहताना सर्व भाषांतले मिळून त्यांच्याकडचे शब्द फक्त पाचशे, तेही रोजचा संवाद, खाणं आणि भांडणाबद्दलचे. मग ही मुलं विचार किती करू शकतील? मनातलं नीट सांगू शकतील का? तुमच्याकडे त्यांच्यापेक्षा काही जास्त आहे का?’’ बाईंनी विचारलं. ‘‘आमच्याकडे त्यांच्यापेक्षा शब्द खूप जास्त आहेत. शाळा, प्रवास, वाचन, इंटरनेट यामुळे माहिती जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विचार करू शकतो. तीन भाषांमध्ये साधारणपणे नीट सांगू शकतो.’’ मुलांनी सांगितलं.  

 ‘‘याचा अर्थ भाषेमुळे विचार करायला, मनातलं सांगायला एक रस्ता मिळतो. बरोबर? तुमच्या मते कोणती भाषा मोठी? मराठी? की इंग्रजी, तेलगू, फ्रेंच, स्वाहिली, हिब्रू..? आवडत्या भाषेच्या देशात किंवा राज्यात जन्म घेणं आपल्या हातात आहे का?’’  मुलं हसायला लागली. चर्चेतून निघालं, ‘‘जी भाषा आपल्या जन्मापासून घरात असते, आपोआप येते, ती मातृभाषा आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपण जिथे राहतो, काम करतो, तीही भाषा आपल्याला यावी लागते आणि जास्त भाषांशी संबंध आला की जास्त प्रकारच्या लोकांशी मैत्री होऊ शकते. भाषेत लहानमोठं काही नाही.’’

भाषा, संवाद आणि भावना

स्वत: व्यक्त होण्याचा आणि इतरांशी संवादातून मैत्री जुळण्याचा हा धागा पुढे स्वत:च्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्यापर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवता येतो. यासाठी सर्व शाळांमध्ये पहिली-दुसरीला भाजीवाले, रिक्षाकाका अशा लोकांच्या मुलाखतींचा गृहपाठ असतो. मुलाखती या माध्यमाचा उपयोग पुण्यातल्या ‘अक्षरनंदन’ शाळेत मुलांची भाषिक, भावनिक समज वाढवण्यासाठी सुंदर पद्धतीनं वापरलेला मी पाहिला. रिक्षावाले काका, रस्ता झाडणाऱ्या मावशी वगैरेनंतर पुढे ‘झाडाची मुलाखत’ घ्यायला प्रश्न काढण्याचा गृहपाठ होता. मुलांचे प्रश्न कल्पक होते. ‘खारी तुझ्या अंगावरून जातात तेव्हा गुदगुल्या होतात का?’, ‘विजेच्या तारा तुझ्यावरून जातायत. शॉक बसतो का?’, ‘तुला अंधाराची भीती नाही का वाटत?’

प्रश्नांच्या निमित्तानं मुलं खरं तर झाडाच्या जागी जाऊन विचार करायला शिकत असतात. मग पुढे खोडरबर, फुलपाखरू, जिराफ, सचिन तेंडुलकर, कुणाचीही, कशाचीही मुलाखत घेण्यासाठी प्रश्न काढणं मुलंच सुरू करतात. दुसऱ्याच्या जागी जाण्याचा हा खेळ नकळतपणे ‘एम्पथी’ (सहभावना) शिकवत असतो. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये एम्पथी सर्वात महत्त्वाची. पुढे मोठेपणी यातूनच इतरांशी सलोख्याचे संबंध, ताणतणावाचं समायोजन, आत्मविश्वास, चिकित्सक वृत्ती, सर्जनशील विचार, निर्णयक्षमता, समस्यांचं निराकरण इत्यादी भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू विकसित होऊ शकतात. त्यासाठी भाषा, संवाद आणि सहभावना यांची भूमिका मोठय़ा माणसांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे.

भाषा- अवघड / सोपी    

 ‘‘प्रसन्न उषेच्या दाराशी सूर्यनारायण आपला रथ घेऊन पोहोचू पाहात होते..’’ पहिलीतला मुलगा गोष्टींचं पुस्तक वाचून दाखवत होता. हे अलंकारिक वाक्य ऐकून त्याची आई थबकली.  

‘‘तुला काय समजलं?’’  

 ‘‘कुणी तरी कुणाकडे तरी रथ घेऊन आलं, एवढंच समजलं. रथ म्हणजे काय? असली न कळणारी बोअिरग पुस्तकं कशाला वाचायची?’’ मुलगा खेळण्यांकडे वळत म्हणाला. गाणी-गोष्टींमुळे मातृभाषा रुजायला मदत होते. पण अवघड, अलंकारिक भाषा? मग भाषा आवडेल कशामुळे?

