डॉ. गीतांजली राणे-घोलप

उद्या ‘मदर्स डे’ अर्थात ‘मातृदिन.’  निसर्गनियमानुसार सृष्टीचं अबाधित्व तिच्या मातृत्वामुळेच टिकत असतं. मातृत्व हे स्त्रीच्या जगण्याचा अपरिहार्य भाग आहे, या विचारामध्ये आता आतापर्यंत दुमत नव्हतं. मात्र पुरुषप्रधान मानसिकतेची झळ पोहोचलेली आणि उच्चशिक्षण, करिअरला प्राधान्य देणारी मुलींची पिढी या मातृत्वाला प्रश्न विचारू लागली, ‘कधी, किती आणि का?’ आणि आतापर्यंत महत्त्वाची असणारी आईपणाची जबाबदारी अधिक आव्हानात्मक ठरू लागली.. काय विचार करते आहे आजची तरुणी आईपणाविषयी..

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

आपल्या समाजानं मातृत्व या संकल्पनेभोवती खूप काही महन्मंगल रचून ठेवलेलं आहे. आईला त्यागाचा, प्रेमाचा, सहनशीलतेचा पुतळा मानून एका विशिष्ट चौकटीत बंद करून टाकलं आहे. मात्र काळानुसार बदलत्या मानसिकतेनं या मातृत्वाच्या संकल्पनेला खिंडारं पाडायला सुरुवात केली. एखादी स्त्री आई असली तरी ती आधी बाई असते, एखादी व्यक्ती असते. तिला तिच्या भावभावना, प्राधान्यक्रम आहेत, हे कळायला सुरुवात झाली. पण ते समाजाला पचवणं, छे, घट्ट रूढीत अडकलेल्या मनापर्यंत पोहोचणंही अवघड होतं. पण काळ बदलतो आहे. आजच्या तरुणी आईपणाकडे, मातृत्वाकडे पारंपरिक पद्धतीनं पाहात नाहीत. आई व्हायचं की नाही आणि व्हायचंच असेल तर केव्हा, कधी, कसं अशा वेगवेगळय़ा पातळय़ांवरून आईपणाचा विचार होतो आहे. काही तरुणींना या विषयावर बोलतं केलं. त्याचा हा गोषवारा.

पेशानं वकील असलेल्या नेहा सावंत-मोरे हिच्याशी या विषयावर संवाद साधला असता ती म्हणाली, ‘‘आई होणं म्हणजे एखाद्या कुटुंबाला पूर्णत्वाच्या आनंदाची नैसर्गिक भेट देणं. म्हणूनच ‘आई होणं’ ही माझ्या दृष्टीनं खूप मोठी आणि पिढय़ानपिढय़ा चालत आलेली, काळानुसार बदलत जाणारी महत्त्वाची जबाबदारी आहे. माझ्या दृष्टीनं ही जबाबदारी सगळय़ाच दृष्टीनं आव्हानात्मक आहे, परंतु मानसिकदृष्टय़ा अधिक. कारण एकदा आई झाल्यानंतर तुमचं जग हे तुमच्या किंवा तुम्हा नवरा-बायकोपुरतं मर्यादित राहात नाही, तर एक नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार असते आणि तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार असतो. सध्याची फास्ट आणि ‘करिअर ओरिएंटेड लाइफस्टाइल’ बघता स्वत:साठी पुरेसा वेळ देता येत नाही, अशी अवस्था अनेकांची होते. अशा वेळी पूर्ण एका व्यक्तीची जबाबदारी, तिही तिच्या जन्मापासून अगदी १०० टक्के घ्यावी लागणार असल्यानं आई होण्याचा विचार करताना सगळं नीट सांभाळता येईल ना, अशी शंका छळतेच. मला एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे या विषयावर अनेकांच्या घरी मोकळेपणानं बोलणं होतच नाही. अगदी नवरा-बायकोतही नाही आणि घरातल्या ज्येष्ठांबरोबरही नाही. आई तर व्हायचंय, पण ते मूल मोठं होईपर्यंत मलाच ते सांभाळायचं आहे. मी करू शकेन ना, हा प्रश्न अगदी मलासुद्धा भेडसावतो. माझ्या आईनं निभावलेलं आईपण माझ्या विचारांच्या आड येत नाही, पण हा विचार मात्र माझ्या मनात नक्कीच येतो, की तिनं आई म्हणून नोकरी करून ज्या पद्धतीनं मला उत्तमरीत्या वाढवलं, त्या प्रकारचं मातृत्व मी माझ्या अपत्याला देऊ शकेन का? आणि माझ्या मनात माझ्याविषयीच शंका येते आणि भय दाटतं. दुसरा एक मुद्दा म्हणजे घरच्या लोकांच्या दबावाखाली येऊन कुटुंबनियोजन न करणं अजिबात योग्य नाही. कुटुंब वाढवण्याआधी तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची शारीरिक अवस्था, मानसिक स्वास्थ्य या सगळय़ाचा विचार करणंदेखील तितकंच महत्त्वाचं आहे.’’

