डॉ. स्वरूपा अय्यर-पाटणकर
प्रत्येक गोष्टीची किंमत असते, ती फक्त पैशांतच मोजायची नसते, त्यात शारीरिक, मानसिक, भावनिक किंमतही गृहीत असते. तशीच आईपणाची किंमत. ती प्रत्येक स्त्रीला मोजावीच लागते. ती चांगली की वाईट? हा मुद्दाच नाही. परंतु सहजपणे, नैसर्गिकरीत्या आई होणे याचीही एक किंमत असते आणि तसे न होण्याचीही. म्हणूनच मग अशा अनेक स्त्रिया आधुनिक विज्ञानाच्या मदतीने आई होण्यात धन्यता मानतात. आणि ती किंमत मोजतात. उद्याच्या (१० मे) आंतरराष्ट्रीय मातृदिनानिमित्ताने विशेष लेख…

‘लग्नाला दोन वर्षे झाली, किंवा होत आली की अगदी आजही, ‘‘गुड न्यूज कधी देणार?’’ हा एक प्रश्न मूल नसलेल्या स्त्रियांच्या मनावर किती खोल जखम करतो, हे फक्त त्या स्त्रियाच जाणतात. आपल्या समाजात आजही स्त्रीचं अस्तित्व तिच्या आई होण्याशी जोडलं जातं. खरं तर वंध्यत्व ही कमतरता नाही. तो एक वैद्यकीय प्रश्न आहे. ज्याप्रमाणे इतर आजारांवर उपचार होतात, त्याचप्रमाणे वंध्यत्वावरही उपचार शक्य आहेत. पण समाज, कुटुंबीय, काही वेळा तर अगदी मित्रमैत्रिणीही ती फुरसत त्या जोडप्यांना देतच नाही… इतकी की अनेकींना अपराधी, निराश वाटायला लागतं. आपल्यात काही कमतरता आहे, असं वाटायला लागतं आणि अनेक जोडपी मूल होण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार होतात. त्यातलीच एक ‘आयव्हीएफ’ ( In Vitro Fertilization   अर्थात वंध्यत्वावर उपचार करणारी एक प्रगत तंत्रज्ञान पद्धती) आईपणाचा प्रवास हा फक्त शरीराचा नसतो. तो मनाचा, भावनांचा आणि आशेचा एक दीर्घ प्रवास असतो. 

विशेषत: बाळ जन्माला घालण्यासाठी ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाचा उपचार घेणार्या स्त्रियांसाठी तर हा प्रवास अधिक संवेदनशील, कधी कठीण, कधी शारीरिक वेदनेचा तर कधी अत्यंत सुंदर, इच्छापूर्तीचाही असतो. त्यासाठी आई होण्याची स्वप्ने पाहाणार्या तिला, घ्यायला लागणार्या प्रत्येक इंजेक्शनसोबत एक आशा असते… आणि त्याच्या येणार्या प्रत्येक निकाला (रिपोर्ट)सोबत आशा-निराशेची धडधडही असते. ‘आयव्हीएफ’च्या प्रक्रियेत तिचं शरीर थकतं, पण मन त्याहून अधिक थकलेलं असतं. तरीही, प्रत्येक वेळी ती पुन्हा उभी राहते, कारण तिच्या मनात एकच स्वप्न असतं, आई होण्याचं. अपयश आलं तरी ती कोसळत नाही. ती थांबते, निराश होते, पण पुन्हा उभी राहते. कारण आशा सोडणं तिच्या स्वभावातच नसतं. बहुतांशी या प्रक्रियेत जुळी मुले होतात (नेहमीच नाही) त्यामुळे जुळ्या गर्भधारणेचा प्रवास म्हणजे दुहेरी आनंदासोबत दुहेरी जबाबदारीही तिच्यावर येणार असते. शरीरावर येणारा ताण, वाढलेली काळजी, आणि सततची वैद्यकीय निगराणी हे सगळं सांभाळताना तिचं मन मात्र हळूहळू मजबूत होत जातं. प्रत्येक हालचालीत, प्रत्येक स्पंदनात तिला तिच्या बाळांचं अस्तित्व जाणवतं. आणि तोच तिचा खरा आधार बनतो. पण प्रश्न उरतो. स्त्रिया एवढं सगळं का सहन करतात?

याचं कारण आई होण्याची इच्छा ही फक्त जैविक नसते. ती एक खोल आंतरिक ओढ असते. स्वत:च्या अस्तित्वाचा एक भाग नव्या जिवात पाहण्याची, त्याला वाढताना अनुभवण्याची, आणि नि:स्वार्थ प्रेम देण्याची तीव्र इच्छा त्यांना पुढे नेत राहते. वेदना, थकवा, अनिश्चितता या सगळ्यांपेक्षा त्या एका क्षणाची किंमत त्यांच्यासाठी अधिक मोठी असते.