 शब्दांकडून अर्थाकडे – एक प्रयोग

माझ्या मुलीला लहानपणी ‘एका तळय़ात होती बदके पिले सुरेख’ हे ग. दि. माडगूळकरांचं गाणं शिकवलं, तेव्हा तिनं ‘कुरूप’, ‘भोळे’ वगैरे अनोळखी शब्दांचे अर्थ विचारले. अर्थ कळल्यावर त्या वेडय़ा पिल्लाचा एकटेपणा तिला जाणवला असावा. ‘‘ते गाणं नको. मला रडायला आल्यासारखं, कसं तरी वाटतं’’ असं ती म्हणाली.  मग मी गाण्यातल्या ‘बदकाच्या पिल्लाची गोष्ट’ सांगितली. तिला गोष्ट आवडली. वाईट वाटणं थांबलं. ‘त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक’ या ओळीनंतर  त्या पिलाचा आनंद दर वेळी तिच्या डोळय़ात चमकायचा. ते गाणं जेव्हा कुणालाही म्हणून दाखवल्यावर, ‘त्या गाण्याची गोष्ट’ ती आवर्जून सांगायची. शब्दांकडून अर्थाकडे, संभाषणांकडे होणारा प्रवास मराठीला कसं रुजवतो, याचं माझ्यासाठी ते प्रात्यक्षिक होतं.

दोन भाषांचा सांधेबदल

‘आई-बाबांच्या मदतीने आपल्या आवडत्या खेळण्याची माहिती इंग्रजीत वर्गात सांगा,’ असा माझ्या मुलीला बालवाडीत तोंडी गृहपाठ होता. एका खेळण्याबद्दल मराठीत सांग म्हटल्यावर तिनं चार-पाच वाक्यं सांगितली. ती इंग्रजीत करून दिल्यावर तिनं शब्दांचे अर्थ विचारले आणि तिला मज्जाच यायला लागली. खेळणं आवडतं होतं, जे म्हणायचं होतं ते स्वत:चंच होतं. फक्त त्यासाठीचे इंग्रजीतले शब्द तोंडी कळणं एवढीच पहिली पायरी होती. व्याकरण, स्पेलिंग या गोष्टी मध्ये न आल्यामुळे इंग्रजी वाक्यं पटकन आपलीशी झाली. ते पाहिल्यावर ‘The Ugly Duckling’ हे रंगीत चित्रांचं पुस्तक मी आवर्जून आणलं. वाचताना त्या त्या अक्षरावर बोट ठेवत वाचायचं आणि पुढचं वाचण्यापूर्वी आधीची पानं पुन्हा एकदा वाचायची. यामुळे शब्द चित्र-उच्चारासह ठसतात. प्रत्यक्ष वाचता येत नसतानाही डोळय़ांना आणि कानांना भाषा ओळखीची होते. वेडय़ा पिल्लाची गोष्ट तिला माहीतच होती. त्यामुळे इंग्रजी शब्दांचे अर्थ विचारत-सांगत, रोज तीन-चार ओळी असं आम्ही ते पुस्तक हळूहळू वाचलं. मराठी ते इंग्रजीचा सांधेबदल अगदी सहज झाला. ‘मातृभाषा यायलाच हवी’ या इच्छेतून इंग्रजी माध्यमातल्या मुलांचे पालक, परदेशस्थ मराठीजनांचे आजी-आजोबा मुलांना मराठी शिकवायला सुरुवात करतात. मुळाक्षरं, बाराखडीचे तक्ते किंवा लहानपणी आपल्याला आवडलेल्या गोष्टींची पुस्तकं वापरली जातात. अनेकदा त्या सक्तीमुळे, कालबाह्य पुस्तकांशी न जुळल्यामुळे, अनावश्यक आणि अवघड वाटल्यामुळे मुलांना मराठीच नकोशी होते. लहान मुलांना ‘संस्कृतीचा अभिमान’ वगैरे कळत नाही, फक्त ‘मज्जा’ आवडते हे समजून घ्यायला हवं. त्यामुळे गावाच्या भेंडय़ांसारख्या शब्दांच्या भेंडय़ा, शब्दसाखळी, एका शब्दाचे अनेक अर्थ, असे खेळ जेवताना, सुट्टीच्या दिवशी सर्वानी मिळून खेळले, तर मजेतून सहजपणे भाषेची आवड रुजेल. आजी-आजोबांशी ‘बाँडिंग’ही वाढेल. आंग्लाळलेल्या मुलांच्या मोडक्यातोडक्या मराठीला हसणं, चुका काढणंदेखील अनेकदा घडतं. मुलं मग बोलणंच टाळतात. भाषेमुळे होणारी हेटाळणी जशी त्या भाषेसाठी मारक असते, तशीच मुलांच्या आत्मविश्वासासाठीही. त्यामुळे दोघांचीही वाढ खुंटते.

मातृभाषा – एक वातावरण

भाषा हे वाढण्यासाठीचं अवकाश, वातावरण आहे. औपचारिक अभ्यासाच्या पलीकडे, जीवनशैलीपासून ते विचार, व्यक्त होणं आणि आत्मविश्वासापर्यंत मातृभाषेची व्याप्ती पोहोचते. मातृभाषा दिनाच्या निमित्तानं ‘मराठीचं भवितव्य’ वगैरे जागतिक चर्चा करण्यापेक्षा वैयक्तिक स्तरावर आपल्या हातात जे आहे त्यातून पुढच्या पिढीत मराठी रुजण्यासाठी विचार आणि कृती महत्त्वाची वाटते. यंदाच्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाचं सूत्र (थीम) देखील ‘बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन’ हेच आहे. त्यामुळे ‘बहुभाषिक भारतीय’ या आपल्या नैसर्गिक उपलब्धीकडे जाणिवेनं बघू या. भाषासहिष्णू होऊन सर्वागानं वाढू या.