प्रार्थना बेहेरे
मातृत्वाची भावना नेहमीच विशेष, पवित्र आणि अनमोल मानली जाते. प्रत्येक स्त्रीनं आई व्हावंच म्हणून समाजाकडून बाईला गृहीतच धरलं जातं. इतकंच नाही तर मातृत्वाची पूर्तता ही बाळाला जन्म देण्यातच आहे, असाही समज थोपवला जातोच, पण खरंच मातृत्व इतक्यापुरतंच मर्यादित आहे?
माझ्या बालपणीचा एक विचार आजही माझ्या मनात तसाच जिवंत आहे. लहान असताना मला नेहमी वाटायचं की, माझी आई माझ्यासाठी माझा आधार, माझी ताकद आहे. त्याच वेळी मनात असाही एक प्रश्न यायचा की, ज्या मुलांना आईच नाही त्यांचं काय? त्यांचं आयुष्य कसं घडत असेल? त्या विचाराने मनाला खोल स्पर्श केला. मोठं होताना आणखी काही अनुभवांमुळे हळूहळू माझ्या मनात एक ठाम निर्णय आकार घेत गेला, तो म्हणजे मी जैविक आई होणार नाही. कारण मला वाटत होतं, जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आईच्या मायेची गरज आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करावं, त्यांना आधार द्यावा, हीच माझ्या मनातली खरी मातृत्वाची हाक होती.
लग्नानंतर माझ्या जोडीदारासोबतही हाच विचार जुळला. आम्ही दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा आदर करत, मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला. पुढे दत्तक घेण्याचाही विचार होता. मात्र आयुष्याने आम्हाला एका वेगळ्या मार्गावर नेलं आणि आम्ही अनेक प्राण्यांना आपल्या घरी स्थान दिलं. कुत्रे, मांजरी आणि इतर जीव जे खरंच प्रेम, काळजी आणि मायेची अपेक्षा करत होते. आमच्याकडे आज १२ श्वान, १० घोडे आणि ५ गायी आहेत. जी आमची मुलंच आहेत. आधी आम्ही मुंबईत राहायचो, पण जागेचा प्रश्न आला अखेर आमच्या मुलांसाठी अलिबागला कायमचं राहायला आलो. त्यांचा सांभाळ करण्यात, त्यांना हवं नको ते पाहण्यात माझ्या मातृत्त्वाचा आनंद मला मिळतो आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मिळत असलेलं प्रेम मला शब्दात व्यक्त नाही करता येत. आज माझं मातृत्व या सगळ्या प्राण्यांमध्ये फुलतं आहे.
मी बाळाला जन्म दिला नाही, पण याचा अर्थ माझ्यात ‘मातृत्व’ नाही असा अजिबात नाही. उलट, ती भावना आजही तितकीच जिवंत आहे. फक्त तिचा मार्ग वेगळा आहे. माझी ममता, माझं प्रेम, माझं मातृत्व या निरागस जीवांसाठी आहे ज्यांना आईची गरज आहे आणि ते कायम तसंच राहणार आहे. म्हणूनच माझ्या मते, मातृत्व म्हणजे जपणं, प्रेम करणं, आणि कुणासाठी तरी नि:स्वार्थपणे उभं राहणं. आणि ही भावना प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या स्वरूपात फुलू शकते.
chaturang@expressindia.com