नेहासारखाच विचार सामाजिक क्षेत्रात काम करणारी अमृता भूषण काळहाने-शिंदेदेखील मांडते. तिच्या मते, ‘‘आई होणं ही कौटुंबिक जबाबदारी असली तरी सर्वाधिक जबाबदारी आईचीच असते. बाळाचं संगोपन, पालनपोषण करणं आणि त्याला स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आवश्यक ती दिशा दाखवणं, आयुष्यातले चढउतार स्वीकारायला शिकवणं, त्यातून परिस्थितीवर मात करणं, हे आई म्हणून मला करावं लागणारच. त्यामुळे मातृत्व शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ाही आव्हानात्मक आहे. आजच्या धावपळीच्या जगण्यात सगळय़ाचा समतोल राखणं कसरतीचं काम आहे. तरीदेखील मानसिकदृष्टय़ा खंबीर राहून मातृत्व स्वीकारायला काहीही हरकत नाही. आणि प्रश्न राहिला करिअरचा, तर माझ्या मते, जर आपण आपलं शिक्षण, करिअर या जबाबदाऱ्या कुटुंबाच्या साथीनं पूर्ण करू शकतो, तर मातृत्वासारखी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करण्यात कुटुंबाची साथ का मिळणार नाही? योग्य साथ असेल, तर या गोष्टी अगदी सहजपणे साध्य करता येऊ शकतात. शिवाय करिअरसाठी मूल होऊ न देण्याचा विचार म्हणजे स्वार्थीपणा झाला. आपल्याला सृष्टी जगवायची असेल तर मुलं होणंदेखील गरजेचं आहे आणि मुलं ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत, त्याला आपण नाकारू शकत नाही.’’

माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारी तन्वी बालिगा म्हणते, ‘‘मातृत्त्व ही एकटय़ा त्या तरुणीची जबाबदारी नसून ती त्या बाळाला जन्म देणाऱ्या आई-वडील अशा दोघांचीही असते. माझ्या मते, बाळामुळे करिअर आणि बाकीच्या गोष्टींना ब्रेक लागू शकतो, पण तो काही काळापुरता. अशा गोष्टी पूर्ण थांबत नसतात. आणि जर जोडीदाराची योग्य साथ असेल तर करिअरला कुठेही अडथळा न येता उत्तम मातृत्व निभावता येऊ शकतं. आपल्याकडे आजही आपण ‘मुलं कशी सांभाळायची’ याचा विचार करताना आपला जोडीदार, आई-वडील, सासू-सासरे यांना गृहीत धरत असतो, पण परदेशात तर मोठय़ा संख्येनं स्त्रिया एकल मातृत्व योग्य करिअर करून यशस्वीरीत्या निभावताना दिसतात. त्यामुळे माझ्या मते, मातृत्व ही काही यशस्वी करिअरच्या आड येणारी बाब नसावी.’’