आज आधुनिक विज्ञानाने, विशेषत: ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाने, लाखो कुटुंबांना नव्या आयुष्याची संधी दिली आहे.  माझ्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत मी अशा कित्येक स्त्रियांना अगदी जवळून बघितले आहे. उद्याच्या (१० मे) आंतरराष्ट्रीय मातृदिना- निमित्ताने, त्याच विज्ञानाने घडविलेल्या या काही खर्या कहाण्या मला सांगायच्या आहेत.

‘‘डॉक्टर, अजून एक प्रयत्न करूया का?’’ समोर बसलेली ३८ वर्षांची मीरा. डोळ्यांत थोडी आशा, थोडी भीती… आणि खूप सारा थकवा. मागे ‘आयव्हीएफ’चे दोनदा केलेले प्रयत्न अपयशी ठरले होते. तरीही तिच्या आवाजात एकच गोष्ट होती…आशा. आजच्या काळात जीवनशैलीतील बदल, उशिरा होणारी लग्नं, करिअरची प्राधान्ये आणि वाढता ताण यामुळे वंध्यत्वाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. प्रत्येक सहापैकी एक जोडपं या समस्येला सामोरं जात आहे.

मला भेटल्यावर प्रियाचाही प्रश्न हाच होता, ‘‘उशीर झालाय, पण आई होण्याची संधी आहे ना?’’ ३६ वर्षांची प्रिया एक यशस्वी आय.टी. प्रकल्प व्यवस्थापक. नोकरीमध्ये झोकून दिलेल्या या मुलीनं लग्न उशिरा केलं. लग्नानंतर मूल व्हावं असं मनापासून वाटत होतं, पण वय वाढत होतं आणि नैसर्गिक गर्भधारणा होत नव्हती. ती माझ्याकडे आली तेव्हा बोलण्यात अपराधभाव होता. जणू उशीर करणं हा तिचा दोष होता. पहिला ‘आयव्हीएफ’  प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा तिला रडू कोसळलं होतं. मनावर निराशा आणि भीती याचा पगडा होता. तेव्हा तिच्याशी शांतपणे बोलावं लागलं होतं. ‘‘प्रिया, तू हरलेली नाहीस, आपण अजून एक प्रयत्न करणार आहोत.’’ दुसर्या प्रयत्नात गर्भधारणा झाली. आज तिचा मुलगा तीन वर्षांचा आहे. ती नेहमी म्हणते, ‘‘माझ्या करिअरने मला घडवलं, आणि ‘आयव्हीएफ’ने मला आई बनवलं. दोन्हीसाठी मला खेद नाही.’’

सुमती आणि राजेश सात वर्षांपासून पालक होण्याची वाट पाहत होते. दोन्ही बाजूंनी तपासण्या झाल्या होत्या. समस्या राजेशची होती. शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गुणवत्ता कमी होती. राजेश खूप अवघडलेला होता. ‘‘माझ्यामुळे सुमतीला हे सहन करावं लागतंय.’’ असा अपराधभाव त्याच्या मनात होता. सुमती शांतपणे म्हणाली, ‘‘आम्हाला दोष कोणामध्ये आहे हे शोधायचे नाहीये, उपाय हवा आहे.’’  ICSI ( Intracytoplasmic Sperm Injection)  या ‘आयव्हीएफ’ च्या प्रगत तंत्राने एकाच शुक्राणूचा उपयोग करूनही गर्भधारणा शक्य असते. आम्ही तेच केलं. पहिल्याच प्रयत्नात सुमतीला जुळी मुलं झाली. ‘‘आम्हाला ‘आयव्हीएफ’ने फक्त मुलं दिली नाहीत, एकमेकांवरचा विश्वास आणखी घट्ट केला.’’सुमती आणि राजेशने जाताना सांगितलं.

नंदिनी आणि सुरेश यांची कहाणी सांगताना मलाच भरून येतं. नंदिनी आणि सुरेश यांचा १८ वर्षांचा मुलगा अपघातात गेला. त्यांचं हसतं खेळतं आयुष्य एका क्षणात थांबलं. एका वर्षानंतर ते माझ्याकडे आले. सुरेश म्हणाले, ‘‘डॉक्टर, वय झालंय आमचं, पण पुन्हा आई-बाबा होणं शक्य आहे का?’’ नंदिनी तेव्हा ४२ वर्षांची होती. ‘डोनर एग आयव्हीएफ’च्या मदतीने आम्ही प्रयत्न केला. दुसर्या प्रयत्नात यश आलं. त्यांच्या हातात बाळ आलं तेव्हा ते व्यक्त करायला शब्दच नव्हते. ‘‘आम्हाला फक्त बाळ मिळालं नाही, हरवलेलं जगणं परत मिळालं,’’ या त्यांच्या भावना होत्या.