नेहा, अमृता, तन्वी यांच्यापेक्षा वेगळी मतं मांडली ती प्राची मोहिते आणि अदिती पाटील यांनी. त्यांच्यानुसार आईपण हे गंभीरपणे स्वीकारण्याची गरज आहे म्हणूनच प्राची आणि अदिती यांनी जैविक मातृत्वाला सध्या तरी विशेष महत्त्व न देता प्राणी संगोपनाला महत्त्व दिलेलं आहे. त्यात त्या त्यांचं मातृत्व पाहातायत. जाहिरात क्षेत्रात काम करणारी प्राची मोहिते म्हणते, ‘‘काही महिन्यांपूर्वी मी एक मांजरीचं पिल्लू दत्तक घेतलं. बघता बघता ते माझं मूल आणि मी त्याची आई झाले. आपलं मूल आपल्या डोळय़ांसमोर नसेल किंवा त्याला कोणत्याही कारणानं वेदना होत असतील तर काळीज किती विचित्र प्रकारे तुटतं, याचा अनुभव मला रोज येतो. कोणीतरी आपलं, हक्काचं या जगात आहे, हे एका आईलाच आपल्या बाळाकडे बघून वाटत असावं. एका छोटय़ा पिल्लासाठी माझी इतकी तळमळ होत असेल आणि त्याला सांभाळणं जर तुलनेनं सोपं असेल, तर आई होण्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. माझ्या दृष्टीनं बाळंतपण म्हणजे करिअरला एक तर स्वल्पविराम किंवा पूर्णविराम! आधी हा एवढा मोठा त्याग आणि मग ते मूल झाल्यानंतर त्याचं संगोपन, संस्कार, शिक्षण इत्यादी करताना फक्त आर्थिक नाही तर शारीरिक, मानसिक जबाबदारीही वाढते. त्यात आपली भारतीय लग्नसंस्था, सासू-सासरे, कुटुंब, या सगळय़ांतून त्या बाळाकडेही लक्ष देताना आईची मात्र तारेवरची कसरत होते. जी पिढय़ानपिढय़ा अनेक स्त्रिया करत आल्या आहेत. मग या सगळय़ांतून उसंत मिळाली तर करिअर करायचं. त्यामुळे इतकी वर्ष अभ्यास करून मिळवलेली नोकरी मुलांच्या संगोपनासाठी अशी सहज जाऊ देणं मला कितपत जमेल हे निदान आत्ता नाही सांगता येणार. मी अविवाहित आहे. मी भविष्यात कधी आई होण्याचा विचार करेन की नाही किंवा केला तरी चांगली आई बनू शकेन की नाही माहीत नाही, या प्रश्नांत मी आजही आहे त्यामुळे मी मूल होण्याकडे ‘प्रॅक्टिकली’ बघायचं ठरवलंय. मला वाटतं, बाळंतपणात फक्त काहीच महिने जातात, परंतु मुलांना त्यांच्या पायावर उभं होण्यासाठी तयार करण्यापर्यंतचा काळ खूप मोठा असतो. मातृत्व जितकं सुखद आहे तितकंच आव्हानात्मकदेखील आहे! आणि ही गंभीर जबाबदारी मला पेलवेल का, याबाबत मी सध्या तरी साशंक आहे.’’

प्राचीप्रमाणेच विचार करणारी अदिती पाटील म्हणते, की ‘‘माझी आई, आजी आणि ताई या तिघी माझ्यासाठी माझ्या सर्वात महत्त्वाच्या प्रेरणा आहेत.  माझ्या आजीनं त्या काळात सर्वाशी लढून माझ्या आईला शिकवलं. शिवाय ती स्वत: ‘पोस्ट मास्टर’ होती. बुरसटलेल्या विचारांच्या फसव्या जाळय़ात न अडकता आपल्या मुलांना उत्कृष्ट घडवायचं आणि मोठं बनवायचं या तिच्या स्वप्नांमुळे, तिच्या प्रयत्नांमुळे आज तिची मुलं आपापल्या जागी मोठय़ा पदावर कार्यरत आहेत. ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश म्हणजे मातृत्वाची व्याख्या मी माझ्या आजीच्या कृतीतून अनुभवली आहे. एक आई तेव्हाच जन्माला येते जेव्हा तिचं मूल जन्माला येतं. आई होणं काय असतं हे मी पहिल्यांदा अनुभवलं, जेव्हा माझ्या घरी मी एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आणलं. तो जरा जरी दिसेनासा झाला, की माझ्या हृदयाचे ठोके वाढायचे, कोणी त्याच्याविरुद्ध बोललं, की मला राग यायचा. आता ही सगळी मातृत्वाची लक्षणं नाहीयेत का? काही लोक मला म्हणतात, मी अति करते. प्राण्याला काय बाळासारखं जपतेस? मी म्हणते, का नको? माझ्या मते मातृत्वाला कुठलंही बंधन नसतं. मातृत्व हे स्त्री असण्याचं सर्वात मोठं सुख आहे. आपल्या पोटात नऊ महिने एक जीव मोठा होतोय ही अनुभूती जगात भारी असेल. पण बदलत्या काळात मुलांना मोठं करणं, योग्य संस्कार देणं पूर्वीसारखी फक्त बाईचीच जबाबदारी नसून आपल्या जोडीदाराचीही असते. एक मुलगी म्हणून मलाही प्रश्न पडतात, की भविष्यात नोकरी सांभाळताना करिअरशी तडजोड करावी लागेल का? माझा जोडीदार मातृत्वाच्या प्रवासात मला साथ देईल का? तो आपल्या बाळासाठी आईसारखं करिअरमध्ये तडजोड करू शकेल का? हे सगळे प्रश्न मला विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे माझ्या मते, मातृत्वाच्या प्रक्रियेत स्त्री आणि पुरुष समान स्थानी असले पाहिजेत. एक मूल जन्माला येतं तेव्हा आणखी दोन व्यक्तींचा जन्म होतो आई आणि बाबा. येणाऱ्या काळात कदाचित पालकत्व निभावणं कठीण असेल. पण जर सोबतीला तुमचा परिवार, जोडीदार समजूतदार असेल तर ती प्रक्रिया जरा सोपी होते.’’

  या सगळय़ा तरुणींची त्यांची त्यांची मतं आहेत आणि ती त्यांनी व्यक्तही केलीत, पण अनेक मुलींनी नाव न सांगण्याच्या अटीवर हेदेखील सांगितलं, की वयाची ३० ते ३५ वर्ष शिक्षण, करिअर हे सगळं स्थिरस्थावर करण्यात खर्ची करण्यात घालवायची. त्यानंतर आयुष्याला स्थैर्य हवं म्हणून घर घेण्यासाठी एक मोठी रक्कम उभी करायची आणि या सगळय़ात एखाद्या मुलाचा विचार करणं हे या मुलींच्या दृष्टीनं आर्थिक आणि मानसिकदृष्टय़ा थकवणारं असतं. अनेकदा सामाजिकदृष्टय़ा दबाव टाकला जातो, की आता स्थिरस्थावर झालात तर मुलाचा विचार करा. हा विचार अशासाठी, की तुमच्या म्हातारपणात तुम्हाला आधार झाला पाहिजे. पण जर आम्ही स्वत:च्या पायावर व्यवस्थित उभे आहोत, तर निव्वळ स्वत:च्या म्हातारपणाची सोय यासाठी म्हणून एखादं मूल जन्माला का घालावं, असा प्रश्नदेखील मुली उपस्थित करत आहेत.

आताच्या तरुण वर्गामध्ये स्वकेंद्रितपणा वाढीस लागतोय. हा वयोगट मी, माझं, मला या कोषाभोवती आयुष्याचं गणित आखू लागलाय. स्वकेंद्रित असणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. पण मला स्वत:चं आयुष्य नीट जगता येईल ना? हा विचारसुद्धा त्याभोवती दिसून येतोय. आणखी एक बाब या लेखाच्या निमित्तानं निदर्शनास आली, ती म्हणजे, ज्या मुलींना करिअर महत्त्वाचं वाटतं, पण मातृत्वदेखील हवं आहे त्या जैविक मातृत्वाचा विचार न करता प्राणी संगोपनाचा नवीन विचार अमलात आणताना दिसून येतायत. कदाचित या गोष्टी कालांतरानं समाजव्यवस्था बदलण्यासही कारणीभूत ठरू शकतील.

वय वर्ष २० ते २५ वयोगटांतल्या या मुलींशी बोलल्यानंतर काही गोष्टी प्रकर्षांनं समोर आल्या, त्या म्हणजे करिअरला, शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या या मुलींपैकी अनेक जणी विवाहसंस्था नाकारून ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’सारख्या पर्यायाचा विचार जरी करत असल्या, तरी मातृत्व ही संकल्पना या मुली नाकारत नाहीत, हीदेखील सकारात्मक बाब आहे.

rane.geet@gmail.com