 अर्थात ‘आयव्हीएफ’ हे आशेचं विज्ञान जरी असलं तरी तो प्रवास सोपा नसतो. आर्थिक, शारीरिक आणि भावनिक अशा तिन्ही पातळ्यांवर तो आव्हानात्मक असतो. त्रास असतो, कष्ट असतात, खर्चही असतो. मात्र अनेकांसाठी ती त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी केलेली गुंतवणूक असते.  ‘आयव्हीएफ’ प्रमाणेच आधुनिक विज्ञानाचा आणखी एक शोध म्हणजे ‘एग फ्रीजिंग’ म्हणजेच स्त्रीबीज गोठवणं. २९ वर्षांची अंजली माझ्याकडे आली. म्हणाली, ‘‘डॉक्टर, मला आत्ता मूल नको आहे.

मला माझं एमबीए पूर्ण करायचं आहे, परदेशात काम करायचं आहे. पण भविष्यात आई व्हायचं स्वप्न आहे. माझ्याकडे वेळ आहे का?’’ हा प्रश्न आजच्या अनेक तरुण स्त्रियांच्या मनात असतो, पण बोलायला धाडस लागतं. मी तिला ‘एग फ्रीजिंग’बद्दल सांगितलं. वयाच्या विशीत आणि तिशीत स्त्रीबीजांड सर्वात निरोगी असतात. ती आत्ता गोठवून ठेवली तर भविष्यात  ३५ ते ४० व्या वर्षीही त्यांचा उपयोग करून कुणीही आई होऊ शकते. अंजलीने ते स्वीकारलं. ती लंडनमध्ये काम करते. नुकताच तिचा निरोप आलाय.

‘‘डॉक्टर, मी परत येतेय. आता तयार आहे!’’ थोडक्यात, करिअर की आईपण? यात निवड करायची गरज नाही, असं मला वाटतं. विज्ञान तुमच्या बाजूने आहे. फक्त वेळेत माहिती घ्यायला हवी. शिवाय कोणताही उपाय हा १०० टक्के यशस्वी असेलच असेही नाही. पण संततीप्राप्तीसाठी विज्ञान रोज नवे दरवाजे उघडत आहे. मात्र त्याच्या यशापयशाची नीट माहिती करून घेणं, शारीरिक, मानसिक ताणतणावाची माहिती करून घेणं आणि सर्वांत महत्त्वाचं आर्थिक गणित समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

   स्त्रीच्या शरीरात जन्मापासूनच स्त्री बीजांचा/बीजांड्यांचा एक मर्यादित साठा असतो. वय वाढत जातं तसा तो साठा कमी होतो आणि त्या अंड्यांची गुणवत्ताही कमी होते, आई होण्याची शक्यताही कमी होत जाते आणि उपचाराला वेळही अधिक लागतो, पैसे खर्च होतात आणि भावनिक थकवाही जास्त असतो. हे एक जैविक वास्तव आहे. त्याची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. पालक होण्याची, आईपणाची किंमत असते परंतु ती पैशांत नाही. ती आहे, आशा, जिद्द, धैर्य आणि विश्वास. आणि आज या सगळ्यांच्या जोडीला आहे, विज्ञान.

 ज्यांना हा प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी विज्ञानाने आशेची दारं उघडी ठेवली आहेत. एकट्याने लढू नका. वेळेत तज्ज्ञांची मदत घ्या.

आईपणाचा हा प्रवास तिला केवळ आई बनवत नाही, तर तो तिला अधिक कणखर, संवेदनशील आणि अधिक जिवंत बनवतो.

आणि सरते शेवटी, तिच्या हातात येणारं ते छोटंसं जीवन, तिच्या प्रत्येक वेदनेला अर्थ देऊन जातं. कारण शेवटी आईपण ही निवड नसते, ती एक आंतरिक हाक असते.त्या हाकेला उत्तर देण्यासाठी स्त्री कोणतीही किंमत मोजायला तयार असते.

(लेखिका वरिष्ठ ‘आयव्हीएफ’ सल्लागार व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.)

uiyerswarupa@gmail.com